Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, २३ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘हेल हिटलर’ च्या धर्तीवर मनसैनिकांची ‘राजवंदना’!
संदीप आचार्य
मुंबई, २२ जानेवारी

 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे दैवत. त्यांच्यानंतर राज यांना आकर्षण आहे ते राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि अ‍ॅडॉल्फ हिटलर यांचे. हिटलरचे संघटनकौशल्य व शिस्त वादातीत होती. हिटलरच्या कोणत्याही सभेत अथवा कार्यक्रमात नाझी सैनिक ज्याप्रकारे हात अर्धा उंचावून कडक सलामी द्यायचे, त्याच प्रकारे यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रत्येक सभेत मनसेचे कार्यकर्ते राज यांच्या आगमनानंतर ‘जय महाराष्ट्र’ अशी मानवंदना देणार आहेत. याचे पहिले प्रात्यक्षिक येत्या २४ जानेवारी रोजी ठाणे येथे होणाऱ्या जाहीर सभेत पाहावयास मिळणार आहे. अर्थात अशी मानवंदना देण्यामागे मनसेच्या कार्यकर्त्यांना ‘हिटलरशाही’ अभिप्रेत नाही, तर केवळ एकसंधपणा व शिस्तीचे निदर्शक म्हणून ही पद्धत सुरू करण्यात येत असल्याचे मनसेच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
राज ठाकरे त्यांच्याकडे जगभरातील उत्तमोत्तम पुस्तकांचा संग्रह आहे. त्यांत अनेक पुस्तके हिटलर आणि महात्मा गांधी यांची आहेत. त्याचप्रमाणे या दोन टोकाच्या व्यक्तिमत्त्वाच्या असंख्य सीडीही राज यांच्याकडे आहेत. हिटलरने केलेल्या ज्यूंच्या अमानुष हत्याकांडाचे समर्थन कोणीही करणार नाही. मात्र पहिल्या महायुद्धातील मानहानीकारक पराभवानंतर त्याने ज्या ताकदीने जर्मनीचा दबदबा निर्माण केला आणि आपल्या सैनिकांत शिस्त बाणवली ती मनसेला अपेक्षित आहे. नाझी पक्षाच्या स्थापनेनंतर पक्षात एक सैनिकी शिस्त व देशाविषयी प्रचंड अभिमान त्याने निर्माण केला होता. हिटलरच्या कोणत्याही सभेच्यावेळी नाझी कार्यकर्ते ‘हेल हिटलर’ अशी हात अर्धा उंचावून मानवंदना द्यायचे तशीच पद्धत यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक सभेच्या वेळी अवलंबिण्यात येणार असून ठाणे येथील सभेत राज ठाकरे यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर मनसेचे सर्व कार्यकर्ते उभे राहून हात अर्धा वर करून राज यांना ‘जय महाराष्ट्र’, अशी मानवंदना देणार आहेत.
मराठी माणसाला त्यातही युवा वर्गाला राज यांचे मोठय़ा प्रमाणात आकर्षण असून आगामी लोकसभा निवडणुकीत याचा फटका अन्य पक्षांबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसला मोठय़ा प्रमाणात बसेल, अशी भीती त्या पक्षातील सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच शरद पवार यांना पुन्हा पंतप्रधान बनायचे असल्यास लालूप्रसाद यादव यांच्या पक्षापासून उत्तर प्रदेश व बिहारमधील खासदारांच्या पाठिंब्याची गरज पडू शकते हे लक्षात घेऊन मनसेविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे. हे कमी ठरावे म्हणून राज ठाकरे यांच्या जीवाला धोका असतानाही त्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आल्याचे मनसेच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याचे म्हणणे आहे. यापूर्वी राज यांच्यावर दोन वेळा भाषण व सभा बंदी लागू करण्यात आली होती. राज यांना रत्नागिरी येथे करण्यात आलेल्या अटकेनंतर राज्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तीव्र आंदोलनानंतर मनसेच्या हजारो कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून अनेकांना तडीपार करण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्यावर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ८८ गुन्हे दाखल करण्यात आले असून राष्ट्रवादी काँग्रेसने कितीही दडपशाही केली तरी मराठी माणसांसाठीच्या हितासाठी पडेल ती किंमत देऊन संघर्ष करण्याची तयारी मनसेने ठेवली असल्याचे एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. आज जरी मनसेच्या कार्यकर्त्यांविरोधात मोठय़ा प्रमाणात दडपशाही व छळवणूक सुरू असली तरी मराठी जनतेच्या पाठिंब्याच्या जोरावर आगामी काळात आमची छळाकडून बळाकडे वाटचाल होईल, असा विश्वास मनसेच्या सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे.