Leading International Marathi News Daily                                 शुक्रवार, २३ जानेवारी २००९
प्रादेशिक

‘भावी पंतप्रधान’ पवारांचा महाराष्ट्राचा आकडा १२ - १३ खासदारांचा !
मुंबई, २२ जानेवारी / खास प्रतिनिधी

शरद पवार यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्याने महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निव्ोडून आणण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा भर असला तरी खुद्द पवारांनी राज्यातून राष्ट्रवादीचे १२ किंवा १३ खासदार निवडून येऊ शकतात असा अंदाज आज पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पवारांनी मतदारसंघनिहाय आढावा घेण्यास सुरुवात केली. तत्पूर्वी पक्षाचे मंत्री व ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत आढावा घेतला. प

लावासा कंपनीच्या जमिनी सरकारजमा करण्यासाठी याचिका
मुंबई, २२ जानेवारी/प्रतिनिधी

पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यात ‘लावासा सिटी’ हे नवे गिरीस्थान विकसित करण्यासाठी लावासा कंपनीने खासगी शेतजमिनी संपादित करण्यात महाराष्ट्र कमाल शेतजमीन धारणा कायद्याचे उल्लंघन झालेले असल्याने या कायद्यानुसार कारवाई करून कंपनीकडील कमाल मर्यादेहून जास्त असलेल्या जमिनी सरकारजमा करून घेण्याचा आदेश राज्य सरकारला दिला जावा, यासाठी एक जनहित याचिका उच्च न्यायालयात केली गेली आहे.

‘नवाकाळ’च्या कार्यालयावर अज्ञात इसमांचा हल्ला
नारायण राणे समर्थकांवर संशय
मुंबई, २२ जानेवारी / प्रतिनिधी
‘नवाकाळ’ या मराठी दैनिकाच्या गिरगाव येथील कार्यालयावर आज दुपारी साडेबाराच्या सुमारास दोघा अज्ञात इसमांनी अचानक हल्ला करीत कार्यालयाची नासधूस केली. या हल्ल्यात कार्यालयाचे बरेचसे नुकसान झाले असले तरी त्यावेळी सुदैवाने कुणी जखमी झाले नाही. या प्रकरणी व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

अपघातग्रस्तांच्या भरपाईतही सरकारचा ‘कट’!
मुंबई, २२ जानेवारी/प्रतिनिधी

रस्ते अपघातात मरण पावणाऱ्यांच्या वारसांना किंवा जखमींना मंजूर झालेल्या भरपाईची रक्कम न्यायालयातर्फे बँकेत मुदत ठेवीत ठेवल्यावर त्यातील व्याजातून प्राप्तिकर (टीडीएस) कापून घेतला जाण्यास आव्हान देणारी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात केली गेली आहे.बँकेतील ठेवीवरील व्याज वर्षांला १० हजार रुपयांपेक्षा जास्त झाल्यास त्यावर ‘टीडीएस’ कापून घेतला जातो, परंतु अपघातग्रस्तांच्या भरपाईची रक्कम जेव्हा न्यायालयातर्फे बँकेत ठेव म्हणून ठेवली जाते तेव्हा त्यातूनही ‘टीडीएस’ कापणे कायद्याला धरून आहे का, या विषयावर आजवर कोणताही न्यायनिर्णय नाही.

सीमाप्रश्नी तज्ज्ञांच्या समितीत मतभेद : अ‍ॅड. वसंत भांडारे यांचा राजीनामा
मुंबई, २२ जानेवारी / खास प्रतिनिधी

महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नाचा भडका पुन्हा एकदा उडालेला असतानाच या संबंधी महाराष्ट्र राज्य शासनाने कर्नाटकाविरुद्धच्या खटल्यात कायदेशीर सल्ला देण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीतील मतभेद उघड होत आहेत. या समितीवर नेमणूक करण्यात आलेले अ‍ॅड. वसंत भांडारे यांनी आपल्याला सातत्याने डावलण्यात येत असल्याचे कारण देत समितीचा राजीनामा दिला आहे.

शिवसेनाप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त फक्त चार नगरसेवकांचे रक्तदान !
मुंबई, २२ जानेवारी / प्रतिनिधी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उद्या २३ जानेवारी रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमीत्त आयोजित रक्तदान शिबिरात मुंबई महापालिकेच्या ८४ शिवसेना नगरसेवकांपैकी फक्त चार नगरसेवकांनी रक्तदान करून आपली निष्ठा व्यक्त केली. रक्तदान नाही तरी, किमान कार्यक्रमाला तरी उपस्थित राहावे, एवढे सौजन्यही नगरसेवकांनी दाखवले नाही. ८४ पैकी जेमतेम ४० नगरसेवकोंनी रक्तदान शिबिराला उपस्थिती नोंदवली. २३ जानेवारीला बाळासाहेब ठाक रे यांचा वाढदिवस असल्याने शिवसेनेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन पालिका मुख्यालयात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना वैयक्तिक निमंत्रणे पाठवण्यात आली होती, तसेच सकाळी दूरध्वनीवरून कार्यक्रमास उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली होती. रक्तदान शिबिराची सुरूवात महापौर शुभा राऊळ यांनी केली. शुभा राऊळ व सेना प्रतोद राहुल शेवाळे तसेच इतर दोन नगरसेवकांनी रक्तदान केले. उपस्थित असलेल्या इतर एकोही नगरसेवकाने रक्तदान करण्याची तसदी घेतली नाही. स्थायी समिती सभापती तसेच सेनेचे अनेक पदाधिकारी देखील कार्यक्रमाला गैरहजर होते.

सहावा वेतन आयोग लागू करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत प्रस्ताव आणणार
मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई, २२ जानेवारी / प्रतिनिधी

सहावा वेतन आयोग लागू करण्याच्या अनुषंगाने मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत प्रस्ताव आणावा, अशा सूचना मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी संबंधितांना आज दिल्या आहेत. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अर्थमंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्याशी याबाबत आज चर्चा केली.सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याच्या अनुषंगाने २० लाखांहून अधिक शासकीय कर्मचारी प्रतीक्षेत आहेत. हा वेतन आयोग त्वरित लागू करावा, यासाठी कर्मचारी व अधिकारी संघटना सातत्याने शासनाला विनंती करीत आहेत. ही विनंती मान्य करून राज्य शासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांनी वित्त विभागाचे प्रधान सचिव यांच्याशी प्राथमिक चर्चा केलेली आहे.हा वेतन आयोग त्वरित लागू करून, सहाव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतन थकबाकी आणि अनुषंगिक बाबींबाबत या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी वित्तमंत्री आणि वित्त विभागाच्या प्रधान सचिवांनी चर्चा करून तोडगा काढावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

म्हाडाच्या घरांसाठी आतापर्यंत ४४ हजार अर्ज दाखल
मुंबई, २२ जानेवारी / प्रतिनिधी

म्हाडाच्या सुमारे तीन हजार ८६३ घरांसाठी आजपर्यंत विविध गटांत ४४ हजार अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २००९ ही आहे. आतापर्यंत सहा लाख ४५ हजार अर्जांची विक्री झाली आहे. शेवटच्या दिवसापर्यंत दीड ते दोन लाख अर्ज प्रत्यक्षात सादर होतील, असा अंदाज म्हाडा अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. एचडीएफएससी बँकेच्या मुंबई, ठाणे व नवी मुंबई येथील २२ शाखांतून आज २१ हजार अर्जांची विक्री झाली. आजच्या दिवसात १३ हजार अर्ज दाखल झाले. उद्यापासून ही संख्या अजून वाढेल, अशी अपेक्षा आहे. तूर्तास तरी अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ करण्याची म्हाडाची योजना नसल्याचे सांगण्यात आले. एक तसेच दोन अर्ज सादर करण्यासाठी स्वतंत्र काऊंटर ठेवण्यात आले आहेत. शेवटच्या तीन दिवसांत काऊंटरच्या संख्येत आणखी वाढ केली जाईल, असे म्हाडाने म्हटले आहे.

रिलायन्सच्या तिमाही नफ्यात तीन वर्षांत प्रथमच घट
मुंबई, २२ जानेवारी/ व्यापार प्रतिनिधी

दर तिमाहीगणिक नफ्यात उत्तरोत्तर वाढ करीत आलेल्या आणि शेअर बाजाराच्या मानसिकतेला प्रभावित करणाऱ्या देशातील तेल-शुद्धीकरण क्षेत्रातील सर्वात मोठी खासगी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने यंदाच्या तिमाहीत मात्र घट नोंदविली आहे. सरलेल्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीची कामगिरी फारशी चांगली राहणार नाही असे अपेक्षिले गेले होते. त्याप्रमाणे गेल्या तीन वर्षांत प्रथमच कंपनीच्या तिमाही निव्वळ नफ्यात आधीच्या वर्षांच्या तुलनेत ८.८ टक्क्यांची माफक घट नोंदविली गेली आहे. रिलायन्सने सरलेल्या तिमाहीत ३५.०१ अब्ज रुपयांचा निव्वळ नफा नोंदविला, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत ३८.३७ अब्ज रुपये इतका होता. पुढील तिमाहीपासून कंपनीच्या एकंदर कामगिरीत मोठी सुधारणा होणे अपेक्षित आहे.

बेवारस मृतदेह आढळला
मुंबई, २२ जानेवारी / प्रतिनिधी

मालाड पश्चिम येथील मार्वे रोडवरील फ्रेंच व्यायाम शाळेसमोर आज दुपारी एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. संबंधित इसमाच्या पॅण्टच्या खिशातून रेल्वे पास मिळाला असून त्यावर या इसमाचे नाव गणेश असे लिहिलेले आहे. तसेच तो मीरा रोड येथील राहणारा असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. भगवती रुग्णालयात या इसमाचा मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठविण्यात आला आहे. मात्र या इसमाच्या शरीरावर मारहाणीची कोणतीही खूण आढळून आलेली नाही.

१५व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू
मुंबई, २२ जानेवारी / प्रतिनिधी

काळाचौकी येथील व्होल्टास कंपनीजवळील मेरू टॉवरच्या १५व्या मजल्यावर पडून आज एका कामगाराचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षितेविषयी बांधकाम व्यावसायिकांकडून होणाऱ्या हलगर्जीपणाचा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. लक्ष्मण दत्तात्रय तांबोळे (४०) असे या कामगाराचे नाव असून आज दुपारी तो मेरू टॉवरच्या १५व्या मजल्यावर इलेक्ट्रीकचे काम करीत होता. काम करताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला.