Leading International Marathi News Daily                                 शुक्रवार, २३ जानेवारी २००९
व्यापार - उद्योग

बँक ऑफ इंडियाच्या तिमाही निव्वळ नफ्यात ७० टक्के वाढ

 

व्यापार प्रतिनिधी: ऑक्टोबर-डिसेंबर २००८ या एकंदर वित्तीय जगतासाठी तुलनेने सर्वाधिक खडतर गेलेल्या तिमाहीत सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाने ८७२ कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याची नोंद केली आहे. आधीच्या वर्षांतील याच तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा रु. ५१२ कोटी होता, त्यात यंदा ७० टक्के अशी भरीव वाढ झाली आहे. सरलेल्या तिमाहीत बँक ऑफ इंडियाच्या एकंदर उत्पन्न रु. ५,३९३.७४ कोटींवर गेले आहे, जे आधीच्या वर्षांतील याच तिमाहीत रु. ३,७०५.२१ कोटी होते. या बहारदार कामगिरीमागे व्याजेत्तर उत्पन्नात झालेली ९० टक्क्यांची घसघशीत वाढ कारणीभूत असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. व्याजेत्तर उत्पन्न मागील वर्षांतील रु. ५५४ कोटींवरून यंदाच्या तिमाहीत रु. १०५१ कोटींवर गेले आहे. तर निव्वळ व्याजापोटी उत्पन्न रु. १०७९ कोटींवरून सरलेल्या तिमाहीत रु. १५२१ कोटींवर म्हणजे ४१ टक्क्यांनी वाढले आहे.

हिंदुस्थान कन्स्ट्रक्शनला १५०० कोटींचे कंत्राट
व्यापार प्रतिनिधी: हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीला महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर धुळ्यानजीक ९६ किलोमीटरचा महामार्ग बांधण्याचे कंत्राट मिळाले आहे. ‘बांधा - वापरा - हस्तांतरीत करा’ या तत्त्वावर मिळालेल्या या कामात जॉन लेंग इन्व्हेस्टमेंट आणि सद्भव इंजिनीअरिंग या कंपन्यांचे सहकार्य ‘हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन’ला मिळणार आहे. या सहापदरी महामार्गाचा अंदाजित खर्च १,४५० कोटी रुपये असून ३० महिन्यांत हा महामार्ग बांधण्यात यावा, असे आदेश राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने दिले आहेत. हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने आतापर्यंत रस्ते, पूल, महामार्ग, रेल्वेमार्ग बांधणीची अनेक कामे देशात पार पडली आहेत. कोलकाता व दिल्ली येथील मेट्रो रेल्वे प्रकल्पही या कंपनीने बांधून दिला. तसेच पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील १६ किलोमीटरचा घाट मार्गही या कंपनीने बांधला आहे.

इट्झकॅश कार्डची ‘प्रॉडक्ट ऑफ द इयर’ म्हणून निवड
व्यापार प्रतिनिधी : इट्झकॅश लिमिटेडने मुंबईत द ताज लँडस एन्डमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात प्रतिष्ठेचा ‘प्रॉडक्ट ऑफ द इयर’ पुरस्कार पटकावला आहे. इट्झकॅश कार्ड लिमिटेडला सर्वोत्तम बहुपयोगी प्रीपेड कॅश कार्ड (बेस्ट मल्टीपर्पज प्रीपेड कार्ड) पुरस्कार मिळाला असून त्या माध्यमातून हे कार्ड या विभागात सर्वात नावीन्यपूर्ण व लोकप्रिय उत्पादन ठरले आहे. पुरस्कार्थ्यांची निवड ही ए सी निल्सनच्या अहवालावर आधारीत होती. या संशोधन एजन्सीने एक सर्वेक्षण घेतले होते. आणि त्यात विविध शहरे आणि विभागांमधील तब्बल ४० हजार लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या पुरस्काराने इट्झकॅश कार्डाच्या बाजारपेठेतील स्थानावर शिक्कामोर्तब केले आहे. यावेळी इट्झकॅश कार्डचे व्यवस्थापकिय संचालक नवीन सूर्या म्हणाले की, ‘प्रॉडक्ट ऑफ द इयर’ पुरस्कार आमच्यासाठी विशेष आहे. केवळ ग्राहकांच्या आमच्यावरील विश्वासानेच आम्हाला हा पुरस्कार जिंकून दिला आहे.

उद्योगपती दिलीप डहाणूकर यांचे ‘एलियन मॅन’ आयआयटी मुंबईला समर्पित
व्यापार प्रतिनिधी: आयआयटी मुंबईत शैक्षणिक पायाभरणी झालेल्या आणि पुढे देशा-विदेशात यशाची शिखरे सर करणाऱ्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी या संस्थेबद्दल आपापल्या परीने कृतज्ञता व्यक्त केली आहे. याच शृंखलेचा एक भाग म्हणून प्रथितयश उद्योजक आणि १९६४ सालच्या बॅचचे आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी दिलीप डहाणूकर यांनी वैज्ञानिक कथांवर आधारीत आपले पुस्तक ‘एलियन मॅन’ आयआयटी-पवईला समर्पित केले आहे. न्यूयॉर्कच्या रेडर पब्लिशिंग या प्रकाशन संस्थेने ‘एलियन मॅन’चे प्रकाशन केले आहे. ‘एलियन मॅन’च्या प्रतीची ऑनलाइन खरेदी ‘इंडियनप्लाझा डॉट कॉम’वर (www.indiaplaza.com) करता येईल. लेखक डहाणूकर यांच्याबद्दलची माहिती ‘ऑथर्सडेन डॉट कॉम’वर (http://www.authorsden.com/dilipsdahanukar) उपलब्ध आहे.

व्होक्सवॉगन ग्रुपच्या विक्रीत ४७ टक्के वाढ
व्यापार प्रतिनिधी: भारतातील व्होक्सवॉगन ग्रुपने २००८ सालची सांगता लक्षवेधक सफलता संपादित करून केली आहे. ऑडी, स्कोडा आणि व्होक्सवॉगन ह्य़ा ग्रूपच्या तीन ब्रँड्सनी २००७ सालातील १२,७१८ कार्सच्या तुलनेत ग्राहकांना १८,७२५ वाहने देऊन कार्सच्या संख्येत जी ६००७ कार्सची भर घातली, त्यामुळे कंपनीने ह्य़ा वर्षांत ४७ टक्के एवढी विक्रमी वाढ नोंदवली. भारतातील व्होक्सव्ॉगन ग्रुपची ही सफलता कंपनीने ह्य़ा देशामध्ये आपला कारभार सुरू केल्यापासून सर्वात घवघवीत आणि म्हणूनच गौरवास्पद आहे. ऑडी ए ४, ऑडी टीटी, ऑडी आर ८, स्कोडा फेबिआ आणि व्होक्सव्ॉगन जेट्टा या नवीन गाडय़ा बाजारात आणल्याने २००८ वर्ष हे कंपनीसाठी अत्यंत उत्साहवर्धक ठरले. ह्य़ा व्यतिरिक्त आमच्या तीन ब्रँड्सचं डीलरशिप नेटवर्क देशात सर्वत्र प्रस्थापित करून आणि त्याद्वारे आमची उपस्थिती अखिल भारतीय पातळीवरची बनवून आमचं सामथ्र्य वाढवण्यात आम्ही यश मिळविले आहे. नव्या जमान्याची टेक्नॉलॉजी आणि इंजिनीयरिंग, आराम आणि सुरक्षा अशा ग्राहकांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या गोष्टींसाठी आमचा ग्रुप जणू ‘प्रतिशब्द’ म्हणून नावारुपाला आला आहे. साहजिकच पुढील वाटचालीसाठी आमचा आत्मविश्वास वाढला आहे. आणि भारतीय मार्केट्समधील आमचे प्लॅन्स प्रत्यक्षात साकारण्यासाठी आगेकूच करण्याकरिता आम्हाला प्रोत्साहन मिळालं आहे,’’ असे व्होक्सवॉगन ग्रुप इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचाकल जॉर्ज मुल्लर यांनी सांगितले.

षण्मुखानंद सभागृहात शिव खेरा यांचे उद्या व्याख्यान
व्यापार प्रतिनिधी: प्रतिबंधात्मक आरोग्य चाचणी क्षेत्रातील प्रसिद्ध इंडस हेल्थ प्लस प्रायव्हेट लिमिटेडने सामाजिक जाणीवेच्या हेतूने वंचित बालकांसाठी मोफत आरोग्य सुरक्षा व मार्गदर्शन मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत ‘इंडस’तर्फे पालिका शाळांतील गरीब व वंचित बालकांची मोफत तपासणी करून त्यांना आरोग्य जागृतीबाबत योग्य ते मार्गदर्शन केले जाईल. हा संपूर्ण उपक्रम पुढील सहा महिने टप्प्याटप्प्याने राबविला जाणार आहे. मोहिमेच्या निधी उभारणीसाठी कंपनीने जागतिक ख्यातीचे प्रेरणा मार्गदर्शक शिव खेरा यांच्या चर्चासत्रांचे आयोजन येत्या २४ जानेवारीला सायंकाळी सहा वाजता षण्मुखानंद सभागृह, २९२, कॉम्रेड हरबन्सलाल मार्ग, सायन (पूर्व) येथे केले आहे. शिव खेरा हे अमेरिकेतील क्वालिफाईड लर्निग सिस्टिम्स इन्कॉर्पोरेटडचे संस्थापक व आंतरराष्ट्रीय पातळीवर तडाखेबंद विक्री झालेल्या ‘यू कॅन विन’ या पुस्तकाचे लेखक आहेत. आपल्या ९० मिनिटांच्या प्रेरणादायी चर्चासत्रात ते व्यक्ती व संघटना यांना यशस्वितेवर मार्गदर्शन करतात. दृष्टिकोन, महत्त्वाकांक्षा, कृती, प्रेरणा, नियंत्रण, नेतृत्व, कार्यक्षेत्रात सांघिक प्रयत्न आदी पैलूंचा त्यात समावेश असतो.

कोल्हापूर मराठा बँकेचे ‘सारस्वत’मधील विलीनीकरण अंतिम टप्प्यात
व्यापार प्रतिनिधी: दि कोल्हापूर मराठा को-ऑप बँकेचे सारस्वत को-ऑप. बँकेमध्ये विलीनीकरण होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेकडून मंजुरी मिळताच येत्या आठ ते दहा दिवसात विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती कोल्हापूर मराठा को-ऑप बँकेच्या वतीने देण्यात आली आहे. बँकेच्या विलीनीकरण प्रक्रियेमध्ये बऱ्याच अडचणी आल्या होत्या. त्या आता दूर होत असून सारस्वत बँकेचे वरिष्ठ अधिकारी बँक ताब्यात घेण्यासंदर्भात प्राथमिक कामे करून घेत आहेत. त्यामुळे बँकेच्या ठेवीदार, सभासद यांनी विलीनीकरणाच्या अंतिम टप्प्यात सहकार्य करावे, असे आवाहनही बँकेच्यावतीने करण्यात आले आहे.