Leading International Marathi News Daily                                 शुक्रवार, २३ जानेवारी २००९
राज्य

प्रादेशिक

विविध

व्यापार - उद्योग

क्रीडा

अग्रलेख

विशेष लेख

लोकमानस

व्यक्तिवेध

राशिभविष्य

प्रतिक्रिया

मागील अंक

वृत्तांतनिवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे..
उमेदवारांच्या नावांचे झेंडे देखील फडकायला लागले आहेत..
कालचे 'घरभेदे' उद्याचे 'आधारस्तंभ' भासायला लागले आहेत..
जातीपातींची नवी समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत..
एकीकडे विद्यमान आघाडय़ा बिघडायला लागल्या आहेत,
तर दुसरीकडे नव्या आघाडय़ा जन्म घेताना दिसू लागल्या आहेत..
आघाडी कितवी म्हणावी..
तिसरी, चौथी, पाचवी... की दहावी..
असा प्रश्न पडावा, असं सभोवतालचं वातावरण आहे..
वाट पाहिली जात्येय ती फक्त निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची..
बदलत्या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रांचा वेध आम्ही वर्षभर घेतोच आहोत..
पण आता आम्हाला हवा आहे, तुमचा अंदाज..
तो सुद्धा तीन सोप्या प्रश्नांच्या उत्तरांमधून..
तुम्ही इतकंच करायचं..
सोबतच्या तीन प्रश्नांची उत्तरं लिहिलेलं कुपन आमच्याकडे लगेच भरून पाठवायचं..
अचूक उत्तरांना बक्षिसं आहेतच..
(कुपन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)

धारावीचा ‘मेकओव्हर’ ऑस्करच्या अंगणात
‘स्लमडॉग मिलेनियर’ला सवरेत्कृष्ट चित्रपटासह १० नामांकने

बेव्हर्ली हिल्स, २२ जानेवारी/पी.टी.आय.

ऑस्कर पुरस्कार मिळणे ही भारतासाठी नवलाईचीच गोष्ट राहिली आहे. परंतु त्याचे मानांकन मिळणेसुद्धा तसे अप्राप्यच मानले जाते. ‘रझिया सुलतान’, ‘गांधी’ या भारताशी संबंधित दोनच चित्रपटांना आजवर हे पुरस्कार मिळाले आहेत. तर अलीकडचा ‘लगान’ आणि मागील जमान्यातील ‘मदर इंडिया’ असे काही सन्माननीय अपवाद वगळता ऑस्करचे नामांकनही भारतीय चित्रपटसृष्टीसाठी स्वप्नवतच राहिले आहे. परंतु या सगळ्याची जणू काही कसर भरून काढणारी तब्बल १० नामांकने ‘धारावी’त घडणाऱ्या कथानकावर बेतलेल्या ‘स्लमडॉग मिलिनियर’ या चित्रपटाला मिळाली आहेत. विशेष म्हणजे आघाडीचा संगीतकार ए. आर. रहमान याला तीन पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले असून ऑस्करवर धडक देणारा तो पहिला भारतीय संगीतकार ठरला आहे.

मुंडे यांच्या ‘शेतकरी संघर्ष अभियानास’ डोरलीतून सुरुवात
संदीप प्रधान
वर्धा (डोरली), २२ जानेवारी

सुमारे तीन वर्षांपूर्वी कर्जबाजारी, नापिकी, दुष्काळ याने गांजलेल्या डोरलीकरांनी ‘गाव विकणे आहे’ अशी जाहिरात दिली. या चमत्कारिक, वेदनादायी जाहिरातीमुळे पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसचे युवा नेते खासदार राहुल गांधी यांच्यापासून अनेकांची पावले या गावाला लागली. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्या आजपासून सुरू झालेल्या ‘शेतकरी संघर्ष अभियान’चा प्रारंभ डोरालीतून केला. शेतकऱ्यांची वेदना राष्ट्रीय ऐरणीवर आणणाऱ्या डोरलीकरांना मुंडे यांनी अभिवादन केले. त्या वेळी डोरलीकर एकमुखाने सांगत होते ‘गाव विकणे आहे’ अशी जाहिरात करूनही त्यांच्या पदरात आश्वासनांखेरीज काहीच पडले नाही. वर्धा जिल्ह्य़ात यंदा दुष्काळ पडला. दुबारा नव्हे तर तिबार पेरणी करूनही शेतकऱ्यांच्या हाती पीक आले नाही.

‘हेल हिटलर’ च्या धर्तीवर मनसैनिकांची ‘राजवंदना’!
संदीप आचार्य
मुंबई, २२ जानेवारी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे दैवत. त्यांच्यानंतर राज यांना आकर्षण आहे ते राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि अ‍ॅडॉल्फ हिटलर यांचे. हिटलरचे संघटनकौशल्य व शिस्त वादातीत होती. हिटलरच्या कोणत्याही सभेत अथवा कार्यक्रमात नाझी सैनिक ज्याप्रकारे हात अर्धा उंचावून कडक सलामी द्यायचे, त्याच प्रकारे यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रत्येक सभेत मनसेचे कार्यकर्ते राज यांच्या आगमनानंतर ‘जय महाराष्ट्र’ अशी मानवंदना देणार आहेत. याचे पहिले प्रात्यक्षिक येत्या २४ जानेवारी रोजी ठाणे येथे होणाऱ्या जाहीर सभेत पाहावयास मिळणार आहे. अर्थात अशी मानवंदना देण्यामागे मनसेच्या कार्यकर्त्यांना ‘हिटलरशाही’ अभिप्रेत नाही, तर केवळ एकसंधपणा व शिस्तीचे निदर्शक म्हणून ही पद्धत सुरू करण्यात येत असल्याचे मनसेच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

करकरे, कामटे, साळसकर, ओंबळे यांच्यासह १३ जणांना अशोकचक्र!
नवी दिल्ली, २२ जानेवारी/प्रतिनिधी

मुंबई हल्ल्यातील अतिरेक्यांचा खंबीर मुकाबला करताना धारातीर्थी पडलेल्या १८ जणांपैकी सहा वीरजवान आणि पोलिसांना अशोकचक्र हा शांतताकाळातील सर्वोच्च वीरपुरस्कार बहाल केला जाणार असल्याचे खात्रीलायकरित्या समजते. याबाबतची अधिकृत घोषणा दोन दिवसांत होणार आहे. अशोकचक्रासाठी यंदा १३ जणांची निवड झाल्याचे समजते. ‘एनएसजी’चे मेजर संदीप उन्नीकृष्णन व कमांडो गजेंद्र सिंग तसेच मुंबई पोलीस दलातील दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, अतिरिक्त आयुक्त अशोक कामटे, खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विजय साळसकर व अतिरेकी कसाबला जिवंत पकडताना प्राणांची आहुती देणारे सहायक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे या सहाजणांचा मरणोत्तर या वीरपुरस्काराने गौरव केला जाणार आहे.

‘व्हाइट हाऊस इज पीपल्स हाऊस’
वॉशिंग्टन, २२ जानेवारी/पी.टी.आय.

अमेरिकेमध्ये चांगल्या बदलांची कास धरणारे नवनिर्वाचित अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या कार्यकालाच्या पहिल्याच दिवशी आता अध्यक्षांचे व्हाइट हाऊस हे जनतेचे कार्यालय म्हणजे ‘पीपल्स हाऊस’ असेल असे स्पष्टपणे जाहीर केले. व्हाइट हाऊसच्या कर्मचाऱ्यांना कामाच्या मूल्यांबाबत सूचना देताना यापुढे पारदर्शकता आणि कायद्याची बूज हे या कामकाजाची अनन्यसाधारण वैशिष्टय़े असतील असे ओबामा यांनी म्हटले. आपल्या धडाकेबाज कार्यपध्दतीला अनुसरून ओबामा यांनी व्हाइट हाऊसचे दरवाजे सर्वसामान्य अमेरिकींसाठी किलकिले केले. दुपारनंतर व्हाइट हाऊसमध्ये येणाऱ्या काही नागरिकांचे त्यांनी पत्नी मिशेलसोबत जोरदार स्वागत केले. लोकांचे, लोकांसाठी लोकांनी नियुक्त केलेले सरकार हे अब्राहम लिंकन यांचे प्रसिध्द वचन ओबामांनी प्रत्यक्षात अमलात आणण्याचे ठरविले आहे. निवडणुकीच्या प्रचारामध्येही त्यांनी हेच अभिवचन जनतेसमोर दिले होते. या वचनाचा आपल्याला विसर पडलेला नाही हेच त्यांनी आपल्या कृतीमधून दाखवून दिले.
पुन्हा शपथ
अमेरिकेसारख्या बलाढय़ लोकशाही देशाच्या अध्यक्षपदाची शपथ घेताना झालेल्या शाब्दिक चुकीपायी बराक ओबामा यांना दुसऱ्याच दिवशी पुन्हा शपथ घ्यावी लागली! अमेरिकेच्या घटनेने राष्ट्राध्यक्षांची शपथ निश्चित केली आहे. मंगळवारी अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्टस् यांनी मात्र शपथ देताना मूळ प्रत न बाळगल्याने ‘फेथफुली’ या शब्दाची जागा चुकली आणि त्यातून त्यांचा तसेच ओबामा यांचाही किंचित गोंधळ उडाला. दोघांनीही त्या गोंधळावर मात करीत शपथविधी पार पाडला खरा पण तरीही कोणाच्याही मनात कोणतीही शंका राहू नये म्हणून बुधवारी दुपारी अध्यक्षीय प्रासादात पुन्हा एकवार शपथविधी पार पाडला गेला!

‘महावितरण’पुढे आर्थिक संकट, विजेची दरवाढ अटळ?
मुंबई, २२ जानेवारी / प्रतिनिधी

बाहेरील स्रोतांकडून दामदुप्पट दराने विजेची खरेदी करून राज्यातील भारनियमन कमीत कमी ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करणारी ‘महावितरण’ कंपनी या चढय़ा दराच्या खरेदीमुळे आता आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे विजेची दरवाढ करण्यावाचून कंपनीपुढे अन्य पर्याय उरला नसल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
गेल्या वर्षभरातील विजेच्या खरेदीपोटी ‘महावितरण’ला मोजावी लागलेली रक्कम पाहता विजेची दरवाढ न केल्यास जादा भावाची वीजखरेदी करणे दुरापास्त होणार असून पर्यायाने त्याचा फटका राज्यात नियोजित वेळापत्रकापेक्षाही अधिकचे भारनियमन करावे लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.गेल्या एप्रिल महिन्यांत विजेच्या खरेदीपोटी १३२२ कोटी रुपये, मे महिन्यांत १५३६ कोटी रुपये, ऑगस्ट महिन्यांत १५४२ कोटी रुपये, ऑक्टोबर महिन्यांत १६३६ कोटी रुपये, नोव्हेंबर महिन्यांत १६७३ कोटी रुपये आणि डिसेंबर महिन्यांत १७२३ कोटी रुपये अशा चढत्या दराने ‘महावितरण’ला रक्कम मोजावी लागली आहे.बाहेरील स्रोतांकडून घेण्यात येणाऱ्या विजेचे दर प्रतियुनिट नऊ ते १० रुपये इतके आहेत तर रत्नागिरी प्रकल्पातून ३.०५ ते ३.१० रुपये या दराने मिळणाऱ्या विजेसाठी आता प्रतियुनिट ३.७० ते ३.८० रुपये मोजावे लागत आहेत. ‘महावितरण’चा खर्च दरमहा वाढत चालला असल्याने विजेची दरवाढ करण्यावाचून अन्य पर्याय राहिलेला नाही. ही वाढ झाली नाही तर विजेचे वेळापत्रकच कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गेल्या वर्षी ११७ कोटी रुपये नफ्यात असलेली ‘महावितरण’ कंपनी आर्थिकदृष्टय़ा संकटात सापडण्याची लक्षणे दिसत आहेत.

हाफिज कॉन्ट्रक्टर यांच्या कार्यालयावर प्राप्तिकर खात्याच्या धाडी
मुंबई, २२ जानेवारी / प्रतिनिधी

प्रसिद्ध वास्तुरचनाकार हाफिज कॉन्ट्रक्टर यांच्या मालकीच्या कार्यालयांवर आज ँप्राप्तिकर खात्याने धाडी टाकल्या. कर चुकविल्याबाबत या धाडी टाकण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. प्राप्तिकर विभागाच्या प्रवक्त्याने याबाबत धाडी टाकल्या आहेत किंवा नाही याबाबत दुजोरा देण्यास नकार दिला. कॉन्ट्रॅक्टर यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक चीनवाला तसेच फाईव्ह गार्डन येथील त्यांच्या अन्य कार्यालयांवर धाडी टाकण्यात आल्या. या धाडीत काय आढळले ते कळू शकले नाही. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत या धाडी सुरू होत्या. याशिवाय नवी मुंबईतील एका बिल्डरच्या कार्यालयांवरही आज धाडी टाकण्यात आल्या. या बिल्डरचे नाव कळू शकले नाही.

हिरे व्यापारी भरत शहाला अटक
मुंबई, २२ जानेवारी / प्रतिनिधी

फसवणुकीच्या प्रकरणात सिल्वासा महानगर दंडाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटवरून आज हिरेव्यापारी व चित्रपट निर्माता भरत शहा याला आज मलबार हिल पोलिसांनी अटक केली. त्याला आज जामीन मिळू न शकल्याने पोलीस कोठडीत राहावे लागले. शहा याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल असून त्याच्याविरुद्ध सिल्वासा महानगरदंडाधिकारी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. हे वॉरंट आज सकाळी आम्हाला मिळाले असून त्याद्वारे आम्ही कारवाई करीत शहाला दक्षिण मुंबईतील त्याच्या घरातून अटक केल्याचे मलबार हिल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक इक्बाल शेख यांनी सांगितले. अटकेनंतर शहाने जामिनासाठी अर्ज दाखल केला. मात्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८


प्रत्येक शुक्रवारी


दिवाळी २००८