Leading International Marathi News Daily                                 शुक्रवार, २३ जानेवारी २००९

नाल्यात उभारली जातेय इमारत
दिलीप शिंदे

किसननगरमधील नाल्यावर उभारलेल्या साईराज इमारत दुर्घटनेत १५ जण ठार झाले असताना पुन्हा कॅसल मिलजवळील नाल्यातच एसआरडी योजनेंतर्गत इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. या नाल्यातील बांधकामास महापालिकेने परवानगी दिल्याचा दावा विकासकाने केला आहे. ठाण्यातील कोटय़ावधी रूपये खर्चाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांचे आराखडेच चुकीचे बनविण्यात आले, असा गौप्यस्फोट खुद्द आयुक्त नंदकुमार जंत्रे यांनी केला आहे. त्यावरून नाल्यामध्ये इमारत बांधण्याची परवानगी मिळविणे ही अशक्य बाब नसल्याचे स्पष्ट होते. कॅसेल मिलजवळील नाल्याची भिंत तोडून त्या ठिकाणी एसआरडी योजनेंतर्गत इमारत बांधणीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

अडथळ्यांच्या चक्रव्युहात रखडला सॅटिस
संजय बापट

दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या सुमारे पाच लाख ठाणेकरांसाठी अनन्यसाधारण महत्त्वाचा ठरलेल्या आणि शहर विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या ठाणे रेल्वे स्थानक परिसर एकात्मिक वाहतूक अर्थात सॅटिस प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण न झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यातच हे काम संथगतीने चालू असल्याने हा प्रकल्प रखडण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. अगोदरच विलंब झालेल्या या प्रकल्पाचे काम मेपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला आहे, मात्र कामाची गती पाहता दिवाळी उजाडेल, असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत

ठाणे जिल्ह्यात ६३ लाख मतदार
ऐरोली, मीरा-भाईंदर येथे विक्रमी वाढ
नालासोपारा सर्वात मोठा तर भिवंडी पश्चिम सर्वात छोटा मतदारसंघ
ठाणे/प्रतिनिधी : निवडणूक आयोगाच्या आदेशांनुसार जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमादरम्यान ठाणे जिल्ह्यात तीन लाख २६ हजार ९०४ नव्या मतदारांची नोंद झाली असून, ऐरोली, मीरा-भाईंदर आणि कोपरी-पाचपाखाडी या विधानसभा मतदारसंघांत विक्रमी मतदार वाढले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ६३ लाख ६३ हजार २१३ मतदारांची नोंद झाली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर १० ते २५ नोव्हेंबरदरम्यान जिल्ह्यात संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला, त्यात ही मतदारवाढ झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आबासाहेब जऱ्हाड यांनी दिली.

युवा पिढीने अपप्रवृत्तींपासून दूर राहावे - नवाब मलिक
भिवंडी/वार्ताहर

मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण उन्नतीच्या विकास योजनांचा लाभ त्यांना प्रत्यक्ष मिळवून देण्यासाठी तंझीम संघटनेबरोबर सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. युवा पिढीला बिघडविण्याचे काम समाजातील काही अपप्रवृत्ती करीत आहेत. त्यापासून सावध राहिले पाहिजे, असे उद्गार राज्याचे कामगारमंत्री नवाब मलिक यांनी येथील एका कार्यक्रमात काढले. जिल्हा ग्रामीण मुस्लिम उत्कर्ष संघटनेचे (तंझीम) रौप्यमहोत्सवी अधिवेशन फरहान होळ येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी संघटनेच्या स्मरणिकेचे प्रकाशन राज्य उत्पादन शुल्क तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

अनुभवाला सामोरी जाते तीच खरी कविता - नारायण सुर्वे
ठाणे/प्रतिनिधी

जीवनातील प्रत्येक अनुभवाला सामोरे जाऊन जी कविता लिहिली जाते, तीच काळावर ठसा उमटवू शकते, असे मत प्रख्यात कवी नारायण सुर्वे यांनी व्यक्त केले. जोशी-बेडेकर महाविद्यालयातील ‘स्वातंत्र्योत्तर भारतीय साहित्य’ या राष्ट्रीय चर्चासत्रातील कविसंमेलनात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आलोक भट्टाचार्य, प्रा. प्रशांत मोरे, प्रकाश होळकर, डॉ. मुकेश गौतम, महेश दुबे हे मराठी-हिंदीतील मान्यवर कवी उपस्थित होते.

ठाण्यात महाघोटाळ्यांच्या उच्च तांत्रिक विद्यापीठाची मागणी
ठाणे/प्रतिनिधी

विकास आराखडय़ात नसलेले अनेक प्रकल्प ठाणे महापालिकेने एकाच वेळी हाती घेतले असून, त्यांच्या चुकीच्या आराखडय़ामुळे कोटय़वधी रुपयांच्या वाढीव खर्चाचा भरूदड सोसावा लागत आहे, म्हणून ठाण्यात महाघोटाळ्यांचे उच्च तांत्रिक विद्यापीठाची स्थापना करण्याची उपरोधात्मक मागणी दक्ष नागरिक मंचाचे सरचिटणीस नितीन देशपांडे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

आनंद दिघे युवा प्रतिष्ठानतर्फे ‘आनंदयात्रा’ कार्यक्रम
ठाणे/प्रतिनिधी

स्व. आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार, २७ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता श्री समर्थ सेवक मंडळ पटांगण, श्री हनुमान व्यायामशाळा, गडकरी रंगायतनसमोर, डॉ. मूस रोड, ठाणे (प) येथे ‘आनंदयात्रा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, ज्येष्ठ नाटय़कर्मी व नाटय़निर्माते मोहन वाघ, ‘लोकसत्ता’चे उपनिवासी संपादक चंद्रशेखर कुलकर्णी, ठाणे महानगरपालिका आयुक्त नंदकुमार जंत्रे, ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना मंजिरी देव व रंगकर्मी राजन भिसे उपस्थित राहणार आहेत. प्रस्तुत कार्यक्रमात ‘लोककला महाराष्ट्राची’ हा वाद्यवंृद आयोजित करण्यात आला असून, विविध क्षेत्रांत उत्तम कामगिरी बजाविलेल्या व्यक्तींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते केला जाणार आहे. या कार्यक्रमास सर्व नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष केदार दिघे यांनी केले आहे.

डोंबिवलीत होणार जागतिक पाणथळ संमेलन
ठाणे/प्रतिनिधी

पर्यावरण दक्षता मंच आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पाणथळ भूमिदिनानिमित्त २ फेब्रुवारी रोजी डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिरात एकदिवसीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी खाडीवरील निरीक्षणे, संशोधनावर मते मांडणार आहेत. याकरिता स्लाईडस् व पोस्टर्सद्वारे सादरीकरण करण्याच्या स्पर्धा होणार आहेत. त्यासाठी मुंबई आयआयटीमधील पर्यावरण विभागप्रमुख डॉ. श्याम आसोलेकर व डॉ. हैद्राबादमधील डॉ. एम.एस.कोडारकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे. या संमेलनात पर्यावरणप्रेमी विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांनी खाडीविषयात अभ्यास अथवा संशोधन प्रदर्शित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९८९२०३१५२९, २५३८०६४८ येथे संपर्क साधावा.

डॉक्टर मारहाणप्रकरणी चौघांना अटक
बदलापूर/वार्ताहर : एका डॉक्टराला केलेल्या मारहाणीप्रकरणी चौघांना अटक करून त्यांची सुटका करण्यात आली, तर डॉक्टरांविरोधातही रहिवाशांनी केलेल्या तक्रारीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे शिवाजीनगर पोलिसांनी सांगितले. अंबरनाथच्या वडवली येथील श्रेयस गृहनिर्माण सोसायटीमधील रहिवाशांनी डॉ. अशोक जाजू यांचे वरुठा नर्सिग होम बंद करावे, या मागणीसाठी सोसायटीसमोर तीन महिन्यांपासून उपोषण केले होते. पालिका प्रशासनाच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले आहे. डॉ. जाजू यांनी याप्रकरणी उल्हासनगर न्यायालयात दावा दाखल केल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. डॉ. जाजू यांच्या रुग्णालयाचा फलक काढून ठेवण्यात आला. यानंतर रहिवाशांनी सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ येणाऱ्या-जाणाऱ्यासाठी नोंदवही ठेवली आणि आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना मज्जाव केला, अशी तक्रार डॉ. जाजू यांनी केली.या प्रकरणी डॉ. रेखा जाजू यांना मारहाण केल्याची तक्रार डॉ. जाजू यांनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सखी वसुंधरा प्रकल्पाचे उद्घाटन
ठाणे/प्रतिनिधी : वाडा येथे ग्रामीण भागातील महिलांसाठी परिवर्तन महिला संस्थेच्या पुढाकाराने ‘सखी वसुंधरा’ प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा आमदार संजय केळकर यांच्या हस्ते व आमदार विष्णू सवरा, ज्योती पाटकर यांच्या उपस्थितीत झाला. विविध महिला बचत गटांच्या माध्यमातून शेतीविषयक प्रशिक्षण, उत्पादन मालाला बाजारपेठ, स्वयंरोजगाराचे विविध उपक्रम ‘सखी वसुंधरा’ प्रकल्पाच्या माध्यमातून निर्माण करून महिलांना आर्थिक दृष्टीने सक्षम करण्याचा प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून केला जाणार असल्याचे प्रतिपादन पाटकर यांनी केले. ग्रामीण भागाचा विकास करावयाचा असेल तर महिला बचत गटांना सक्षम करणे ही काळाची गरज आहे, असे केळकर यांनी सांगितले. शासन महिला सक्षमीकरणाच्या नुसत्या गप्पा मारून महिलांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. आमदार विष्णू सवरा यांनी सर्व प्रकारचे सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.

आज सार्थक प्रतिष्ठानचे उद्घाटन
ठाणे/प्रतिनिधी

‘दुसऱ्यांसाठी जगणे हेच जीवनाचे सार्थक’ या हेतूने सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी करण्यासाठी ठाण्यात स्थापन झालेल्या सार्थक प्रतिष्ठानचे उद्घाटन शनिवारी संयुक्त राष्ट्रीय जनसंख्या कोशच्या राज्य प्रकल्प अधिकारी अनुजा गुलाटी यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी ‘मराठी बाणा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गडकरी रंगायतनमध्ये होणाऱ्या या सोहळ्यास खासदार आनंद परांजपे, आमदार एकनाथ शिंदे आणि महापौर स्मिता इंदुलकर या विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष समिधा मोहिते यांनी दिली आहे.

शांतीनगर शाळेचे सूर्यनमस्कार, लेझीम स्पर्धेत यश
डोंबिवली/प्रतिनिधी

गोग्रासवाडीतील शांतीनगर शिक्षण प्रसारक मंडळाने सूर्यनमस्कार व लेझीम स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला आहे. गणेश मंदिर संस्थान व क्रीडा भारती यांच्यातर्फे सूर्यनमस्कार व लेझीम स्पर्धा आयोजित केल्या होत्या. शांतीनगर प्राथमिक विभागाने सूर्यनमस्कार स्पर्धेत व माध्यमिक मातोश्री सरलाबाई म्हात्रे विद्यालयाने द्वितीय क्रमांक मिळवला आहे. गणेश मंदिराचे अध्यक्ष अच्युत कऱ्हाडकर यांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धा झाल्या. यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षिका कुळकर्णी, आगे, देसाई, साळवी, मांडवकर, अष्टेकर, खरोटे, क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले.

वैद्यकीय मदतीसाठी आवाहन
प्रतिनिधी : प्रसिद्ध निवेदिका स्मिता कराडे या गेली दोन वर्षे विविध आजारांनी ग्रस्त असून सध्या डायलिसीसचे उपचार घेत आहेत. त्याखेरीज त्यांना रेटिनोपॅथीचाही विकार आहे. यावरील वैद्यकीय उपचारांचा खर्च त्यांच्या आर्थिक आवाक्याबाहेरचा असल्याने त्यांच्यावतीने दानशूरांना आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. स्मिता कराडे यांना मदत करू इच्छिणाऱ्यांनी आपली मदत बँक ऑफ महाराष्ट्र, दहिसर शाखा खाते - स्मिता कराडे या नावाने पाठवावी. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक - ९२२३३६४४१६.