Leading International Marathi News Daily                                  बुधवार, २१ जानेवारी २००९

कैद्यांनी केले पोलीस यंत्रणेचे पोस्टमॉर्टेम !
दिलीप शिंदे

मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यानंतर राज्यभरातील पोलीस यंत्रणा सतर्क असल्याच्या सरकारी दाव्याचे पाच कैद्यांनी पोलीस गाडीतून पळून पोस्टमॉर्टेम केले आहे. मोक्कासारख्या गुन्ह्यातील सहा अट्टल दरोडेखोरांसह १३ आरोपींच्या बंदोबस्तासाठी पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याऐवजी वयोवृद्ध पोलीस जमादाराला नऊ शिपाई आणि एका अनलोडेड कार्बाइनसह धाडण्यात आले असताना त्यापैकी सहा पोलीस चक्क ड्रायव्हरच्या बाजूला बसलेले होते, अशी धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.

जीवन प्राधिकरणाचे चुकीचे नियोजन
दोन कोटींचा बंधारा गेला १८ कोटींवर

सोपान बोंगाणे

अंबरनाथ-बदलापूर शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी उल्हास नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या कामात मोठय़ा प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. वाढीव कामाच्या कोणत्याही निविदा न मागविता ठराविक ठेकेदारालाच कोटय़वधी रुपयांची कामे देणे, कामाचा दर्जा न सांभाळणे आणि तांत्रिकदृष्टय़ाही ते काम चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे पंपिंग करून पाणी उचलण्यासाठी दरवर्षी सरासरी आठ ते दहा लाख रुपयांचा नाहक भुर्दंड सोसावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या संपूर्ण कामाची तज्ज्ञ समितीमार्फत चौकशी व्हावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

गर्दीची कोंडी फोडण्यासाठी डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात स्कायवॉक
डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरातील वाढत्या गर्दीचा विचार करून पूर्व भागात तीन व पश्चिम भागात एक असे चार स्कायवॉक बांधण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने तयार केला आहे. या कामासाठी सुमारे दहा कोटी रुपये प्रस्तावित केले आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दोन स्कायवॉक प्रस्तावांना तात्काळ मान्यता दिली आहे. डोंबिवली पूर्वेतील रेल्वे स्टेशनजवळील (भाजप कार्यालय) डॉ. रॉथ रोड व पश्चिमेतील महात्मा गांधी रोडवरील स्कायवॉक प्राधान्याने हाती घेण्यात येणार आहेत.

‘बेस्ट’ची ठाणे-बोरिवली वातानुकूलित सेवा
ठाणे/प्रतिनिधी

अवघ्या दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या ठाणे-बोरिवली या बेस्ट बसेसना प्रवाशांनी दिलेल्या अपूर्व प्रतिसादामुळे बेस्ट प्रशासन समाधानी असून, आता प्रवाशांनाही खूश करण्यासाठी याच मार्गावर वातानुकूलित सेवा सुरू करण्यात आली आहे.घोडबंदर मार्गावरील प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार सेवा देण्यात ठाणे परिवहन सेवा कुचकामी ठरत असल्याने, या मार्गावर बेस्टची सेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांनीच केली होती.दोन महिन्यांपूर्वी विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ठाणे ते बोरिवली अशी घोडबंदर मार्गे बेस्टची ७०० क्रमांकाची बससेवा सुरू झाली. १५ ते २० मिनिटांच्या अंतराने या मार्गावर दररोज १४ ते १५ बसेस धावत आहेत. बेस्टच्या गाडय़ांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, सगळ्या गाडय़ा खचाखच भरून जातात.प्रवाशांचा हा प्रतिसाद लक्षात घेऊन आता याच मार्गावर बेस्टची वातानुकूलित सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार सुरुवातीला चार एसी गाडय़ा या मार्गावर सुरू करण्यात आल्या असून, त्या सकाळच्या सत्रातच आहेत घोडबंदर मार्गावरील प्रवाशांनीही या नव्या सुविधेचे स्वागत केले असून, या गाडय़ा दुपारच्या वेळीही चालू ठेवाव्यात अशी मागणी केली आहे.

हिंदी भाषा एकता परिषदेतर्फे तुकाराम ओंबळे यांना मरणोत्तर पुरस्कार
ठाणे/प्रतिनिधी

मुंबईवर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याच्या वेळी शरीरात पाच गोळ्या घुसल्या असतानाही खतरनाक दहशतवादी अजमल कसाब याला पकडून ठेवणारे सहाय्यक उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांच्या अतुलनीय शौर्याबद्दल हिंदी भाषा एकता परिषदेतर्फे त्यांचा मरणोत्तर गौरव करण्यात येणार आहे.
परिषदेचे संयोजक अ‍ॅड. बी.एल. शर्मा यांनी ही माहिती दिली. हा कार्यक्रम २५ जानेवारी रोजी गडकरी रंगायतन येथे होणार आहे. यानिमित्ताने राष्ट्रीय कवीसंमेलन होणार असून, त्यास हरिओम पवार, संजय झाला, सरदार मनजीतसिंग, जानी बैरागी , रामदास फुटाणे आदी कवी सहभागी होणार आहेत. हे संमेलन मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेले जवान, कर्मचारी व अधिकाऱ्यांना समर्पित करण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. शर्मा म्हणाले. याचवेळी महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्यास शिवछत्रपती पुरस्कार, तसेच साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल हरिवंशराय बच्चन पुरस्कार देण्यात येतील.