Leading International Marathi News Daily                                 शुक्रवार, २३ जानेवारी २००९
राज्य

सीमाप्रश्न न्यायप्रविष्ट असताना कर्नाटक विधानसभेचे बेळगावातील अधिवेशन चुकीचे - प्रा. एन. डी. पाटील
कोल्हापूर, २२ जानेवारी / विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी याचिका सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी प्रलंबित असताना कर्नाटक शासनाने वादग्रस्त भागात राज्य विधिमंडळाचे अधिवेशन घेणे, त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करणे आणि विधानसभेची इमारत बांधण्यासाठी भूमिपूजन करणे या सर्व बाबी कर्नाटक शासनाच्या माकडचेष्टा आहेत. अशा कृतीने कर्नाटक शासनाने सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला असल्याने संबंधित बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या जातील, अशी माहिती सीमा चळवळीचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी येथे एका पत्रकार परिषदेत दिली.

लेखक भगवान ठग यांचे निधन
बुलढाणा, २२ जानेवारी / प्रतिनिधी

आपलं घर, गाव, देश, नाव, गोत्र, पत्नी, मुल
हे अवघं पंचतत्व मी माझ्या पद्धतीने निवडतो
मात्र, मृत्यूविषयी मी काहीही करू शकत नाही
या शब्दात आठ दिवसांपूर्वी जीवनाचे शाश्वत सत्य कवितेतून अधोरेखित करणारे ज्येष्ठ साहित्यिक भगवान ठग यांचे गुरुवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते.

आगामी लोकसभा निवडणूक युतीकडून लढविण्याची सुरेश जैन यांची स्पष्टोक्ती
जळगाव, २२ जानेवारी / वार्ताहर

आगामी लोकसभा निवडणुकीत आपण जळगाव मतदारसंघातून सेना-भाजप युतीतर्फे उमेदवारी करू अशी घोषणा करतानाच हा मतदारसंघ जागावाटपात युतीकडून ज्या घटक पक्षाच्या वाटय़ाला येईल त्या पक्षात नंतर रितसर प्रवेश केला जाईल, असे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुरेश जैन यांनी आज स्पष्ट केले. एकेकाळी शरद पवारांशी सख्य असलेल्या जैन यांचे काही काळापासून राष्ट्रवादीशी चांगलेच बिनसले आहे. केवळ तांत्रिक कारणामुळे ते पक्षात असून या काळात त्यांनी भाजपच्या एकनाथ खडसे यांच्याशी जुळवून घेतले आहे.

महामार्ग चौपदरीकरणात शेकडो शेतकऱ्यांची घोर फसवणूक
मोबदला देण्याऐवजी शेतकऱ्यांना धमक्या!
सुभाष हरड
शहापूर, २२ जानेवारी

मुंबई-आग्रा या राष्ट्रीय (क्र. ३) महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असले, तरी शेकडो शेतकऱ्यांच्या संपादित केलेल्या लाखमोलाच्या जमिनींचा मोबदला अजूनही न दिल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांची शासनाने एकप्रकारे घोर फसवणूक केली आहे. महामार्गालगतच्या साने, पाली, वासिंद, खातिवली, आसनगाव या गावातील प्रकल्पग्रस्त शेतकरी शासनाविरुद्ध एकवटले असून, प्रसंगी रुंदीकरणाला विरोध करण्याच्या तयारीत आहेत.

राज्य बँकेकडून अधिक व्याजदराची आकारणी - खा. पिंगळे
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवरील जप्तीची कारवाई

नाशिक, २२ जानेवारी / प्रतिनिधी

तब्बल ७२ कोटी रूपयांच्या कर्जाच्या थकबाकीपोटी नाशिक तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर राज्य सहकारी बँकेने जप्तीची कारवाई केली असली तरी मुळात हे कर्ज नाबार्डकडून मिळाले आहे आणि ते कमी व्याजदराचे असताना राज्य बँक अधिक व्याजदराची आकारणी करीत असल्याचे बाजार समितीचे सभापती खा. देवीदास पिंगळे यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंगळे यांची गेल्या अनेक वर्षांपासून या बाजार समितीवर सत्ता असून कारवाईच्या बडग्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसल्याची चर्चा खुद्द त्यांच्याच पक्षात सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांचे आव्हान गोरठेकरांनी परतवून लावले
भोकर बाजार समिती निवडणूक

रामचंद्र मुसळे
भोकर, २२ जानेवारी

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत आमदार बापूसाहेब गोरठेकर गटाला १२ जागा मिळाल्या. काँग्रेसला केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागले. मुख्यमंत्र्यांचा पूर्ण पाठिंबा असतानाही काँग्रेसला मोठा पराभव पत्करावा लागला.
विधानसभेच्या भोकर मतदारसंघात भोकर, उमरी, धर्माबाद हे तीन तालुके येतात.

रायगडमध्ये ओळखपत्राविना सात लाख ७५ हजार मतदार
१७ हजार मतदारांची एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंदणी
जयंत धुळप
अलिबाग, २२ जानेवारी

भारत निवडणूक आयोगाचे भूतपूर्व आयुक्त टी़ एन्. शेषन यांनी मतदानातील तथाकथित गैरप्रकारांना आळा घालण्याच्या हेतूने ‘मतदार ओळखपत्र’ ही संकल्पना देशात सर्वप्रथम १९९० मध्ये अमलात आणली़ त्यास आज तब्बल १९ वर्षांचा कालावधी लोटला तरी रास्त मतदारास बिनचूक मतदार ओळखपत्रे देण्यात, निवडणूक आयोगाची अधिकृत यंत्रणा म्हणून काम करणाऱ्या महसूल यंत्रणा यशस्वी होऊ शकलेल्या नाहीत, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आह़े

मराठा समाजास आरक्षण देण्यास रिपाइंचा पाठिंबा- आठवले
नाशिक, २२ जानेवारी / प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण देण्यास आपला पाठिंबा असून ही मागणी आपणच आधी केली होती, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी येथे आज पत्रकार परिषदेत सांगितले. आगामी निवडणुकीत आपण शिर्डी किंवा पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.पक्षात दलितांशिवाय इतर समाजाच्या कार्यकर्त्यांनाही सामावून घेण्यासाठी ६०:४० असे धोरण ठेवण्यात येणार असून ६० टक्के दलित तर ४० टक्के इतर असे हे वर्गीकरण राहणार आहे. आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसशी रिपाइंची युती कायम राहणार असून शिवसेना-भाजपासारख्या जातीय पक्षांना सत्तेपासून दूर ठेवण्याची गरजही आठवले यांनी यावेळी व्यक्त केली. देशविघातक शक्तींना शिवसेना-भाजपाकडून पाठिंबा मिळत असल्याची टीकाही त्यांनी केली.

मनमाडमध्ये कर्नाटक एक्स्प्रेस रोखण्याचा प्रयत्न;
छावा संघटनेच्या २१ कार्यकर्त्यांना अटक
मनमाड, २२ जानेवारी / वार्ताहर

बेळगावमधील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज दुपारी मनमाड रेल्वे स्थानकात बंगळूरू-नवीदिल्ली कर्नाटक एक्स्प्रेस रोखण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी सुमारे २१ कार्यकर्त्यांना अटक केली.घोषणाबाजी करीत दुपारी अचानक छावाचे कार्यकर्ते रेल्वे स्थानकात दाखल झाले. फलाट क्रमांक दोनवर उभ्या असलेल्या कर्नाटक एक्स्प्रेसच्या इंजिनसमोर ठाण मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु पोलीस व सुरक्षा दलाने हा प्रयत्न हाणून पाडला व कार्यकर्त्यांची धरपकड केली. बेळगावमधील मराठी जनतेला न्याय मिळावा म्हणून छावाने हे आंदोलन केल्याचे संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर माळी यांनी सांगितले. यापुढे महाराष्ट्रातून एकही रेल्वे कर्नाटकमध्ये जाऊ देणार नाही तसेच कर्नाटकमधून येऊ देणार नाही, असा इशारा देतानाच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरोडेखोरांच्या टोळीला अटक
वर्धा, २२ जानेवारी / प्रतिनिधी

दरोडा टाकण्याच्या तयारीत असतानाच अट्टल दरोडेखोरांच्या टोळीला रेल्वे पोलिसांनी अटक केली. बुधवारी मध्यरात्रीची ही घटना आहे. सेवाग्राम स्थानकावरून वर्धेकडे येत असताना रेल्वे थांबवण्याची कुजबूज सुरू असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना प्राप्त झाली होती. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी शिताफीने सापळा रचून सात आरोपींना अटक केली. ते सर्व बिहारमधील गया येथील राहणारे आहेत.

दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या?
अलिबाग, दि़ २२ जानेवारी/ प्रतिनिधी

नेरळमध्ये रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या करणारी कर्जत तालुक्यांतील पोशिर गावातील श्रमजीवी जनता विद्यामंदिरात इयत्ता दहावीत शिकणारी कु. राजेश्री शांताराम पाटील (१९) या विद्यार्थिनीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणास्तव भा.दं.वि. कलम ३०६, ५०४ आणि ३४ अन्वये अनंत गणपत पाटील, मधुकर गणपत पाटील, सुरेश गणपत पाटील, मनीषा मधुकर पाटील (सर्व रा. मानिवली), दुर्वेश प्रभाकर लिये (रा. पोशिर) आणि नलिनी काळूराम राणे (रा.जावसे-अंबरनाथ) या सहा जणांविरुद्ध नेरुळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आह़े राजेश्री ही या शाळेत इयत्ता दहावीत शिकत होती़ मोबाईल चोरल्याचा आळ तिच्यावर घेऊन नलिनी काळुराम राणे ही शाळेत तिला या खोटय़ा कारणास्तव सतत त्रास देत असे. उर्वरित पाच जणांनी मृत राजेश्री हिस शिवीगाळ करून अपमानित केले होत़े त्यातूनच राजेश्री हिने आत्महत्या केल्याची तक्रार राजेश्रीचे पिता शांताराम हरिश्चंद्र पाटील यांनी नेरळ पोलीस ठाण्यात दाखल केली आह़े या प्रकरणी नेरळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एन्.डी. शिंदे अधिक तपास करीत आहेत़

३१ हजार २२१ युनिट विजेच्या फसवणूकप्रकरणी पोलिसांची कारवाई
अलिबाग, २२ जानेवारी/ प्रतिनिधी
रामा जानू हिलम यांच्या नावावर असणारा कृषिपंपाचा वीज मीटर बेकायदेशीररीत्या वॉटर फॉलमध्ये पाणी भरण्यासाठी तब्बल सहा महिने वापरून ३१ हजार २२१ युनिट विजेचा गैरवापर करून वीज वितरण कंपनीची २ लाख ९८ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई - पुणे मार्गावरील खालापूर तालुक्यांतील विनेगांव येथील सुप्रसिद्ध ‘निशिलॅन्ड वॉटर पार्क’चे परेश शहा आणि कृषिपंपाचे मूळ मालक रामा हिलम या दोघांविरुद्ध खालापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आह़े रामा हिलम यांच्या नावे वीज वितरण कंपनीचा मीटर क्र. ०३१६०००००३४१ हा आह़े त्यातून ही वीजचोरी व गैरप्रकार होत असल्याचे वीज वितरण कंपनीचे खोपोली येथील अभियंता भाऊसाहेब सावंत यांच्या लक्षात आल्यावर, त्यांनी ही चोरी पकडून, विद्युत अधिनियम कायदा २००३ च्या कलम १३५ व १५१ नुसार दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी ही कारवाई केली आह़े

मारुती बोंबले आश्रमशाळा विषबाधाप्रकरणी संस्थाचालकसह सहाजणांवर गुन्हा
अलिबाग, दि़ २२ जानेवारी/ प्रतिनिधी

गेल्या १६ जानेवारीस माणगांव तालुक्यांतील उत्तेखोल वाडी येथील मारुती बोंबले आश्रमशाळेतील तब्बल ४६ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा होऊन, त्यांच्या जीवितास धोका निर्माण केल्या कारणास्तव संस्थाचालक हरिश्चंद्र सोपानराव कांबळे (५५), अधीक्षक दयानंद पांडुरंग जाधव (२७), सौ़ संगीता सुनील मुंढे (३६), सौ़ शकुंतला भागवत केमनार (३६), राजू दत्ताराम तेटगुरे (३०) आणि राजाराम बाळू बुटे (३२) या सहाजणांविरुद्ध भा.दं.वि. कलम ३३७ व ३४ अन्वये माणगांव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आह़े अधिक तपास माणगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लोखंडे करीत आहेत.