Leading International Marathi News Daily                                  बुधवार, २१ जानेवारी २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

हॉकी: भारताचा सलग दुसरा विजय
अर्जेन्टिनावर ३-२ गोलने मात
मार डेल प्लाटा, २० जानेवारी / पीटीआय

 

भारताने आज दुसऱ्या हॉकी कसोटीत अर्जेन्टिनाची झुंज ३-२ गोलने मोडून काढली आणि चार सामन्यांच्या मालिकेत २-०अशी आघाडी मिळवली. मालिकेतील तिसरा कसोटी सामना उद्या, बुधवारी खेळला जाणार आहे.
तब्बल एक वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय मालिका खेळणाऱ्या भारतीय हॉकी संघाने काल झालेल्या पहिल्या लढतीत अर्जेन्टिनाचा २-० गोलने पराभव केला होता. आज सेंटर फॉरवर्ड शिवेंद्र सिंग (१२वा मिनिट), प्रभज्योत सिंग (४०वा मिनिट) आणि कर्णधार संदीप सिंग (५९वा मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवत भारताच्या विजयात उल्लेखनीय योगदान दिले. पराभूत अर्जेन्टिनातर्फे मारिओ अलमडा (१३वा मिनिट) आणि प्रेडो इबरा (४६वा मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला. आठ ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकावणाऱ्या भारतीय संघाने आज सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. भारताच्या आघाडीच्या फळीत खेळणारा प्रभज्योत सिंग, कालच्या लढतीत दोन गोल नोंदवणारा दीपक ठाकूर, शिवेंद्र सिंग आणि तुषार खांडेकर यांनी आक्रमक खेळ करत अर्जेन्टिनाच्या बचाव फळीवर दडपण निर्माण केले. सामन्याच्या चौथ्या मिनिटाला भारताला खाते उघडण्याची संधी होती पण, अर्जेन्टिनाचा गोलरक्षक व्हिवाल्डीने योग्य बचाव करत भारताचे आक्रमण परतवून लावले. १२व्या मिनिटाला संदीप सिंगने दिलेल्या पासवर शिवेंद्र सिंगने गोल नोंदवत भारताचे खाते उघडले पण, त्यानंतर दुसऱ्याच मिनिटाला अलमडाने गोल नोंदवत अर्जेन्टिनाला बरोबरी साधून दिली. मध्यंतराला खेळ थांबला त्यावेळी उभय संघ १-१ गोलने बरोबरीत होते. ४०व्या मिनिटाला खांडेकरने दिलेल्या पासवर प्रभज्योत सिंगने अर्जेन्टिनाच्या बचाव फळीला गुंगारा देत चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखवला आणि भारताला २-१ची आघाडी मिळवून दिली. राजपालकडून चेंडू हिसकावत अर्जेन्टिनाच्या मातिस रे याने लांब स्कूप केला. लुकास व्हिलाने त्यावर इबरा याला पास दिला. प्रेडो इबराने गोलजाळ्याचा अचूक वेध घेत अर्जेन्टिनाला २-२ अशी बरोबरी साधून दिली. ५८व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर कर्णधार संदीप सिंगने गोल नोंदवत भारताला मिळवून दिलेली ३-२ गोलची आघाडी अखेपर्यंत कायम राहिली.