Leading International Marathi News Daily                                 गुरुवार, २२ जानेवारी २००९
राज्य

प्रादेशिक

विविध

व्यापार - उद्योग

क्रीडा

अग्रलेख

विशेष लेख

व्यक्तिवेध

राशिभविष्य

प्रतिक्रिया

मागील अंक

वृत्तांत

निवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे..
उमेदवारांच्या नावांचे झेंडे देखील फडकायला लागले आहेत..
कालचे 'घरभेदे' उद्याचे 'आधारस्तंभ' भासायला लागले आहेत..
जातीपातींची नवी समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत..
एकीकडे विद्यमान आघाडय़ा बिघडायला लागल्या आहेत,
तर दुसरीकडे नव्या आघाडय़ा जन्म घेताना दिसू लागल्या आहेत..
आघाडी कितवी म्हणावी..
तिसरी, चौथी, पाचवी... की दहावी..
असा प्रश्न पडावा, असं सभोवतालचं वातावरण आहे..
वाट पाहिली जात्येय ती फक्त निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची..
बदलत्या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रांचा वेध आम्ही वर्षभर घेतोच आहोत..
पण आता आम्हाला हवा आहे, तुमचा अंदाज..
तो सुद्धा तीन सोप्या प्रश्नांच्या उत्तरांमधून..
तुम्ही इतकंच करायचं..
सोबतच्या तीन प्रश्नांची उत्तरं लिहिलेलं कुपन आमच्याकडे लगेच भरून पाठवायचं..
अचूक उत्तरांना बक्षिसं आहेतच..
(कुपन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)

ओबामा यांचा पाकिस्तानला दणका
अर्थसाह्यासाठी प्रामाणिकपणा ही अट

वॉशिंग्टन, २१ जानेवारी/पी.टी.आय.

सीमेलगतच्या अफगाणिस्तानी प्रदेशातील घातपाताबद्दल पाकिस्तानलाच जबाबदार धरले जाईल, असा इशारा देतानाच दहशतवादिंवरोधी लढय़ातील सहभागानुसार पाकिस्तानला बिनलष्करी आर्थिक साह्य दिले जाईल, असे अमेरिकेतील नवनियुक्त ओबामा प्रशासनाने जाहीर केले आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी लढय़ात पाकिस्तान किती प्रामाणिकपणे साह्य करतो, यावर त्यांना दिले जाणारे साह्य अवलंबून राहील, असे अमेरिकने स्पष्ट केले आहे. अध्यक्ष बराक ओबामा आणि उपाध्यक्ष जो बिडेन यांनी पाकिस्तानबाबतच्या धोरणाची आखणी केली आहे. बिडेन हे अफगाणिस्तान व पाकिस्तानविषयक तज्ज्ञ मानले जातात.

पंतप्रधानपदासाठी शरद पवार यांच्या उमेदवारीचे संकेत
नवी दिल्ली, २१ जानेवारी/खास प्रतिनिधी

केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरले असल्याचे स्पष्ट संकेत आज मिळाले. नव्या वर्षांतील राजकीय घडामोडींमुळे पंधराव्या लोकसभेत पंतप्रधानपदाची शर्यत धूसर होत चालली असतानाच शरद पवार रिंगणात उतरले आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या विस्तारित बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी यांच्या पत्रकार परिषदेत पवार यांच्या पंतप्रधानपदाच्या दावेदारीचा मुद्दा समोर आला.

अकरावी प्रवेशासाठी आता ‘एमएमआरडीए’नुसार ७०:३० कोटा
मुंबई, २१ जानेवारी / प्रतिनिधी

अकरावी प्रवेशासाठी जिल्ह्याअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के व जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांसाठी ३० टक्के कोटय़ाच्या गुंतागुंतीमधून मुंबई व परिसरातील विद्यार्थ्यांची सुटका होणार आहे. मुंबईतील प्रवेशासाठी जिल्ह्याऐवजी ‘मुंबई महानगर प्रदेशा’तील भौगोलिक कार्यक्षेत्र हेच युनिट मानून युनिटच्या अंतर्गत असलेल्या विद्यार्थ्यांना ७० टक्के व युनिटबाहेरील विद्यार्थ्यांना ३० टक्के कोटा पद्धत लागू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री पतंगराव कदम यांनी काल शिक्षण सचिव संजयकुमार व अन्य काही अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या नव्या निर्णयानुसार आता ‘७०:३०’ कोटय़ाच्या मुळ शासन निर्णयात दुरूस्ती केली जाणार आहे.

विलासरावांकडून गडकरींवर बदनामीचा खटला
मुंबई, २१ जानेवारी/प्रतिनिधी

शीव-पनवेल रस्त्याचे चौपदरीकरण आणि त्यावर पथकर वसुलीसाठी पाच टोलनाक्यांचे व्यवस्थापन करण्याचे सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे कंत्राट आपल्या मुलाची भागीदारी असलेल्या कंपनीस मिळावे यासाठी नियम गुंडाळून घाईघाईने निविदा काढल्या गेल्या, या महिनाभरापूर्वी नागपूर येथे केलेल्या आरोपाच्या संदर्भात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व आमदार नितीन गडकरी यांच्यावर बदनामीचा फौजदारी खटला गुदरला आहे.बिनबुडाचे व धादांत असत्य आरोप करून गडकरी यांनी आपली अब्रुनुकसानी केली असल्याने त्यांच्यावर भारतीय दंड विधानाच्या कलम ५०० अन्वये खटला चालवून कारवाई करावी, अशी विलासराव देशमुख यांची फिर्याद सोमवारी भोईवाडा येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाखल केली गेली होती.

खाजगी वीज उत्पादक कारखान्यांना ५० टक्के वीज राज्यातच विकावी लागणार
समर खडस
मुंबई, २१ जानेवारी

राज्यातील २५ विविध खाजगी वीज उत्पादक कारखान्यांनी उत्पादन केलेल्या वीजेपैकी ५० टक्के वीज ही राज्यालाच विकावी लागणार आहे. राज्याचे नवे ऊर्जा मंत्री सुनील तटकरे यांनी ऊर्जा खात्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर घेतलेला हा पहिला मोठा धोरणात्मक निर्णय आहे. मंत्रीमंडळाच्या उपसमितीसमोर हा प्रस्ताव येत्या आठ दिवसांत येणार असून त्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब होईल. राज्यात सुरू झालेल्या कारखान्यांमधील वीज बाहेरील राज्यांना विकल्यास त्यामुळे राज्यातील जनतेत मोठय़ा प्रमाणात असंतोष निर्माण होऊ शकतो, असे वाटल्यानेच राज्य सरकार या निर्णयाप्रत आले आहे. राज्यात एकंदर २५ खाजगी वीज उत्पादक कारखाने होऊ घातले असून त्यातून ३५,९६० मेगॅवॅट वीज निर्माण होणार आहे.

राज्याचा विक्रीकर वाढविण्यासाठी ‘प्राइस वॉटरहाऊस कूपर’च सल्लागार!
निशांत सरवणकर
मुंबई, २१ जानेवारी

कोटय़वधी रुपयांच्या ‘सत्यम कॉम्प्युटर’च्या घोटाळ्याकडे कानाडोळा करणारी ‘प्राईस वॉटरहाऊस कूपर’ हीच कंपनी गेल्या चार वर्षांंपासून राज्याचा विक्रीकर वाढविण्यासाठी सल्लागार म्हणून वावरत आहे. सल्ल्यासाठी कोटय़वधी रुपये आकारणाऱ्या या कंपनीच्या सल्ल्यानंतरही महसूलात अपेक्षित वाढ होण्याऐवजी कार्यप्रणालीतच कमालीचा गोंधळ निर्माण झाल्याचा आरोप केला जात आहे.
राज्यात २००५ मध्ये वॉटप्रणाली लागू झाल्यामुळे सर्वच व्यापारी कराच्या जाळ्यात ओढले गेले. त्यामुळे कमालीच्या झपाटय़ाने विक्रीकर वाढण्याची अपेक्षा होती. कदाचित त्यामुळेच ‘प्राईस वॉटरहाऊस कूपर’वर सल्ल्याची जबाबदारी सोपविण्यात आली असावी.

नांदेडच्या विभागीय आयुक्तालयावरून पक्षश्रेष्ठींचे मुख्यमंत्र्यांना झुकते माप !
मुंबई, २१ जानेवारी / खास प्रतिनिधी

नांदेडला विभागीय आयुक्तालय स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिल्याने या निर्णयाला विरोध करणारे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर मात करण्यात मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे यशस्वी झाले आहेत. नांदेडचा मुद्दा आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेचा केला असला तरी या वादात काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी हस्तक्षेप करून मुख्यमंत्र्यांना झुकते माप दिल्याचे जाणवत आहे. नांदेडला विभागीय आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय दोन आठवडय़ांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यावरून लातूरमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी लातूरऐवजी नांदेडला विभागीय आयुक्तालय स्थापन करण्यास तीव्र विरोध दर्शविला होता.

सरकारच्या घोटाळ्याच्या शंभर फायलींची एसआयटी नेमून चौकशी हवी- नितीन गडकरी
मुंबई, २१ जानेवारी/प्रतिनिधी

झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील गडबडीपासून भूखंडांची आरक्षणे बदलण्यापर्यंत एकूण १०० प्रकरणांच्या फाईल माझ्याकडे असून न्यायालयाने आपल्या देखरेखीखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करून या प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी आज पत्रकार परिषदेत केली. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी माझ्या विरोधात खटला दाखल करण्याचा निर्णय घेऊन मला या प्रकरणांना वाचा फोडण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असा टोलाही गडकरी यांनी देशमुख यांना लगावला.शीव-पनवेल रस्त्यावरील टोल वसुलीच्या कंत्राटावरून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांत सुरू झालेला संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. गडकरी म्हणाले की, विलासरावांनी नोटीस पाठविल्याचे मी स्वागत करतो. यानिमित्ताने न्यायालयापुढे पुरावे मांडण्याची संधी मला प्राप्त झाली. ज्याची निविदा मंजूर करायची त्याला अनुकूल अशा अटी व शर्ती ठरवून काम दिले. या कामावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत तंटा झाल्यामुळेच माझ्याकडे माहिती आली. झोपडपट्टी पुनर्विकास योजनेपासून भूखंडांची आरक्षणे बदलण्यापर्यंत १०० प्रकरणातील घोटाळ्याच्या फायली माझ्याकडे असून त्या न्यायालयापुढे मांडण्यात येतील. तेलगी प्रकरणात न्यायालयाच्या देखरेखीखाली जशी एसआयटी नियुक्त केली होती तशी ती या सर्व प्रकरणांत नियुक्त करून चौकशी करावी. शीव-पनवेल रस्त्यासंदर्भात मुख्यमंत्री, संबंधित खात्याचे मंत्री, राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांना पत्र पाठवून चुकीचा निर्णय रद्द करा अन्यथा मी न्यायालयात जाईन, असा इशारा दिल्याचे गडकरी यांनी सांगितले.

दहावी-बारावीचे वेळापत्रक संकेतस्थळावर
पुणे, २१ जानेवारी / खास प्रतिनिधी

दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांमध्येही त्याच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत. मंडळाचे राज्य सचिव टी. एन. सुपे यांनी निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. बारावीची प्रात्यक्षिक, तोंडी व श्रेणी परीक्षा ६ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. बारावीची लेखी परीक्षा २६ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत होईल. दहावीची प्रात्यक्षिक, तोंडी आणि श्रेणी परीक्षा १२ ते २८ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. लेखी परीक्षा ५ ते २३ मार्च या कालावधी होईल. मंडळाने या तारखा यापूर्वीच जाहीर करण्यात आल्या असल्या, तरी त्याचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले नव्हते. मंडळाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून आता वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. www.msbshse.ac.in या मंडळाच्या संकेतस्थळावर वेळापत्रकाची माहिती मिळू शकेल. सव्‍‌र्हरसारख्या तांत्रिक समस्या उद्भविल्यास काही वेळा वेळापत्रक दिसण्यास अडथळे येऊ शकतात.

मालेगाव बॉम्बस्फोट : मोक्काचा आज निर्णय
मुंबई, २१ जानेवारी / प्रतिनिधी

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींविरुद्ध पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात मोक्का कायद्यातील गुन्ह्यांचा समावेश करण्यात आला असून त्याची दखल घेऊन त्यानुसार खटला चालवायचा की नाही, याबाबतचा आदेश विशेष मोक्का न्यायाधीश वाय. डी. शिंदे हे उद्या देणार आहेत. दहशतवादविरोधी पथकाने काल मालेगाव स्फोटातील १४ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. मोक्का, बेकायदेशीर कृत्य (प्रतिंबध), आयपीसी, शस्त्रे आणि स्फोटके कायदा आदी कलमे त्यामध्ये लावण्यात आली आहेत.बचाव पक्षाच्या वकिलांनी या वेळी असा युक्तिवाद केला की, राकेश धावडे या आरोपीवर दोन अन्य खटल्यांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर मोक्का लावण्यात आला. मालेगाव स्फोटानंतर धावडे याच्याविरुद्ध दोन आरोपपत्रे दाखल करण्यात आली. १५ नोव्हेंबर रोजी धावडेला अटक करून नाशिक येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्याचदिवशी सरकारी पक्षाने त्याच्याविरुद्ध जालना येथे २००४ मध्ये झालेल्या स्फोटाच्या खटल्यात पुरवणी आरोपपत्र दाखल केले.सरकारने २० नोव्हेंबर रोजी मालेगाव प्रकरणी मोक्का लावलेला असतानाही न्यायालयाने २८ नोव्हेंबर दाखल करण्यात आलेले आरोपपत्रच केवळ विचारात घेतले, असा युक्तिवादही बचाव पक्षाच्या वकिलांनी केला.

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८


प्रत्येक शुक्रवारी


दिवाळी २००८