Leading International Marathi News Daily
 


बुधवार, २१ जानेवारी २००९
  तरुणांनी शिक्षणक्षेत्रात येऊन राष्ट्रउभारणी करावी!
  जंगल संपत्ती व संवर्धनातील करिअर
  रिटेल ब्रोकर
  रोटरी यूथ एक्स्चेंज : वैश्विक संस्कृतीचे महाद्वार
  परदेशातील शिक्षणासाठी बँकेचे कर्ज
  शोध संशोधन समस्येचा
  कॅनरा बँक ऑफिसरपदाची तयारी
  उडान : विस्तार कार्याची गरुडझेप
  ‘व्यावसायिक नैतिकता’ म्हणजे काय ?
  स्वयंरोजगार -
समृद्ध लेदर टेक्नॉलॉजी
  समाजकार्याची संधी

 

देशाच्या विद्यार्थीशक्तीला जर राष्ट्रउभारणीच्या कामात सहभागी करायचे असेल तर पहिल्यांदा शिक्षणक्षेत्राकडेच बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलावा लागेल! कुठेतरी सुरुवात ही व्हायलाच पाहिजे! किती दिवस आपण एक मूक प्रेक्षक होऊन आपल्या उघडय़ा डोळ्यांनी शिक्षणक्षेत्राची अधोगती पाहणार आहोत?
मुंबईवर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर मुंबई विद्यापीठ, एस.एन.डी.टी. विद्यापीठ व यशवंतराव मुक्त विद्यापीठ या तिन्ही विद्यापीठांच्या वतीने २० डिसेंबर २००८ रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे सलोखा सभेचे आयोजन करण्यात आले. मुंबई, ठाणे व नवी मुंबईतील सुमारे दीड लाख विद्यार्थी, तसेच महाराष्ट्रातील १२ विद्यापीठांचे कुलगुरू आणि १८ शहिदांची कुटुंबे त्या सभेला आली. सर्व
 
विद्यापीठांनी या प्रकरणी वेगळ्या दृष्टिकोनातून नवा अभ्यासक्रम सुरू करावा अशी सूचना सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल एस. सी. जमीर यांनी केले. राज्यपालांनी उपस्थित असलेल्या सर्व तरुणांना दहशतवादाविरुद्ध लढण्याची शपथ दिली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, देशावर आलेल्या अशा प्रकारच्या संकटांना तोंड देण्यासाठी एखाद्या राज्यपालांनी व कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांना देशाच्या प्रश्नावर काम करायला आवाहन करण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी! म्हणून सर्वप्रथम ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांचे, राज्यपालांचे, उपस्थित असलेल्या कुलगुरूंचे व सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व धन्यवाद!
आज देशापुढे असंख्य प्रश्न आहेत व ते कालच्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे आहेत. डोळसपणे विचार केला तर आपल्या असे लक्षात येईल की, सगळ्या प्रश्नांचे मूळ आहे आपला ‘अशिक्षित’ समाज! १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ‘औद्योगिक क्रांती’ व त्यानंतर ‘हरीत क्रांती’ घडविण्याच्याच आधी आपण ‘शैक्षणिक क्रांती’ घडवायला पाहिजे होती! जसे माणसाच्या जीवनात काही घटना त्याच्या आयुष्याची दिशा बदलतात, तसे काही घटना देशात घडल्यावर संपूर्ण समाज अंतर्मुख होतो आणि त्याची विचार करण्याची दिशा बदलून जाते! २६ नोव्हेंबर ०८ रोजी मुंबईवर अतिरेक्यांनी केलेला दहशतवादी हल्ला ही एक अशीच घटना आहे! देशाला एकसंध व राष्ट्राभिमानी करण्यासाठी कधी कधी परकीय आक्रमण होणे गरजेचे असते! त्यामुळे आज प्रत्येक सामान्य माणूस, तरुण व तरुणी देशासाठी कुठल्याही कामात स्वत:ला झोकून द्यायला तयार आहे. त्यांच्यात एक नवीन जोश दिसतो आहे. गरज आहे ती त्यांना सकारात्मक विचार देण्याची, त्यांना विधायक कामासाठी प्रेरित करण्याची व नव्याने राष्ट्रउभारणीसाठी त्यांना विश्वासात घेण्याची!
‘अलिप्त दृष्टिकोनातून’ या आपल्या पुस्तकात माजी अर्थमंत्री व आताचे नवे गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी लेनिनचा विचार मांडला आहे. लेनिनच्या मते आधुनिक आणि शक्तिशाली राज्य निर्माण करायचे असेल तर ‘शिक्षण आणि वीज’ या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. लेनिनची मते आजच्या युगातसुद्धा किती खरी आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपला आजचा भारत देश! चिदम्बरम यांचे पुस्तक त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकारी, निदान शिक्षणमंत्री व ऊर्जामंत्री यांना वाचायला दिले तर फार बरं होईल! माझ्या मते वीज नसल्यामुळे होत असलेल्या भारनियमनापेक्षा, शिक्षण नसल्यामुळे होत असलेले स्वच्छ विचारांचे भारनियमन देशाला जास्त घातक आहे! आपल्या देशाला कुठल्याही अतिरेक्यांचा किंवा अतिरेकी विचारांचा सामना करायला सक्षम करायचे असेल, तर समाजाला अंतर्मुख व्हावेच लागेल! प्रत्येकाला शिकावेच लागेल, ‘शिक्षण क्रांती’ आणावीच लागेल! हे काम आज फक्त देशातले शिक्षक तरुणांच्या मदतीने करू शकतात! काल शिवाजी पार्कच्या सभेतदेखील राज्यपालांनीही समाजाच्या या दोन घटकांना आवाहन केले आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी मोठय़ा प्रमाणात शिक्षणक्षेत्रामध्ये यावे याकरिता खास प्रयत्न करावे लागतील. थोडे आपल्या शिक्षणक्षेत्राकडे पाहू या-६० वर्षांंच्या स्वतंत्र भारतात करोडो मुलांना अजून शिक्षण नाही व ज्या लाखोंनी घेतले, त्यांना त्या शिक्षणाचा पाहिजे तसा उपयोग करता येत नाही! Right to Education मुळे आठवीपर्यंत परीक्षा नाही म्हणून पुढच्या शिक्षणाचे दरवाजे शाळेत जाणाऱ्यांसाठी उघडायचे आहेत. पण ज्यांना शाळेचे दरवाजेच दिसले नाहीत त्यांचे काय? देशात कित्येक प्राथमिक शाळांत शिक्षक नाहीत, हजारो खेडय़ांत एकशिक्षकी शाळा हा प्रयोग अजून चालू आहे. त्या चालवणारे शिक्षक खरे ‘भारतरत्न!’ दुसरीकडे ग्रामीण भागातील शिक्षक अभिमन्यूप्रमाणे एकाकी लढत आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न पूर्णपणे वेगळे व कितीतरी पटीने जटील आहेत. हातावर पोट असलेले लाखो विद्यार्थी रात्रशाळेत कधी तरी आपल्या आयुष्यात भाग्याचा दिवस उगवेल या आशेने रात्रीचा दिवस करतात, पण त्यांना कुणाचीही सहानुभूती नाही. त्यात २००० सालापासून ‘शिक्षणसेवक’ नावाच्या कंत्राटी पद्धतीने शिक्षकांच्या नेमणुका व C-H-B पद्धतीने शिक्षकांना वेतन, ही शिक्षकांची क्रूर चेष्टा सुरू आहे. या शिक्षकांचे मानसिक हाल मंत्रालयात एअर कंडिशनमध्ये बसणाऱ्या नोकरशाहीला केव्हा व कसे समजणार? डोक्याला सुन्न करणारे त्यांचे एक- एक अनुभव आहेत! काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात ‘खडू-फळा’ मोहिमेत आणि पुस्तक खरेदीमध्ये भरपूर भ्रष्टाचार झाला, त्याबद्दल काही न बोललेले बरे. आपल्या कुलगुरूंना एक विनंती-‘भ्रष्टाचार’ ही ‘आपण आपले रोजचे व्यवहार करण्याची एक सरळ व सोपी पद्धत’ अशी साधी व्याख्या अभ्यासक्रमात केली तर फार बरे होईल! निदान भ्रष्टाचारावर चर्चा करण्यात देशाचा वेळ वाया जाणार नाही. शाळा आहेत तर शिक्षक नाहीत, इमारत आहे तर फळा नाही, फळा आहे तर खडू नाही, हे सर्व आहे तर विद्यार्थी नाहीत! एकीकडे बेसुमार बेकारी तर दुसरीकडे शाळेत शिकवायला चांगले शिक्षक नाहीत ही परिस्थिती. हे विदारक सत्य पाहिल्यावर प्रश्न पडतो की, दर वर्षी जे लाखो विद्यार्थी बी.कॉम., बी.ए. किंवा बी.एस्सी. होतात, त्यांना आपण एखाद्या सरकारी, निमसरकारी किंवा कुठल्यातरी छोटय़ा मोठय़ा नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा, किंवा बेकार बसण्यापेक्षा शिक्षणक्षेत्रात का नाही यावसं वाटत? याचं मुख्य कारण शिक्षणक्षेत्राला आपण आपल्या समाजात सगळ्यात खालचा दर्जा देतो म्हणून!
अठराविश्व दारिद्रय़, दु:ख आणि अवहेलना जर आपण आपल्या शिक्षकांना देणार असू तर नवीन
पिढीला कोणत्या तोंडाने आपण या क्षेत्रात या म्हणून सांगणार आहोत? समाजाने ‘शिक्षक’ या व्यक्तीला, त्याचे जे विद्यार्थी डॉक्टर, इंजिनीयर किंवा वकील होतात, त्यांच्यापेक्षा जास्त नाही पण, किमान त्यांच्याबरोबरीने तरी मान दिला पाहिजे! हे विद्यार्थी कोणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत जरी नसले, तरी ते त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचे नक्कीच ऐकतील व विश्वास ठेवतील!
मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी आपल्या एका महत्त्वाच्या निकालात म्हटलं आहे की, शिक्षणसेवकांना त्यांच्या नेमणुका किंवा काम करण्याच्या अटीसंदर्भातले निर्णय-हे सामान्य कंत्राटांच्या सर्वसाधारण अटीप्रमाणे न बघता, त्यांना स्कूल ट्रायब्युनलपुढे सामान्य शिक्षकांप्रमाणे कुठलीही तक्रार मांडण्याची मुभा आहे. या निर्णयाची प्रत तुम्हाला http://bombayhighcourt.nic.in/data/judgements/2008/
CWP2653408.pdf इथे मिळू शकते. अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक प्रश्न रेंगाळत पडलेले आहेत, मग ते प्राथमिक शिक्षकांचे असोत, हजारो एकशिक्षकी शाळांचे असोत, ग्रामीण भागातील शिक्षकांचे असोत की, आदिवासी भागात शिकवणाऱ्यांचे असोत की आपल्या वृद्ध आणि निवृत्त शिक्षकांचे. आपला सगळा वेळ चर्चेवर चर्चा करण्यात, ढिगाने अहवाल तयार करण्यात आणि समित्यांवर समित्या बसविण्यात जात आहे. २००२ पासून आपण Right to Education Bill चा कायदा कागदावरदेखील करू शकलो नाही. आज काय करायला पाहिजे हे बघण्यापेक्षा काल कोणी, कुठे व कसे चुकीचे निर्णय घेतले, या विचारातच आपल्या पिढय़ान्पिढय़ा बरबाद होत आहेत! गाव तिथे पक्का रस्ता ही योजना आपण आणली, पण गाव तिथे पक्के शिक्षण केव्हा आणि कसे आणणार?
एकूणच समाजाचा ‘शिक्षणा’कडे बघण्याचा दृष्टिकोन फार निराशाजनक आहे. शहरात फार स्पर्धा व चढाओढ आहे म्हणून व ग्रामीण भागात आवड असूनही ते चांगल्या प्रकारे उपलब्ध नसल्यामुळे. जास्त शिकूनसुद्धा जर नोकरी मिळणार नसेल आणि शिक्षक म्हणूनच जगायचे असेल तर शिकायचेच कशाला? शिक्षण आहे तर नोकरी नाही आणि नोकरी आहे तर ती मनासारखी नाही व मनासारखी आहे तर तिला समाजात मान नाही! या दुष्टचक्रातून निदान शिक्षण क्षेत्राला तरी बाहेर काढायला पाहिजे.
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा प्रसार फार मोठय़ा प्रमाणात झालेला आहे, आपण खूप प्रगती केलेली आहे यात वादच नाही. खरे तर प्रश्न दिसतात तेवढे मोठे नाहीत व कालच्या दहशतवादाएवढे मोठे तर नक्कीच नाहीत. गरज आहे तर फक्त एका साध्या इच्छाशक्तीची व एक पाऊल पुढे टाकण्याची! शिक्षण क्षेत्रातल्या सर्वाचे प्रत्येकी किमान तीन मुख्य प्रश्न उपायासकट शासनदरबारी मांडायला काय हरकत आहे? काहीही झाले तरी सर्वप्रथम (१) जनगणनेपासून ते निवडणुकीपर्यंत कुठल्याही सरकारी कामात शिक्षकांना जे राबविले जाते ते थांबायलाच पाहिजे, (२) पदवीधर असूनही शिक्षकांना कायम शिक्षक म्हणून घेण्याआधी तीन वर्षांसाठी ‘‘शिक्षकसेवक’’ म्हणून ठेवण्याची ‘‘कंत्राटी पद्धत’’ आणि (३) ‘‘क्लॉक अवर बेसिस पद्धतीने’’ (C-H-B) शिक्षकांना राबवणे, मागे घेऊन शिक्षकांना विश्वासात घेऊन समाधानकारक व सन्मानपूर्वक उकल होणे आवश्यक आहे.
Right to Education्ल चा कायदा करून शिक्षण हा Fundamental Right आहे हे जरी मान्य केले तरी अवाढव्य लोकसंख्येला साधे प्राथमिक शिक्षण देणारी यंत्रणा कुठे आहे? सगळ्यांना शिक्षण देऊन चांगला व सुशिक्षित समाज निर्माण करण्यासाठी आपल्या शिक्षणपद्धतीत आऊट ऑफ द बॉक्स चौकटीबाहेरचा विचार करण्याची गरज आहे. मिळेल त्या माध्यमांचा उपयोग करावा लागेल. त्या दृष्टीने फक्त दोन विचार इथे मांडतो- (१) एकीकडे महाराष्ट्रामध्ये रात्रीची कॉलेजेस नाहीत व दुसरीकडे रात्रभर आपल्या रंगीत दूरचित्रवाणीवरून दोनशेच्या वर वाहिन्या आपल्या घरात धुडगूस घालत आहेत. त्यामध्ये शिक्षण प्रसारासाठी एक कायमची वाहिनी का असू नये? प्रायोगिक तत्त्वावर आपल्या काही विद्यापीठांनी आणि दूरदर्शनने एकत्र येऊन रोज काही राखीव तासाला लेक्चर्सने सुरुवात करायला काहीच हरकत नसावी, निदान दिवसा काम करणाऱ्या हातामध्ये आपण लेखणी आणि पुस्तक देऊ शकू. रात्रीच्या कॉलेजची समस्याही काही प्रमाणात सहज सुटण्यासारखी आहे. दूरस्थ शिक्षणासाठी अशी वाहिनी फार उपयोगी होईल आणि (२) मद्रासच्या श्रीमती मंगला सुंदर क्रिश्नन या केमिस्ट्रीच्या प्रोफेसर आहेत. त्यांनी आय. आय. टी.च्या काही प्रोफेसरांना बरोबर घेऊन त्यांची लेक्चर्स व्हिडीओवर रेकॉर्ड करून इंटरनेटच्या यू-टय़ूबवर (www.youtube.com) अपलोड केली. नागपूर ते न्यूयॉर्क कुणालाही आय. आय. टी.च्या लेक्चर्सचा लाभ होत आहे. चांगले शिक्षण देण्यासाठी निवडक प्रोफेसरांची लेक्चर्स व्हिडीओवर रेकॉर्ड करून आपल्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये एक प्रयोग करायला काय हरकत आहे? चांगल्या शिक्षकांची कमी काही प्रमाणात तरी नक्कीच
भरून काढता येईल. याच बाबतीत आणखी एक उदाहरण देता येईल, टय़ुटरव्हिस्टा (www.tuttorvista.com) अशा काही भारतातील कंपन्या परदेशातील मुलांना ऑनलाइन शिकवणी देतात. या कंपन्यांचे शिक्षक व ती मुले एकाच वेळी नेटवर येतात व त्यांची शिकवणी सुरू असते. जर आपण देशाबाहेरच्या मुलांना असे शिक्षण देऊ शकतो तर देशातील मुलांना याच पद्धतीने शिक्षण देणेही शक्य आहे.
‘‘राजकारण एक सीरियस करिअर’’ हा विचार मी १७ डिसेंबर ०८ च्या ‘लोकसत्ता’ करिअर काऊन्सेलरमध्ये मांडला आणि समाजकल्याण हीच राजकारणाची पहिली पायरी आहे, असे सांगितले. बऱ्याच लोकांकडून व तरुणांकडून मला विचारणा झाली की, समाजकारणालासुरुवात नक्की कुठून करायची हेच समजत नाही. या सर्वानी समाजकरणाचा श्रीगणेशा शिक्षण क्षेत्रापासून करायला काय हरकत आहे? महाराष्ट्राच्या संपूर्ण शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या माध्यमासाठी स्वतंत्र वेबसाइटस्ची निर्मिती होऊ शकते व प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना एकत्र आणता येईल. हे काम तरुणांनी हातात घ्यायला काय हरकत आहे? बऱ्याच ठिकाणी शाळेच्या किंवा कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचे ग्रुप्स आहेत व ते स्वत:चे वाढदिवस, दिवाळी, नवीन वर्ष एकत्र येऊन साजरे करतात. अशा ग्रुप्सनी आपल्याच शाळेसाठी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मदत का करू नये?
शिक्षण क्षेत्रातील प्रश्नासंबंधी लोक उदासीन आहेत. प्रश्न गंभीरपणे घेत नाहीत, लोक ऐकत नाहीत, बदलत नाहीत, अशिक्षित आहेत, बुरसटलेल्या विचारांचे आहेत, सगळीकडे भ्रष्टाचार आहे, प्रत्येक विषयाचे राजकारण होत आहे, गुंड प्रवृत्ती वाढते आहे, हे सगळे खरे असले तरी ज्या समाजात हे सगळे होत आहे त्याच समाजाचा आपणही एक भाग आहोत व समाजाच्या या नैतिक ऱ्हासाला काही प्रमाणात का होईना आपणही जबाबदार आहोत. आणि म्हणूनच या रेडय़ांकडून वेद म्हणून घ्यायची जबाबदारीसुद्धा आपलीच आहे!
ज्ञानेश्वरांच्या या महाराष्ट्रात तरी शिक्षणाचे दरवाजे सर्वाना कुठल्याही परिस्थितीत खुले झालेच पाहिजेत. चांगले, दर्जेदार आणि उपयुक्त शिक्षण हे जसे सर्व विद्यार्थ्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे, तसा सर्व शिक्षकांना समाजामध्ये मानाचे स्थान हासुद्धा त्यांचा जन्मसिद्ध हक्कच आहे. तरच आजचे विद्यार्थी स्वखुशीने शिक्षण क्षेत्रात येतील. ज्या शिक्षकांनी आपल्या घर आणि संसाराच्या खर्चाचा विचार न करता शिक्षण क्षेत्रामध्ये आपले आयुष्य खर्ची घातले त्यांना मन:पूर्वक धन्यवाद आणि त्रिवार सलाम! कोणालाही दोष देण्याचा प्रश्नच नाही, कारण दोष देऊन व त्रागा करून हे प्रश्न सुटणार नाहीत. हा विषय मी ‘लोकसत्ता’ करिअर काऊन्सिलरमध्ये मांडला, कारण शाळेत न जाणाऱ्या, रस्त्यावरच्या आपल्या लाखो मुलांचा, शाळा-कॉलेजमध्ये जाणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचा व त्याचबरोबर कालच्या दहशतवादी हल्ल्यामुळे ६० वर्षांच्या आपल्या देशाच्याच करिअरचा देखील प्रश्न आहे!
येत्या २६ जानेवारीला रस्त्याच्या सिग्नल्सवर लहान लहान मुले फाटक्या कपडय़ांनी तिरंगा झेंडा विकताना दिसतील. इतर दिवशी ही मुले मोठमोठय़ा गाडय़ांतून प्रवास करणाऱ्या आपल्या सुशिक्षित समाजाला पुस्तक विकताना बघितल्यावर आपण नक्कीच कुठे तरी चुकलो आहोत याची खात्री पटते! त्यांच्या चिमुकल्या हातात तिरंगा बघून वरून त्यांचे चाचा नेहरू ढसाढसा रडतील! आपण निदान तोंडाने म्हणू या ‘झेंडा उंचा रहे हमारा!’
नितीन पोतदार (कॉर्पोरेट लॉयर)
९८२००५४७४७
www.nitinpotdar.blogspot.com