Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, २३ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

धारावीचा ‘मेकओव्हर’ ऑस्करच्या अंगणात
‘स्लमडॉग मिलेनियर’ला सवरेत्कृष्ट चित्रपटासह १० नामांकने
बेव्हर्ली हिल्स, २२ जानेवारी/पी.टी.आय.

 

ऑस्कर पुरस्कार मिळणे ही भारतासाठी नवलाईचीच गोष्ट राहिली आहे. परंतु त्याचे मानांकन मिळणेसुद्धा तसे अप्राप्यच मानले जाते. ‘रझिया सुलतान’, ‘गांधी’ या भारताशी संबंधित दोनच चित्रपटांना आजवर हे पुरस्कार मिळाले आहेत. तर अलीकडचा ‘लगान’ आणि मागील जमान्यातील ‘मदर इंडिया’ असे काही सन्माननीय अपवाद वगळता ऑस्करचे नामांकनही भारतीय चित्रपटसृष्टीसाठी स्वप्नवतच राहिले आहे. परंतु या सगळ्याची जणू काही कसर भरून काढणारी तब्बल १० नामांकने ‘धारावी’त घडणाऱ्या कथानकावर बेतलेल्या ‘स्लमडॉग मिलिनियर’ या चित्रपटाला मिळाली आहेत. विशेष म्हणजे आघाडीचा संगीतकार ए. आर. रहमान याला तीन पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले असून ऑस्करवर धडक देणारा तो पहिला भारतीय संगीतकार ठरला आहे.
ऑस्कर पुरस्काराची नामांकने आज जाहीर करण्यात आली. यात दिग्दर्शक डेव्हिड फिंचर यांच्या ‘द क्यूरिअस केस ऑफ बेंजामिन बटन’ या चित्रपटाने सर्वाधिक म्हणजे १३ नामांकने मिळवून आघाडी घेतली आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटासोबत महत्त्वाच्या सर्व पारितोषिकांसाठी या चित्रपटाने मानांकने मिळवली आहेत. त्याखालोखाल ब्रिटिश दिग्दर्शक डॅनी बॉयल यांनी भारतात बनविलेल्या ‘स्लमडॉग मिलिनियर’ला १० तर ‘द डार्क नाईट’ आणि मिल्क या दोन्ही चित्रपटांना अनुक्रमे आठ नामांकने मिळाली आहेत. ‘वॉल ई’ या अ‍ॅनिमेटेड चित्रपटाला सहा नामांकने मिळाली आहेत. स्लमडॉग मिलेनियरने अलीकडेच चार गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळवून पाश्चात्य जगतात खळबळ माजवली होती. तेव्हापासूनच ऑस्करवरही या चित्रपटाची मोहर उमटणार, अशी चर्चा सुरू होती. परंतु या अपेक्षेवरही वरताण करीत या चित्रपटाने तब्बल १० नामांकने मिळविली आहेत. सवरेत्कृष्ट दिग्दर्शक, सवरेत्कृष्ट चित्रपट, संगीत, गीतकार, ध्वनी संकलन, ध्वनीमिश्रण, संकलन आदी विभागांसाठी ही नामांकने मिळाली आहेत. दिग्दर्शक डॅनी बॉयल व ए. आर. रेहमान यांच्यासह गीतकार गुलझार तसेच माया अरुलप्रकाशम यांनाही ही नामांकने मिळाली आहेत.
कौन बनेगा करोडपतीसारख्या कार्यक्रमात सगळ्याच प्रश्नांची अचूक उत्तरे देणारा जमाल हा धारावीत राहणारा निरक्षर मुलगा उत्तरे देण्यासाठी लांडी लबाडी केल्याच्या आरोपावरून तुरुंगात टाकला जातो. मात्र प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याला १८ वर्षांंच्या आपल्या उण्यापुऱ्या आयुष्यात भेटलेल्या माणसांमधून आणि अनुभवातून कसं मिळतं, हे ‘स्लमडॉग मिलिनियर’मध्ये दाखविण्यात आले आहे. भारताचे प्रिटोरियातील उच्चायुक्त विकास स्वरूप यांच्या ‘क्यू अ‍ॅन्ड ए’ या कादंबरीवरून हा चित्रपट बनविण्यात आला आहे.