Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, २३ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

इंदूरशी तुलना करताना हेही पाहावे
नाशिकमध्ये पालिकेने बस सेवा सुरू करण्याबाबत अनेक मंडळी इंदूरचे उदाहरण देतात. पण, तेथील

 

परिस्थिती व येथील परिस्थिती यातील तफावत लक्षात घ्यायला हव्यात. इंदूरमध्ये यापूर्वी सार्वजनिक बस सेवा अस्तित्वातच नव्हती. तेथे फक्त खासगी स्वरूपाच्या सेवा होत्या. आज तेथे पालिकेद्वारे चांगल्या दर्जाची लक्झरी बस सेवा पुरविली जाते. पण, त्यासाठी पालिका जो आर्थिक भार उचलते त्याचे काय ? तेथे प्रवासी नसले तरी प्रति किलोमीटर तत्वावर पालिका कंत्राटदारांना पैसे देते. त्याचाही विचार होणे गरजेचे आहे.
नाशिकमध्ये सध्या असणाऱ्या एस.टी.च्या बस सेवेला पूरक म्हणून महापालिकेने शहराच्या वेगवेगळ्या भागात आपली मिनीबस सेवा सुरू केल्यास सर्वसामान्यांची तर मोठी सोय होईलच, शिवाय त्यांना रिक्षांवरही फारसे अवलंबून राहावे लागणार नाही.
बेरोजगारीमुळे रिक्षांची संख्या वाढली आहे, भाडे परवडावे म्हणून अनेकदा रिक्षात क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक प्रवासी कोंबले जातात. अनेकदा इच्छा नसताना रिक्षाचालक आणि प्रवाशांनाही ही पद्धत अंगीकारावी लागते. यात सगळा दोष रिक्षाचालकांचा आहे असेही नाही. त्यामुळे त्यांना बेरोजगार करून चालणार नाही. मग पालिकेने या मिनीबसचे परवाने अशा बेरोजगारांना द्यावेत. एस.टी.ची बस सेवा, त्याला मिळालेली पालिकेच्या सेवेची जोड व सध्या असलेल्या रिक्षा असे अनेकविध पर्याय नाशिककरांना उपलब्ध होऊ शकतील.
मुंबई पालिकेची बस सेवा कित्येक दशकांपासून सुरू आहे. त्या अगोदर तेथे ट्राम सेवा होती. पहिल्यापासूनच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे जाळे चांगले असल्याने ‘बेस्ट’ला चांगला जम बसविता आला. आज मुंबईकर या सेवेवर बऱ्याच अंशी समाधानी आहेत. त्या धर्तीवर नाशिकमधील पालिकेच्या या संभाव्य सेवेची आखणी करता येईल.
पुणे-ठाणे येथेही बस सेवा पालिकेद्वारे चालविली जाते. पण, त्यांच्या सेवा व्यवस्थापनात त्रुटी असल्याने त्या अपेक्षेप्रमाणे सक्षम होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे तेथेही अवैध प्रवासी वाहतुकीने धुडगूस घातला आहे. त्याचा परिणाम तेथील वाहतूक व्यवस्था, प्रदूषण यावरही झाला आहे. नाशिकमध्ये हे टाळायचे असेल तर तेथील सेवांमधील त्रुटी अगोदरपासून दूर करायला हव्यात.
वाहनांची संख्या आज वाढली असली तरी त्याचा लाभ मुख्यत: हाती पैसा खुळखुळणाऱ्यांना वा नवश्रीमंतांना होताना दिसतो. सामान्य माणूस आजही बस सेवेवर विसंबून आहे. त्याचा विचार करून या सेवेची अंमलबजावणी व्हायला हवी. पठडीबद्धपणे अथवा मागील पानावरून पुढे या तत्वावर पालिकेने ही सेवा पुरवण्याचा अट्टाहास
करू नये .
अजित पतकी
ajitpatki@gmail.com