Leading International Marathi News Daily                                  बुधवार, २१ जानेवारी २००९
राज्य

नाशिकमधील ३०० टॉवर्सवर कारवाईची शक्यता
नाशिक, २० जानेवारी / खास प्रतिनिधी

महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ठिकठिकाणी विनापरवाना उभारण्यात आलेल्या सुमारे ३०० टॉवर्स विरुद्ध पालिकेने मोहिम हाती घेतली असून संबंधितांना अंतिम नोटीसा बजावण्याची कार्यवाही पूर्ण केली आहे. अशा विनापरवाना टॉवर्स पैकी सुमारे १०० प्रकरणे परवानगीसाठी पालिकेकडे आल्यानंतर आता त्यातून तब्बल दीड ते दोन कोटींची वसुली होवू शकते अशी माहिती पालिकेच्या सूत्रांनी येथे दिली.
नाशिक महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील रहिवाशी इमारती, व्यापारी संकुल वा काही खासगी जागांमध्ये मोठय़ा प्रमाणात टॉवर्स उभारण्यात आले आहेत.

अनधिकृत बांधकाम करणाऱ्या नगरसेवकांना ठाणे महापालिकेचेच अभय
ठाणे, २० जानेवारी/ खास प्रतिनिधी

एकीकडे अनधिकृत बांधकामाबाबत न्यायालय आणि राज्य सरकारने कठोर भूमिका घेत अनधिकृत बांधकाम करणारे नगरसेवक आणि त्यांना साथ देणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची भूमिका घेतली आहे, तर दुसरीकडे मात्र अनधिकृत बांधकाम करणाऱ्या नगरसेवकांना अभय देण्याची भूमिका ठाणे महापालिकेने घेतली आहे. सत्ताधारी पक्षाला निवडणुकीत केलेल्या मदतीची परतफेड म्हणून या नगरसेवकांना कायद्यातील पळवाटा शोधत वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचे आढळून आले आहे.

‘श्वास’ कार अरुण नलावडे यांच्या आगामी चित्रपटाची अलिबागेत होणार निर्मिती
अलिबाग, २० जानेवारी/ प्रतिनिधी

पाच वर्षांपूर्वी अलिबागमध्ये आलो़ अलिबागेतच सज्जनांचा सहवास लाभला़ सांस्कृतिक चळवळ ही जीवनाचे अविभाज्य अंग आहे, हे येथे जोपासताना पाहायला मिळत़े मुंबईसारखी मोठी शहरे आपल्या स्वत:च्या सांस्कृतिक चेहऱ्याकडे पाहतच नाहीत़ ग्रामीण भागानेच सांस्कृतिक चळवळ जिवंत ठेवली आहे, आणि म्हणूनच ‘श्वास’ नंतर पुढची भरारी घेणारा आगामी चित्रपट याच अलिबागेत, स्थानिक कलाकारांच्या सहभागातून आपण तयार करणार असल्याची घोषणा ‘श्वास’कार अरुण नलावडे यांनी येथे नुकतीच केली आह़े

चेतना मॅरेथॉन-२००९ मध्ये नीलम कदम व मनोज म्हात्रे सर्वप्रथम
अलिबाग, २० जानेवारी/ प्रतिनिधी

चोंढी येथे आयोजित १९ व्या चेतना मॅरेथॉन-२००९ या स्पध्रेत महिलांच्या खुल्या गटात कु. नीलम कदम (उरण-जिमखाना) हिने १० कि.मी. अंतर ३६ मिनिटात तर तर पुरुष खुल्या गटात कु. मनोज म्हात्रे (उरण-चिरनेर कॉलेज) याने २१ कि.मी. हे अंतर १ तास ७ मी़ ५४ से. अशा विक्रमी वेळेत पार करून अजिंक्यपद पटकाविल़े चेतना क्रीडा मंडळ ही संस्था रायगड जिल्ह्यातील नावाजलेली संस्था असून, गेली १८ वष्रे रायगड जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने मॅरेथॉन स्पध्रेचे आयोजन करण्यात येते.

‘एटीव्हीएम’द्वारे मिळणाऱ्या रेल्वे पासविषयी सावधानतेचा इशारा
पंकज ओसवाल यांचे निवेदन

कर्जत, २० जानेवारी/वार्ताहर

ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीनच्या माध्यमातून म्हणजेच ‘एटीव्हीएम’द्वारे काही दिवसांपासून दिल्या जाणाऱ्या रेल्वे पाससंबंधी कर्जतमधील सामाजिक कार्यकर्ते आणि कर्जत रेल्वे प्रवासी संघाचे सदस्य पंकज ओसवाल यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाला सावधानतेचा इशारा दिला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी या यंत्रणेत असलेली त्रुटी दूर करावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

१२ कोटी खर्च झाले, तरीही २६ पैकी २५ ‘जलस्वराज्य’ प्रकल्प पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत
जितेंद्र पराडकर
संगमेश्वर, २० जानेवारी : दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की, पाणी टंचाईची मोठी चणचण जाणवू लागते. गावागावातून महिला डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन मैलोन् मल अंतराची पायपीट करीत असल्याचे करुणाजनक दृश्य आजही दुर्दैवाने पाहायला मिळतंय. पाणी योजनांवर आजवर कोटय़वधी रुपयांचा निधी खर्च झाला, यावर अखेर जागतिक बँकेच्या सहकार्याने ‘जलस्वराज्य’ ही नवीन पाणीपुरवठा योजना महाराष्ट्रात राबविली जात असून, संगमेश्वर तालुक्यात एकूण २६ जलस्वराज्य प्रकल्प राबविले जात असले, तरी प्रत्यक्षात केवळ माभळे येथील एकमेव योजनेचे उद्घाटन करण्यात यश मिळाले आहे.

ठाणे पोलिसांच्या नोटिशीमुळे राज ठाकरे यांची सभा अडचणीत?
ठाणे, २० जानेवारी/प्रतिनिधी

ठाण्यात २४ जानेवारी रोजी होणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेवर सर्व राजकीय पक्षांचे लक्ष केंद्रित झाले असताना त्यांनी सभेत प्रक्षोभक भाषण करू नये, यासाठी उद्या नोटीस बजाविण्यात येणार असून ठाण्यातील मनसेच्या इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजाविण्यात आल्या असल्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्त अनिल ढेरे यांनी
मुंबईच्या अतिरेकी हल्ल्यानंतर राज ठाकरे यांच्यावर सामाजिक संस्था व राजकीय नेत्यांकडून टीका करण्यात आली होती. त्याचे उत्तर ठाण्यातील २४ जानेवारीच्या सभेत देण्याची घोषणा ठाकरे यांनी केली आहे. गडकरी रंगायतनमधील एका कार्यक्रमात त्याचे ट्रेलर दाखविल्यामुळे पोलीस सतर्क झाले आहेत. २४ जानेवारी हा उत्तर प्रदेशाचा स्थापन दिनी असल्यामुळे राज यांनी सभेसाठी हा मुहूर्त निवडला आहे. या सभेत मराठी व अमराठी विषयावर राज यांचे प्रक्षोभक भाषण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दोन समाजात तेड निर्माण करणारे भाषण होऊ नये म्हणून ठाणे पोलिसांनी मनसेचे जिल्हा संघटकांपासून इतर प्रमुख कार्यकर्त्यांना कलम १४९ अंतर्गत नोटिसा बजाविल्या आहेत. अशा प्रकारची नोटीस मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही बजाविली जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त ढेरे यांनी दिली.

चित्रकला शिक्षकांचे रंग मान्यतेअभावी पडले फिके
पुणे, २० जानेवारी/खास प्रतिनिधी

पहिली ते सातवीच्या प्राथमिक स्तरावरील इयत्तांसाठी चित्रकला शिक्षक या पदाला मान्यता देण्याची मागणी जिल्हा कलाध्यापक संघाने केली आहे. त्याचप्रमाणे कलाशिक्षक होण्यासाठीची ‘आर्ट टीचर डिप्लोमा’ ही पात्रताही बदलावी, असे संघाने म्हटले आहे. चित्रकला शिक्षकांच्या मागण्यांबाबतचे निवेदन शालेय शिक्षणमंत्री डॉ. पतंगराव कदम आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांना नुकतेच देण्यात आले. त्याबाबत संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले, की पहिली ते आठवी या इयत्तांना चित्रकला हा विषय सक्तीचा आहे. त्यामुळेच त्यासाठी पूर्णवेळ व मंजुरी प्राप्त असलेला शिक्षक नेमण्याची मागणी कित्येक वर्षांपासून करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या चित्रकला शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून बढती द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. कलाशिक्षक म्हणून सेवेत रुजू होण्यासाठीची पात्रता असलेला कला शिक्षण प्रशिक्षण पदविका अभ्यासक्रम (आर्ट टीचर डिप्लोमा) हा कालबाहय़ झाला असून त्याऐवजी सुधारित अभ्यासक्रम तयार करावा किंवा ही पात्रता बदलावी, अशी मागणीही संघाने केली आहे. चित्रकला शिक्षकांना मंजुरी देण्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन उभय मंत्रिमहोदयांनी दिल्याची माहिती संघातर्फे देण्यात आली.

दहावी-बारावी परीक्षेसाठी लोडशेडिंगमध्ये कपात
ठाणे, २० जानेवारी/प्रतिनिधी

राज्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सलग आठ तास वीज उपलब्ध करण्यासाठी भारनियमनात कपात करण्यात आली असून कपातीच्या नवीन वेळापत्रकाचे नियोजन करण्यात येत आहे. तसेच दहावी-बारावी परीक्षेच्या काळात भारनियमन कमी करणार असल्याची घोषणा ऊर्जा मंत्री सुनील तटकरे यांनी आज ठाण्यात केली. ठाणे महापालिका आणि इक्ले, साउथ एशिया यांच्या संयुक्त विद्यमाने 'ऊर्जा कार्यक्षमता व अपारंपारिक ऊर्जा वापर' या विषयावर आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलताना तटकरे यांनी भारनियमनाच्या कपातीची घोषणा केली. ते पुढे म्हणाले, केंद्रीय मंत्री शरद पवार व मुरली देवरा यांच्या प्रयत्नानंतर प्रकल्पांना मुबलक कोळसा व गॅस उपलब्ध झाल्याने मागील दोन महिन्यांत राज्याला ९०० मॅगाव्ॉट अतिरिक्त वीज मिळू लागली आहे. सिंगल फेज व फिडरमध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांना सलग आठ तास वीज देण्यासाठी नियोजन सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर दहावी आणि बारावी परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना वीज भारनियमनाचा फटका बसू नये, याची काळजी घेतली जाणार आहे. परीक्षेच्या काळातील भारनियमनात आणखी कपात केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. जुन्या यंत्रणांमध्ये सुधारणा व वीज उत्पादनाच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी ४५०० कोटी रुपयांचे पॅकेज निर्माण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

घोडबंदर रोडवर दोन महिला ठार
ठाणे, २० जानेवारी/ प्रतिनिधी

घोडबंदर रोडवर भाईंदर पाडा येथे रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोन महिला ठार झाल्या. ही घटना आज सकाळी घडली. मोतीबाई पवार आणि तानीबाई पाटील या दोघी देवदर्शनाला जाण्यासाठी रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी अज्ञात वाहनाने त्यांना उडविले. त्यात मोतीबाई जागीच ठार, तर तानीबाई रुग्णालयात मरण पावल्या. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्जतमधील निवडणूक संदर्भात उच्च न्यायालयात दाद मागणार
काँग्रेस उमेदवाराची घोषणा

कर्जत, २० जानेवारी/वार्ताहर : कर्जतमधील नगर परिषदेच्या रविवारी पार पडलेल्या निवडणुकीच्या संदर्भात नियुक्त करण्यात आलेले मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी पी. डी. निकुंभ यांनी दिलेल्या एका निर्णयाच्या विरोधात पक्षनेतृत्वाने अनुमती दिल्यास आपण मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची घोषणा प्रभाग क्रमांक दोनमधील उमेदवार राजेश कलवार यांनी केली आहे.
या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक दोनमधून काँग्रेस पक्षाचे उमेदवार या नात्याने राजेश कलवार यांनी तर प्रभाग क्रमांक १० मधून संदीप पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र तांत्रिक कारणास्तव मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी पी. डी. निकुंभ यांनी हे दोन्ही उमेदवारी अर्ज फेटाळून लावले होते. त्यांच्या या निर्णयाविरुद्ध काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. जे. टी. पाटील यांनी अलिबाग येथील जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले होते. मात्र त्यांना तेथे अपेक्षित न्याय मिळू शकलेला नाही, अशी माहिती कलवार यांनी दिली आहे. यामुळेच जर काँग्रेस पक्षाने आपल्याला अनुमती दिली, तर या निर्णयाविरुद्ध आपण उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहोत, अशी घोषणा राजेश कलवार यांनी केली आहे.

जमिनीच्या वादातील मारहाणीत तीन जखमी, नऊ आरोपी फरारी
खोपोली, २० जानेवारी/वार्ताहर

जमिनीच्या वादात झालेल्या मारहाणीत फिर्यादीसह अन्य दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी (१९ जानेवारी) रात्री सव्वा नऊ ते दहाचे दरम्यान मौजे देवन्हावे हद्दीत पालीफाटा येथील हॉटेल मयुरीजवळ घडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. जमिनीच्या जुन्या वादातील राग मनात धरून ठाणेन्हावे येथील हनिफ कासिम दुदुके, कादीर सरफुद्दीन खोत, उस्मान सरफुद्दीन खोत, अजिज कासिम दुदुके, अब्दुल हसन अलिसाब खोत, मुक्तार हसनमिया खोत व अन्य दोन अनोळखी इसम यांनी सोमवारी रात्री पालीफाटा येथून जात असताना आपण तसेच आपले सहकारी महम्मद आरिफ अब्बास राऊत, नियाज इस्माइल खोत यांच्यावर लोखंडी शिंगा, हॉकी स्टीक यांच्या सहाय्याने प्राणघातक हल्ला केला, अशी फिर्याद जखमी मुक्तार महम्मद धनसे यांनी खोपोली पोलिसांकडे दाखल केली आहे. ठाणेन्हावे येथे धनसे व दुदुके कुटुंबियांमध्ये जमिनीवरून अनेक वर्षांंपासून वादंग सुरू आहे. या वादात आज फिर्यादी असलेले, चार महिन्यांपूर्वीच्या मारहाण प्रकरणात आरोपी होते. चार महिन्यांपूर्वी फिर्यादी असलेले आज आरोपी ठरले आहेत. पहिले मारहाणीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आता उभयगटात हे दुसरे मारहाणप्रकरण न्यायप्रविष्ट होत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. मारहाण करून फरार झालेल्या नऊ आरोपींच्या विरोधात खोपोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.