Leading International Marathi News Daily                                 शुक्रवार, २३ जानेवारी २००९
नवनीत

जी व न द र्श न
बाजारभाव

 

हज़्‍ारत बिलाल (रज़िअल्लाहु तआला अन्हु) प्रेषित हज़्‍ारत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहिवसल्लमचे अत्यंत निकटचे सोबती (सिहाबी) होते. अजमन देण्याची जबाबदारी त्यांच्या सुपूर्द होती. ते आफ्रिकेतील कृष्णवर्णीय होते. एका लढाईत पकडले गेले असल्याने त्यांना गुलाम म्हणून विकण्यात आले. ते मक्केतील कुरैशियांचे गुलाम होते. नंतर हज़्‍ारत अबुबक्र यांनी खरेदी करून त्यांना मुक्त केले.
मदिनेत एकदा त्यांनी प्रेषित हज़्‍ारत मुहम्मद साहेबांना भेट म्हणून उत्तम प्रकारच्या खजुरी खावयास आणल्या. त्यातली एक खजूर खाण्याआधी पैगंबरसाहेबांनी बिलालला विचारले, ‘‘एवढय़ा चांगल्या दर्जाच्या खजुरी कुठून आणल्या?’’ बिलालने उत्तर दिले, ‘‘माझ्यापाशी दोन साअ (एक प्रकारचे माप) हलक्या दर्जाच्या खजुरी होत्या. बाजारातील एका विक्रेत्याकडून त्या दोन साअऐवजी या एक साअ उत्तम खजुरी आपणाकरिता आणल्या आहेत.’’
पैगंबरसाहेबांनी हातातली खजूर परत टाकली आणि म्हणाले, ‘‘त्या व्यापाऱ्याकडे परत जा, या खजुरी परत कर. आपल्या हलक्या दर्जाच्या खजुरी त्याच्याकडून परत घे आणि त्यांना खुल्या बाजारात विक. त्याचे जे पैसे येतील, त्या पैशातून या खजुरी पुन्हा खरेदी कर. असे केल्याने तुझा व्यवहार दुरुस्त होईल.’’ बिलालने त्याप्रमाणे केले आणि जुन्या खजुरी खुल्या बाजारात विकल्या. त्याकरवी मिळालेल्या पैशाने त्यांने चांगल्या खजुरी खरेदी केल्या. ज्या पैगंबरसाहेबांनी स्वीकारल्या. मालाची अदलाबदल अशाच ठिकाणी उपयुक्त ठरते, जेथे चलनाचा अभाव आहे किंवा अशा दुर्मीळ वस्तू ज्यांना कुणी रास्त खरीदार नाही. अशा बाबतीत विक्रेत्याची अथवा बिछायतदाराची (बागायतदार) फसवणूक होण्याची दाट शक्यता असते, म्हणून अशा व्यापाराला इस्लामने पसंत केलेले नाही.
अनीस चिश्ती

कु तू ह ल
ताऱ्याचा मृत्यू
ताऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर ताऱ्याचे काय होते?

माणसाच्या बाबतीत मृत्यू शब्दाचा जो अर्थ आहे तो ताऱ्याच्या बाबतीत शब्दश: लागू पडत नाही. हायड्रोजनचे हेलियममध्ये रूपांतर होत असताना ऊर्जा उत्सर्जित होते. ही अवस्था किंवा स्थिती म्हणजे ताऱ्याचे खरे आयुष्य, असे मानले तर त्यानंतर ताऱ्याला निरनिराळय़ा अवस्थांतून जावे लागते. मोठय़ा किंवा अतिविशाल लाल रंगाच्या ताऱ्यांत त्याचे रूपांतर सामान्यपणे होते आणि ही अवस्था अपरिहार्य असते. यानंतर श्वेतबटू (व्हाइट ड्वार्फ), न्यूट्रॉन तारा, कृष्णविवर (ब्लॅक होल) यापैकी एखादी अवस्था ताऱ्याला प्राप्त होते. यापैकी काय घडेल हे प्रामुख्याने ताऱ्याच्या वस्तुमानावर अवलंबून असते. लाल महाकाय ताऱ्याच्या स्फोटानंतर उरलेले द्रव्य जर सूर्यवस्तुमानाच्या १.४४ पटीपेक्षा कमी असेल तर श्वेतबटू अवस्थेत ताऱ्याला राहावे लागते.
सूर्याएवढे वस्तुमान, पण आकार पृथ्वीएवढा असे स्वरूप प्राप्त झाले तर काय होईल? त्या ताऱ्याची घनता वाढते. या ताऱ्यावरील चमचाभर द्रव्याचे वजन टनावारी भरेल. पृष्ठभागाचे तापमान ७००० अंश केल्व्हीन असले तरी दीप्ती सूर्याच्या दीप्तीच्या ४५० ते ५०० पटीने कमी असते. त्यात आणखी ऊर्जा निर्माण होत नाही. अतिविशाल ताऱ्याचा स्फोट झाल्यानंतर त्याचा गाभा इतका आकुंचित होतो की, त्याचा फक्त दहा किमी व्यासाचा गोळा होतो. त्याचे वस्तुमान मात्र सूर्यवस्तुमानाच्या दोन ते तीन पटीपेक्षा जास्त असत नाही. या द्रव्याची घनता प्रचंड असते. या ताऱ्यांना न्यूट्रॉन तारे म्हणतात. अणूतील प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन एकत्र येऊन न्यूट्रॉन बनल्याने हा तारा अशा अवस्थेला येतो. हा न्यूट्रॉन तारा अतिवेगाने स्वत:भोवती गिरक्या घेतो आणि रेडिओ लहरींेचे उत्सर्जन करतो. म्हणून याला ‘स्पंदक तारा’ही म्हणतात. जर स्फोटानंतर ताऱ्याचे वस्तुमान यापेक्षाही जास्त झाले तर त्याचे रूपांतर सातत्याने आकुंचित होणाऱ्या कृष्णविवरांत होते. या स्थितीत गुरुत्वाकर्षणाचा जोर इतका असतो की, तेथून प्रकाशसुध्दा परावर्तित होत नाही. म्हणूनच त्याला ‘कृष्णविवर’ म्हणतात. ताऱ्याच्या या उत्तरावस्थांपूर्वी ताऱ्यांमध्ये कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन, मॅग्नेशियम, लोखंड इ. मूलद्रव्ये तयार होतात. ती विखुरली जातात. त्यापासून नवे तारे, ग्रहमालिका बनतात. तुमच्याआमच्या शरीरांतील संयुगस्वरूपातील मूलद्रव्ये ताऱ्याच्या स्फोटांतून आपल्याकडे आली आहेत.
हेमंत मोने
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
महाराणी व्हिक्टोरिया

ब्रिटिश साम्राज्य वैभवाच्या कळसावर पोचलं ते महाराणी व्हिक्टोरियाच्याच काळात. ब्रिटिश साम्राज्यावरचा सूर्य कधीच मावळणार नाही असं म्हटलं जाऊ लागलं तेही तिच्याच काळात. १८१९ मध्ये जन्मलेली व्हिक्टोरिया वयाच्या १८ व्याच वर्षी इंग्लंडची महाराणी बनली. पण भारतीयांच्या मनात ती ठसली ती तिच्या सुप्रसिद्ध जाहीरनाम्यामुळे. तिच्या कारकीर्दीतच १८५७ चा स्वातंत्र्यलढा झाला, अखेर भारतीयांची मने शांत करण्यासाठी महाराणीच्या वतीने लॉर्ड कॅनिंगने १ नोव्हेंबर १८५८ ला तो जाहीरनामा वाचून दाखवला, पण निव्वळ फसगत करणाऱ्या त्या जाहीरनाम्याने लढाही शांत झाला नाही, आणि कंपनीची सत्ताही संपली नाही. २३ जानेवारी १९०१ ला तिचं निधन झालं.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
करायला गेलो एक

सुहास ‘अक्षर भांडार’ या पुस्तकांच्या दुकानात नोकरी करायचा आणि रात्रीच्या शाळेत शिकायचा. आई धुणं-भांडय़ाची कामं करायची, संसार चालवायची. सुहासला वाचनाची आवड होती. दुकानात फावल्या वेळात त्याची कितीतरी पुस्तके वाचून झाली होती. शाळेतल्या अभ्यासाबरोबर जगाचे आणि जगण्याचे ज्ञान त्याला त्याच्या वाचनाच्या छंदामुळे मिळत होते.
मालक फार भला माणूस नाही, असे त्याला वाटायचे. एक तर तो फार चिक्कू होता. दुसऱ्याचा विचार करायचा नाही. सुहासचा पगारही त्याने कधीच वाढवला नाही. पण सुहासला वाटे, पगार कमी असला तरी इथे केवढी तरी पुस्तके वाचायला मिळतात.
सुहास आणि मालक एकदा पुस्तकांची खोकी उचलून माळय़ावर नेत होते. मालकाचा हात सटकला आणि खोके त्याच्या पायावर पडले. ‘अगं आईऽऽ गं!’ करत मटकन तो पायरीवर बसला. पाय हां हां म्हणता सुजला. सुहासने धावत जाऊन बर्फ आणला. पाय शेकला. मालकाला प्यायला पाणी दिले. ‘‘मालक दवाखान्यात जाऊ या. आपल्याकडे ते डॉ. साळी पुस्तकं घ्यायला येतात, त्यांचा दवाखाना मला ठाऊक आहे’’, सुहास म्हणाला. बारीक डोळे करून चष्म्याच्या वरून सुहासकडे पाहात मालक म्हणाला, ‘‘अरे, तो आपला गिऱ्हाईक आहे. दवाखान्यात जाऊन त्याला फी कशाला द्यायची. उद्या बुधवार. ते इथं दुकानात चक्कर टाकतातच. आले की पाय दाखवेन. म्हणजे फी नाही द्यावी लागणार’ आणि सुजरा पाय घेऊन मालक लंगडत टेबलाशी जाऊन बसले. सुहासला वाटलं, ‘लगेच पाय दाखवला तर दुखणं वाढणार नाही, पण यांना कसं पटणार?’
दुसऱ्या दिवशी डॉ. साळी दुकानात आले. दोन पुस्तके सुहासला बांधायला सांगून नवी पुस्तकं चाळू लागले. मालक लंगडत येऊन म्हणाले, ‘‘आल्यासरशी जरा पाय तपासून औषध द्या. फार ठणका लागलाय’’. डॉक्टरांनी पाय पाहिला. तपासला. वरून लावायला एक आणि एक वेदनाशामक औषध पोटात घ्यायला लिहून दिले.
मालकाने जेव्हा सुहासने बांधून ठेवलेली दोन पुस्तके आणि दीडशे रुपयांचे बिल दिले. तेव्हा डॉ. साळी म्हणाले, ‘‘अरे वा, छान! अगदी नेमका आकडा झाला की!’’ ‘‘म्हणजे?’’, मालकाने गोंधळून विचारले. डॉक्टर म्हणाले, ‘दवाखान्यात आला असतात तर माझी फी पंच्याहत्तर आहे. पण पेशंटकडे जाऊन तपासायला मी दुप्पट पैसे घेतो.’सुहास गालातल्या गालात हसला. मालकाचा चेहरा जास्तच वेदनामय झाला.
वेळेतच एखादी अडचण सोडवली नाही तर थोडक्यात न निभावता दुप्पट नुकसान होते. स्वत:चे नुकसान होऊ नये म्हणून दुसऱ्याचं नुकसान करणे अयोग्य आहे.
आजचा संकल्प : दुसऱ्याचे नुकसान करून मी स्वत:चा फायदा करून घेत नाही ना, याबद्दल आजपासून मी जागरूक राहीन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com