Leading International Marathi News Daily

गुरुवार, २२ जानेवारी २००९

माझिया जातीचा मज मिळो काणी..

रंजना : काय शंतनू, सोसायटीतल्या सगळ्या ‘लिट्ल चॅम्प्स’ना घेऊन कसली तयारी चाललीये!
शंतनू : काही नाही काकू, कार्यक्रमाची तयारी करतोय.
रंजना : अच्छा प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची तयारी होय?
कुहू : प्रजासत्ताक दिन म्हणजे?

 

केतन : ए ढील, म्हणजे इंडिपेंडन्स डे.
सुरीली : इंडिपेंडन्स डे! पण तो तर 15th Augustला असतो ना!
रंजना : अरे, काय गोंधळ घालताय रे! प्रजासत्ताक दिन म्हणजे Republic day आणि स्वातंत्र्य दिन म्हणजे Independance day. पाह्य़लंस ना संध्या, काय आजकालच्या या मुलांची ही अवस्था आहे! अगं साध्या साध्या गोष्टी यांना माहिती नसतात.
संध्या : तर काय! कुहू, कुंजर, सुरीली तुम्ही आता चौथीत ना रे! मग एवढंही माहीत नाही का?
रंजना : अगं, या गोष्टी माहीत नसतात. पण सिनेमांबद्दल विचार.. सगळी माहिती तोंडपाठ असेल..
शंतनू : काकू, यासाठीच या वर्षी आम्ही क्वीझ कॉम्पिटिशन घेणार आहोत.
रंजना : अशी एक क्वीझ कॉम्पिटिशन घेऊन काय होणार डोंबलं! तेवढय़ापुरतं पाठ करतात. नंतर विसरून जातात.
शंतनू : काकू, ऐकून तर घ्या माझं पूर्ण, ही क्वीझ कॉम्पिटिशन one time event नाहीये. तर पुढे पूर्ण वर्षभर घेणार आणि वर्षांच्या शेवटी म्हणजे पुढच्या २६ जानेवारीला या कॉम्पिटिशनच्या फायनल्स.
संध्या : अरे बापरे, बराच मोठा कार्यक्रम आहे की म्हणजे! आणि ही कल्पना तुझ्याच सुपीक डोक्यातून निघाली असणार?
शंतनू : अं हं! credit goes to शाश्वती.
रंजना : शाश्वती! आता ही शाश्वती कोण?
संध्या : अगं, ती गं, राण्यांच्या फ्लॅटमध्ये नव्यानं राहायला आलेली!
रंजना : हां हां. ती होय! आणि काय रे शंतनू, तू अगदी तिला अगं-जागं करतो आहेस. मोठीय ना ती तुमच्यापेक्षा.
शंतनू : तिनंच सांगितलंय की मला उगीच अहो-जाहो आणि काकू-बिकू म्हणू नका. उगीचच मोठं झाल्यासारखं वाटतं. आणि खरं सांगू का काकू. ती मोठी आहे आमच्यापेक्षा, पण तिला काकू-बिकू म्हणावंसं वाटतच नाही.What a lovely, and lively character she is... काय कल्पना आहेत माहित्येय तिच्याकडे..
रंजना : मग ती कुत्र्यांना दत्तक घेण्याची कल्पनाही तिचीच का?
शंतनू : नाही. ती शाल्मलीची. पण ‘डॉग शो’ची कल्पना शाश्वतीची. क्वीझचीही कल्पना तिचीच!
संध्या : मग शाल्मली कशी दिसत नाहीये आता तुमच्याबरोबर?
शंतनू : ती शाश्वतीकडेच गेलीय. दोघी मिळून पुढच्या वर्षांचं प्लॅनिंग करताहेत.
संध्या : म्हणजे वर्षभर आता तुम्ही कार्यक्रम करणार?
शंतनू : हो. शाश्वती म्हणाली की, जे काय करायचं ते long term goal ठेवूनच करायचं. उगीच छूटपूट एखादा कार्यक्रम करायचा आणि सोडून नाही द्यायचं. त्यातून काहीच achieve होत नाही.
रंजना : हे मात्र पटलं हं मला.
संध्या : मलाही. कारण कुठल्याही गोष्टीचे रिझल्टस् मिळायला हवे असतील ना तर त्यासाठी प्रयत्नांत सातत्य असलं पाहिजे.
शंतनू : एक्झ्ॉक्टली. काकू, अहो तुमचंच वाक्य तिनं वेगळ्या भाषेत सांगितलं. ती म्हणाली, to get results, sustained efforts are required.'
संध्या : बघ. म्हणतातच ना big people think alike.
शाल्मली : अरे वा, संध्याकाकू, काय आज एकदम phylosophical moodमध्ये? आणि कोण हे big people?
संध्या : मी आणि शाश्वती!
शाल्मली : तुम्ही आणि शाश्वती! हे काय गौडबंगाल आहे?
शंतनू : कमॉन शाल्मली. अगं, sustained efforts बद्दल दोघींचेही विचार एकसारखे निघाले, म्हणून संध्याकाकू तसं म्हणत होत्या. एनी वे, पण तुमची तयारी कुठवर?
शाल्मली : अरे, मस्त प्लॅन वर्कआऊट झालाय. शाश्वतीचा मेंदू म्हणजे ग्रेट आहे हं! काय भन्नाट कल्पना काढल्या आहेत. ही सगळी टिल्लीपिल्ली जाम खूश होणार आहेत बघ!
शंतनू : शाल्मली, तुला तो सगळा प्लॅन पटला म्हणजे ग्रेटच असणार!
रंजना : तर काय! शाल्मली, तूही काही कमी नाहीस. तुझ्याही कल्पना नेहमी सगळ्यांपेक्षा वेगळ्याच असतात हं!
संध्या : आणि आता तर काय, ही नवीन मैत्रीण पण तशीच.. तुमचं दोघींचं जमलं यात काही नवल नाही.
शाल्मली : खरंच काकू. like minded people भेटणं हे खरंच खूप छान असतं. विशेषत: तुमचे विचार सर्वसामान्यांपेक्षा वेगळे असतील तर सरधोपट विचारांना खूप पटकन साथ मिळते. पण रुळलेल्या वाटेवरचे मळलेले विचार सोडून चालणाऱ्यांना अशी साथ पटकन मिळत नाही. ‘माझिया जातीचा मज मिळो कोणी’ असं प्रत्येकालाच मनोमन वाटत असतं, ते यामुळेच..
शंतनू : झालं.. आमच्या शाल्मलीबाई, गेल्या विचारांच्या दुनियेत.
संध्या : अगं, तू काय, शंतनू काय आणि शरयूताई, शरदराव काय, तुम्ही सगळेच कायम वेगळे विचार करणारे बाई!
शाल्मली : हो नं काकू, अहो, शेवटी खाण तशी माती नाही का? वेगळ्या विचारांचं वळण आई-बाबांनी लहानपणापासूनच लावलं ना गं आम्हाला.
रंजना : हो. आणि तुम्हाला ते लागलं. नाही तर आमची मुलं बघा, किती ओरडा, रागवा, ती त्यांच्या त्यांच्या मार्गानंच गेली.
संध्या : जाऊ दे गं, रंजना, तू ना त्यांना समजूनच घेत नाहीस. तुझी मुलंही काही वाईट नाहीत गं. त्यांनी त्यांचे त्यांचे मार्ग पकडले.
शाल्मली : आणि त्याच मार्गावर त्यांनाही त्यांच्या ‘जातीचे’ कोणी भेटतील. हे भेटणं खूप परिवर्तन घडवून आणतं. आपल्याच वेगळ्या विचारांचा वसा जपताना कुठेतरी जाणवणारं एकटेपण कमी होतं. समविचारी माणसांची साथ खूप आश्वासक असते.
रंजना : पण अशी साथ तर तुम्हाला घरातूनच कायमच मिळत आली की..
शाल्मली : त्यात काही शंकाच नाही. पण कधी कधी नात्यांच्या चौकटीच्या बाहेर अशी साथ मिळते ना, त्याची एक वेगळीच मजा असते. तीच सध्या मी अनुभवतेय. असं वाटतं शाश्वतीशी माझी वर्षांनुवर्षांची ओळख आहे. काकू, अहो, तिच्याबरोबर कसा वेळ जातो कळत नाही.
शंतनू : म्हणून तर शाल्मली आमच्या वाटय़ाला येतच नाही हल्ली.
शाल्मली : No emotional blackmailing हं शंतनू. मला असं वाटतं. आपल्या सहवासातल्या प्रत्येक व्यक्तीबरोबरच आपलंी०४ं३्रल्ल वेगवेगळं असतं. त्यामुळे या equation ्ल नुसार भावविश्वही बदलत जातं. त्यामुळेच प्रत्येकाशी होणारा संवाद, exchange of thoughts बदलत जातं. त्यामुळेच तू, आई, बाबा यांच्याबरोबर होणाऱ्या गप्पांपेक्षाही वेगळ्याच गप्पा शाश्वतीबरोबर होतात. आणि या गप्पांची तुलना नाही. प्रत्येक नातं आपापल्या जागी आहे. आणि या सगळ्या नात्यांची वीण मला मात्र अजूनच समृद्ध करते आहे.
शंतनू : शाल्मली, तुझ्या लक्षात असेल तर, सकाळपासून आपण बाहेर आहोत. आणि आता जेवायला घरी गेलो नाही ना तर ती नात्यांची वीण उसवायला वेळ लागणार नाही हं..
शुभदा पटवर्धन.
shubhadey@gmail.com