Leading International Marathi News Daily                                 शुक्रवार, २३ जानेवारी २००९

कोण म्हणतं शास्त्रीय संगीत नामशेष होतंय?
येत्या ३ फेब्रुवारी रोजी उस्ताद अल्लारखाँ यांचा स्मृतिदिन आहे. उस्ताद अल्लारखाँ यांना संगीतमय श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात ‘होमेज टू अब्बाजी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या निमित्ताने देश-विदेशातील वादक या ठिकाणी एकत्र येतात. झाकीर हुसेन यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे यंदा नववे वर्ष आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उस्ताद झाकीर हुसेन यांच्याशी केलेली ही खास बातचीत.
एखादा जपानी पदार्थ प्रथमच खाल्ल्यावर कदाचित त्याची चव एवढी आवडणार नाही. दहाव्यांदा तोच पदार्थ चाखल्यावर त्याची लज्जत जाणवू शकेल. तसेच काहीसे शास्त्रीय संगीताचेही आहे. शास्त्रीय संगीत ऐकण्यासाठी ते समजलेच पाहिजे असा काही नियम नाही. एकदा-दोनदा-दहा वेळा..श्रवणभक्ती करता करता एखाद्या दिवशी शास्त्रीय संगीताचा खजिना उघडतो. एखाद्याच्या बाबतीत हे पाचव्या खेपेस घडेल तर एखाद्याला पंचवीस वेळा ऐकावे लागेल. उस्ताद झाकीर हुसेन सांगत होते. ते पुढे म्हणाले की, शास्त्रीय संगीत नामशेष होत चालले आहे अशी ओरड सध्या ऐकू येते. पण याच्या नेमके उलट घडत असल्याची सध्याची परिस्थिती आहे. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी शास्त्रीय संगीताच्या बैठकीला ५० श्रोते असत तर पॉप संगीताच्या कार्यक्रमाला पाचशे प्रेक्षक गोळा होत. आता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला अडीच-तीन हजार प्रेक्षक येतात आणि पॉप संगीताच्या कार्यक्रमासाठी १० हजार प्रेक्षक येतात. याचाच अर्थ हा की, शास्त्रीय गाण्याच्या कार्यक्रमांना येणाऱ्यांच्या टक्केवारीत नक्कीच वाढ झाली आहे.
‘होमेज टू अब्बाजी’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने जगभरातील कानाकोपऱ्यात असलेली कला भारतीय प्रेक्षकांसमोर सादर करण्याचा आमचा मानस असल्याचे झाकीर म्हणाले.अब्बाजींचे व्यक्तिमत्त्वच एवढे प्रभावी होते की, त्यांच्यावरील प्रेमापोटी अनेक मोठे कलाकार ‘होमेज टू अब्बाजी’मध्ये आपली कला सादर करण्यास उत्सुक असतात. यंदाच्या कार्यक्रमाची सुरुवात रणजित बारोट, राकेश चौरसिया आणि उस्ताद अल्लारखाँ इन्स्टिटय़ूट ऑफ म्युझिकच्या विद्यार्थ्यांच्या ‘ताल प्रणाम’ने होणार आहे. निलाद्री कुमार यांच्या सतारवादनाने सकाळच्या सत्राची सांगता होईल. दुपारच्या सत्रात तौफिक कुरेशी (जेम्बे), विक्कु विनायकम (घट्टम) आणि पुरण महाराज (तबला) हे आपापली कला पेश करणार आहेत आणि संध्याकाळच्या सत्रासाठी पश्चिम बंगालच्या ‘ढाक’वादकांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यानंतर जॅझ संगीतात ज्यांच्या नावाने कानाच्या पाळीला हात लावला जातो असे चार्लस् लॉइड, एरिक हारलॅण्ड, झाकीर हुसेन एक अनोखी जुगलबंदी सादर करणार आहेत. याच वाद्यमेळ्यात लुईस बँक्स, शिवमणी हेही या जुगलबंदीत आपापला खारीचा वाटा उचलतील. ‘वृत्तान्त’शी बोलताना झाकीर हुसेन यांनी आपल्या बालपणीच्या काही आठवणी जागविल्या. त्यांनी सांगितले की, अब्बाजींनी माझ्यावर कधीही रियाज करण्याची सक्ती केली नाही. त्यांच्या सक्ती न करण्यामुळे मी तबल्याकडे अधिकाधिक ओढला गेलो. लहानपणी कार्यक्रमरात तबला वाजवून बाहेर पडलो आणि अब्बाजींनी कढईतील गरम गरम दूध देऊ केले की समजायचो की, आजचा कार्यक्रम चांगला झाला. कौतुक करण्याची त्यांची अशी अनोखी पद्धत होती. अल्लारखाँचा हात पाकसिद्ध होता. त्यांच्या मित्रांकरवी त्यांना क्वचितप्रसंगी जेवण करायचा आग्रह होत असे. त्यावेळी ते स्वत: बाजारात जाऊन सर्व पाकसाहित्य विकत आणून गाणी म्हणत, ठेका धरत खाना तयार करत असत. आपण केलेले जेवण आग्रहाने सर्वाना वाढत आणि सर्वात शेवटी स्वत: जेवत असत. एवढा सतत तबला वाजवून त्यांच्या हाताला कधीच घट्टे पडले नाही. हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. पंचाहत्तराव्या वर्षी तबला वाजवताना देखील त्यांच्या चेहऱ्यावर एखाद्या बालकासारखे हास्य उमटत असे. मलाही तेच सौभाग्य मिळावे अशी इच्छा झाकीर हसेन यांनी व्यक्त केली.
गप्पांची गाडी पुन्हा एकदा शास्त्रीय संगीतावर आली. गेली शेकडो वर्षे शास्त्रीय संगीत अस्तित्त्वात असले तरी गेल्या सत्तर वर्षांत शास्त्रीय संगीत सर्वसामान्यांसमोर आले आहे. त्याआधी ते केवळ दरबारातच गायले जायचे. आता हळुहळु त्याला एक ठोस व्यासपीठ मिळत आहे. झाकीर हुसेन गेली जवळपास पन्नास वर्षे तबला वाजवत आहेत. आजही तबला वाजवताना त्यांना तोच आनंद मिळतो. लहानपणी माझ्या हाती लागलेले हे एक
अप्रतिम खेळणे आहे आणि त्याचा अजूनही मला कंटाळा आलेला नाही. यंदाच्या ‘होमेज टू अब्बाजी’च्या निमित्तानेही जगभरातील संगीत भारतीयांसमोर ठेवून ‘वसुधैव कुटुंबकम’ ही भावना रुजविण्याचा आमचा प्रयत्न आहेत. या विनामूल्य कार्यक्रमाच्या प्रवेशिका ३० जानेवारीपासून दादर (प.) येथील महाराष्ट्र वॉच कंपनी आणि फोर्टमधील ऱ्हिदम हाऊसमध्ये उपलब्ध होणार आहेत.
सुनील डिंगणकर

एप्रिलमध्ये रंगणार मिस महाराष्ट्र स्पर्धा
आतापर्यंत मिस वर्ल्ड, मिस इंडिया अशा सौंदर्य स्पर्धा होत्या. पण आता पहिल्यांदाच ‘मिस महाराष्ट्र’ स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. चाऊ-माऊ नृत्यशाळेचे नरेंद्र मसुरेकर, कौशिक मसुरेकर आणि लीना डिसोझा यांच्या फर्स्ट इम्प्रेशन एन्टरटेन्मेंट कंपनीने पुढाकार घेऊन ‘मिस महाराष्ट्र’ स्पर्धा घेण्याचे ठरविले आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर , कोल्हापूर, औरंगाबाद आणि रत्नागिरी या शहरांमध्ये प्राथमिक निवड फेरी होणार असून अंतिम फेरी ४ एप्रिल २००९ रोजी मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये होईल, अशी माहिती फर्स्ट इम्प्रेशन (सी. एम.) एन्टरटेन्मेंटचे कौशिक मुसरेकर यांनी सांगितले. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १८ ते ३० अशी वयोमर्यादा ठेवण्यात आली असून विजेत्या सौंदर्यवतीला ‘मिस महाराष्ट्र’ हा किताब तसेच एक लाख रुपये रोख असे पारितोषिक देण्यात येणार आहे. वयाच्या अटीप्रमाणेच स्पर्धक सौंदर्यवतींची उंची किमान साडेपाच फूट असणे अशीही अट आहे. ‘मिस महाराष्ट्र’ स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या परीक्षकांमध्ये आघाडीचे फॅशन डिझायनर्स, दिग्दर्शक, निर्माते तसेच अभिनेते-अभिनेत्री यांचा समावेश आहे. या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे यातून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी काही उत्पन्न नॅशनल फेडरेशन ऑफ दी ब्लाइंड, महाराष्ट्र या संस्थेला देण्यात येणार असल्याची माहितीही कौशिक मुसरेकर यांनी दिली. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या तरुणींनी २३८१४०३६, २३८०४४७७, ९८२०१७७८१७ अथवा ९८२०१७७३२९ या क्रमांकांवर संपर्क साधावा. त्याशिवाय www.letsdance.co.in या वेबसाईटमार्फत किंवा kaushik@letsdance.coin
या ईमेलद्वारेही संपर्क साधून स्पर्धेत सहभाग घेता येईल.
प्रतिनिधी

‘इंडियन आयडॉल’च्या सेटवर ‘दिल्ली सिक्स’च्या सीडीचे प्रकाशन
सध्या सर्वत्र चर्चा सुरु असलेल्या दिल्ली सिक्स या अभिषेक बच्चन व सोनम कपूर यांच्या चित्रपटाच्या सीडीचे प्रकाशन नुकतेच इंडियन आयडॉलच्या सेटवर झाले. अशा प्रकारे प्रथमच एखाद्या चित्रपटाच्या सीडीचे प्रकाशन एका रिअ‍ॅलिटी शो मध्ये झाल्याने सेटवर अतिशय उत्साहाचे वातावरण होते. राकेश ओमप्रकाश मेहरा, प्रसून जोशी आणि सोनम कपूर यांनी या प्रकाशनाला खास उपस्थिती लावली. राकेश मेहरा म्हणाले की, इंडियन आयडॉलसारखा दुसरा कार्यक्रम नाही. जेव्हा तुम्ही हा सिनेमा बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की या सीडीच्या प्रकाशनासाठी आम्ही इंडियन आयडॉलची निवड का केली. ‘संगीताच्या क्षेत्रात नाव कमावणाऱ्या मुलीचे पात्र मी यात रंगविले आहे’, असे सोनम कपूरने मिश्कीलपणे सांगितले. सेलिब्रेटींच्या उपस्थितीत सर्व स्पर्धकांच्या गाण्याला बहर आला होता. प्रजासत्ताकदिनाच्या खास भागात देशभक्तीपर गीते स्पर्धकांनी गायली. राजदीपने ‘मेरा रंग दे बसंती चोला’ हे गाणे झोकात सादर केले. प्रसनजीतने सुनो गौर से दुनियावालो. हे गाणे सादर केले तर तोर्षांने ‘वंदे मातरम’ हे गाणे गायले. रेमोने ‘बंदे मे था दम’ हे गाणे सादर केले. सौरभीने ‘आय लव्ह माय इंडिया’ व कपीलने ‘कर चले हम फिदा’ ही गाणी गायली. जावेद अली आणि कैलाश खेर यांच्या जुगलबंदीने तर सेटवर धुम माजवली. प्रजासत्ताकदिनाचा हा खास भाग शुक्रवारी रात्री ९.०० वाजता सोनी एंटरटेन्मेंट टेलीव्हीजनवर बघता
येईल.
प्रतिनिधी

जावेद अख्तर आता अभिनेत्याच्या भूमिकेत
‘जाओ पहले उसके बाप की साइन लेके आओ जिसने मेरे हाथ पे ये लिख दिया’ किंवा ‘एक लडकी को देखे तो ऐसा लगा’ असे गाजलेले संवाद आणि गाजलेले गाणे लिहिणारे गीतकार, पटकथा-संवाद लेखक जावेद अख्तर हे आता चित्रपटांतून अभिनय करणार आहेत. ‘मेरे ख्वाबों में जो आए’ या चित्रपटांत ते गाण्याच्या रिअ‍ॅलिटी शोचे परीक्षक म्हणून ‘जावेद अख्तर’ या स्वत:च्याच नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहेत. विशेष म्हणजे चित्रपटातील त्यांच्या व्यक्तिरेखेचे नावही ‘जावेद अख्तर’ हेच आहे.
हा चित्रपट ६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार असून निर्माते अजय बिजली आणि संजीव बिजली यांनी आग्रह केल्यामुळेच अख्तर यांनी भूमिका साकारली, असे म्हटले जातेय. रिअ‍ॅलिटी शोचे परीक्षक म्हणून जावेद अख्तर यांनी इंडियन आयडॉल फोरमध्ये आपण छोटय़ा पडद्यावर पाहत आहोत आता मोठय़ा पडद्यावरही ते याच भूमिकेत दिसणार आहेत. आतापर्यंत लेखणीद्वारे रुपेरी पडद्यावर अजरामर व्यक्तिरेखा आणणारे जावेद अख्तर यापुढे स्वत:साठी व्यक्तिरेखेचे लेखन करतील किंवा काय याबाबत अनेक आडाखे बांधले जात आहेत.
प्रतिनिधी

चॉईस आहे?
तुम्हाला माहित्ये, स्लमडॉगमधील अनिल कपूरने साकारलेली व्यक्तिरेखा आधी शाहरूख खानला ऑफर झाली होती. पण काही कारणांस्तव म्हणे शाहरूखने ही भूमिका नाकारली होती. असो, हा सर्व इतिहास आहे. आज याच चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. विकास स्वरूप यांनी लिहिलेल्या ‘क्यू अ‍ॅण्ड ए’ या पुस्तकावर आधारित हा चित्रपट आहे. गेला जवळपास दीड आठवडा याच चित्रपटाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कारामुळे ‘स्लमडॉग..’ला चार चाँद लागलेत. टीव्हीवरील ट्रेलर पाहून या चित्रपटाविषयी आशा उंचावतातच. भारतीय विषयावरचा चित्रपट, तोही परदेशी दिग्दर्शकाने केलेला.. त्यामुळे या चित्रपटाविषयी आकर्षण निर्माण होणे साहजिकच आहे. एखादा चित्रपट ‘फॉरेन रिटन्र्ड’ म्हटल्यावर त्याला वेगळी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहेच. त्यातच इरफान खान, अनिल कपूर असे अस्सल अभिनेते चित्रपटात असल्यावर मोजूनमापून चित्रपट पाहणाऱ्या रसिकांसाठी ही पर्वणी आहे. पुस्तक वाचताना दिसलेला चित्रपट ‘स्लमडॉग..’मध्ये उतरलाय का, याचीही उत्सुकता अनेकांना असेलच. या चित्रपटात आयुष खेडेकर आणि तन्वी लोणकर या मराठी बालकलाकारांनीही काम केले आहे. एकूणच या चित्रपटासाठी तिकीटबारीवर धाव घ्यायला हरकत नाही.

‘राज’ची पुण्याई फळास येणार का?
इम्रान हाश्मी आवडतो का? या प्रश्नावर होकार मिळण्यीच शक्यता कमी असली तरी त्याचे चित्रपट ‘हीट’ जातात ही वस्तुस्थिती आहे. गेल्या वर्षीचा ‘जन्नत’ हा असाच ‘हीट’ झालेला चित्रपट होता. आता ‘राज’ येऊ घातलाय. ‘मुन्नाभाईचा’, ‘सरकार’ किंवा ‘हेराफेरी’चा सिक्वल वगळता आपल्याकडे दुसरा भाग करण्याची फारशी प्रथा नाही. हॉलीवूडमध्ये मात्र बहुतेक हॉररपटांचे सिक्वल येतात. ‘राज’च्या निमित्ताने आपल्याकडे हाही ट्रेन्ड सुरू होतोय असे दिसते. ‘हंड्रेड डेज’मध्ये माधुरीला स्वप्न पडत असतात. त्याचप्रमाणे ‘राज’मध्ये इम्रान हाश्मीच्या हातून रेखाटल्या जाणाऱ्या चित्रांमध्ये त्याला अशा काही घटना दिसत असतात. ‘राज -१’मध्ये बिपाशा बासु होती, नदीम-श्रवणचे संगीत होते तर ‘राज-२’मध्ये फॅशनसाठी समीक्षकांची प्रशंसा मिळविलेली कंगना राणावत आहे. ‘फुंक’ ला प्रेक्षकांनी फुंकर मारली आणि ‘१९२०’लासुद्धा प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभला नाही. पण ‘राज - २’च्या बाबतीत मात्र अनेक घटक प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे खेचून आणण्यासारखे आहेत. ‘जहर’, ‘कलियुग’, ‘वो लम्हे’, ‘आवारापन’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केलेल्या मोहित सूरीने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ‘राज-१’ची पुण्याई सोबत घेऊनआल्यामुळे हा चित्रपट अपेक्षा पूर्ण करेल, अशी आशा आहे.

‘आसमाँ’ से टपका
हा चित्रपट कधी तयार झाला, ‘आसमाँ से टपका’ की काय, असा प्रश्न पडणे शक्य आहे. खास ‘मेट्रो’ टच असलेले काही चित्रपट सध्या तयार होत आहेत. ‘जाने तू..’, ‘रॉक ऑन’ला शहरी प्रेक्षकांनी उचलून धरल्याने, फ्रेश लुक असलेला चित्रपट चालू शकतो यावर शिक्कामोर्तब झाले आहे. नाटकवेडय़ा एका ग्रुपमधील कलाकार आणि प्रगतीपथावर जाण्याची त्यांची इच्छा आणि या प्रवासात घणारे प्रसंग, असे या चित्रपटाचे कथासूत्र असल्याचे समजते. टीव्हीवर या चित्रपटाचे फारसे दर्शन होत नाही. आता सचिन खेडेकर, हृषिता भट, सीमा विश्वास असे अभिनयात उजवे असलेले कलाकार असले तरी प्रेक्षकांना चित्रपटगृहांपर्यंत खेचून आणण्यासाठी ही नावे पुरेशी नाहीत. चित्रपटाचा दिग्दर्शक रोहित नय्यर याने याआधी ‘ढाई अक्षर प्रेम के’ आणि ‘हर दिल जो प्यार करेगा’ या चित्रपटांसाठी सहाय्यक म्हणून काम केले आहे. एकूण स्टारकास्ट आणि दिग्दर्शकाची पूर्व कामगिरी पाहता प्रथमदर्शनी हा चित्रपट आकृष्ट करत नाही. त्यामुळे मल्टिप्लेक्समध्ये जाऊन किमान दीडशे रुपये आणि आयुष्यातील दोन तास ‘दाँव पे’ लावायचे असतील तर तो निर्णय तुमचा आहे. नाही तर मग मित्राला हा चित्रपट पाहण्यास सांगा आणि त्याचे ऐकून मगच तुम्ही हे धाडस करा.
टॉकिजवाला