Leading International Marathi News Daily                                  बुधवार, २१ जानेवारी २००९
क्रीडा

नदाल, मरे, विल्यम्स भगिनींचे सहज विजय
ह्युइट पराभूत

मेलबर्न, २० जानेवारी/पीटीआय

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत आज अग्रमानांकीत स्पेनचा राफेल नदाल, अँडी मरे आणि विल्यम्स भगिनी यांनी आपापले सामने जिंकत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. आज येथील तापमान ४० अंशांवर पोहचल्यामुळे खेळाडूंची दमछाक झाली. राफेल नदालने बेल्जिअमच्या ख्रिस्तोफ रोकसचा सरळ सेटमध्ये ६-०, ६-२, ६-२ असा पराभव केला. ब्रिटनच्या चतुर्थ मानांकीत अँडी मरे याने रुमानियाच्या आंद्रे पावेल याच्या विरूध्दचा सामना ६-२, ३-१ असा जिंकला. दुखापतीमुळे पावेलने सामना अर्धवट सोडून दिल्यामुळे मरेला पुढच्या फेरीत प्रवेश मिळाला. सामना जिंकल्यावर मरे म्हणाला की, अशा पध्दतीने सामन्याचा निकाल लागल्याबद्दल मला दु:ख होत आहे.

सेरेनावर ओबामांचा प्रभाव
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी झालेल्या सेरेना विल्यम्सवर अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा प्रचंड प्रभाव आहे. पहिली फेरी जिंकल्यानंतर सेरेना ओबामांबद्दल बोलण्यास खूपच उत्सुक आहे. ती म्हणते, मी, व्हीनस आणि ओबामा यांच्यात अनेक गोष्टींत साधम्र्य आहे.ती म्हणते की, मी आणि व्हीनसने आफ्रिकन-अमेरिकन या नात्याने टेनिसमध्ये अनेक दरवाजे उघडून दिले. एक आफ्रिकन-अमेरिकन माणसांच्या इतिहासाचा मला खूप अभिमान आहे.सेरेनाने पहिल्या फेरीत मेंग युआनला ६-३, ६-२ असे सरळ सेटमध्ये पराभूत करणारी सेरेना ओबामांचा शपथविधी पाहण्यासाठी उत्सुक आहे, पण ती या संपूर्ण सोहळ्याचे रेकॉर्डिग करून नंतर त्याचा आनंद घेणार आहे. ती म्हणते की, अमेरिकन इतिहासातील हा सर्वोच्च क्षण आहे. अमेरिकेत काल मार्टिन ल्यूथर किंग यांची जयंतीही होती. किंग यांची जयंती आणि त्याचवेळेस ओबामा यांचे राष्ट्राध्यक्ष पदावर विराजमान होणे हे एकाचवेळी जुळून येणे हा सुवर्णक्षण आहे.एकीकडे सेरेना ओबामांबद्दल बोलण्यात रस घेत असताना तिची बहीण व्हीनस मात्र राजकारणापासून थोडेसे लांबच राहणे पसंत करते. ती म्हणते, मला राजकारणाची अजिबात आवड नाही आणि मी कुणाची बाजूही घेत नाही. पण ओबामा हे उत्तम उमेदवार होते आणि मला आनंद होतो आहे की, एका उत्तम उमेदवाराची निवड झाली. तरीही मी राजकारणाबद्दल बोलण्यास असमर्थ आहे. माझ्याकडे राजकारणाबाबत शून्य ज्ञान आहे.

‘झहीर आणि इशान्तमुळे वेगवान गोलंदाजीचा दर्जा उंचावला’
मुंबई, २० जानेवारी/पीटीआय

भारताचे जलदगती गोलंदाज झहीर खान आणि इशान्त शर्मा यांनी वेगवान गोलंदाजीचा दर्जा उंचावला आहे. ते दोघेही त्या दर्जापर्यंत पोहचण्याचे इतरांना आवाहन करत आहेत. काही काळानंतर प्रत्येकजण त्या उंचीला पोहचेल आणि त्याचा संघाला निश्चित फायदा होईल, असे मत डावखुरा गोलंदाज इरफान पठाण याने व्यक्त केले आहे.श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणाऱ्या १५ सदस्यीय संघात इरफानचा समावेश झालेला आहे. त्या पाश्र्वभूमीवर इरफान म्हणाला की, या दौऱ्यात मी संघातील माझे स्थान पक्के करण्याचा निश्चितच प्रयत्न करणार आहे. पण संघात सचिन व्यतिरिक्त अन्य कोणालाही संघात कायम स्थान मिळणे कठीण आहे. डंबोला आणि कोलंबो येथील वातावरणाची मला चांगली माहिती आहे. रणजी सामन्यात बडोद्याकडून खेळताना माझी कामगिरी चांगली राहिलेली आहे. अष्टपैलू खेळाडू युसूफ या वेळी म्हणाला की, माझी गोलंदाजीतील कामगिरी उंचावण्यासाठी देशांतर्गत सामने खेळताना मी खूप परिश्रम घेतलेले आहेत. त्यामुळे मला खात्री आहे की, मी श्रीलंकेच्या दौऱ्यात प्रत्येक सामन्यात एक-दोन गडी निश्चित बाद करू शकेन.

सचिन मला गुरुस्थानी - सेहवाग
नवी दिल्ली, २० जानेवारी/ पीटीआय

एकेकाळी गमतीने " सचिन आणि माझ्यामध्ये फक्त बॅंक बॅलेन्सचाच फरक आहे", असे म्हणणारा भारतीय संघाचा स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आज एका मुलाखती दरम्यान म्हणाला की, सचिन एवढी माझी योग्यता नक्कीच नाही. त्याने क्रिकेट विश्वामध्ये जे नाव कमाविले आहे, जे शिखर गाठले आहे त्याच्या अध्र्यापर्यंतही मी कधी पोहचू शकत नाही. सचिन मला गुरूस्थानी असून मी त्याचा शिष्य आहे आणि त्याच्या कडून बरेच काही शिकण्याचा प्रयत्न करतोय.

हॉकी: भारताचा सलग दुसरा विजय
अर्जेन्टिनावर ३-२ गोलने मात

मार डेल प्लाटा, २० जानेवारी / पीटीआय

भारताने आज दुसऱ्या हॉकी कसोटीत अर्जेन्टिनाची झुंज ३-२ गोलने मोडून काढली आणि चार सामन्यांच्या मालिकेत २-०अशी आघाडी मिळवली. मालिकेतील तिसरा कसोटी सामना उद्या, बुधवारी खेळला जाणार आहे. तब्बल एक वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय मालिका खेळणाऱ्या भारतीय हॉकी संघाने काल झालेल्या पहिल्या लढतीत अर्जेन्टिनाचा २-० गोलने पराभव केला होता. आज सेंटर फॉरवर्ड शिवेंद्र सिंग (१२वा मिनिट), प्रभज्योत सिंग (४०वा मिनिट) आणि कर्णधार संदीप सिंग (५९वा मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवत भारताच्या विजयात उल्लेखनीय योगदान दिले.

हॉकी समितीत मतभेद नाहीत- कलमाडी
नवी दिल्ली, २० जानेवारी/ वृत्तसंस्था

भारतीय हॉकी अस्थायी समितीत कोणत्याही प्रकारचे मतभेद नसल्याचा निर्वाळा या समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी आज येथे दिला. समितीच्या कारभारात पारदर्शकता नसल्याचा आरोप करीत समितीचे एक सदस्य रणधीर सिंग यांनी नुकताच समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे समिती सदस्यांची आज घाईघाईने बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना कलमाडी म्हणाले, की समिती सदस्यांत कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे सरचिटणीस या नात्याने रणधीर सिंग यांना काही वेगळय़ा जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. या बैठकीला उपस्थित असणाऱ्या रणधीर सिंग यांनीही आपल्यावर २०१० साली होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेबाबत काही जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्याचे सांगितले.

बॉक्सिंग :महाराष्ट्राचा कोटीयन अंतिम फेरीत दाखल
मुंबई, २० जानेवारी / क्री. प्र.

महाराष्ट्र संघातून खेळणाऱ्या मुंबईचा विनित कोटियनने तिसऱ्या महापौर सुपर कप बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. सुपर कप स्पर्धेच्या आजच्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्र संघाचा विनित कोटियनला रिंगणातील प्रवेशा आधीच अंतिम फेरीचे दरवाजे उघडले. विनितला उपान्त्य फेरीत भारतीय बॉक्सिंग असोसिएशन सीनियर संघाच्या मनोज कुमारशी लढत द्यायची होती. वजन मापनासाठी वेळेवर हजर न राहिल्यामुळे त्याला खेळण्यास परवानगी देण्यात आली नाही आणि विनितचा अंतिम फेरीचा मार्ग मोकळा झाला. विनित हा एकमेव महाराष्ट्राचा खेळाडू आहे की जो पहिल्यांदा सुपर कपच्या अंतिम फेरीपर्यंत पोहचला आहे. अंतिम फेरीत त्याची लढत के.टी.टी. सिंगशी होणार आहे.

सानियाची लढत ईएसपीएन-स्टार स्पोर्ट्सवर
नवी दिल्ली, २० जानेवारी / पीटीआय

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाची ऑस्ट्रेलियन ओपनमधील दुसऱ्या फेरीची लढत ईएसपीएन स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर थेट दाखविण्यात येणार आहे. रशियाच्या नादिया पेत्रोव्हाविरुद्ध सानिया झुंजणार आहे.
पहाटे ५.३० वाजता ही लढत सुरू होईल. सानियाने पहिल्या फेरीत पोलंडच्या मार्ता दोमाचोव्हस्काविरुद्ध ६-१, ६-४ असा विजय मिळवून दुसरी फेरी गाठली होती. तर पेत्रोव्हाने कझाकस्तानच्या श्वेडोव्हाविरुद्ध ६-३, ७-६ (३) अशी मात केली होती.गेल्या वर्षी विम्बल्डनमध्ये नादियाने सानियाला नमविले होते. तर सानियाने त्याआधी तिला नमविले होते.

बोरिवलीत उपनगर मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धा
मुंबई, २० जानेवारी / क्री. प्र.

मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना व नवसमर्थ क्रीडा प्रसारक केंद्र संचालित विद्यार्थी क्रीडा संघटना आणि बोरिवली स्पोर्ट्स अ‍ॅण्ड कल्चरल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने संघटनेची १४ वी जिल्हा अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धा रविवार २५ व २६ जानेवारी रोजी बोरिवली स्पोर्ट्स अ‍ॅण्ड कल्चरल सेंटर, अरुणकुमार वैद्य क्रीडांगण, गोराई रोड, बोरिवली (प.) येथे आयोजित करण्यात येणार आहे.
स्पर्धेचे प्रवेश शुल्क प्रति खेळाडूस रुपये २५/- असेल. स्पर्धेला मुलांसाठी १२, १४, १८ वर्षांखालील व १८ वर्षांवरील व मुलींसाठी १२, १४, १६ वर्षांखालील व १६ वर्षांवरील असे वयोगट असतील. या स्पर्धेत पिरॅमीडच्या स्पर्धा घेतल्या जातील. उपनगरातील एकूण ४० शाळा व संस्थांमधील सुमारे २५० खेळाडू, ५० अधिकारी व पंच या स्पर्धेत सहभागी होतील, असा अंदाज आहे.
इच्छुकांनी संघटनेचे प्रमुख कार्यवाह दत्ताराम दुदम, अ/४०४, गोदावरी, शांतीवन सोसायटी, संत ज्ञानेश्वर मार्ग, बोरिवली (पू.), दूरध्वनी- ९८६९१२१४१० यांच्याकडे पाठवाव्यात.

विजय नवनाथचा शानदार विजय
आर्यनगर कबड्डी स्पर्धा
मुंबई, २० जानेवारी / क्री. प्र.

विजय नवनाथ मंडळाने विजय बजरंग व्यायामशाळेवर १३-१२ असा अवघ्या एका गुणाने मिळविलेला रोमहर्षक विजय हे ताडदेव येथील आर्य सेवा मंडळाच्या ७४ व्या वार्षिक कबड्डी स्पर्धेतील आजचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले. प्रारंभी विजय नवनाथचा थोडा अधिक जोर दिसला विशाल कदम आणि मयूर खामकरच्या दमदार खेळामुळे. त्यांनीच आपल्या संघाला पूर्वार्धात १०-६ अशी आघाडी मिळवून दिली. विजय बजरंगच्या दशरथ पाटील, नितीन आंबेरकर व अरविंद सखतकर यांनी चौफेर चढायांच्या जोरावर ती मोडित आणली होती; पण शेवटी त्यांचे प्रयत्न कमी पडले. गोल्फादेवीने बलवान सुनील स्पोर्ट्स क्लबवर मिळविलेल्या २८-१५ अशा गुणांचा शानदार विजय हेही आजचे विशेष आकर्षण ठरले. त्यांचे समीर भयगावकर, नीलेश पाटील आणि सुनीलचे दिनेश पाटकर व सुशांत आनंद सुरेख खेळले. शिवशक्तीने यंग उमरखाडीवर ३५-१६ असा तर एच. जी. एस.ने वंदेमातरमवर ३६-११ असा विजय मिळविला. अग्निशमन दलाने मोठय़ा उत्साहाने स्पर्धेत आपली प्रवेशिका भरली, पण यंग प्रभादेवीविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात हा संघ उतरलाच नाही.

पेट्रोलियम बॅडमिंटन स्पर्धेत नेहवाल, श्रीधर सहभागी
पुणे, २० जानेवारी/प्रतिनिधी

भारत पेट्रोलियमतर्फे उद्यापासून २९ वी पेट्रोलियम कंपनी बॅडमिंटन स्पर्धा होत असून, त्यामध्ये ऑलिम्पिकपटू साईना नेहवाल व अनुप श्रीधर यांच्यासह नामवंत खेळाडू भाग घेत आहेत.
भारत पेट्रोलियमचे उपमहाव्यवस्थापक के. पद्माकर यांनी ही माहिती दिली. पेट्रोलियम क्रीडा मंडळाचे चिटणीस आर. एस. जडेजा व महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे उपाध्यक्ष एस. व्ही. नातू हेही या वेळी उपस्थित होते. पीवायसी जिमखाना येथे २५ जानेवारीपर्यंत ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतील पहिले दोन दिवस पुरुष, महिला व प्रौढ गटाच्या सांघिक लढती होणार आहेत. महिलांच्या गटात इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, ओएनजीसी हे तीनच संघ सहभागी झाले असल्यामुळे संघाने अव्वल साखळी पद्धतीने होणार आहेत. अन्य दोन गटांतील सामने बाद पद्धतीने होणार आहेत. २३ ते २५ जानेवारीदरम्यान पुरुष, महिला, प्रौढ गटाच्या एकेरी व दुहेरी स्पर्धा होतील.
या स्पर्धेमध्ये ओएनजीसी, ऑईल इंडिया, इंडियन ऑईल, ईआयएल, गॅस अ‍ॅथॉरिटी (गेल), हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, बीआरपीएल, एमआरपीएल आदी संघांमधील ११० खेळाडू व अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामध्ये बी. चेतन आनंद, अनुप श्रीधर, रूपेशकुमार, जीबीएस विद्याधर, साईना नेहवाल, तृप्ती मुरगुंडे, बी. आर. मीनाक्षी, ज्वाला गट्टा, श्रुती कुरियन, सिक्की रेड्डी, आदित्य प्रकाश, साई गुरुदत्त आदी नामवंत आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी झाले आहेत. गतवर्षी चेतन आनंद व अदिती मुटाटकर यांनी विजेतेपद मिळविले होते. दुखापतीमुळे अदितीचा सहभाग यंदा अनिश्चित आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन उद्या सकाळी १० वाजता भारत पेट्रोलियमचे संचालक (मनुष्यबळ) एस. मोहन यांच्या हस्ते होणार आहे.

बोरिवलीत मॅरेथॉनचे आयोजन
मुंबई, २० जानेवारी / क्री. प्र.

बोरिवली (पूर्व) विभागातील महाराष्ट्र युवा संघातर्फे २६ जानेवारी रोजी रायडोंगरी, क्वार्टर रोड नं. ५, बोरिवली (पूर्व), येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. २६ जानेवारी रोजी सकाळी ठिक साडेसहा वाजता सुरू करण्यात येईल. या स्पर्धेला पुरुष व महिलांसाठी १२, १५, २० वर्षांखालील व २० वर्षांवरील असे वयोगट असतील. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी महाराष्ट्र युवा संघाचे संस्थापक अध्यक्ष जमुनाप्रसाद पटेल (९८९२४०८२१६ / ९२०१२७८२२) यांच्याशी संपर्क साधावा.

ब्रविशच्या द्विशतकाने मुंबई विद्यापीठाला आघाडी
मुंबई, २० जानेवारी/ क्री.प्र.

आंतरविद्यापीठ विभागीय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत आजचा दिवस खऱ्या अर्थाने गाजवला तो मुंबई विद्यापीठाच्या ब्रविश शेट्टीने. काल तमिळनाडूला तंबूत धाडल्यानंतर मुंबईने तीन विकेट्स गमाविल्यानंतर आजचा दिवस म्दोन्ही संघासाठी महत्वाचा होता. पण ब्रविशने झळकाविलेल्या नाबाद द्विशतकामुळे मुंबई विद्यापीठाने सामन्यात आघाडी घेतली आहे. ब्रविशने सात षटकार आणि वीस चौकार ठोकत तमिळनाडूच्या गोलंदाजांची पिसे काढली. दिवसअखेर मुंबईने ७ बाद ३८६ अशी मजल मारली असून तमिळनाडू १८८ धावांनी पिछाडीवर आहे.

सूर्यकुमारचे शतक; पोद्दारचा विजय
आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा
मुंबई, २० जानेवारी / क्री. प्र.

एस. पी. ग्रुपने आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत पोद्दार, रुपारेल व खालसा महाविद्यालयांनी आपापल्या लढती जिंकल्या. सूर्यकुमार यादवने केलेल्या ११९ धावा आणि त्याला निखिल पाटीलने (५२) दिलेली साथ या जोरावर पोद्दार महाविद्यालयाने डहाणूकर महाविद्यालयावर ८७ धावांनी विजय मिळविला. रुपारेल महाविद्यालयाने एच. आर. महाविद्यालयावर मात केली तर झुनझुनवाला महाविद्यालयाला खालसा महाविद्यालयाने नमविले.
संक्षिप्त धावफलक - पोद्दार महाविद्यालय ४ बाद २७१ (शंतनू पराडकर ३२, निखिल पाटील ५२ सूर्यकुमार यादव ११९) विजयी वि. डहाणूकर महाविद्यालय सर्व बाद १८४ (आशीष दुबे ३५, आनंद रेगे ३०, सिद्धांत वैती ९ धावांत ३ बळी, क्षितिज आरेकर १८ धावांत २). सामनावीर : सूर्यकुमार यादव.
रुपारेल महाविद्यालय ५ बाद २२८ (अजिंक्य कांबळी ३०, राजीव कामत ९७, सिद्धेश कानलेकर ४८, प्रतीक डेंगळे ३१ धावांत २ बळी) विजयी वि. एच. आर. महाविद्यालय सर्व बाद १४७ (यश गांधी ३५, रोहन तेंडुलकर ५२, पुष्कराज चव्हाण १४ धावांत ४ बळी, अक्षय केळुसकर १९ धावांत २ बळी).
सामनावीर : पुष्कराज चव्हाण.
झुनझुनवाला महाविद्यालय ९ बाद १७७ (दिनेश नटराजन ५०, ऋषभ पंडित ७८, विघ्नेश राजन ३१ धावांत ३ बळी, हर्षल नंदू २४ धावांत २ बळी) पराभूत वि. खालसा महाविद्यालय ९ बाद १७८ (नील नार्वेकर ३०, तन्मय जाधव ३५, शलभ अगरवाल ३८, गौरव सूर्यवंशी १९ धावांत ४ बळी).
सामनावीर : गौरव सूर्यवंशी.