Leading International Marathi News Daily                                  बुधवार, २१ जानेवारी २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

सचिन मला गुरुस्थानी - सेहवाग
नवी दिल्ली, २० जानेवारी/ पीटीआय

 

एकेकाळी गमतीने " सचिन आणि माझ्यामध्ये फक्त बॅंक बॅलेन्सचाच फरक आहे", असे म्हणणारा भारतीय संघाचा स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आज एका मुलाखती दरम्यान म्हणाला की, सचिन एवढी माझी योग्यता नक्कीच नाही. त्याने क्रिकेट विश्वामध्ये जे नाव कमाविले आहे, जे शिखर गाठले आहे त्याच्या अध्र्यापर्यंतही मी कधी पोहचू शकत नाही. सचिन मला गुरूस्थानी असून मी त्याचा शिष्य आहे आणि त्याच्या कडून बरेच काही शिकण्याचा प्रयत्न करतोय.
सेहवाग जेव्हा पहिल्यांदा फलंदाजीला आला तेव्हा त्याची उंची आणि शरीरयष्टी पाहून त्याला सचिनची ‘कार्बन कॉपी’ म्हणायला लोकांनी सुरूवात केली होती, पण आज मात्र त्याने ‘पीटीआय’ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सचिन आणि माझ्यामध्ये भरपूर फरक आहे. त्याची आणि माझी तुलना करणे योग्य नाही, असे म्हटले आहे.
सेहवागशी साधलेला संवाद असा
प्रश्न-: क्रिकेट विश्वामध्ये भारतीय संघ कसोटी मानांकनामध्ये अव्वल स्थानी कधी येईल आणि नुकतीच आयसीसीने ‘ऑल टाईम ग्रेट’ क्रिकेटपटूंची यादी जाहीर केली, याबद्दल काय वाटते ?
उत्तर-: फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेमध्ये जर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आणि न्यूझीलंड दौऱ्यामध्ये जर आम्ही चांगली कामगिरी करू शकलो तर नक्कीच भारतीय संघ अव्वल स्थानावर येईल. पण त्यासाठी अजुन बरेच काही काम करायचे बाकी आहे.
आयसीसीने ‘ऑल टाईम ग्रेट’ क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये सचिनला जे स्थान दिले त्याबद्दल फक्त मीच नाही तर संपुर्ण भारतीय संघ नाराज आहे.
प्रश्न: आम्हा सर्वाना माहिती आहे की, सचिन तुझ्यासाठी एक खास व्यक्ती आहे, तुझा आदर्श आहे. पण त्याच्या आणि तुझ्यामध्ये काय फरक आहे असे विचारल्यावर तु ‘त्याच्या आणि माझ्यामध्ये फक्त बॅंक बॅलेन्समध्ये फरक आहे’ असे म्हटले होतेस, त्याबद्दल सांग?
उत्तर-: ते मी गमतीमध्ये म्हणालो होतो, ते तुम्ही कृपया गंभीरपणे घेऊ नका. वीरेंद्र सेहवाग म्हा कधीही सचिनच्या फलंदाजीच्या जवळ जाऊ शकत नाही.
त्याचा खेळ बघूनच मी मोठा झालो आहे. त्याला मी आदर्श मानतो. त्याची शैली आणि फटकेबाजी बघून मी त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करायचो. खेळातली शिस्त कशी असावी हे त्याच्याकडून मी उत्तमरीत्या शिकलो आहे. मी सचिनला गुरू मानत असलो तरी त्याने मला शिष्य मानल्यास तो माझा सन्मान असेल.
प्रश्न-: जेव्हा तु सचिन बद्दल विचार करतोस तेव्हा त्याच्यातील कोणत्या गोष्टी तुझ्याकडे असाव्यात असे तुला वाटते ?
उत्तर-: सर्वच. त्याची फक्त फलंदाजीचा शैली अद्वितीय आहे असे नाही तर तो एक माणूस म्हणूनही फार मोठा आहे. मला असे वाटते की, त्याचा विक्रम कधीही मोडू शकत नाही. जर कोणाला त्याचा विश्वविक्रम मोडीत काढायचा असेल तर त्याच्यामध्ये फक्त गुणवत्ता असून चालणार नाही तर त्याला दुखापतीपासूनही दूर रहावे लागेल आणि हे सुद्धा त्याच्ये विक्रम मोडीत काढण्यासाठी पुरेसे नाही.
१५ व्या वर्षांपासून तो मोठय़ा पातळीवर क्रिकेट खेळत होता, बरेच जण वयाच्या १४ व्या वर्षांपासूनच क्रिकेट खेळायला सुरूवात करतात. सचिनने केलेली ८३ आंतरराष्ट्रम्ीय शतके, जवळपास तीस हजार धावा आणि अजुनही तो चांगला खेळत असल्याने त्याचा विक्रम मोडणे ही अशक्यप्राय गोष्ट आहे.
सचिन आणि तुझ्यामध्ये एक गोष्ट सारखी वाटते, ती म्हणजे तु मैदानावर नेहमीच शांत दिसतो, याबद्दल काय सांगू शकतोस ?
उत्तर-: हे मी माझ्या पालकांकडून शिकलो आहे. ते मला नेहमी सांगतात की, जर तुम्हाला कोणी चिडवत असेल तर तुम्ही त्याला हसून उत्तर द्यायला हवे. ते त्याला नंतर खजील करते.
प्रश्न-: गोलंदाज हे शब्दांतूनही ‘गोलंदाजी’ करीत असतात त्याबद्दल काय सांगशील. वेगवान गोलंदाज जसा शोएब अख्तरने कधी तुला असा त्रास दिलाय का?
उत्तर-: हो, गोलंदाज नेहमीच शाब्दिक ‘गोलंदाजी’ करीत असतात. मला आठवतंय जेव्हा मी पाकिस्तानसध्ये जाऊन त्रिशतक झळकाविले होते तेव्हा शोएब अख्तरने मला असाच त्रास दिला होता. तो मला बाऊन्सर टाकत होता आणि सांगत होता की, "हिम्मत असेल तर हा चेंडू मारून दाखव किंवा तू फक्त थर्ड मॅनलाच चेंडू मारू शकतो". त्यावर मी त्याला ’ तू हे माझ्या सहकाऱ्याला सांग’ असे सांगत होतो. कारण त्यावेळी माझा सहकारी होता सचिन तेंडुलकर. त्यावेळी सचिन माझा मार्गदर्शक होता.
त्यावेळी मी थर्ड मॅनला जास्त फटके मारत होतो. पण त्यानंतर मी यष्टीच्या दिशेने सरळ फटका मारून त्याला बॅटनेच उत्तर द्यायला शिकलो.
प्रश्न-: सचिनने इंग्लंडविरूद्धच्या सामन्यामध्ये संघाला ३८७ धावांचे लक्ष्य गाठून दिले होते, पण त्या सामन्यात तू ६९ चेंडूत ८३ धावा फटकावून विजयाचा पाया रचला होतास त्याबद्दल सांग ?
उत्तर-: खरतंर मला त्यावेळी चौकार मारायचे नव्हते. मी त्यावेळी गौतमलाही सांगत होतोकी, मला चौकार मारायचे नाहीत. पण इंग्लंडचे म्गोलंदाज मला आाखूड टप्प्याचे चेंडू टाकत होते आणि त्यामुळेच मी चौकार मारू शकलो. त्यावेळी मला गौतम सांगत होता की, तू तुझा नैसर्गीक खेळ करीत राहा. त्याखेळी मुळे आम्ही दिवसअखेर १ बाद १३३ अशी मजल मारू शकलो होतो.