Leading International Marathi News Daily                                  बुधवार, २१ जानेवारी २००९
विविध

आर्थिक गुन्ह्यांचे खटले हाताळण्यास भारतीय न्यायव्यवस्था सक्षम
सरन्यायाधीशांचे प्रतिपादन

नवी दिल्ली, २० जानेवारी/पी.टी.आय.

सत्यम, नागार्जुन फायनान्ससारखे उद्योगक्षेत्रातील आर्थिक घोटाळे व पांढरपेशा वर्गाकडून होत असलेल्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. या पाश्र्वभूमीवर आर्थिक गुन्ह्यांची उकल तसेच दोषींवर कारवाई करण्यास भारतीय न्यायव्यवस्था सक्षम आहे असे सरन्यायाधीश के. जी. बालकृष्णन यांनी सांगितले.
---------------------------------------------------------------------------- ओबामा शपथविधी विशेष
हिज मास्टर्स व्हॉईस

वॉशिंग्टन, २० जानेवारी/पीटीआय

जेव्हा अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष बराक हुसेन ओबामा त्यांच्या पहिल्या अध्यक्षीय भाषणासाठी मंचावर उभे राहिले तेव्हा शपथविधीसाठी उपस्थित असलेल्या लाखो लोकांच्या त्या गर्दीत एका व्यक्तीने जिवाचे कान करून त्यांचे ते भाषण ऐकले, बारीक कापलेले केस पोरगेलासा चेहरा असे साधे व्यक्तिमत्त्व असलेल्या माणसाचं नाव जॉन फेव्हर्यू. वय अवघे २७ वर्ष. हे भाषण त्याने एवढं जिवाचे कान करून ऐकण्याचे कारण म्हणजे त्यानेच ते लिहिलेलं होतं. जॉनच वैशिष्ट्य म्हणजे तो ओबामा यांचा निकटचा सहकारी तर आहेच पण त्यांचं मन वाचण्याचं कसब त्याच्याजवळ आहे.

शतकातील ‘न भूतो.’ असा सोहळा
वॉशिंग्टन, २० जानेवारी/पी.टी.आय.

अवघ्या काही महिन्यांपूर्वी संपूर्ण जगात कोणी कल्पनाही करू शकत नव्हते की एखादा कृष्णवर्णीय, एखाद्या मुस्लिम वडिलांचा मुलगा अमेरिकेचा अध्यक्ष बनू शकेल. परंतु २० जानेवारी २००९ या दिवसाला अमेरिकेच्या इतिहासात ‘सुवर्णदिना’चा मान देत सूर्यनारायणाच्या साक्षीने येथील कॅपिटॉल हिलवर बराक ओबामा यांचा अमेरिकेच्या अध्यक्षपदाचा शानदार सोहळा साजरा झाला. अमेरिकेचे ४४ वे अध्यक्ष म्हणून तसेच पहिलेच कृष्णवर्णीय या नात्याने बराक हुसेन ओबामा यांनी आज भारतीय वेळेनुसार रात्री १०.३६ वाजता पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आणि मानवी इतिहासाने एक आणखी ‘आश्वासक वळण’ घेतले.

भारत-अमेरिका संबंध आणखी दृढ करण्याचा ओबामा यांचा निर्धार
वॉशिंग्टन, २० जानेवारी/पीटीआय

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष बराक ओबामा यांच्या कारकिर्दीत भारतीय उपखंडासंदर्भात नेमके कोणते धोरण राबविले जाईल याविषयी भारतामध्ये काहीशी संदिग्धता व्यक्त करण्यात येत असल्याच्या पाश्र्वभूमीवर बराक ओबामा यांनी मात्र भारत-अमेरिकादरम्यानचे संबंध अधिक दृढ करण्याचा निर्धार केला आहे. महात्मा गांधी यांचे आत्मचरित्र हे ओबामा यांच्या आवडत्या पुस्तकांपैकी एक आहे. शुभयोगाचे प्रतिक म्हणून हनुमानाची प्रतिमा ओबामा नेहमी जवळ बाळगतात. काश्मीर प्रश्नासाठी विशेष दूत नेमण्याचा निर्णय ओबामा घेण्याची शक्यता आहे अशी चर्चा नवी दिल्लीतील राजनैतिक वर्तुळात गेले काही दिवस सुरू आहे.

व्हाइट हाऊसमध्ये बुश यांच्याकडून ओबामांचे स्वागत
अमेरिकेचे मावळते अध्यक्ष जॉर्ज बुश व त्यांच्या पत्नी लॉरा बुश यांनी त्यांचे उत्तराधिकारी व डेमोक्रॅटिक पक्षाचे निर्वाचित अध्यक्ष बराक ओबामा व त्यांच्या पत्नी मिशेल यांचे रात्री आठच्या सुमारास जंगी स्वागत केले. बराक ओबामा व मिशेल यांना घेऊन येणारी नव्या लिमोझिनला सुरक्षा रक्षकांनी सुरक्षेच्या कारणास्तव ‘द बीस्ट’ असे नाव दिले होते. त्यांची लिमोझिन व्हाइट हाऊसच्या प्रांगणात शिरल्यानंतर उत्तरेकडील पोर्चमध्ये उभ्या असलेल्या बुश दाम्पत्याने त्यांचे स्वागत केले. लॉरा यांना देण्यासाठी मिशेल यांनी भेटवस्तू बरोबर आणली होती. त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या छायाचित्रकारांच्या फौजेने हा सोहळा आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासाठी एकच दाटीवाटी केली..नवे उपाध्यक्ष ज्यो बिडेन आणि काँग्रेसमधील समिती सदस्य हेही यावेळी झालेल्या कॉफीपानाला हजर होते. व्हाइट हाऊसमध्ये येण्याआधी ओबामा यांच्या कुटुंबाने सेंट जॉन इपिस्पोकल चर्चमध्ये प्रार्थनेला उपस्थित राहून आपल्या दिवसाला सुरुवात केली.

शपथविधी सोहळ्याआधी ओबामा कुटुंबियांची चर्चमध्ये प्रार्थना
व्हाइट हाऊसमध्ये मावळते अध्यक्ष जॉर्ज बुश यांची भेट घेण्याआधी ओबामा तेथून नजीकच्या ब्लेअर हाऊसमधून अमेरिकेच्या प्रमाणवेळेनुसार सकाळी ८ वाजून ४७ मिनिटांनी बाहेर पडले व कुटुंबियांसमवेत सेंट जॉन इपिस्पोकल चर्च गाठले. चर्चच्या पायऱ्यांवर नवे उपाध्यक्ष ज्यो बिडेन व त्यांच्या पत्नी जील ओबामांच्या कुटुंबाची वाट पाहात उभे होते. ओबामांची काळी लिमोझिन चर्चमध्ये शिरल्यानंतर या सर्वांनी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना केली. लोकांसमोर येताना दिवसाची सुरुवात करण्याची संधी ओबामा यांनी अशी चर्चमध्ये प्रार्थना करून साधली. चर्चमध्ये प्रार्थना केल्यावर ओबामा व ज्यो बिडेन आपल्या कुटुंबियांसाठी व्हाइट हाऊसला कॉफीपानाला रवाना झाले. काळा कोट आणि तांबडा टाय परिधान केलेले ओबामा व खास सुवर्णाच्या कलाकुसरीचा काळा ड्रेस परिधान केलेल्या मिशेल हे दोघेही खूप आनंदी आणि उत्साही दिसत होते.

पोप यांच्याकडून आशीर्वाद
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारत असलेल्या बराक ओबामा यांनी पोप बेनेडिक्ट १६ वे यांनी खास आशीर्वाद दिले आहेत. व्हॅटिकनकडून ओबामा यांना पाठविण्यात येणारा तारेतील संदेश जगातल्या प्रसारमाध्यमांसाठी जाहीर करण्यात आला असून पोप यांनी ओबामा यांच्यासाठी देवाकडे कृपादृष्टी ठेवण्याची प्रार्थना केली आहे. कधीही न चुकणारे शहाणपण ओबामा यांना मिळू दे आणि आपल्या कार्यासाठी त्यांना अखंड शक्ती मिळू दे अशी प्रार्थना पोप बेनेडिक्ट १६ वे यांनी केली आहे. जगामध्ये सर्वत्र शांतता आणि एकमेकांविषयी स्नेहभाव वाढण्यासाठी ओबामा हे कायम प्रयत्नशील राहतील, अशी खास अपेक्षाही पोप यांनी व्यक्त केली आहे. ओबामा आपल्या मनात जी मुल्ये बाळगून आहेत त्यातून अमेरिकी जनतेला नवे धैर्य मिळत राहील, असेही पोप यांनी या संदेशात म्हटले आहे.
---------------------------------------------------------------------------बाटला हाऊस चकमकीची अर्जुन सिंगांनाही हवी न्यायालयीन चौकशी
नवी दिल्ली, २० जानेवारी/पी.टी.आय.

येथील बाटला हाऊसमध्ये दिल्ली पोलिसांशी झालेल्या चकमकीत इंडियन मुजाहिदीनचे दोन दहशतवादी ठार झाले होते. या चकमकीची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री अर्जुनसिंग यांनी आज केली. बाटला हाऊस येथे दिल्ली पोलिसांनी केलेली कारवाई तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री यांच्या देखरेखीखाली पार पडली होती. बाटला हाऊस चकमकीबाबत पत्रकारांनी मत विचारले असता अर्जुनसिंग म्हणाले की, लोकशाहीमध्ये सर्व गोष्टींसंदर्भातील वस्तुस्थिती समोर येणे आवश्यक असते. बाटला हाऊस चकमकीची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी अनेकांनी केली आहे. त्यामुळे या चकमकीसंदर्भातील वस्तुस्थिती उजेडात येण्यास मदत होईल का या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर अर्जुनसिंग यांनी होकारार्थी उत्तर दिले. हे प्रकरण पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याही विचाराधीन आहे असे संकेत अर्जुनसिंग यांनी दिले. यासंदर्भात पंतप्रधान व आपल्यात नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील सांगण्यास अर्जुनसिंग यांनी नकार दिला. दिल्लीमध्ये गेल्या १३ सप्टेंबर रोजी बॉम्बस्फोट मालिका घडविणारे इंडियन मुजाहिदीनचे दोन दहशतवादी शहरातील जामिया नगर भागातील बाटला हाऊस येथे दिल्ली पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाले होते. या चकमकीत एक पोलीस निरीक्षकही शहीद झाला होता. या चकमकीची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणी समाजवादी पक्ष, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ व अन्य घटकांनी केली होती.

जागामालकांशी पुन्हा करार करण्याचा ‘सुभिक्षा’चा प्रयत्न
नवी दिल्ली, २० जानेवारी/पी.टी.आय.

आर्थिक पेच आणि जागामालकांनी भाडे न भरल्यावरून घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे अडचणीत आलेल्या ‘सुभिक्षा’ या रिटेलमार्केट उद्योगाने जागामालकांशी पुन्हा करार करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. अर्थात भाडी थकविल्याचा आरोप या उद्योगाने फेटाळला आहे. वरचढ भाडी आणि कमी खप यामुळे तोटय़ात गेलेली देशातील आपली १६०० दुकाने बंद करण्याचा तसेच काही ठिकाणी नव्या जागी दुकाने सुरू करण्याचा निर्णयही ‘सुभिक्षा’ने घेतला आहे.सुभिक्षाचे विपणन व्यवस्थापकीय संचालक आर. सुब्रमण्यम यांनी सांगितले की, सुमारे ८० ते ९० दुकानांच्या सध्याच्या ठिकाणांचा फेरविचार केला जात आहे. अर्थात गेल्या दोन वर्षांत आम्ही चांगली प्रगती केली असली तरी जागतिक आर्थिक मंदीचा फटका बसल्याने आम्ही आमच्या धोरणात काही फेरबदल करीत आहोत.करारानुसार ठरलेले भाडेही न दिल्याचा आरोप नॉयडा आणि गाझियाबादमधील काही जागामालकांनी केला आहे. त्याबाबत छेडता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. हे करार गोपनीय असून आम्ही नेमके कोणाशी करार केले, भाडे किती ठरले व ते चुकते झाले आहे की थकले आहे, याबाबत आम्ही कोणतीही माहिती देऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले.नॉयडातील मालमत्ताधारकांच्या एका गटाने मात्र गेल्या पाच महिन्यांपासून ‘सुभिक्षा’ने भाडे थकविल्याचा आरोप केला आहे. कंपनी जागाही रिकामी करीत नाही की थकलेले भाडेही देत नाही. त्यामुळे पुढील कारवाईबाबत सर्व मालमत्ताधारकांची बैठक होणार असल्याचेही सांगण्यात आले.

मलेशियन सरकार आणि कॅथलिक वार्तापत्रात ‘गॉड’वाद!
क्वालालम्पूर, २० जानेवारी/पी.टी.आय.

मलेशियातील कॅथलिक पंथाच्या ‘हेरॉल्ड’ या वृत्तपत्राने ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणाऱ्या लेखनात ‘गॉड’चे भाषांतर ‘अल्ला’ केल्यावरून मलेशिया सरकारने तीव्र आक्षेप घेतला आहे. या वृत्तपत्रानेही ‘गॉड’चे भाषांतर ‘अल्ला’ करण्यास घातलेली बंदी धुडकावली असल्याने हा वाद विकोपाला गेला असून या साप्ताहिक वृत्तपत्रावर बंदी घालण्याचा इशारा सरकारने दिला आहे. ‘हेरॉल्ड’ वार्तापत्राचे संपादक फादर लॉरेन्स अँड्रय़ू यांनी सांगितले की, गेली कित्येक शतके मलेशियात ‘गॉड’ला ‘अल्ला’ हाच शब्द वापरला जात आहे. हे प्रकरण न्यायालयात गेले असून न्यायालय पुढील महिन्यात निर्णय देणार आहे. जोवर तो निकाल लागत नाही तोवर आपण साप्ताहिक लेखनात ‘गॉड’ला प्रतिशब्द म्हणून ‘अल्ला’चाच वापर करणार आहोत.सरकारने मात्र न्यायालयात निकाल लागेपर्यंत या मलय वृत्तपत्रावर बंदी घालण्याचा आदेश गेल्या महिन्यात दिला. ‘अल्ला’ शब्द वापरण्याचा अधिकार केवळ मुस्लिमांचाच आहे, असेही सरकारने म्हटले! या वृत्तपत्राने या बंदीविरोधातही न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर मात्र सरकारने घूमजाव केले व हा शब्द गाळल्यास वृत्तपत्राचे प्रकाशन रोखण्याचा आमचा इरादा नाही, असे जाहीर केले.आधुनिक मलय साहित्याचे जनक मुन्शी अब्दुल्ला यांनी १८५२ मध्ये ‘बायबल’चे भाषांतर करताना ‘गॉड’ला ‘अल्ला’ हा शब्द वापरला आहे. त्यामुळे आमच्या शब्दप्रयोगास ऐतिहासिक आधार आहे, असे फादर अँड्रय़ू यांनी ठामपणे नमूद केले. ‘द हेरॉल्ड’ या वृत्तपत्राचे मलेशियात साडेआठ लाख कॅथलिक वाचक आहेत. मलेशियात ६० टक्के नागरिक मुस्लिम आहेत.

अण्वस्त्रवाहू ‘ब्राह्मोस’ची यशस्वी चाचणी
जैसलमेर, २० जानेवारी/पीटीआय

ब्राह्मोस क्षेपणास्त्र मालिकेतील अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेल्या व २९० कि.मी.च्या पल्ल्यापर्यंत मारा करू शकणाऱ्या नव्या जातीच्या क्षेपणास्त्राची राजस्थानमधील पोखरण येथे आज यशस्वी चाचणी घेण्यात आली. मुंबइवरील हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर भारत व पाकिस्तानमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या पाश्र्वभूमीवर ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली.
संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅन्टोनी यांनी नवी दिल्ली येथे आज पत्रकारांना सांगितले की, ब्राह्मोस क्षेपणास्त्राची आज पार पडलेली चाचणी ही पूर्वनियोजित होती. ती एखाद्या देशाच्या विरोधात केली गेली असे मानण्याचे कारण नाही. ध्वनिच्या वेगापेक्षा २.८ पट अधिक वेग असलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी खरे तर गेल्या १७ जानेवारी रोजी करण्याचे ठरले होते. मात्र काही कारणाने ही चाचणी लांबणीवर टाकण्यात आली होती. ही चाचणी आज पार पडली. संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्या (डीआरडीओच्या) सूत्रांनी सांगितले की, ब्राह्मोस क्षेपणास्त्राचे विविध प्रकार असून, त्यातील पहिल्या प्रकारातील क्षेपणास्त्राचा लष्कराच्या ताफ्यात नुकताच समावेश करण्यात आला आहे.रशियाच्या सहकार्याने भारत ब्राह्मोस क्षेपणास्त्र विकसित करीत आहे. ब्रम्हपुत्रा व मॉस्को यांच्या नावाचा मेळ घालून या क्षेपणास्त्राला ब्राह्मोस हे नाव देण्यात आले आहे. हायपरसोनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्र विकसित करण्यासाठी गेल्या वर्षी रशियाचे संरक्षणमंत्री अ‍ॅनातोली सेर्दीयुकोव यांच्या भारतदौऱ्यादरम्यान दोन्ही देशांत करार झाला होता.

दिल्लीमध्ये गुटखा उत्पादकाकडून १३.५ कोटी बेहिशेबी रोकड जप्त!
नवी दिल्ली, २० जानेवारी/पीटीआय

येथील एका अग्रगण्य गुटखा उत्पादकाच्या मालकीच्या नऊ निवासस्थाने व कार्यालयांवर प्राप्तीकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकून १३ कोटी ५० लाख रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली. दिल्लीमध्ये प्राप्तीकर खात्याने आजवर घातलेल्या धाडींमध्ये इतक्या मोठय़ा प्रमाणात बेहिशेबी रोख रक्कम जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्राप्तीकर खात्याच्या दिल्लीतील अन्वेषण संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी या धाडी टाकल्या. या गुटखा उत्पादकाने सुमारे १०२ कोटी रुपयांचा कर चुकविल्याचे पुरावेही प्राप्तीकर अधिकाऱ्यांच्या हाती लागले आहेत. दक्षिण दिल्लीमध्ये या गुटखा उत्पादकाच्या जागेत एका सेफ्टी डिपॉझिट व्हॉल्टमध्ये १२ कोटी रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम सापडली. ही सर्व रक्कम हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात होती. या गुटखा उत्पादकाच्या मालकीच्या दुसऱ्या एका जागेतून दीड कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. ही रोख रक्कम मोजण्यासाठी एका बँकेचे सुमारे १५ अधिकारी काऊंटिंग मशिनसह प्राप्तीकर अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी हजर होते.या गुटखा उत्पादकाच्या नऊ निवासस्थाने व कार्यालयांवर टाकलेल्या धाडीमध्ये मोठय़ा प्रमाणावर दागदागिने तसेच विविध बँकखात्यांची कागदपत्रे जप्त करण्यात आली. दिल्लीतील या अग्रगण्य गुटखा उत्पादकाच्या दिल्लीसह पाटणा, लखनौ, जमशेदपूर, कोलकाता, इंदूर, गुवाहाटी, नोईडा येथील जागांवरही प्राप्तीकर खात्याने आज धाडी टाकल्या.

कच्च्या तेलाचे दर घसरले
न्यूयॉर्क, २० जानेवारी/वृत्तसंस्था

जागतिक मंदीच्या पाश्र्वभूमीवर जगभरात सर्वत्र तेलाची मागणी घसरत असल्याने कच्च्या तेलाचे भाव आज ३५ डॉलरच्याही खाली उतरले. येत्या फेब्रुवारी महिन्यात पुरवठा केल्या जाणाऱ्या तेलाचे भाव आज १.८८ डॉलर प्रतिबॅरलने घसरून ३४.६३ डॉलरवर स्थिरावले. अमेरिकेत आज ‘मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) डे’च्या सुट्टीमुळे आज बाजारपेठ बंद होती. तसेच बराक ओबामा यांच्या पदग्रहण कार्यक्रमामुळे साऱ्या जगाचे लक्ष तिकडे लागले आहे. परिणामी तेलाच्या किमती आणखी घसरू शकतील. तसेच गाझा पट्टीतील इस्रायल- लेबॅनॉन संघर्ष आता थांबला असून रशिया आणि युक्रेनमधील गॅस पुरवठय़ाशी संबंधित वादही मिटला आहे. यामुळेही मागणी घटून दरांमध्ये घसरण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नेपाळचा पाणीप्रकल्प चिनी कंपनीकडे!
काठमांडू, २० जानेवारी/पी.टी.आय.

नेपाळमध्ये हिंदू राजेशाही संपुष्टात येऊन मार्क्‍सवादी सरकार सत्तेवर आल्यानंतर देशातील महत्त्वाच्या पाणीप्रकल्पाचे कंत्राट कम्युनिस्ट सत्ता असलेल्या चीनमधील दोन कंपन्यांना मिळाले आहे.
काठमांडूतील २५ लाख लोकांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी बांधल्या जात असलेल्या २६.५ किलोमीटर लांबीच्या जलवाहिनी प्रकल्पाचे हे कंत्राट चायना रेल्वे-१५ ब्युरो ग्रुप कॉर्पोरेशन आणि चायना सीएमआयआयसी इंजिनिअरींग कॉर्पोरेशन या दोन कंपन्यांना दिले गेले आहे. पाच कोटी डॉलर खर्चून चार ते पाच वर्षांत या प्रकल्पातील जलवाहिनीचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. संपूर्ण प्रकल्पाचा खर्च ३५ कोटी रुपये अपेक्षित असून त्यासाठी ‘एशियन डेव्हलपमेन्ट बँके’ने (‘एडीबी’ने) मोठय़ा प्रमाणात पतपुरवठा केला आहे. मेलामची नदीचे पाणी या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याद्वारे काठमांडूत आणले जाणार आहे नंतर अन्य दोन नद्यांचे पाणीही आणले जाणार असून त्यामुळे काठमांडूतील पिण्याच्या पाण्याची दहा ते बारा वर्षांची गरज भागणार आहे.