Leading International Marathi News Daily                                 शुक्रवार, २३ जानेवारी २००९
क्रीडा

नदाल, सेरेना तिसऱ्या फेरीत; व्हिनस पराभूत
ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस

मेलबर्न, २२ जानेवारी / एएफपी
अव्वल मानांकित राफेल नदाल व सेरेना विल्यम्स यांनी आपापल्या प्रतिस्पध्र्यावर मात करत ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला विभागात तिसऱ्या फेरीत धडक मारली. नदालने दुसऱ्या फेरीचा अडसर सहज पार केला तर तीनदा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या सेरेना विल्यम्सला तिसऱ्या फेरीत धडक मारताना आज घाम गाळावा लागला. सहाव्या मानांकित व्हिनस विल्यम्सचे महिला एकेरीतील आव्हान संपुष्टात आले. जागतिक क्रमवारीत ४६व्या स्थानावर असलेल्या स्पेनच्या सुरेझ नाव्हारोने व्हिनसचा २-६, ६-३, ७-५ गुणांनी पराभव केला.

शोएबने कसोटीतून निवृत्ती घ्यावी - वकार
कराची, २२ जानेवारी / वृत्तसंस्था

शोएब अख्तर याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन एकदिवसीय आणि ट्वेंटी-२० सामन्यांकडेच लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार युनूस याने दिला आहे. शोएबला आणखी काही काळ आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये खेळायचे असेल, तर त्याला कसोटीमधून निवृत्ती घेण्याखेरीज पर्याय नाही, असेही वकार म्हणाला. वेगवान गोलंदाजीने क्रिकेट विश्व गाजवून सोडलेल्या वकारने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांत ८०० हून अधिक बळी घेतले आहेत. काही काळ त्याने पाकिस्तानचे कर्णधारपदही भूषविले आहे.

भारताची अर्जेटिनाकडून हार
अखेरच्या लढतीसह मालिका जिंकण्याची आज संधी
मार डेल प्लाटा (अर्जेटिना), २२ जानेवारी/पीटीआय
भारताच्या आघाडीच्या फळीने गोल करण्याच्या अनेक नामी संधी गमावल्यामुळे येथील इस्तादिया पॅनामेरिकानो स्टेडियमवरील तिसऱ्या हॉकी कसोटी सामन्यात अर्जेटिनाकडून ०-२ अशा फरकाने हार पत्करली. पहिल्या दोन्ही कसोटी लढतींमध्ये मिळविलेल्या दमदार विजयांमुळे भारताने चार सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली असून, अखेरची लढत शुक्रवारी खेळविण्यात येणार आहे.

शिवशक्ती व मध्य रेल्वे विजेते
गजानन राज्यस्तरीय कबड्डी

मुंबई, २२ जानेवारी / क्री. प्र.
विलेपार्ले येथील गजानन क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतील महिला गटात शिवशक्तीने तर पुरुष व्यावसायिक गटात सेंट्रल रेल्वे संघाने विजेतेपद पटकावले. महिला गटातील डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लब आणि शिवशक्ती यांच्यातील लढत चांगलीच उत्कंठावर्धक ठरली. डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लबने पूर्वार्धात अप्रतिम खेळ करीत १२-४ अशी मोठी आघाडी घेतली होती.

मिळालेली संधी अन् उजळलेले भाग्य..
उदय रंगनाथ
नागपूर, २२ जानेवारी

मिळालेल्या संधीचे सोने करणाऱ्याचे भाग्यसुद्धा कसे लखलख उजळते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे विदर्भाच्या रणजी संघाचा नवोदित वेगवान गोलंदाज उमेश यादव..! मातीत दडलेल्या हिऱ्यावर पारख्याची नजर पडावी आणि त्याची किंमत कोटय़वधींच्या घरात असावी, अशीच काहीशी कामगिरी उमेशने बंगळुरूला दक्षिण विभागाविरुद्ध सुरू असलेल्या दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यात आज पहिल्याच दिवशी मध्य विभागाचे प्रतिनिधित्व करताना द्रविड व लक्ष्मणसह पाच बळी मिळवून केली. यंदाच्या हंगामातच थेट रणजी स्पर्धेत पदार्पण करणारा विदर्भाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव असाच झपाटय़ाने पुढे येत आहे.

जय भारतचा शेवटच्या चढाईत पराभव!
आर्य सेवा कबड्डी

मुंबई, २२ जानेवारी / क्री. प्र.
शेवटच्या मिनिटाला विजय नवनाथ मंडळाच्या क्षेत्ररक्षकांनी जय भारत संघाच्या शिवाजी बावडेकरची अचूक पकड करून १५-१४ असा रोमहर्षक विजय मिळविला आणि आर्य सेवा मंडळाच्या ७४ व्या प्रथम श्रेणी कबड्डी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. त्यांची आता गतविजेत्या एच. जी. एस. क्रीडा मंडळाशी लढत होईल.

मुंबई इंडियन्स संघात उथप्पाऐवजी झहीर
मुंबई, २२ जानेवारी / क्री. प्र.

इंडियन प्रीमिअर लीगसाठी मुंबई इंडियन्स संघाने आपल्या संघात रॉबिन उथप्पाऐवजी डावखुरा वेगवान गोलंदाज झहीर खानचा समावेश केला आहे. गतवर्षी या स्पर्धेत बंगळूरच्या रॉयल चॅलेंजर्स संघातून झहीर खान खेळला होता. मात्र या वर्षी झहीर-सचिनच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघातून तर उथप्पा बंगळूरच्या रॉयल चॅलेंजर्सकडून खेळेल, अशी अदलाबदल करण्यात आली आहे. त्याअगोदर मुंबई इंडियन्स संघाने आपल्या संघातून खेळलेल्या दिल्लीच्या आशिष नेहराला दिल्ली डेअर डेव्हिल्स संघाकडे परत पाठवून तिकडच्या शिखर धवन या फलंदाजाला आपल्या संघात स्थान दिले होते. आता झहीरच्या समावेशाने पुन्हा संघाचा समतोल साधण्यात आल्याचे मुंबई इंडियन्सच्या प्रवक्त्याने सांगितले. बंगळूरचा रॉयल चॅलेंजर्स संघ धडाकेबाज फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या रॉबिन उथप्पाला संघात घेण्यासाठी उत्सुक होता तर मुंबईला रणजी करंडक मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या झहीर खानसाठी मुंबई इंडियन्स संघही उत्सुक असल्याने ही अदलाबदल सहज पार पडली.

सानिया दुहेरीतही पराभूत; पेस, भूपतीची आगेकूच
ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीतील आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात आल्यानंतर भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झाला आज महिला दुहेरीतही पराभव स्वीकारावा लागला. लिएंडर पेस व महेश भूपती यांनी आपापल्या सहकाऱ्यांसह पुरुष दुहेरीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
सानिया व तिची अमेरिकन सहकारी व्हॅनया यांना रशियाची व्हेरा डुश्चेव्हिना व युक्रेनचा ओल्गा सॅव्हचुका यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. डुश्चेव्हिना-ओल्गा जोडीने सानिया-व्हॅनया जोडीची झुंज ४-६, ६-१, ६-१ गुणांनी मोडून काढली. पहिला सेटजिंकत १-०ची आघाडी मिळवणाऱ्या सानिया-व्हॅनया जोडीला त्यानंतरच्या सेटमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. डुश्चेव्हिना-ओल्गा जोडीने नंतरचे दोन्ही सेट सहजजिंकत महिला दुहेरीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सानियाला काल महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीतील लढतीत १०व्या मानांकित रशियाच्या नादिया पेट्रोव्हाकडून पराभव स्वीकारावा लागला.
पुरुष दुहेरीत तिसऱ्या मानांकित महेश भूपती व मार्क नोव्हेल्स जोडीने रशियाच्या मिखाईल यौझनी व जर्मनीच्या मिश्चा झव्हरेव्ह यांचा ६-३, ६-२ गुणांनी धुव्वा उडवला. भूपती-नोव्हेल्स जोडीला दुसऱ्या फेरीत रशियन जोडी इगोर कुनित्सिन आणि दिमित्री टुर्सोनोव्ह यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागले. चौथ्या मानांकित लिएंडर पेस-लुकास डलौही यांनी स्वित्र्झलडचा युव्हेस अलेग्रो व फ्रान्सच्या फॅब्रिस सॅन्ट्रो यांचा ४-६, ६-१, ६-२ गुणांनी पराभव केला. दुसऱ्या फेरीत पेस-डलौही यांची इटलीच्या फॅबिओ फोगनिनी आणि क्रोएशियाच्या इव्हान जुबिकिक या जोडीसोबत लढत होईल.

पाकविरुद्धची मालिका जिंकायचीय- जयवर्धने
कराची, २२ जानेवारी/वृत्तसंस्था

पाकिस्तानविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकणे हेच आमचे ध्येय आहे, असे श्रीलंकेचा कर्णधार महेला जयवर्धने याने म्हटले आहे. सध्या तरी आपण पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेवरच लक्ष केंद्रित केले असून, भारताविरुद्धच्या आगामी मालिकेविषयी आपण विचारही केलेला नाही, असेही तो म्हणाला.
पाकिस्तानविरुद्धची एकदिवसीय मालिका खेळल्यानंतर श्रीलंका संघ भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी मायदेशी जाणार आहे. भारताविरुद्धची मालिका खेळल्यानंतर श्रीलंका संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी पुन्हा पाकिस्तानात जाणार आहे. पहिला एकदिवसीय सामना गमाविल्यानंतर श्रीलंका संघाने दुसरा सामना १२९ धावांनी जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. दुसऱ्या सामन्यातील विजयानंतर ‘पीटीआय’शी बोलताना जयवर्धने म्हणाला की, भारतीय संघ बलवान आहे यात वादच नाही. मात्र या संघाला गेल्या वर्षी आम्ही कसोटी मालिकेत पराभूत केले होते हे विसरू नका.

ऑलिम्पिकवीरांना सरकारकडून पेन्शन
नवी दिल्ली, २२ जानेवारी/पीटीआय

ऑलिम्पिकपटू निरंजन दास आणि गोरा चंद सील यांना क्रीडापटू राष्ट्रीय कल्याण योजनेनुसार सरकारने महिन्याला प्रत्येकी आठ हजार रुपयांची पेन्शन आज मंजूर केली. ८६ वर्षीय बंगालचा जलतरणपटू सील याने १९४८मध्ये लंडन ऑलिम्पिक स्पध्रेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. आता सुरू झालेली पेन्शन त्यांना आजीवन मिळेल, अशी माहिती क्रीडा मंत्रालयाने दिली. बंगालच्याच दासने १९५६च्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पध्रेत कुस्तीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

श्रीलंका दौऱ्याच्या कार्यक्रमात बदल
कोलंबो, २२ जानेवारी/ पीटीआय

भारताच्या श्रीलंकन दौऱ्याच्या कार्यक्रमामध्ये बदल करण्यात आला असून पाच एकदिवसीय सामन्यांमधील फक्त पहिला सामनाच दम्बुला येथे खेळविण्यात येणार आहे.
दम्बुला येथील रनगिरी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पूर्वीच्या वेळापत्रकानुसार २८ आणि ३० जानेवारीला दौऱ्यातील पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. पण नवीन कार्यक्रमानुसार दम्बुला येथे फक्त २८ जानेवारीलाच एकदिवसीय सामना खेळविण्यात येईल, अशी माहिती श्रीलंकन क्रिकेट मंडळाने दिलेल्या पत्रकात देण्यात आली आहे. या पहिल्या सामन्यानंतर तीन दिवस-रात्र सामने कोलंबो येथील प्रेमदासा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळविण्यात येतील, तर पाचवा आणि अंतिम सामना सिंहली स्पोर्ट्स क्लबवर खेळविण्यात येणार आहे. त्याचबरोबर एक ट्वेंन्टी-२० सामना प्रेमदासा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे.
श्रीलंका दौऱ्याचा नवीन कार्यक्रम :
२६ जानेवारी - कोलंबोत आगमन. २८ जानेवारी - पहिला एकदिवसीय सामना (दम्बुला), ३० जानेवारी - दुसरी लढत (प्रेमदासा- दिवसरात्र), २ फेब्रुवारी - तिसरी लढत (प्रेमदासा- दिवसरात्र), ५ फेब्रुवारी - चौथी लढत (प्रेमदासा- दिवसरात्र), ८ फेब्रुवारी - पाचवी लढत (सिंहलिज), १० फेब्रुवारी -ट्वेन्टी-२० (प्रेमदासा- दिवसरात्र). ११ फेब्रुवारी - भारतात परत.

रणजी विजेत्या मुंबई संघाचा सत्कार शुक्रवारी
मुंबई, २१ जानेवारी / क्री. प्र.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने ३८ वे रणजी विजेतेपद पटकाविणाऱ्या मुंबई संघाचा शुक्रवारी (२३ जानेवारी) सायंकाळी साडेसहा वाजता बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एम. सी. ए. क्रिकेट अ‍ॅकेडमीवर जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. रणजी संघासह या वेळी कुच बिहार करंडक स्पर्धा जिंकणारा मुंबईचा १९ वर्षांखालील खेळाडूंचा संघ, रोहिंग्टन बारिया करंडक पटकावणारा मुंबई विद्यापीठाचा संघ आणि अखिल भारतीय स्पर्धेत विजेता ठरलेला मुंबई विद्यापीठाच्या महिला संघाचाही या वेळी सत्कार होणार आहे. एम. सी. ए. इनडोअर क्रिकेट अ‍ॅकेडमीच्या बॅन्क्वेट हॉलमध्ये हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी चषक कबड्डी स्पध्रेसाठी रोहा सज्ज
रोहा, २२ जानेवारी/क्री.प्र.

छत्रपती शिवाजी चषक कबड्डी स्पर्धा प्रथमच रोहा येथे २७ ते ३१ जानेवारी या कालावधीत घेतली जाणार असून, यजमान अवधूत तटकरे मित्र मंडळाची आयोजनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. यंदा स्पध्रेत दोन्ही गटात मिळून ४० संघांचा सहभाग असून, राठी हायस्कूल मैदानावर सहा क्रीडांगणे सज्ज केली जात आहे. दोन्ही गटांसाठी एकंदर सव्वाचार लाखांची बक्षिसे दिली जाणार आहेत.
या स्पध्रेचे वैशिष्टय़ म्हणजे दोन्ही गटांतील विजेत्यांना समान रकमेचे प्रत्येकी एक लाखाचे बक्षीस दिले जाईल. तसेच उपविजेत्यास ५१ हजारांचे तर तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावरील संघास अनुक्रमे २५ हजार आणि ११ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. याखेरीज प्रतिदिनी सर्वोत्तम खेळाडूस तसेच स्पध्रेत सर्वोत्तम ठरणाऱ्या खेळाडूंनाही रोख पोरितोषिके देण्यात येणार आहेत.