Leading International Marathi News Daily                                  बुधवार, २१ जानेवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

‘शवविच्छेदन अहवालानंतर हत्तिणीच्या मृत्यू प्रकरणात चौकशी करू’
सावंतवाडी, २० जानेवारी/वार्ताहर

 

आंबेरी नियजे येथे जंगली हल्ली पकडण्याच्या मोहिमेप्रसंगी हत्तिणीचा मृत्यू झाला. त्याबाबतचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंर चौकशीबाबतचे धोरण ठरविले जाईल, असे वनमंत्री बबनराव पाचपुते यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत सांगितले असल्याची माहिती माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी दिली.
वनमंत्री बबनराव पाचपुते यांच्या मंत्रालयीन दालनात झालेल्या बैठकीस सिंधुदुर्गचे पालकमंत्री मदन पाटील, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, वनविभागाचे प्रधान सचिव डांगे, मुख्य वनसंरक्षक मुझुमदार आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्गात कर्नाटकातून आलेल्या जंगली हत्तींना पकडण्यात येत आहे. हत्तिणीचा मृत्यू झाल्याने मोहीम थांबविली गेली असली तरी ती पुनश्च आठ दिवसांत सुरू होईल, असा विश्वास वनमंत्र्यांनी या बैठकीत दिला.
हत्तिणीचा मृत्यू अतिसारामुळे झाला आहे, तसेच हत्ती हा प्राणी शाकाहारी आहे. हत्तिणीला बांधून ठेवल्याने तिच्या मनावर शॉक निर्माण झाला, तेही एक कारण मृत्यूमागे असल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले असल्याचे वनमंत्र्यांनी बैठकीत सांगितले. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या हत्तिणीच्या मृत्यूमागचे नेमके कारण उघड होईल. त्यानंतरच हत्ती मृत्यूबाबत चौकशीचे धोरण ठरविले जाणार आहे, असे या बैठकीत वन खात्याच्या अधिकाऱ्यांचा हवाला देऊन वनमंत्र्यांनी स्पष्ट केले.
या जंगली हत्तींनी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. त्यामुळे हत्ती पकडण्याची मोहीम सुरू झाली, ती थांबविली जाऊ नये, या मताचे आहोत, असे या बैठकीत सांगितल्यावर येत्या आठ दिवसांत पुनश्च मोहीम हाती घेण्याचे आश्वासन वनमंत्र्यांनी दिले. हत्ती हटाव मोहिमेच्या दरम्यान हत्तीण मृत्युमुखी पडल्याने माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी मुंबईत जाऊन वनमंत्री व पालकमंत्री यांची संयुक्त बैठक तातडीने बोलवावी, अशी आग्रही मागणी करताच ही बैठक घेण्यात आली, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, हत्तीण मृत्यूबाबत संशयाचे वातावरण असले तरी अतिसार व शॉकमुळेच तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज शवविच्छेदन करणाऱ्या स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.