Leading International Marathi News Daily                                  बुधवार, २१ जानेवारी २००९
व्यक्तिवेध

भारत-अमेरिका अणुऊर्जा कराराला पाठिंबा देणारे सिनेटर हॅरी रीड यांचे सल्लागार या नात्याने काम पाहणारे राहुल वर्मा यांना अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या सल्लागारांमध्ये निवडण्यात आले आहे. परराष्ट्रमंत्रिपदी हिलरी क्लिंटन असतील तेव्हा त्यांच्या कार्यालयात राहुल वर्मा काम पाहू लागतील. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केलेली त्यांची ही निवड राहुल वर्मा यांना कदाचित अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या उपमंत्रिपदापर्यंत घेऊन जाईल, अशी शक्यता आहे. राहुल ‘रिचर्ड’ वर्मा नावाने ओळखले जाणारे आणि मूळचे भारतीय वंशाचे अमेरिकन वर्मा अमेरिकेतल्या पहिल्या पन्नास भारतीयांमध्ये गणले जातात. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या सल्लागारांमध्ये राहुल वर्मा यांची निवड केली जाण्यापूर्वी ते ‘स्टेप्टो अ‍ॅण्ड जॉन्सन एलएलपी’ या आंतरराष्ट्रीय

 

कायदेविषयक कंपनीचे भागीदार होते. ही कंपनी आंतरराष्ट्रीय मालकी हक्काविषयीच्या कायदेकानूंचे व्यवहार पाहते. वाहतूक, दळणवळण, आंतरराष्ट्रीय व्यापार, त्यावरील मर्यादांचे उल्लंघन आदी गोष्टींच्या कायदेशीर बाबींमध्ये ही कंपनी लक्ष घालते. ओबामांनी नव्या परराष्ट्रमंत्र्यांच्या सल्लागारपदावर वर्मा यांना नेमले जाण्यापूर्वी ते संरक्षणविषयक समितीवरही काम पाहात होते. जनसंहारक अस्त्रांना रोखण्यासाठी कोणते खंबीर उपाय योजले जावेत, याविषयी सिनेटला सल्ला देणाऱ्या समितीवरही ते होते. प्रतिनिधिगृहाचे सभापती नॅन्सी पेलोसी आणि हॅरी रीड हेही त्या समितीवर होते. या समितीने अमेरिकेच्या संरक्षण खात्याला जनसंहारक अस्त्रांविषयी माहिती पुरवली. वर्मा हे अमेरिकेच्या हवाईदलात काही काळ होते. वर्मा यांनी त्यांच्या कायदेशीर अडचणींकडे लक्ष दिले. त्यांना हवाईदलातल्या सेवेबद्दल खास पदक देऊन गौरविण्यात आले आहे. रीड यांच्याकडे मुख्य सल्लागार म्हणून काम पाहात असताना त्यांनी रीड यांच्या वतीने वॉशिंग्टनच्या भारतीय दूतावासातल्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसमवेत अनेकवार चर्चा केली आहे. पेन्सिल्व्हानियाच्या लेहाय विद्यापीठात त्यांनी अमेरिकेच्या हवाईदलाचे राखीव अधिकारीपदाचे प्रशिक्षण घेतले. अमेरिकन युनिव्हर्सिटी लॉ स्कूलमधून त्यांनी जे.डी.ची पदवी मिळवली. १९९८ मध्ये जॉर्जटाऊन विद्यापीठातून विशेष गुणवत्तेसह त्यांनी एलएल.एम. ची पदवी प्राप्त केली. पाहता पाहता त्यांनी अमेरिकन भारतीय म्हणून राजकीय वर्तुळात ख्याती मिळवली. २००४ पासून २००८ पर्यंत प्रतिनिधिगृहात डेमॉक्रॅट्स अल्पमतात होते. डेमॉक्रॅट्सना एकगठ्ठा मतांची आवश्यकता असल्याने त्यांना मदत करायला जो एक प्रभावी गट निर्माण करण्यात आला, त्या गटाचेही नेतृत्व वर्मा यांच्याकडे होते. याच काळात अनेक डेमॉक्रॅट्सना निवडणूक निधीची आवश्यकता पडल्याने त्यांनाही वर्मानी मदतीचा हात दिला. अतिशय अल्पावधीत अमेरिकेत स्वत:चे प्रस्थ निर्माण करणारे जे मूळचे भारतीय आहेत, त्यात वर्माचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. जनसंहारक अस्त्रांच्या विरोधात नेमण्यात आलेल्या समितीत काम केल्याने आंतरराष्ट्रीय दहशतवादाचाही वर्मा यांचा अभ्यास आहे. स्वाभाविकच त्यांची नव्या पदावर झालेली निवड त्यांना लाभदायक ठरणार आहे. अमेरिकन राजकारण्यांच्या वर्तुळात राहून त्यांनी भारत-अमेरिका अणुऊर्जा कराराला पाठबळ प्राप्त करून दिले. हा करार रिपब्लिकन जॉर्ज बुश यांचा न राहता तो भारताच्या बाजूच्या रिपब्लिकनांचा तसेच डेमॉक्रॅट्सचा झाला. हा करार अमेरिकेच्या राजकारणात भारतीयांना प्राधान्यक्रम द्यायलाही उपयुक्त ठरला. वर्मा यांचे नाव अमेरिकन काँग्रेसच्या परराष्ट्र सल्लागार समितीकडून मंजूर झाले, की त्यांचे नाव परराष्ट्र खात्याच्या नामावलीत समाविष्ट होईल. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्रालयात दुय्यम पातळीवरील अधिकारपदांवर काही भारतीयांनी काम केले असले तरी दुसऱ्या क्रमांकाच्या अधिकारपदावर आजपर्यंत कुणी भारतीय नव्हता, राहुल वर्मा यांना तो मान आता मिळतो आहे.