Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, २३ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

नसता खटाटोप कशाला?
प्रतिनिधी/नाशिक

 

नाशिक महानगरपालिकेने शहर वाहतूक बस सेवा ताब्यात घ्यावी की नाही यावरून सध्या वादंग सुरू आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा धुरळाही उडत आहे. पण, टोकाच्या भूमिका घेण्यापेक्षा काही पर्यायांचा विचार करून ते प्रत्यक्षात आणले तर सुवर्णमध्य निघू शकतो. संपूर्ण बस.सेवा ताब्यात घेण्याचा अट्टाहास करण्याऐवजी पालिकेने सध्याच्या बससेवेला पूरक ठरेल अशी सेवा शहराच्या विविध भागात सुरू करावी, त्यासाठी मिनी बसेस अथवा तत्सम लहान वाहनांचा उपयोग करावा, हा विचार गुरुवारी ‘वृत्तान्त’च्या माध्यमातून मांडण्यात आला होता. त्याचे विविध स्तरातून स्वागत होत असून या चर्चेच्या निमित्ताने अन्य काही सूचना :
महापालिकेने शहर बस सेवेचे संचालन करण्याच्या मुद्दयावर स्थायी समितीचे सभापती संजय चव्हाण यांनी मांडलेली भूमिका..
प्रश्न : महापालिकेतील अर्थकारणाच्या चाव्या हाती असलेल्या स्थायी समितीचे प्रमुख म्हणून शहर बससेवेबाबत आपल्याला काय वाटते?
चव्हाण : माझ्यापेक्षा बहुसंख्य नाशिककरांना काय वाटते, ते अधिक महत्त्वाचे आहे. शहरातील सर्वसामान्यांचेही याविषयी प्रतिकूल मत आहे. सध्या एस.टी. महामंडळ पुरवत असलेली सेवा चांगल्या दर्जाची आहे. त्याबाबत फारशा तक्रारी नाहीत. असे असताना पालिकेने आपली प्राधान्याची कर्तव्ये सोडून या ऐच्छिक व खर्चिक कामाच्या मागे लागू नये, अशी माझी भूमिका आहे.
प्रश्न : यातील खर्चासाठी अनुदान उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जाते..
चव्हाण : अनुदान काही अंशीच मिळणार आहे. पण त्यामुळे जो खर्च आता करायची गरज नाही, तो पालिकेला करावा लागणार आहे. एकदा का हा पर्याय स्वीकारला की बस खरेदीपासून त्याची देखभाल, संचालन, कर्मचारी वृंद, इतर अनुषंगिक खर्च अशा अनेक बाबींचा भार उचलावा लागेल. परिणामी, किमान ५०० ते ७०० लोकांच्या आस्थापना खर्चाचा बोजा पालिकेवर पडेल. सध्या विविध कारणांमुळे पालिकेच्या उत्पन्नात अपेक्षित भर पडत असल्याचे दिसत नाही.
प्रश्न : म्हणजे, थोडक्यात बससेवा पालिकेने चालवू नये..
चव्हाण : प्राप्त परिस्थितीत तरी तसेच म्हणावे लागेल. इंदूरची गोष्ट वेगळी आहे. तेथे अगोदरपासून सार्वजनिक यंत्रणेची बससेवाच नव्हती. त्यामुळे त्या शहरासाठी, तिथल्या पालिकेसाठी ती गरजेची होती. नाशिकमध्ये मात्र परिस्थिती तशी नाही. एस.टी. सेवेचा पर्याय येथे उपलब्ध आहे. ही सेवा बरीच सक्षम आहे. असे असताना पालिकेने ती स्वत:च्या ताब्यात घेण्याचा अट्टाहास का करावा ?
प्रश्न : सध्याच्या शहर वाहतूक सेवेबद्दल लोकांच्या तक्रारी नाहीत का ?
चव्हाण : ही सेवा पूर्णपणे निर्दोष आहे, असे नाही. पण, त्यात सुधारणा करून, या सेवेला पालिकेतर्फे काही सुविधा उपलब्ध करून देऊन काम चालण्यासारखे आहे. आज प्रवासी वाहतूक क्षेत्रात परिवहन महामंडळाचे काम देशपातळीवर उल्लेखनीय आहे. त्यांच्याकडे या सेवेसाठी लागणारे खास प्रशिक्षित मनुष्यबळ आहे, तांत्रिक कार्यशाळा आहेत.. शिवाय या सगळ्या पायाभूत सुविधांबरोबर या क्षेत्रातील व्यवस्थापनाचा अनुभव आहे. पालिकेला मात्र या सगळ्याची उभारणी पहिल्यापासून करावी लागणार आहे. त्यासाठी मोठा खर्च होणार आहे. त्याची तशी आता काही निकड नाही. त्यामुळे हा सौदा व्यवहार्य ठरणार नाही. त्याऐवजी रस्ते, पाणीपुरवठा, अशा सुविधा शहरवासियांना कार्यक्षमतेने पुरवण्याची काळजी घ्यायला हवी. बससेवा चालवून हे सगळे सुरळीत होणार नाही. त्यामुळेच आमच्या पक्षानेही या विषयाच्या विरोधात भूमिका घेतली आहे.
मी पक्षाच्या भूमिकेशी बांधील तर आहेच, पण सर्वसामान्य नाशिककरांचा कल देखील ही सेवा पालिकेने चालवू नये असाच आहे. त्यामुळे कुणीही सूज्ञ माणूस ही सेवा आताच सुरू करा असे म्हणणार नाही. मग हा नसता खटाटोप कशाला ?