Leading International Marathi News Daily                                  बुधवार, २१ जानेवारी २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

बॉक्सिंग :महाराष्ट्राचा कोटीयन अंतिम फेरीत दाखल
मुंबई, २० जानेवारी / क्री. प्र.

 

महाराष्ट्र संघातून खेळणाऱ्या मुंबईचा विनित कोटियनने तिसऱ्या महापौर सुपर कप बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे.
सुपर कप स्पर्धेच्या आजच्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्र संघाचा विनित कोटियनला रिंगणातील प्रवेशा आधीच अंतिम फेरीचे दरवाजे उघडले. विनितला उपान्त्य फेरीत भारतीय बॉक्सिंग असोसिएशन सीनियर संघाच्या मनोज कुमारशी लढत द्यायची होती. वजन मापनासाठी वेळेवर हजर न राहिल्यामुळे त्याला खेळण्यास परवानगी देण्यात आली नाही आणि विनितचा अंतिम फेरीचा मार्ग मोकळा झाला. विनित हा एकमेव महाराष्ट्राचा खेळाडू आहे की जो पहिल्यांदा सुपर कपच्या अंतिम फेरीपर्यंत पोहचला आहे. अंतिम फेरीत त्याची लढत के.टी.टी. सिंगशी होणार आहे.
लाईट वेट गटात भारतीय बॉक्सिंग असोसिएशन सीनियर संघातून खेळणाऱ्या महाराष्ट्राच्या राकेश कळसकरने उत्तर विभाग ग्रीन संघाच्या संजय कुमारवर ६-० असा एकतर्फी विजय मिळविला. फ्लाय वेट गटात सेनादलाच्या संजय कोलतेने भारतीय बॉक्सिंग असोसिएशन सीनियर संघाच्या मदनलालला दुसऱ्या डावात लोगोपाठ दोन जबरदस्त ठोसे लगावत खाली पाडले. मदनलाल खेळण्यास कमी पडत असल्याचे रेफ्रीच्या निदर्शनात येताच खेळ थांबवत संजयला विजयी घोषित केले. सेनादलाच्या के. रोशन सिंगला विजयासाठी भारतीय बॉक्सिंग असोसिएशन सीनियर संघाच्या छोटेलाल यादवशी कडवी झुंज द्यावी लागली. सुरुवातीपासून दोन्ही खेळाडूंनी आक्रमक पवित्रा घेत एकमेकांवर वरचढ ठरत असतानाच के.रोशन सिंगने छोटेलाल यादवला संधी न देता गुण मिळविण्यात यशस्वी झाला. के.रोशन सिंगने छोटेलाल यादव विरुद्ध १०-७च्या फरकाने विजय मिळविला. सेनादल भारतीय बॉक्सिंग असोसिएशन सीनियर संघावर भारी पडत असल्याचे जाणवत असतानाच सनबीरने सेनादलाच्या जी. सत्या राजूला डोकेवर काढण्याची संधी न देता ७-५ च्या फरकाने विजय मिळविला. तर भारतीय बॉक्सिंग असोसिएशन सीनियर संघाच्या सतेंदरने सेनादलाच्या अमर सिंगला ७-४च्या फरकाने नमविले. सेनादलाचा जी. सत्या राजू व अमर सिंग वगळता इतर सर्व अंतिम फेरीत दाखल झाले आहे. तर भारतीय बॉक्सिंग असोसिएशन सीनियर संघाचे जे. पाटील व मनोज कुमार वगळता इतर सर्वानी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
निकाल : देवेंद्र सिंग (सेनादल)विजयी वि. प्रकाश दर्जी(उत्तरपूर्व विभाग यलो); पी. नरजीत (भारतीय बॉक्सिंग असो. सीनियर)विजयी वि. अमित (मध्यविभाग ग्रीन); के. रोशन सिंग (सेनादल) विजयी वि. छोटेलाल यादव (भारतीय बॉक्सिंग असो. सीनियर); सनबीर (भारतीय बॉक्सिंग असो. सीनियर)विजयी वि. जी सत्या राजू (सेनादल); परमजीत सिंग(भारतीय बॉक्सिंग असो. सीनियर)विजयी वि. कमान सिंग (उत्तरपूर्व विभाग ग्रीन).