Leading International Marathi News Daily                                 शुक्रवार, २३ जानेवारी २००९

यंत्रमागधारकांच्या ‘बंद’ ला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद
सोलापूर, २२ जानेवारी/प्रतिनिधी

यंत्रमाग कामगारांना माथाडीसदृश कायदा लागू करण्याच्या विरोधात सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाने पुकारलेल्या ‘यंत्रमाग बंद’ आंदोलनास भरघोस प्रतिसाद मिळाला. मात्र या बंदला आक्षेप घेऊन कामगार संघटनांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.कामगारांना सदर कायदा लागू झाल्यास यंत्रमाग कारखानदारांवर १५ ते १६ टक्के जादा बोजा पडणार असून तो न परवडणारा आहे म्हणून या कायद्याच्या विरोधात गुरुवारी यंत्रमाग बंद आंदोलनास शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा संघाचे सभापती पेंटप्पा गड्डम यांनी केला.

काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांचे व्यासपीठावर ऐक्य; राजकीय धुळवडीची चिन्हे
दयानंद लिपारे
इचलकरंजी, २२ जानेवारी

इचलकरंजी नगरपरिषदेच्या कार्यक्रमानिमित्त राष्ट्रीय व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दाखवलेले ऐक्य कार्यकर्त्यांना आधार देणारे आहे. आवाडे-आवळे, आवाडे-माने यांच्यातील मतभेद संपुष्टात येवून ऐक्याची एक्सप्रेस सुसाट धावू लागल्याने दोन्ही काँग्रेसना लोकसभा-विधानसभा निवडणुकाजिंकणे सोपे बनणार आहे. तथापि व्यासपीठावर दिसलेले ऐक्य पुढेही कायम राहणार का आणि मनोमिलनाचे नाटय़ मनापासून व्यक्त होणार का, हा कळीचा मुद्दा आहे. या प्रश्नाचे उत्तर वाटते आणि दिसते तितके सोपे नसल्याने राजकीय धुळवड रंगण्याची चिन्हे अधिक आहेत.

बेकायदेशीररित्या गर्भिलग तपासणी कोल्हापुरात उघड
कोल्हापूर, २२ जानेवारी / प्रतिनिधी

कोल्हापूर शहरात काही वैद्यकीय केंद्रांमध्ये बेकायदेशीररित्या गर्भिलग तपासणी केली जाते अशी माहिती मिळाल्यानंतर गर्भिलग तपासणी विरोधी समितीच्या अ‍ॅड.वर्षां देशपांडे यांनी आज शहरातील सुपर सोनोग्राफी या ठिकाणी धाड टाकून गर्भिलग तपासणी केली जात असल्याचे पुराव्यासह उघडकीस आणले. या प्रकरणी डॉ.विजय पाटील आणि डॉ.पी.जी.माने या दोघाजणांविरूध्द लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. याशिवाय आणखीही काही ठिकाणी अशाच प्रकारची बेकायदेशीररित्या गर्भिलग तपासणी केली जात असल्याबद्दलची माहिती अ‍ॅड.देशपांडे यांनी पोलिसांना दिली आहे.

मधू कांबीकर, सुरेखा पुणेकर यांच्या नृत्याने सांगलीकर मंत्रमुग्ध!
सांगली, २२ जानेवारी / प्रतिनिधी

महाराष्ट्रातील आघाडीच्या लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर व मधु कांबीकर यांनी दिलखेचक अदाकारीने समस्त सांगलीकरांना मंत्रमुग्ध करीत अबकड कल्चरल ग्रुपच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती संगीत महोत्सवाची शानदार सांगता झाली. येथील तरुण भारत क्रीडांगणावर आयोजित या कार्यक्रमास रसिकांनी मोठी गर्दी केली होती. भेदिकापासून सुरू झालेल्या या लावणीचा प्रवास बैठक, तमाशा व तो खुला कसा झाला, हे पदर राहुल सोलापूरकर यांनी उलगडून सांगितले. ढोलकीचा घुमणारा नाद, घुंगरांचा छनछनाट व थिरकणाऱ्या पायांवर रसिकांची नजर स्थिरावून गेली होती. या कार्यक्रमात बैठकीची, खडी, शृंगारी, झुन्नर, बालेघाटी व छक्कड अशा लावण्या सुरेखा पुणेकर व मधु कांबीकर यांनी सादर केल्या. तसेच त्याचा इतिहास व वैशिष्टय़ेही उलगडून दाखवली. महिलांची अलोट उपस्थिती लक्षात घेऊन या लावणीतील शब्दांची नीट उमग व्हावी, यासाठी मधु कांबीकर यांनी नायिकेच्या मनातील भावना स्पष्टपणे सांगितल्या. तसेच वसंत बापट यांची ‘राया थट्टा केली’ व ‘नेसुनी पितांबर जरी’ या लावण्या सादर केल्या. लावणी म्हटलं की जे नाव प्रथम तोंडी येतं त्या सुरेखा पुणेकर यांच्या ठसकेबाज आवाज, दिलखेचक अदा व बोलके डोळे यामुळे या कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढत गेली. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली ‘या रावजी, बसा भाऊजी’ ही त्यांची लावणी चांगलीच बहारदार झाली. तसेच ‘पावणं नाद खुळा हा धरू नका’ या लावणीवर नवख्या लावण्यवतींसह त्यांनी ठुमकेदार नृत्यही सादर केले.

मिरज अर्बन बँकेच्या मजल्याचा ठेवीदारांच्या परतफेडीसाठी लिलाव जाहीर
मिरज, २२ जानेवारी/वार्ताहर

ठेवीदारांच्या सुमारे नऊ लाख रुपयांच्या परतफेडीसाठी मिरज अर्बन को-ऑप. बँकेच्या इमारतीतील पहिल्या मजल्याचा लिलाव करण्यात येणार आहे. जप्ती व लिलावासाठी दि. ९ फेब्रुवारी ही तारीख तहसीलदार डॉ. विकास खरात यांनी निश्चित केली असून, तशी नोटीस गुरुवारी बँकेला बजावली आहे.
मिरज येथील वयोवृद्ध ठेवीदार गोपाळ मुतालिक यांनी आठ लाख ८० हजार रुपयांच्या ठेवरकमेच्या वसुलीसाठी ग्राहक न्यायालयात दावा दाखल केला होता. ग्राहक न्यायालयाने बँकेची स्थावर मालमत्ता जप्त करून लिलाव करावा व ठेवीदाराची रक्कम द्यावी, असा निकाल दिला. या निकालानुसार तहसीलदार डॉ. विकास खरात यांनी बँकेच्या पहिल्या मजल्यावरील २६८.९६ चौरस मीटर इमारतीचा जप्ती लिलाव आज जाहीर केला. सुमारे १७ कोटी रुपयांच्या बेकायदा कर्जव्यवहारामुळे मिरज अर्बन बँकेची आर्थिक स्थिती मोडकळीस आली आहे. अशातच गतवर्षी रिझव्‍‌र्ह बँकेने बँकिंग परवाना रद्द केला, तर सहकार खात्याने या बँकेची दिवाळखोरी जाहीर करून अवसायक नियुक्त केला आहे. जप्ती लिलावाची नोटीस आज बजावण्यात आल्याने पुन्हा एकदा मिरज अर्बन बँक चर्चेत आली आहे.

दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी
कागल, २२ जानेवारी / वार्ताहर

कागल-निढोरी राज्य मार्गावरील शेंडूर फाटय़ाजवळ झालेल्या मोटरसायकल अपघातात राजू त्रिमल भोसले (वय २३, रा. बेघर वसाहत) हा जागीच ठार झाला तर संदीप दिलीप गाडेकर (वय २२, रा.कागल) हा जखमी झाला असून त्याच्यावर कोल्हापूर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.रात्री दहा वाजता निढोरीहून जेवण करून परत येत असताना अज्ञात वाहनाने मागून जोरदार धडक दिली. यात दोघेही बाजूला फेकले गेले. गुरुवारी सकाळी गवत कापावयास जाणाऱ्यांना हे दोघे पडलेले दिसले. त्यातील भोसले हा मयत झाला होता तर रात्रभर बेशुद्ध असलेल्या संदीप गाडेकर याला पहाटे शुद्ध आली होती. त्याच्याकडील मोबाईलवरून त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधला. सकाळी कागल पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व राजू भोसले याचा मृतदेह ताब्यात घेतला. गाडेकर यांच्यावर कागल ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार झाल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. राजू भोसले हे विवाहित असून त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व आई असा परिवार आहे.

कर्नाटककडे जाणारी एसटी वाहतूक ठप्प
इचलकरंजी, २२ जानेवारी / वार्ताहर

मराठी भाषिकांच्या सीमाप्रश्नावरून महाराष्ट्र व कर्नाटकात उमटणाऱ्या प्रतिक्रियांचे पडसाद इचलकरंजीतही दिसण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी कर्नाटक राज्यात अंशत: सुरू असलेली एसटी बस वाहतूक आज पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी इचलकरंजी एसटी आगाराचे सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. इचलकरंजी वस्त्रोद्योगाचे शहर असल्याने कर्नाटकातील शेजारच्या बेळगाव, विजापूर या जिल्हय़ाशी संबंध असल्याने या दोन्ही जिल्हय़ांत प्रवासी वाहतूक मोठय़ा संख्येने होते. इचलकरंजी एसटी आगाराकडून विजापूर, हुबळी, जमखंडी, निपाणी, माद्याळ, हणबरवाडी, सदलगा, कारदगा, कागवाड, बालेघोळ आदी ठिकाणी दिवसभर व रात्री मुक्कामाच्या फेऱ्या होतात. इचलकरंजीच्या एसटी बसच्या अंशत: फेऱ्या रद्द झाल्याने काल सुमारे ३० हजार रुपयांचे उत्पन्न बुडाले.काल सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हणबरवाडीस जाणाऱ्या बसवर (एम. एच. १२ ए. आर. ८३७२) कन्नडिगांच्या कार्यकर्त्यांनी प्रवासी उतरवून दगडफेक केली. त्यामध्ये बसच्या सर्व काचा फोडल्या. त्यामुळे आज एकही एसटी कर्नाटकात जाऊ शकली नाही. दिवसभरात सुमारे १४०० कि.मी.च्या फेऱ्या रद्द झाल्याने ७० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती इचलकरंजी आगारातून देण्यात आली.

कर्नाटक सरकारच्या प्रतिमेचे मिरजेत दहन
मिरज, २२ जानेवारी / वार्ताहर

सीमाभागातील मराठी जनतेवर होणाऱ्या अन्यायाबद्दल कर्नाटक सरकारच्या प्रतिमेचे मिरज शहरात दहन करण्यात आले. शिवसेना कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.
शहरातून कर्नाटकात होणारी बस वाहतूक गेले तीन दिवस बंद असून काही ठिकाणी कन्नड फलकांना शिवसैनिकांनी काळे फासून आपला रोष प्रदर्शित केला. कर्नाटक शासनाची तिरडी बांधून येथील लक्ष्मी मार्केट परिसरात फिरविण्यात आली. महाराणा प्रताप चौकात कर्नाटक शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत दहन करण्यात आले. या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, शहरप्रमुख श्रीकांत एडके, श्रीमती सुनीता मोरे, शोभा आडसूळ, किरण कांबळे, सुरेश भोसले व किरण रजपूत आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

दादूकाका भिडे शिशुमंदिरचे वार्षिक पारितोषिक वितरण
सांगली, २२ जानेवारी / प्रतिनिधी

सांगली शिक्षण संस्थेच्या के. वि. तथा दादूकाका भिडे शिशु मंदिर व बालविहार या शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण व विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम मोठय़ा उत्साहात झाला.
या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन अध्यक्ष शैलेश केळकर व प्रमुख पाहुणे श्रीकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. मोठय़ा गटातील मुलांनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. शैलेश केळकर व श्रीकांत पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन श्रीकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. बालवाडीच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती वरदा खाडीलकर यांच्या हस्ते नटराज पूजनाने झाले. या प्रसंगी बालविहार, लहान व मोठय़ा गटाच्या विद्यार्थ्यांनी जंगलच्या प्राण्यांनी जेवण केले, खुळ खुळ घुंगरू, वाजे घुंगरू वाजे, ढमा ढम ढोलक झनन झांजिरी, जोगवा जोगवा आम्ही मागतो जोगवा, सर्व जण साधूसंत एक होऊ या, या असे एकापेक्षा एक नाच सादर केले. आई मला चंद्र हवा, चंद्र हवा या गाण्याने या कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुकुमार पाटील यांनी केले. बालमंदिरच्या कार्याध्यक्षा श्रीमती वैशाली जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या वेळी शाला समितीचे अध्यक्ष नितीन खाडीलकर, शाला अधीक्षक डी. डी. कांबळे यांच्यासह शिक्षक, सेवक व पालक वर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होता. मुख्याध्यापिका श्रीमती एस. एस. जाधव यांनी गायलेल्या पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली.