Leading International Marathi News Daily                                 शुक्रवार, २३ जानेवारी २००९

तरुणाईची गुलाबांकडे पाठ?
नमिता देशपांडे

तरुण पिढीचे गुलाब संवर्धनाकडे दुर्लक्ष
७५ विभागांमध्ये विविध जातींचे गुलाब
२४ ते २६ जानेवारी दरम्यान गुलाब प्रदर्शन
गुलाब आणि तारुण्य यांचा पूर्वापार प्रेमसंबंध लक्षात घेतला तर गुलाबाच्या संवर्धनाबाबत तरुणाईकडून अपेक्षिला जाणारा दृष्टिकोन उत्साहपूर्ण हवा असे वाटणे साहजिकच आहे. परंतु सध्याच्या तरुणाईच्या मदतीला कायम धावून जाणाऱ्या गुलाबासाठी तरुण पिढी मात्र तशी उदासीन असल्याचा अनुभव रोझ सोसायटीच्या अध्यक्षांना आला आहे. मुंबईत येत्या २४ ते २६ जानेवारी दरम्यान सकाळी ९ सायंकाळी ६ या वेळेत राजभवन येथे गुलाबांचे प्रदर्शन भरविण्यात येत असून या निमित्ताने गुलाबांच्या प्रदर्शनाबाबत माहिती देताना रोझ सोसायटीचे अध्यक्ष आणि मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरु ए. डी. सावंत यांनी प्रदर्शनातील तरुणाईच्या प्रतिसादाबद्दल खूपच निराशा व्यक्त केली.

शासकीय वसतिगृहांसाठी अनुदानाची झोळी फाटकीच!
यशश्री उपासनी

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या मागासवर्गीय तसेच आर्थिक दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मुंबईत अनेक वसतिगृहे चालविली जातात. परंतु, महत्त्वाच्या सोयीसुविधांचा अभाव, गैरव्यवस्था, अपुरे कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून इमारतीच्या देखभालीकडे होत असलेले दुर्लक्ष, वित्त व लेखा विभागाकडून अत्यावश्यक बाबींवरील अनुदान देण्यास केली जाणारी दिरंगाई यामुळे या शासकीय वसतिगृहांमधील परिस्थिती दयनीय झाली आहे. मुंबई शहर या जिल्ह्याअंतर्गत वरळी येथील बीडीडी चाळीत मुलांसाठी दोन तर मुलींसाठी एक वसतिगृह आहे.

इसवी सनापूर्वी पहिल्या शतकातील जलसंवर्धन!
विनायक परब

येत्या काही वर्षांत यादवी युद्धाला जगाला सामोरे जावे लागले किंवा मग तिसरे महायुद्ध झाले तर त्याचे कारण असेल पाणी.. ही भीती इतर कुणी नव्हे तर संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली आहे. इतर कोणत्याही गोष्टीशिवाय माणूस राहू शकतो मात्र पाण्याशिवाय राहू शकत नाही. आता जगभरात सर्वत्र पाण्याविषयी चिंता व्यक्त होऊ लागली आहे आणि जलसंवर्धनाचा मंत्र जपला जावू लागला आहे. पण बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असलेल्या कान्हेरीच्या लेण्यांमध्ये इसवी सनापूर्वी पहिल्या शतकापासूनच जलसंवर्धनाचा मंत्र जपला जात होता, हे मात्र फार कमी जणांना ठावूक आहे.

कोकण रेल्वेच्या ‘तप’श्चर्येचा प्रवास आर्थिक स्थैर्याकडे !
प्रतिनिधी

परशुरामाच्या भूमीत बदलाचे वारे आणणारी.. एसटीला पर्याय बनून कोकणवासीयांना भुरळ घालणारी.. दिल्ली-त्रिवेंद्रम ‘शॉर्टकट’ ठरणारी.. दुर्दम्य इच्छाशक्ती व प्रगत तंत्रज्ञानाच्या जोरावर असाध्य ते साध्य करणारी.. कोकण रेल्वे येत्या २६ जानेवारी रोजी बाराव्या वर्षांत पदार्पण करणार आहे. गेल्या आर्थिक वर्षांत बऱ्यापैकी स्थैर्य आलेल्या कोकण रेल्वेने आता तंत्रज्ञानाचे मार्केटिंग करून आपला आर्थिक पाया अधिक मजबूत करण्याचा ध्यास घेतला आहे. अत्यंत दुर्गम भूप्रदेशातून जाणारा रेल्वेमार्ग, भुसभुशीत माती, ठिसूळ खडक यासारख्या नैसर्गिक आव्हानांनी सुरूवातीला कोकण रेल्वेला चांगलेच त्रस्त केले. दरडींचा उतार कमी करणे, ‘नेटिंग’ करून रेल्वेमार्ग सुरक्षित बनविणे, मातीची धूप थांबविण्यासाठी वेटिवर गवत लावणे यासारख्या उपाययोजना करून कोकण रेल्वेने त्यावर मात केली.

तुजसाठी विहंगा
उत्तरेतील थंडी वाढू लागली. आपल्याकडे स्थलांतरित पक्षांचे आगमन सुरू होते. मुंबईकरांना चिरपरिचित झालेल्या फ्लेमिंगोचे फोटोदेखील वृत्तपत्रांमधून झळकू शकतात. पक्षी निरिक्षकांबरोबरच सामान्यजनपणे कुतूहल जागृत होते. सृष्टीसौंदर्यात खुलविणाऱ्या या पक्षांच्या दर्शनाचा लाभ घेण्यास प्रत्येकजण उत्सुक असतो. पण आपण केवळ त्यांचा आनंदच लुटायचा का? तसेच पक्षीमित्र म्हणविल्या जाणाऱ्या मंडळींनी फक्त या मित्राकडून फक्त घेतच राह्य़चा का? स्थलांतरित पक्षांच्या दर्शनासाठी उडय़ा टाकायच्या. पण आपल्या परिसरातील स्थानिक पक्षांच्या अभ्यासाचे काय?हे असे प्रश्न आठवायचे. कारण म्हणजे नुकतेच संपन्न झालेल्या पक्षीमित्र संमेलनातील या विषयांवरील विविध चर्चासत्रे. सरत्या वर्षांच्या अखेरीस २७-२८ डिसेंबर रोजी नांदूर मध्यमेश्वर येथे पार पडलेल्या २२ व्या महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संमेलनात खुद्द संमेलनाध्यक्षांनीच संवर्धनाच्या मुद्यावर भर दिल्याने मध्यंतरी काही वर्षे खंडीत झालेल्या पक्षीमित्रांचा चळवळीला एक वेगळी दिशा मिळत आहे.

‘सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत’ फक्त ‘सवाई’
प्रतिनिधी

सवाई एकांकिका स्पर्धा.. महाराष्ट्रातील सगळे नाटय़रसिक ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहतात ती स्पर्धा. तरुण रंगकर्मीपासून ज्येष्ठ कलाकारांपर्यंत लोकप्रिय असलेली स्पर्धा.. सवाईसाठी कोणत्या एकांकिकांची निवड झाली? या वर्षी कोण सवाई ठरणार?, कोणाचं सादरीकरण दमदार असणार? याबद्दलच्या चर्चा नेहमीच रंगतात. सवाईसाठी तिकीटं मिळवण्यासाठी प्रचंड खटाटोप करावा लागतो हेही आता बऱ्याच जणांना माहीत झालंय. तर चतुरंग आयोजित गणेश सोळंकी स्मृतिप्रीत्यर्थ होणारी. सवाई एकांकिका स्पर्धा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या अनेक इव्हेंट्सपैकी एक झाली आहे असं म्हणणं चूक ठरणार नाही.

कान्हेरीमध्ये सिटीवॉक!
लोकसत्ता आणि मुंबई विद्यापीठाचा बहिशाल शिक्षण ़िवभाग यांच्या संयुक्त विद्यमाने थेट इतिहासाचाच फेरफटका मारण्यासाठी कान्हेरी लेण्यांमध्ये सिटीवॉकचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवारी व रविवारी सकाळी ११.३० ते सायंकाळी ४.३० या वेळात हे सिटीवॉक होणार आहेत. लोकसत्ताच्या वाचकांनी त्यासाठी आगावू नोंदणी आवश्यक आहे. पुरातत्व तज्ज्ञ डॉ. सूरज पंडित आणि इतर तज्ज्ञ या सिटीवॉकमध्ये आपल्या सोबत असतील. रुपये शंभर भरून त्यासाठी नोंदणी करावी लागेल, त्याची पावती विद्यापीठातर्फे देण्यात येईल. एका वेळेस ३० वाचकांच्या गटाला सिटीवॉकमध्ये सहभागी होता येईल. ही नोंदणी लोकसत्ता कार्यालय, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट आणि कालिना विद्यानगरीतील मुंबई विद्यापीठाच्या बहिशाल शिक्षण विभागाच्या कार्यालयात करता येईल. अधिक माहितीसाठी संपर्क ६५९५२७६१, ६५२९६९६२ (सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत.) लोकसत्ता कार्यालयातील नोंदणी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेतच होईल. वाचकांना स्वखर्चाने कान्हेरी गुंफांच्या प्रवेशद्वारावर यावे लागेल. राष्ट्रीय उद्यानाचे प्रवेश शुल्क भरावे लागेल त्याचप्रमाणे पैसे भरून उद्यानाच्या प्रवेशद्वारापासून ते कान्हेरीपर्यंत उपलब्ध असलेल्या बससेवेचा लाभ घेता येईल. शंभर रुपये शुल्कामध्ये केवळ तज्ज्ञांचे मानधन व कान्हेरी गुंफांचे प्रवेश शुल्क याचाच समावेश आहे.

रात्रभर रंगणार!
चतुरंग प्रतिष्ठानची सवाई एकांकिका स्पर्धा प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला यशवंत नाटय़मंदिर, माटुंगा येथे २५ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजल्यापासून सवाई एकांकिका स्पर्धाना सुरुवात होईल आणि सर्व नाटय़वेडय़ांना ‘सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत’ उत्तम कलाकृतींचा आनंद घेता येईल. अंतिम फेरीत ‘सहर.. एक पहाट’ (अजातशत्रू, मुंबई), ‘निमिषमात्र’ (प्रवेश कलामंच, मुंबई), ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (उन्नती आर्ट्स, मुंबई), ‘जिलबी’ (मिठीबाई ड्रामा टीम, मुंबई), ‘अनन्या’ (रूईया महाविद्यालय, मुंबई), ‘तू, मी, इत्यादी’ (मिती चार, कल्याण) आणि ‘दोन शूर’ (बी. एम. सी. सी., पुणे) या सात एकांकिकांमध्ये चुरशीचा सामना होईल. प्राथमिक फेरीत २१ संस्थांनी सहभाग घेतला होता. शशांक सोळंकी, देवेंद्र पेम आणि लीना भागवत यांनी प्राथमिक फेरीचे परीक्षक म्हणून काम पाहिले. अंतिम फेरीत प्रेक्षक परीक्षक योजनेनुसार प्रेक्षकांनाही परीक्षक बनून सवरेत्कृष्ट एकांकिकेची निवड करण्याची संधी मिळणार आहे. मात्र, त्याकरिता त्यांनी पहिली एकांकिका सुरू होण्यापूर्वीच नाटय़गृहात हजर राहणे बंधनकारक आहे. त्यानंतर आलेल्या प्रेक्षकांना मात्र परीक्षणाची ही संधी मिळणार नाही.

डॉ. प. वि. वर्तक यांचा अमृतमहोत्सवानिमित्त सत्कार
प्रतिनिधी

डॉ. प. वि. वर्तक यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त अलीकडेच दादर येथील ब्राह्मण सेवा मंडळात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पुत्र विश्वास सावरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी त्यांना ‘प्रज्ञानब्रह्म’ उपाधी देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यास मुंबईच्या महापौर शुभा राऊळ उपस्थित होत्या. गो. रा. सारंग यांनी अध्यात्म संशोधन मंदिरातर्फे प्रास्ताविक केले तर मानपत्राचे वाचन गरीश दाबके यांनी केले. डॉ. शुभा राऊळ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, वेद, उपनिषदे, गीता वगैरे ग्रंथ ही आपली संपत्ती आहे. हे ज्ञान सर्वाना मिळावे यासाठी संस्कृतचे ज्ञानही आवश्यक आहे. महापालिका शाळांमध्ये संस्कृत विषय शिकवला जावा यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्या योवळी म्हणाल्या. प्रकृती ठीक नसतानाही विश्वास सावरकर या सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहिले होते. डॉ. वर्तक यांच्यासारख्या व्यक्ती समाजाला मार्गदर्शन ठरत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या सत्काराला उत्तर देताना डॉ. वर्तक यांनी काही आठवणी जाग्या केल्या. सत्याचा स्वीकार आणि असत्याचा अव्हेर हा बाणा अंगी रुजल्यामुळे प्रसंगी वरिष्ठांशी सामना कसा करावा लागला, याबद्दलचे काही प्रसंग त्यांनी यावेळी सांगितले. ‘संशोधन केवळ पाश्चात्य शास्त्रज्ञच करतील, आपण फक्त तेच मानू’ या तथाकथित बुद्धिवादी विद्वानांच्या परधार्जिण्या वृत्तीबद्दल डॉ. वर्तक यांनी खंत व्यक्त केली. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची कास धरल्याशिवाय भारतीय समाजाला उर्जितावस्था येणार नाही, असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले.

वेसाव्यात कोळी सी फूड फेस्टिवल
प्रतिनिधी

वेसावा कोळी जमात ट्रस्ट आणि वेसावे गावातील विविध मच्छिमार सहकारी संस्थांतर्फे २२ ते २५ जानेवारी दरम्यान कोळी सी फूम्ड फेस्टिवलचे गणेश मंदिरलगत असलेल्या मैदानात आयोजन करण्यात आले आहे. हे चौथे वर्ष असून कोळी समाजाची संस्कृती, परंपरा आणि जेवणाची लज्जत या महोत्सवात अनुभवायास मिळणार आहे. मासळीच्या विविध जातींच्या निरनिराळ्या पारंपारिक खाद्य्पदार्थांचे प्रदर्शन तसेच विक्री, कोळी नृत्य आदींचे दर्शनही या चार दिवसांच्या महोत्सवातून घडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गेल्या वर्षी २५ हजार रसिकांनी या महोत्सवाला भेट दिली होती. यंदाही तसाच प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा वेसावा कोळी जमातीचे अध्यक्ष जगदिश भिकरू, उपाध्यक्ष जयेंद्र लडगे व सचिव महेंद्र लडगे यांनी व्यक्त केली आहे. अधिक माहितीसाठी जगदिश भिकरू (९८६९२३३२४६), जयेंद्र लडगे (९८१९६०७९३४) व महेंद्र लडगे (९८३३१८६६०९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रत्येक स्त्रीमध्ये अर्थमंत्री असतो-गिरीश वासुदेव
प्रतिनिधी

प्रत्येक स्त्रीमध्ये अर्थमंत्री दडलेला असतो. या गुणाचा महिलांना जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा, असा सल्ला अर्थतज्ज्ञ गिरीश वासुदेव यांनी दिला आहे. ‘ललना दिवाळी कथा स्पर्धा २००८’च्या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. ललना प्रकाशन व दादर सार्वजनिक वाचनालय (दासावा)यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा सोहळा नुकताच दासावाच्या सभागृहात पार पडला. प्रमुख पाहुण्या भारती राजे-देशपांडे यांच्याखेरीज प्रसिद्ध ज्योतिषी श्री. श्री. भट आणि संपादक नंदकुमार सापळे या सोहळ्याला हजर होते. महिलांवर उद्याचा देश घडविण्याची महत्त्वाची भूमिका आहे. पुढची पिढी सुसंस्कांरित बनविण्यासाठी स्त्रियांनी सद्गुण जोपासले पाहिजेत, असे मत भट यांनी व्यक्त केले. ‘ललना’मधील त्रिवेणीची अनुवादित कादंबरी अत्यंत आवडल्याचे सांगून, लेखन अधिक समृद्ध करताना त्याला चिंतनाचा, मनोविश्लेषणाचा पाया असू द्या, अशी सूचना भारती राजे-देशपांडे यांनी केली.

जपानी कला प्रदर्शन
प्रतिनिधी

मुंबई फेस्टीवल कमिटी व जपानच्या दुतावासाच्यावतीने ‘ जपानी कलाकारांचे शरकु प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. २४ जानेवारी ते ३० जानेवारी या कालावधीत हे प्रदर्शन भरणार आहे. तोषुशाय शरकु या इडो काळातील म्हणजेच सध्याचे टोकियो, कलाकाराच्या कलेवर आधारित चित्रांवर हे प्रदर्शन आधारित आहे. पोस्टर्स, पेंटीग्ज व थ्री डायमेंन्शनल काम याठिकाणी पहायला मिळेल. या प्रदर्शनात, ‘रिप्रॉडक्शन ऑफ शकरु’, ‘ शकरु इन ग्राफीक आर्ट’ व ‘होमेज टु शरकु’ असे तीन विभाग करण्यात आले आहेत. सकाळी ११.०० ते ७.०० या वेळात प्रभादेवी येथील पु.ल. देशपांडे सभागृहात हे प्रदर्शन आहे.