Leading International Marathi News Daily                                 शुक्रवार, २३ जानेवारी २००९
विशेष

चांदी के चम्मच से चटनी चटाई!
गेल्या आठवडय़ात प्रदीर्घ कालावधीनंतर दिल्लीला जाणं झालं.. दिल्लीला जाणं झालं की ‘चांदनी चौकात’ गेलो नाही असं कधीच होत नाही; या खेपेसही तसं घडलंच; पण यावेळचं जाणं वेगळ्या संदर्भात झाल्यानं, वेगळ्या पाश्र्वभूमीवर झाल्यानं, ते मनात अधिक ठसलं.. अगदी पहिल्यांदा चांदनी चौकात कधी गेलो, ते आता नेमकं आठवत नाही.. पण एकविसाव्या शतकातलं पहिलं जाणं झालं ते २००१ मध्ये.. काजोल आणि करीना कपूरचा ‘कभी खुशी कभी गम’ तेव्हा नुकताच लागून गेला होता.. सिनेमात दोघांची भूमिका होती ती कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातील बहिणी-बहिणींची.. ‘चांदनी चौक’चा परिसर तेव्हाही आणि आताही कनिष्ठ मध्यमवर्गीयांनी राहावं असा सामान्य नव्हताच.. गर्भश्रीमंतांना आपलासा वाटावा, नवश्रीमंतांनी थोडय़ाशा धाडसानं जवळ करावा आणि उच्चमध्यमवर्गीयांनी बाचकत-बाचकत वावरण्याचा प्रयत्न करावा असं त्याचं रुप तेव्हाही होतं.. आजही आहे..

किमयागारांनीच गड राखला!
विधान परिषदेच्या नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत सत्तारूढ काँग्रेसला संधीचे सोने करता आले नाही तर, भाजपने त्यांचा गड कायम राखण्यात यश मिळवले. यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांची ‘किमया’ कामी आली आणि काँग्रेस आघाडीच्या नेत्यांना ती साधणे जमले नाही. लोकसभा निवडणुकीचे वेध लागले असताना भाजपचा झालेला विजय राज्यातील राजकारण्यांना सूचक संदेश देणारा ठरावा. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक अनंत घारड यांना उमेदवारी मिळावी, यासाठी जिल्ह्य़ातील सर्व नेते एकत्र आले. त्यांना विजयी करण्यासाठी सर्वेतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन या नेत्यांनी दिले. स्वपक्षीयांनी नाव समोर केल्याने घारड यांच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील मते फुटत असल्याची कल्पना त्यांना अखेपर्यंत देण्यात आली नाही आणि अनेक निवडणुकांचा अनुभव पाठिशी असतानादेखील स्वभावातील साधेपणा मात्र घारड यांना नडला. भाजपचे प्रदेश सचिव अशोक मानकर यांच्यासाठी नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्य़ातील सर्व नेते व कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.

शाब्दिक युद्ध!
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज आहेत, दोघांचा क्षेपणास्त्र कार्यक्रम जोरात आहे, दोन्ही देशांत तणाव आहे पण तरी दोन्ही देश युद्धाची ठिणगी पडू नये, अशीच इच्छा बाळगून आहेत. या दोन्ही देशांत प्रत्यक्ष युद्धाचे चिन्ह नसले तरी एक ‘युद्ध’ गेली काही दशके सुरू आहे. हे युद्ध आहे नावांचे! भारताने ‘पृथ्वी’ हे क्षेपणास्त्र विकसित केले तेव्हापासून ही शाब्दिक लढाई सुरू आहे. ‘पृथ्वी’ हे नाव बाराव्या शतकातील राजपूत राजा पृथ्वीराज चौहान याच्यावरून ठेवले आहे, या समजातून पाकिस्ताननेही भारतावर आक्रमण केलेल्या मुघल राजांची नावे क्षेपणास्त्राला देण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात भारतीय क्षेपणास्त्रांची नावे अर्थपूर्ण आहेत याचे कारण त्या-त्या क्षेपणास्त्राच्या वैशिष्टय़ानुसार व कार्यपद्धतीनुसार ही नावे निवडली गेली आहेत. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र म्हणून त्याचे नामकरण झाले ‘पृथ्वी’. लष्कर आणि हवाई दलाने याच नावाने ते दाखल केले. नौदलाने ते लढाऊ जहाजांवर तैनात करताना त्याचे नामकरण केले ‘धनुष’. हवाई हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी जमिनीवरून आकाशातील लक्ष्याचा वेध घेणाऱ्या क्षेपणास्त्राचे ‘आकाश’ हे नावही असेच समर्पक आहे. याचप्रकारे लष्कर, हवाई दल आणि नौदल या तिन्ही सेनादलांसाठी तयार केल्या गेलेल्या क्षेपणास्त्राचे नाव पडले ‘त्रिशूल’! रणगाडय़ांचा सावध व संध वेध घेणाऱ्या लांबट सडपातळ आकाराच्या क्षेपणास्त्राचे ‘नाग’ हे नावही चपखलच आहे. रशियाच्या साह्याने सध्या विकसित होत असलेल्या ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्रात आपली ब्रह्मपुत्रा आणि रशियाची मोस्कावा या नद्यांचा संगम आहे. भारतीय क्षेपणास्त्रांचे हे नामकरण कसे केले जाते? प्रत्येक प्रकल्पावर काम करणारी टीम आणि त्या प्रकल्पाचा संचालक काही नावे सुचवितो. संरक्षण संशोधन विकास संघटनेच्या प्रयोगशाळेचा नियंत्रक त्यातील काही नावे निवडतो. अखेर त्या क्षेपणास्त्राची कार्यपद्धती आणि वैशिष्टय़ लक्षात घेऊन अंतिम नाव निश्चित केले जाते.
पाकिस्तानने मात्र ‘हफ्त’ (पवित्र तलवार) नावाने क्षेपणास्त्र निर्मिती केली असली तरी त्या क्षेपणास्त्रांना भारतावर आक्रमण करणाऱ्या आणि हिंदू धर्म नष्ट करू पाहणाऱ्या मुघल राजांची नावे द्यायला सुरुवात केली. दिल्लीला धडक देणारा महम्मद शाह अब्दाली (१७२४ ते १७७३) याच्यावरून हफ्त-२ चे नामकरण झाले ‘अब्दाली’. सोमनाथ मंदिर उद्ध्वस्त करणारा महम्मद गझनवी (९७१ ते १०३०) याच्यावरून हफ्त-३ चे नामकरण झाले ‘गझनवी’. हफ्त-४ चे नाव पडले ‘शाहीन’ म्हणजे गरुड. पृथ्वीराज चौहानला पराभूत करणाऱ्या महम्मद घौरीचे नाव ‘हफ्त-५’ ला दिले गेले. आता ‘टिपू’ आणि ‘हैदर’ ही दोन क्षेपणास्त्रेही पाकिस्तान विकसित करीत आहे. त्यातही गमतीचा भाग म्हणजे पाकिस्तानची नावे ही अफगाणि योद्धय़ांची असल्याने अफगाणिस्तानने त्यांना आक्षेप घेतला होता. पाकिस्तानी व भारतीय ब्लॉगवर या नावांवरूनही बरेच चर्वितचर्वण सुरू असते. भारतीय क्षेपणास्त्रांची संस्कृत नावे ही हिंदू वर्चस्ववादाचीच झलक असल्याचा पाकिस्तानी ब्लॉगधारकांचा आक्षेप आहे तर पाकिस्तानी क्षेपणास्त्रांची नावे थेट आक्रमकांचीच असल्याने पाकिस्तान आजही मध्ययुगीन धुंदीत असल्याचा भारतीय ब्लॉगधारकांचा आरोप आहे.
उमेश करंदीकर