Leading International Marathi News Daily                                 शुक्रवार, २३ जानेवारी २००९

जेधे चौकातील वाहतुकीत अचानक बदल
पुणे, २२ जानेवारी/प्रतिनिधी

स्वारगेट येथील जेधे चौकातून सारसबागेकडे जाणारा रस्ता एकेरी करण्याची, तसेच चौकातून टिळक रस्त्यावर जाण्यास बंदी घालणाऱ्या योजनेची अंमलबजावणी वाहतूक पोलिसांनी आजपासून सुरू केली. सिग्नलचा वेळ कमी करून जेधे चौकातील वाहतुकीचा वेग वाढविण्याच्या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे. दरम्यान, कोणतीही पूर्वसूचना न देता ही योजना आज घाईघाईने अमलात आणल्यामुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली. जेधे चौकातील एकेरी वाहतुकीची योजना लांबणीवर टाकण्यात आणली होती.

अडीचशे छाप्यांद्वारे आठ बालमजुरांची सुटका
पुणे, २२ जानेवारी / विशेष प्रतिनिधी

महिनाभरात तब्बल २५२ ठिकाणी छापे मारूनही केवळ आठच बालमजुरांची सुटका कामगार विभागाला करता आली आहे. या महिन्यात २ ते १५ जानेवारी दरम्यान झालेल्या या धडक कारवाईद्वारे बालमजुरांना कामावर ठेवणाऱ्या पाचजणांवर फौजदारी कारवाई करण्यात आली. कात्रज, धनकवडी, बालाजीनगर, इंदिरा नगर, पिंपरी चिंचवड, रहाटणी, वाकड, पिंपळे निलख, िपपळे सौदागर, थेरगाव, काळेवाडी, भोसरी, दापोडी, बोपोडी या परिसरात २ जानेवारी आणि १२ ते १५ जानेवारी दरम्यान ही धडक तपासणी मोहीम राबविण्यात आल्याची माहिती सहायक कामगार आयुक्त संभाजी मोरे यांनी आज लोकसत्ताशी बोलताना दिली.

‘साहेबां’च्या घरी भोसरीकरांचा पाहुणचार!
पिंपरी, २२ जानेवारी / प्रतिनिधी
भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास लांडे यांच्यासह भोसरीच्या पंचक्रोशीतील १४ नगरसेवक व प्रमुख कार्यकर्त्यांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या दिल्ली येथील सहा जनपथ निवासस्थानी पाहुणचार घेतला. भोसरी विधानसभेचा समावेश लोकसभेच्या शिरूर लोकसभा मतदारसंघात होतो. पवार येथून निवडणूक लढविण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना भोसरीकर पुढाऱ्यांच्या या पाहुणचारातून त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याचा तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत.

डाळिंब दाण्यांची निर्यात करणारा प्रकल्प सोमेश्वरनगरजवळ सुरू
सोमेश्वरनगर, २२ जानेवारी/वार्ताहर

जागतिक आर्थिक मंदीमुळे निर्यात करणारे कारखाने एकीकडे बंद होत असल्याचे चित्र एका बाजूला असताना पुणे जिल्हय़ातील बारामती तालुक्यातील कृषी उद्योजक इंद्रजित काकडे या युवकाने सुमारे ८ कोटी ५० लाख रुपयांचा फ्रुट वर्ल्ड ब्रेडा बी. व्ही. या नेदरलँड्समधील नामांकित उद्योगसमूहाच्या व नेदरलँड सरकारच्या सहकार्याने सोमेश्वरनगर (करंजे) येथे फ्रेश एकर्स अ‍ॅग्रो इंडिया प्रा.लि. हा प्रकल्प उभारला असून, या प्रकल्पातून डाळिंबावर प्रक्रिया करून डाळिंब दाण्यांची निर्यात केली जाणार आहे. संपूर्ण भारतातील हा पहिलाच प्रकल्प असणार आहे.

‘मातंग समाजाबाबतच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेऊ ’
पुणे, २२ जानेवारी/प्रतिनिधी

‘मातंग समाजाच्या विकासासाठी आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे अभ्यास आयोगाने सादर केलेल्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेऊन याबाबतची सूचना संबंधित मंत्र्यांना केली जाईल’, असे आश्वासन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आज येथे मातंग समाजाच्या मेळाव्यात दिले. राज्याचे सांस्कृतिक व सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही या मागणीबाबत शासन कार्यवाही करेल, असे आश्वासन दिले. मातंग एकता आंदोलनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याला मातंग समाजातील राज्यभरातील बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मेळाव्यात अध्यक्षस्थानाहून बोलताना ठाकरे यांनी वरील आश्वासन दिले. माजी खासदार संदिपान थोरात, आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष व मेळाव्याचे संयोजक आमदार रमेश बागवे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष अभय छाजेड, उपाध्यक्ष दीपक मानकर,आंदोलनाचे कार्याध्यक्ष अविनाश बागवे, माजी महापौर कमल व्यवहारे, तसेच विठ्ठल थोरात, प्रा. मरतड साठे, आप्पा उकरंडे, जेनब बागवे आदी या वेळी उपस्थित होते.

सामाजिक संस्थांनी सरकारला जागे करावे - चव्हाण
पुणे, २२ जानेवारी/प्रतिनिधी

सामाजिक सेवा संस्थांनी सरकारला महत्त्वाच्या विषयाबाबत जागे करायला हवे असे प्रतिपादन वेणुताई चव्हाण प्रतिष्ठानचे विश्र्वस्त अशोक चव्हाण यांनी केले. मातोश्री प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी व महाराष्ट्र आरोग्य सेनेच्या अध्यक्ष वर्षां गुप्ते यांचा गौरव मानपत्र देऊन करण्यात आला त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. प्रतिष्ठानच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रदीर्घ कार्याबद्दल जोशी यांचा तर आरोग्याच्या क्षेत्रातील सेवेबद्दल वर्षां गुप्ते यांचा गौरव अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.

माधुरी सहस्रबुद्धे यांना ‘रानवारा पुरस्कार’ प्रदान
पुणे, २२ जानेवारी/प्रतिनिधी

वंचित विकास संस्थेतर्फे देण्यात येणारा निर्मळ रानवारा कृतज्ञता पुरस्कार माधुरी सहस्रबुद्धे यांना नुकताच प्रदान करण्यात आला. छोटय़ा-छोटय़ा गोष्टींतून मिळणारा आनंद महत्त्वाचा मानणाऱ्या आणि इतरांनीही तो घ्यावा म्हणून प्रयत्न करणाऱ्या माधुरी सहस्रबुद्धे भारती निवास सोसायटी येथे सुमारे २१ वर्षे मुलांसाठी बालरंजन केंद्र चालवित आहेत. मुलांमध्ये रमणाऱ्या आणि त्यांच्यासाठी विविध कल्पक उपक्रम राबविणाऱ्या मुलांचे व्यक्तिमत्त्व फुलेल तसेच त्यांच्यावर उत्तम संस्कार होतील यासाठी प्रयत्नशील राहणे आदी कार्याचा गौरव करीत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून चारुहास पंडित, प्रभाकर वाडेकर उपस्थित होते. निर्मळ रानवारा या मासिकासाठी उत्कृष्ट लेखन करणाऱ्या तसेच चित्र काढणाऱ्या बालचमूंनादेखील दरवर्षी इंदिरा गोविंद पुरस्कार प्रोत्साहनपर दिला जातो. यंदाचा पुरस्कार रसिका तुंडलवार, निखिल यादव, तन्वी गरुड, तेजस घोटवडेकर, नील खरे, ईशा परांडे, श्वेता चलवादी, देवकी देशमुख यांना देण्यात आला. सुषमा दातार यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली तर सन्मानपत्राचे वाचन ज्योती जोशी यांनी केले. सूत्रसंचालन श्रीराम ओक यांनी केले. कार्यक्रमास सरोज टोळे, विलास चाफेकर,श्रीकांत नारायण,ललितागौरी डांगे, सरिता पदकी आदी उपस्थित होते. याप्रसंगी बालरंजनच्या मुलांनी बालनाटय़ व नृत्य सादर केले.

भौतिकशास्त्र विभागाचे माजी प्रमुख पद्माकर पानट यांचे निधन
पुणे, २२ जानेवारी/खास प्रतिनिधी

पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. पद्माकर वासुदेव पानट (वय ६५) यांचे मूत्रपिंडाच्या विकाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, मुलगा-मुलगी असा परिवार आहे. जगभरात आघाडीवर असलेल्या बर्कले विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केली. त्यानंतर विद्यापीठामध्ये १९७५ पासून पानट यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. विभागप्रमुख ही जबाबदारी यशस्वीपणे पेलण्याबरोबरच विद्यापीठ व उच्चशिक्षण क्षेत्रातील घडामोडींबाबत ते आग्रहाने माहिती घेऊन मतप्रदर्शन करीत. त्याचबरोबर प्राध्यापकवर्गासह अन्य घटकांमध्येही त्याबाबत जागरूकता निर्माण करीत. गेल्या काही वर्षांपासून त्यांना मूत्रपिंडाचा त्रास होता. त्यांच्या मुलाकडे अमेरिकेत गेल्यानंतर तो काहीसा बळावला. तिथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर ते मायदेशी परतले. परंतु, त्यानंतर मूत्रपिंड निकामी झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत होते. त्यामध्येच त्यांचे निधन झाले. विद्यापीठामध्ये एका सभेचे आयोजन करून पानट यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

जप्त वाहनांचा २८ ला लिलाव
पुणे, २२ जानेवारी/ प्रतिनिधी

थकित कराच्या वसुलीसाठी जप्त करण्यात आलेल्या अठरा वाहनांचा लिलाव येत्या २८ जानेवारी रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयात केला जाणार आहे. कर वसुलीसाठी जप्त करण्यात आलेली ही वाहने उरुळी कांचन, शिक्रापूर पोलीस ठाणे, प्रादेशिक परिवहन कार्यालयात ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये डिलिव्हरी व्हॅन, बसेस आणि जड वाहनांचा समावेश आहे. संबंधित वाहनधारकांना आपल्या वाहनाचा लिलाव होऊ नये असे वाटत असल्यास त्यांनी लिलावाच्या दिनांकापर्यंत थकित कराची रक्कम भरावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे. लिलाव करण्यात येणाऱ्या वाहनांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय तसेच पुणे शहर प्रादेशिक कार्यालयात सूचना फलकावर लावण्यात आली आहे.

‘लवासा सॅटेलाईट सिटी’ मध्ये अद्ययावत स्पेस स्टेशन होणार
पुणे, २२ जानेवारी/प्रतिनिधी

स्पेसवर्ल्ड हे स्पेस एडय़ुटेन्मेंटचे आशियातील पहिले अद्ययावत स्पेस स्टेशन उभारण्यासाठी व त्याच्या व्यवस्थापनासाठी लवासा कॉर्पोरेशनने स्पेस इन्व्हेस्टमेंट कंपनी, एलएलसीसह करार केला आहे. ६५ एकर क्षेत्रात ४०० कोटी रुपये गुंतवून उभारले जाणारे स्पेसवर्ल्ड पुण्याजवळील लवासा येथील वरसगाव धरणाच्या बॅकवॉटर्सलगत असेल. सन २०१० पासून लवासा येथील स्पेसवर्ल्ड कार्यान्वित होईल.
‘लवासा सॅटेलाईट सिटी’ एचसीसी समूह कंपनीच्या लवासा कॉर्पोरेशन लि.ने वसवले.या सेंटरमधील अभ्यासक्रम प्रामुख्याने नवे तंत्रज्ञान आणि स्पेस ब्राऊजिंग यावर आधारित असतील.

स. प. महाविद्यालयात उत्साह ‘ऊर्मी’चा
पुणे, २२ जानेवारी / खास प्रतिनिधी

विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या ओसंडून वाहणाऱ्या उत्साहात सर परशुरामभाऊ महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ऊर्मी या महोत्सवाचा प्रारंभ झाला. प्रसिद्ध दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्या हस्ते स.प. गीताचे प्रकाशन करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी मृण्मयी देशपांडे व सिद्धार्थ चांदेकर यांनी राजवाडे यांची मुलाखत घेतली. शिक्षण प्रसारक मंडळीचे उपाध्यक्ष अनंत माटे, वसंत देसाई आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. माधव पेंडसे यांनी स्वागत केले. संयोजिका डॉ. सरोज हिरेमठ, छाया आबनावे, राघव अष्टेकर आदी या वेळी उपस्थित होते. पाच हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत क्रेझी किया रे, अ‍ॅड मॅड शो, अंताक्षरी आदी कार्यक्रम रंगले. त्यानंतर मी परशुरामीय या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.

तुकाराम महाराज प्रतिष्ठानतर्फे गाथा पारायण सप्ताहाचे आयोजन
पुणे, २२ जानेवारी/प्रतिनिधी

संतश्रेष्ठ तुकाराममहाराज सेवा प्रतिष्ठानतर्फे २४ ते ३१ जानेवारी दरम्यान गाथा पारायण व कीर्तन सप्ताहाचे शनिवारवाडा पटांगण येथे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिष्ठानचे सचिव चंद्रकांत वांजळे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या कीर्तन सप्ताहाचे उद्घाटन शनिवारी (दि. २४) सायंकाळी पाच वाजता ‘सकाळ’चे संपादक यमाजी मालकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आमदार मोहन जोशी, डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. सदानंद मोरे उपस्थित राहतील. दररोज सकाळी सात ते अकरा या कालावधीत गाथा पारायण, दुपारी तीन ते सहा श्रीमद् भागवत कथा आणि साडे सहा ते साडे आठ कीर्तन हे कार्यक्रम होणार आहेत. तसेच प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा ‘संत तुकाराम महाराज सेवा पुरस्कार’ यावर्षी ह.भ.प. बिल्लूशेठ पंजाबी यांना २६ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता प्रदान करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, पाच हजार रुपये रोख व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे, असे वांजळे यांनी यावेळी सांगितले.