Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, २३ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

मुंडे यांच्या ‘शेतकरी संघर्ष अभियानास’ डोरलीतून सुरुवात
संदीप प्रधान
वर्धा (डोरली), २२ जानेवारी

 

सुमारे तीन वर्षांपूर्वी कर्जबाजारी, नापिकी, दुष्काळ याने गांजलेल्या डोरलीकरांनी ‘गाव विकणे आहे’ अशी जाहिरात दिली. या चमत्कारिक, वेदनादायी जाहिरातीमुळे पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसचे युवा नेते खासदार राहुल गांधी यांच्यापासून अनेकांची पावले या गावाला लागली. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्या आजपासून सुरू झालेल्या ‘शेतकरी संघर्ष अभियान’चा प्रारंभ डोरालीतून केला. शेतकऱ्यांची वेदना राष्ट्रीय ऐरणीवर आणणाऱ्या डोरलीकरांना मुंडे यांनी अभिवादन केले. त्या वेळी डोरलीकर एकमुखाने सांगत होते ‘गाव विकणे आहे’ अशी जाहिरात करूनही त्यांच्या पदरात आश्वासनांखेरीज काहीच पडले नाही.
वर्धा जिल्ह्य़ात यंदा दुष्काळ पडला. दुबारा नव्हे तर तिबार पेरणी करूनही शेतकऱ्यांच्या हाती पीक आले नाही. पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या कर्जमाफीची पॅकेज निष्फळ ठरली. कापूस खरेदी केंद्र सुरू झाली नसल्याने कापूस कुठे घालायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कापसाला केंद्र सरकारने जाहीर केलेला तीन हजार रुपयांचा हमी भाव देणारा ‘माय का लाल’ डोरलीकरांना आजूबाजूच्या गावातील लोकांना भेटलेला नाही. रोह्य़ोवरील कामे काढली जात नाहीत त्यामुळे रोजगारासाठी घरदार सोडून परजिल्ह्य़ात स्थलांतरित व्हावे लागत आहे. मजुरी नसल्याचे गाऱ्हाणे सांगणारी गीता गोंडाणे, राहुल गांधी यांनी ज्यांच्या घरात जावून डोरलीकरांच्या जखमेवर फुंकर घातली ते मोहन हलुले असे सारेच जण तीन वर्षांत आपल्या जीवनात काडीमात्र बदल झाला नसल्याचे गाऱ्हाणे मांडत होते. दोन एकराची शेती असलेला बाजीराव भगत पत्रकारांना घेऊन आपल्या झोपडीपाशी गेला. आतमध्ये त्याची अठरा वर्षांची आजारी मुलगी झोपली होती. ‘‘मी म्हातारा आहे. मुलगी आजारी आहे. पीक वाया गेले. मजुरी करायला मला पोरगा नाही. मी जगू कसा,’’ असा सवाल त्याने डोळ्यात आसव आणून केला.
मुंडे यांचे आगमन होताच त्यांनी गावपंचायत सुरू केली. जातीचे प्रमाणपत्र मिळत नसल्यापासून बीपीएलची कार्ड मिळत नाहीत, अशा असंख्य तक्रारींचा पाढा वाचायला ग्रामस्थांनी सुरुवात केली. ‘‘वावरात ईज नाही, मुलांचे शिक्षण नाही, खंतावून जावू नको, तर काय करू’’, हंसाबाई गाऱ्हाणे मांडत होती. ‘पोस्टग्रॅज्युएट असूनही विधवांकरिता असलेली सरकारी नोकरी मिळत नाही,’ अनिता चांभारे तक्रारीच्या सूरात सांगत होती.. गावपंचायत संपली. धुरळा उडवत मोटारी रवाना झाल्या.. डोरलीकरांच्या भकास, नजरा काही क्षण दृष्टिआड झाल्या..

‘युतीची सत्ता आल्यास शेतकऱ्यांना सावकारांच्या कर्जातूनही मुक्ती’
सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ फक्त बँकांनाच होत असल्याने राज्यात युतीची सत्ता आल्यास सर्व पीक-कर्जांशिवाय सावकारांकडून घेतलेले कर्जही माफ करण्यात येईल, असे आश्वासन मुंडे यांनीवायफड येथील शेतकरी मेळाव्यात दिले.