Leading International Marathi News Daily                                  बुधवार, २१ जानेवारी २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

नदाल, मरे, विल्यम्स भगिनींचे सहज विजय
ह्युइट पराभूत
मेलबर्न, २० जानेवारी/पीटीआय

 

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत आज अग्रमानांकीत स्पेनचा राफेल नदाल, अँडी मरे आणि विल्यम्स भगिनी यांनी आपापले सामने जिंकत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. आज येथील तापमान ४० अंशांवर पोहचल्यामुळे खेळाडूंची दमछाक झाली. राफेल नदालने बेल्जिअमच्या ख्रिस्तोफ रोकसचा सरळ सेटमध्ये ६-०, ६-२, ६-२ असा पराभव केला. ब्रिटनच्या चतुर्थ मानांकीत अँडी मरे याने रुमानियाच्या आंद्रे पावेल याच्या विरूध्दचा सामना ६-२, ३-१ असा जिंकला. दुखापतीमुळे पावेलने सामना अर्धवट सोडून दिल्यामुळे मरेला पुढच्या फेरीत प्रवेश मिळाला. सामना जिंकल्यावर मरे म्हणाला की, अशा पध्दतीने सामन्याचा निकाल लागल्याबद्दल मला दु:ख होत आहे.
व्दितीय मानांकीत अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने चीनच्या मेंग युआन हिचा ६-३, ६-२ असा सहज पराभव केला. सहाव्या मानांकीत व्हिनस विल्यम्सने जर्मनीच्या आंगेलिक केर्बर हिचा ६-३, ६-३ असा पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या लेटन ह्युइट चिलीच्या तेराव्या मानांकीत फर्नान्डो गोन्झालेझ याच्याविरुध्द पाच सेटपर्यंत चाललेल्या लढतीत पराभूत झाला. गोन्झालेझने हा सामना ५-७, ६-२, ६-२, ३-६, ६-३ असा जिंकला. रशियाच्या चतुर्थ मानांकीत इलेना दिमिन्तिएवाकडे या स्पर्धेची अघोषित विजेती म्हणून पाहिले जात आहे. तिने या वर्षी दोन अजिंक्यपदे मिळवून तसे स्पष्ट केले आहे. पण आज तिला जर्मनीच्या क्रिस्तीना बारोईस विरुध्द विजय नोंदवताना तीन सेटस्पर्यंत झगडावे लागले. तिने बारोईसचा ७-६ (७-४), २-६, ६-१ असा पराभव केला. मला संघर्ष केल्यावर विजय मिळाल्याबद्दल खूप आनंद होत आहे, असे ती सामन्यानंतर म्हणाली.
बेल्जिअमची तेरावी मानांकीत व्हिक्टोरिया अझारेन्का हिनेही पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. २००६ची ऑस्ट्रेलियन स्पर्धा जिंकणाऱ्या फ्रान्सच्या अ‍ॅमिली मॉरेस्मोने ओल्गा गोवत्र्सोवा हिचा ६-४, ६-३ असा पराभव केला.