Leading International Marathi News Daily                                 शुक्रवार, २३ जानेवारी २००९

सिडकोच्या नवी मुंबई फेस्टिव्हलला आजपासून सुरुवात
बेलापूर/वार्ताहर

 

नवी मुंबईसारख्या २१ व्या शतकातील काँक्रिटच्या जंगलाला सांस्कृतिक शहर म्हणून ‘लूक’ देण्याचा सिडकोने चंग बांधला असून, त्यातूनच सदस्य झालेल्या नवी मुंबई फेस्टिव्हलला मोठय़ा दिमाखात शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन वाशी रेल्वे स्थानकासमोरील प्रदर्शन मैदानात होणार आहे. २३ ते २६ जानेवारीपर्यंत होणाऱ्या या महोत्सवात लहान मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमासह, संगीत, नृत्य व त्यासोबत विविध खाद्यान्नांचाही रसिकांबरोबर खवय्यांनाही लाभ घेता येणार आहे.
२५ जानेवारी रोजी पामबीच मार्गावर भव्य मॅरेथॉन होणार आहे. ऐरोली ते पनवेलपर्यंत १२ ठिकाणी विविध २५ कार्यक्रमांची या महोत्सवात रेलचेल आहे. प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान यांच्या गायनाने या महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. सीबीडीतील अर्बन हार्टमध्ये ज्येष्ठ गायिका शुभा मुदगल यांचा ‘मॉर्निंग रागा’ हा प्रसिद्ध कार्यक्रम होणार असून, भूषण मंगेश पाडगावकर ‘माझे जीवन गाणे’ हा कार्यक्रमही तेथेच २४ तारखेला सादर करणार आहेत. सुप्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना स्नेहल परांजपे, कविता सेठ आदी नामवंत कलाकारांची अदाकारी रसिकांना पाहायला मिळणार आहे. २६ जानेवारी रोजी डॉ. डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये महोत्सवाची सांगताहोईल.

प्रजासत्ताक दिनी ठाणे-नेरुळच्या २० फेऱ्या वाढणार
नवी मुंबई, प्रतिनिधी
ठाणे-नेरुळ रेल्वे मार्गावर गाडय़ांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी, यासाठी प्रवाशाचा दबाव दिवसागणिक वाढत असतानाच येत्या प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर मध्य रेल्वेने या मार्गावर तब्बल २० फेऱ्या वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या फेऱ्या वाढविण्यासाठी रेल्वेने या मार्गावर नऊ डब्यांची आणखी एक लोकल सोडण्याचाही निर्णय घेतला आहे. दरम्यान, ठाणे-नेरुळ मार्गावर प्रवाशांच्या पदरी एकूण ३० फेऱ्यांचे दान पडत असताना, ठाणे-पनवेल मार्गावरील एकाही फेरीत वाढ करण्यात आलेली नाही. ठाण्याचे खासदार आनंद परांजपे तसेच नवी मुंबई, पनवेल भागातील प्रवासी संघटनांनी ठाणे-नेरुळ मार्गावर गाडय़ांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी, असा आग्रह सातत्याने धरला होता. मागील ९ जानेवारी रोजी मध्य रेल्वेने मोठय़ा थाटामाटात ठाणे-नेरुळ, तसेच ठाणे-पनवेल रेल्वे सेवेचे उद्घाटन केले. पहिल्या टप्प्यात ठाणे-नेरुळ मार्गावर नऊ डब्यांच्या एका लोकलच्या तब्बल २२ फेऱ्या करायच्या, असा निर्णय मध्य रेल्वेने घेतला होता. परांजपे यांच्या सोबत घेण्यात आलेल्या यासंबंधीच्या बैठकीत रेल्वे अधिकाऱ्यांनी आश्वासनही देऊ केले होते. प्रत्यक्षात ही रेल्वे सेवा सुरू होताच ठाणे-नेरुळ मार्गावर अवघ्या १२ फेऱ्याच सुरू करण्यात आल्या. या मार्गासोबत सुरू करण्यात आलेला ठाणे-पनवेल मार्ग हा प्रवाशांकरिता नवीन वर्षांचा बोनस ठरला खरा, मात्र या मार्गावर दोन्ही बाजूस अवघ्या चार फेऱ्या सुरू करून रेल्वेने प्रवाशांची निराशाच केली. असे असले तरी हे दोन्ही मार्ग सुरू होताच या मार्गावर फेऱ्या वाढविण्याचा आग्रह खासदारांसह अनेक प्रवासी संघटनांनी धरला होता. ठाणे-पनवेल मार्गावरही गाडय़ांच्या फेऱ्या वाढवाव्यात, यासाठी प्रवासी संघटना आग्रही होत्या. दरम्यान, येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर ठाणे-नेरुळ मार्गावर २० फेऱ्यांची वाढ करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. पूर्वीच्या १० आणि नव्या २० अशा एकूण ३० फेऱ्या या मार्गावर सुरू होतील, अशी माहिती मध्य रेल्वेतील वरिष्ठ सूत्रांनी ‘वृत्तान्त’ला दिली. ठाणे-नेरुळ मार्गावर दोन्ही बाजूंनी पहिली लोकल सकाळी नऊनंतरच कारशेडमधून बाहेर पडायची. यामुळे सकाळच्या ‘पीक अवर’मध्ये या सेवेचा काहीच उपयोग प्रवाशांना होत नसे. नव्या वेळापत्रकात सकाळच्या वेळेत गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली. या नव्या वेळापत्रकानुसार ठाणे-नेरुळ मार्गावर दोन्ही बाजूस प्रत्येकी १६ फेऱ्या होणार आहेत. दरम्यान, ठाणे-नेरुळ प्रवाशांना प्रजासत्ताक दिनाची भेट मिळत असताना ठाणे-पनवेल मार्गावर मात्र एकही फेरी वाढविण्यात आलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. बेलापूर रेल्वे स्थानकालगत रेल्वे मार्गाचे काम पूर्णत्वास येताच या फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत.

राज यांच्या सभेसाठी पनवेलहून येणार १०० गाडय़ांची फौज!
पनवेल/प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या २४ जानेवारीला ठाण्यात होणाऱ्या जाहीर सभेविषयी पनवेल शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता असून, राज यांचे विचार ऐकण्यासाठी लहान-मोठय़ा सुमारे १०० गाडय़ांतून मनसेचे हजारो कार्यकर्ते सेंट्रल मैदानावर धडकणार आहेत.
उत्तर भारतीयांविरुद्ध मनसेने छेडलेल्या आंदोलनानंतर राज यांना झालेली अटक, त्यांच्यावरील भाषणबंदी या पाश्र्वभूमीवर ही सभा होत आहे. याच दिवशी उत्तर प्रदेशदिन साजरा करण्यात येणार असल्यानेही राज यांच्या या सभेला कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. पनवेलमधील असंख्य कार्यकर्त्यांनीही अशाच भावना व्यक्त केल्या. प्रदीर्घ कालावधीनंतर आमच्या अध्यक्षांची सभा होत आहे. यादरम्यान मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याबाबत ते काय बोलतात, दहशतवाद्यांचा कशाप्रकारे समाचार घेतात, याची आम्हाला उत्सुकता आहे. त्यामुळे त्यांचे भाषण ऐकण्यासाठी आम्ही कोणत्याही परिस्थितीत जाणार, असे मनसेचे शहर चिटणीस विशाल सावंत यांनी सांगितले.
लोकसभेच्या निवडणुकाही जवळ आल्याने त्याबाबत पक्षाचे धोरण व डावपेच काय असतील, याचा उल्लेखही ते भाषणात करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या सभेसाठी पनवेल शहर, कळंबोली, कामोठे व तालुक्यातून हजारो कार्यकर्ते रवाना होणार आहेत, एवढेच नव्हे तर अनेक सर्वसामान्य नागरिकांनीही या सभेबाबत आमच्याकडे विचारणा केली आहे, असे ते म्हणाले. या सभेसाठी मनसेचे पनवेल व नवीन पनवेलमधील सर्व पदाधिकारी, मनविसेचे सर्व पदाधिकारी असंख्य कार्यकर्त्यांसह ठाणे गाठणार आहेत. राज यांचे भाषण संध्याकाळी सात वाजता सुरू होण्याची शक्यता असून, सभेसाठी होणारी गर्दी लक्षात घेता आम्ही लवकर निघणार आहोत, मात्र तरीही बसायला जागा मिळाली नाही तर त्यांचे भाषण उभ्याने ऐकू, असे एका कार्यकर्त्यांने सांगितले. मात्र दोन समाजांत तेढ निर्माण होईल, असे प्रक्षोभक भाषण करण्यास पोलिसांनी राज यांना बंदी घातल्याने मनसे कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील का, याविषयी शंका आहे. कर्नाटक सरकारकडून बेळगावमधील मराठी भाषकांवर नव्याने सुरू झालेल्या अत्याचाराबाबत राज ताठर भूमिका घेतील का व या मराठीजनांचे नेतृत्व करतील का, असा प्रश्न काही नागरिकांनी उपस्थित केला आहे.