Leading International Marathi News Daily                                 शुक्रवार, २३ जानेवारी २००९

वाळू ठेकेदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
प्रतिनिधी / नाशिक

पर्यावरण विभागाच्या परवानगीच्या कारणावरून थांबविलेले जिल्ह्य़ातील वाळू ठेक्यांचे लिलाव पुन्हा सुरू करावेत, या मागणीसाठी गुरूवारी श्रमिक सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाळू ठेकेदार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर संयुक्त मोर्चा काढला. श्रमिक सेनेचे संस्थापक सुनील बागूल आणि राष्ट्रवादी काँग्रेस वाळू ठेकेदार संघटनेचे शिवाजी चुंबळे यांच्या नेतृत्वाखाली गोल्फ क्लबवरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. जिल्ह्य़ात वाळूचे सुमारे ३०० ते ३५० ठिय्या असून त्यापैकी काही ठिय्यांचा लिलाव जिल्हा प्रशासनाने केला तर काही ठिय्यांचा लिलाव केलेला नाही. त्यामुळे ज्या ठिय्यांचा लिलाव झाला नाही तेथून मोठय़ा प्रमाणावर वाळू चोरी केली जाते आणि तिची विक्री अधिकृत वाळूच्या तुलनेत निम्म्या दराने होत असल्याचे मोर्चेकऱ्यांचे म्हणणे आहे. या कारणास्तव अधिकृत ठिय्याची वाळू व चोरीच्या वाळू यांच्या दरात मोठी तफावत पडून त्याचा फटका व्यावसायिकांना सहन करावा लागत असल्याचे बागूल यांनी सांगितले. तसेच वाळू ठिय्यांचा लिलाव न केल्यामुळे शासनाचाही महसूल बुडत असल्याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले. पर्यावरण विभागाची परवानगी घेतल्याशिवाय नद्यांमधील वाळू काढण्यास परवानगी दिली जाऊ नये असे परिपत्रक अलिकडेच शासनाने काढले आहे. शासनाच्या या निर्णयाच्या अनुषंगाने ४० ते ५० वाळू ठिय्यांचे लिलाव प्रशासनाने केलेले नाहीत. थांबविण्यात आलेल्या या ठिय्यांचा लिलाव करावा, अशी मागणी करण्यात आली.

नसता खटाटोप कशाला?
प्रतिनिधी/नाशिक
नाशिक महानगरपालिकेने शहर वाहतूक बस सेवा ताब्यात घ्यावी की नाही यावरून सध्या वादंग सुरू आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा धुरळाही उडत आहे. पण, टोकाच्या भूमिका घेण्यापेक्षा काही पर्यायांचा विचार करून ते प्रत्यक्षात आणले तर सुवर्णमध्य निघू शकतो. संपूर्ण बस.सेवा ताब्यात घेण्याचा अट्टाहास करण्याऐवजी पालिकेने सध्याच्या बससेवेला पूरक ठरेल अशी सेवा शहराच्या विविध भागात सुरू करावी, त्यासाठी मिनी बसेस अथवा तत्सम लहान वाहनांचा उपयोग करावा, हा विचार गुरुवारी ‘वृत्तान्त’च्या माध्यमातून मांडण्यात आला होता. त्याचे विविध स्तरातून स्वागत होत असून या चर्चेच्या निमित्ताने अन्य काही सूचना : महापालिकेने शहर बस सेवेचे संचालन करण्याच्या मुद्दयावर स्थायी समितीचे सभापती संजय चव्हाण यांनी मांडलेली भूमिका..

इंदूरशी तुलना करताना हेही पाहावे
नाशिकमध्ये पालिकेने बस सेवा सुरू करण्याबाबत अनेक मंडळी इंदूरचे उदाहरण देतात. पण, तेथील परिस्थिती व येथील परिस्थिती यातील तफावत लक्षात घ्यायला हव्यात. इंदूरमध्ये यापूर्वी सार्वजनिक बस सेवा अस्तित्वातच नव्हती. तेथे फक्त खासगी स्वरूपाच्या सेवा होत्या. आज तेथे पालिकेद्वारे चांगल्या दर्जाची लक्झरी बस सेवा पुरविली जाते. पण, त्यासाठी पालिका जो आर्थिक भार उचलते त्याचे काय ? तेथे प्रवासी नसले तरी प्रति किलोमीटर तत्वावर पालिका कंत्राटदारांना पैसे देते. त्याचाही विचार होणे गरजेचे आहे.नाशिकमध्ये सध्या असणाऱ्या एस.टी.च्या बस सेवेला पूरक म्हणून महापालिकेने शहराच्या वेगवेगळ्या भागात आपली मिनीबस सेवा सुरू केल्यास सर्वसामान्यांची तर मोठी सोय होईलच, शिवाय त्यांना रिक्षांवरही फारसे अवलंबून राहावे लागणार नाही.

नाशिक-मुंबई रेल्वे सेवेबाबत रविवारी खुली चर्चा; रेल परिषदेचा उपक्रम
प्रतिनिधी / नाशिक

दररोज रेल्वेव्दारे नाशिक-मुंबई दरम्यान ‘अप-डाऊन’ करणाऱ्या शेकडो प्रवाशांसह एरवीही या रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांसंदर्भात रेल परिषदेच्या वतीने येत्या रविवारी मुक्त चर्चा आयोजित करण्यात आली आहे. गंगापूररोडवरच्या कुसुमाग्रज स्मारकातील सभागृहात सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार असून त्यामध्ये नाशिककरांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

जनप्रबोधन गरजेचे
ग्रामीण आणि वनवासी भागात राहाणाऱ्या जनतेचे आरोग्य हा चिंतेचा आणि चितंनाचा विषय बनलेला आहे. या भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून त्यांच्या हाती या जनतेचे आरोग्य गेले की काय, अशी काहीशी स्थिती निर्माण झाली आहे. बोगस डॉक्टरांची समस्या निपटायची असेल तर प्रशासनाला जागरुक राहावे लागेल. औषधोपचार करणाऱ्या मंडळींची योग्य तऱ्हेने शोध मोहीम, त्यांच्या नोंदणी प्रमाणपत्रांची शाहनिशा, त्यांच्याकडे असलेल्या पदवीची निश्चिती यांचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. त्यासाठी अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी यांच्या संबंधित कौन्सीलचीही मदत घेता येऊ शकेल. पोलीस यंत्रणेचाही सहयोग यामध्ये घ्यावा लागेल. ते करीत असतानाच सर्वसामान्यांचे जनप्रबोधन करणे हाही एक उपयुक्त मार्ग आहे.

वापराअभावी पडलेल्या नव्या घंटागाडय़ा म्हणजे जनतेच्या पैशांची उधळपट्टी
माजी महापौर दशरथ पाटील यांचा आरोप

नाशिक / प्रतिनिधी

शहरातील कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेने खरेदी केलेल्या नव्या घंटागाडय़ांचा वापर आठ ते दहा महिन्यांपासून होत नसल्याने प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी शहरवासीयांच्या पैशांची अक्षरश उथळपट्टी केली असल्याचा आरोप माजी महापौर दशरथ पाटील यांनी पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे. एकीकडे तब्बल सात कोटी रूपयांच्या नवीन घंटागाडय़ा जागेवर उभ्या असल्याने खराब होण्याची भीती असताना दुसरीकडे कचरा उचलण्यासाठी इतर यंत्रणेला दररोज दोन लाख रूपये मोजावे लागत आहेत.

सर्व शिक्षा अभियानातील साधन व्यक्तींचा आत्मदहनाचा इशारा
पुनर्नियुक्तीचे आदेश देण्याची मागणी

वार्ताहर / धुळे

जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत ५६ साधन व्यक्तींच्या पुनर्नियुक्तीचे आदेश द्यावेत, अन्यथा प्रजासत्ताकदिनी सर्व कुटुंबे जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आत्मदहन करतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य साधन व्यक्ती कृती समितीचे कार्याध्यक्ष किशोर सोनवणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.
धुळे जिल्हा परिषदेत सर्व शिक्षा अभियानातंर्गत ५६ साधन व्यक्ती जिल्हा निवड समितीच्या माध्यमातून सप्टेंबर २००६ पासून कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत.

बंकट वाचनालयाचे ज्ञानकुंड
चाळीसगाव येथील शेठ नारायण बंकट वाचनालयातर्फे आयोजित सरस्वती व्याख्यानमालेने यंदा ७२ वर्षे पूर्ण केली. १९३४ मध्ये सुरू झालेल्या या व्याख्यानमालेचे खरे तर हे ७४ वे वर्ष राहिले असते. परंतु १९७५-७७ मधील आणीबाणीमुळे दोन वर्षांचा खंड पडला. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील दिग्गजांनी या व्याख्यानमालेतून प्रबोधनाच्या सार्वजनिक कार्यातून आपली सेवा दिलेली आहे. या व्याख्यानमालेच्या यंदाच्या सत्रातील व्याख्यानांचा थोडक्यात आढावा.

डॉ. मुंजे इन्स्टिटय़ूट येथे राज्यस्तरीय चर्चासत्र
नाशिक / प्रतिनिधी
येथील मध्यवर्ती हिंदू सैनिकी संचलित डॉ. मुंजे इन्स्टिटय़ुट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीज् शिक्षणसंस्थेतर्फे ‘इनर्जिग ट्रेन्डस् इन मॅनेजमेंट अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी इन इंडिया कॉन्टेक्स्ट’ विषयावर ३१ जानेवारी रोजी हॉटेल साई पॅलेस येथे राज्यस्तरीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. चर्चासत्राचे उद्घाटन सिंगापूरच्या स्किमिडित एशियाचे व्यवस्थापकीय संचालक एच. व्ही. भावे, झायलॉगचे सुनिल चौधरी, व प्रकाश पाठक यांच्या उपस्थितीत होणार आहे. समारोप समारंभाला डॉ. एस. बी. कोलते, प्रा. सुहास देशमुख यांची उपस्थिती लाभणार आहे. चर्चासत्रात ई-एज मार्केटींग, बेल-आऊट ऑफ वर्ल्ड क्रायसिस, ह्य़ुमन कॉम्प्युटर इंटरफेस, वायरलेस टेक्नॉलॉजी या व्यवस्थापनशास्त्र व संगणक शास्त्रातील विषयांवर व्यावसायिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची मार्गदर्शनपर व्याख्याने होणार आहेत. नाशिक शहर परिसरातील शैक्षणिक क्षेत्रातील प्राध्यापक व विद्यार्थी वर्गाने तसेच व्यावसायिकांनी चर्चासत्रात बहुसंख्येने सहभागी होऊन शोधनिबंध सादर करावेत असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिलीप बेलगावकर, संचालिका शैलजा लवेकर व श्रीराम झाडे यांनी केले आहे. या संदर्भात अधिक माहितीकरीता ०२५३ - २३०९६१७, ६५१९१२८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

नगराध्यक्षांनी उपोषण का सुरू केले नाही? - सोनवणे
सटाणा / वार्ताहर

वळण रस्त्याच्या कामास तातडीने सुरूवात व्हावी यासाठी उपोषणाचा इशारा देणारे नगराध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांनी उपोषण का सुरू केले नाही, असा सवाल शिवसेनेचे शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे यांनी केला आहे. शहरातून जाणाऱ्या विंचूर-प्रकाशा राज्य मार्गावर दुभाजक टाकण्याच्या कामाचा लवकरच शुभारंभ करण्यात येणार असून कळवण रस्त्याची भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असताना या कामाचे श्रेय लाटण्यासाठी इतर राजकीय पक्ष आंदोलनाची भाषा करीत असल्याचा टोला नगराध्यक्षांनी लगावला होता. ही आंदोलनाची भाषा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली असल्याने त्यांनी नगराध्यक्षांना उपोषणाबाबत जाब विचारला आहे. कामास दिरंगाई होत असल्याने आंदोलनाची तयारी करीत होतो. त्यात श्रेय घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विकास कामे लवकर होत नाहीत म्हणून आंदोलनाचा दणका द्यावा लागतो. दुभाजकांचे काम सुरू होणार असेल तर त्याचे श्रेय आपणच घ्या, मात्र वळण रस्त्याचे कामही तातडीने सुरू करा असे सोनवणे यांनी म्हटले आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम खात्याकडून दुभाजक टाकावयास रस्त्याच्या रुंदीकरणाच्या हालचाली सुरू झाल्या असून किती फूट रस्ता रुंदीकरण करावयाचा आहे यासाठी खुणा करण्यात झाल्या असून येत्या दोन दिवसात त्यास प्रारंभ होण्याची चिन्हे आहेत.

व्यक्तिविकासापेक्षा प्रभाग विकासाला महत्व - भोगे
नाशिक / प्रतिनिधी

महापालिका क्षेत्रात अनेक प्रभागांमध्ये व्यक्ती विकासाला महत्व देण्यात येते. परंतु प्रभाग क्रमांक अकरामध्ये कोणी किती मते मिळवून दिली, त्याचा विचार न करता संपूर्ण प्रभाग विकासाची परंपरा आम्ही रूजवली आहे, असे प्रतिपादन नगरसेवक भगवान भोगे यांनी केले. महानगरपालिकेच्या पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक अकरामधील दिंडोरीरोड लगत असलेल्या आदित्य कुंज व पंचवटी टॉवर परिसरातील विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ भोगे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. प्रभागात राजकीय कारणास्तव द्वेष भावना ठेऊन कामांना विरोध करणाऱ्यांना मात्र विकास नको असेल तर आमची हरकत नाही व विकासाचा हट्टही आम्ही करणार नाही, असा टोलाही भोगे यांनी विरोधकांना लगावला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून शशीताई आहेर उपस्थित होत्या. परिसरातील पथदीप, बगिचा, रस्ता काँक्रिटीकरण, पावसाळी गटारी, जलवाहिनी इत्यादी विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. आयोजक व नगरसेविका रिमा भोगे यांच्या हस्ते व परिसरातील महिलांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. या कार्यक्रमात अनेकांनी स्थानिक समस्या मांडल्या.

प्रांतस्तरीय युवा प्रेरणा शिबिरात तळोद्यातील युवकांचा सहभाग
तळोदा / वार्ताहर

शेगाव येथे झालेल्या महाराष्ट्र व गोवा प्रांतस्तरीय युवा प्रेरणा शिबिरात येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील व समाजकार्य महाविद्यालयातील २१ युवक व चार युवतींनी सक्रीय सहभाग घेतला. स्वामी विवेकानंद केंद्राच्या प्रांत विभागाच्यावतीने ‘विजय पूर्ण विजय’ प्रकल्पांतर्गत ‘स्वामी विवेकानंद चरित्र व विचार’ या विषयावर घेण्यात आलेल्या परीक्षेत तळोद्यातील ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे एक दिवसीय शिबीर घेण्यात आले होते. त्यापैकी २५ विद्यार्थ्यांची प्रांतस्तरीय शिबीरासाठी निवड करण्यात आली. शिबीरात भारताचा भूतकाळ, भारताची वर्तमान परिस्थिती, येणाऱ्या पिढय़ांपुढील आव्हाने व खऱ्या भारताचा शोध व पूर्ण विजयाची संकल्पना या विषयावर चिंतन मनन करण्यात आले. सांघिक खेळ, देशभक्तीपर समूह गीते, गटचर्चा, व्याख्याने, व्हिडीओ शो, योगासने आदींव्दारे विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासाच्या दृष्टीने उपक्रम राबविण्यात आले. शिबीरात महाराष्ट्र व गोवा प्रांतातील सुमारे १४०० युवक-युवतींनी व ३०० कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी शिबीरार्थीनी राष्ट्रकार्यासाठी झोकून घेण्याची शपथ घेतली. तळोद्यातील सहभागी युवकांचे नेतृत्व वरिष्ठ महाविद्यालयातील इंग्रजीचे प्राध्यापक जयपालसिंग शिंदे व तंत्रनिकेतन शाळेचे अनंत जाधव यांनी केले. विवेकानंद केंद्र, मालेगाव शाखेचे डॉ. सुरेश शास्त्री व नितीन हिरे यांचेही मार्गदर्शन लाभले.