Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, २३ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

नाशिक-मुंबई रेल्वे सेवेबाबत रविवारी खुली चर्चा; रेल परिषदेचा उपक्रम
प्रतिनिधी / नाशिक

 

दररोज रेल्वेव्दारे नाशिक-मुंबई दरम्यान ‘अप-डाऊन’ करणाऱ्या शेकडो प्रवाशांसह एरवीही या रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांसंदर्भात रेल परिषदेच्या वतीने येत्या रविवारी मुक्त चर्चा आयोजित करण्यात आली आहे. गंगापूररोडवरच्या कुसुमाग्रज स्मारकातील सभागृहात सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार असून त्यामध्ये नाशिककरांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिक आणि मुंबई या दोन्ही शहरांतील ‘कनेक्टिव्हीटी’ मध्ये रेल्वेचा मोठा वाटा आहे. तसेच सद्यस्थितीत रेल्वेचाच पर्याय इतर कोणत्याही प्रवासाहून किफायतशिर आणि वेळेची बचत करणाराही आहे. परिणामी बहुसंख्य प्रवासी रेल्वे सेवेवरच अवलंबून असतात. असे असले तरी विशेषत: नाशिककर प्रवाशांच्या या संदर्भातल्या मागण्या वर्षांनुवर्षांपासून प्रलंबित आहेत. त्या मार्गी लागाव्यात तसेच बदलत्या परिस्थितीत निर्माण झालेल्या वा येत्या काळात निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य गरजा लक्षात घेऊन त्यानुसार या रेल्वे प्रवासासाठी भविष्यकालीन आराखडा तयार करावा या हेतूने प्रस्तुत उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीनभाई गांधी यांनी दिली.
सर्वाना सोयीचे व्हावे यासाठी मुद्दाम रविवारी ही चर्चा ठेवण्यात आली आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री व जिल्ह्य़ाचे पालकमंत्री छगन भुजबळ, आरोग्य राज्यमंत्री शोभा बच्छाव, खा. देवीदास पिंगळे, खा. हरिश्चंद्र चव्हाण, ओबीसी विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. कैलास कमोद यांना विशेषत्वाने निमंत्रित करण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून हे प्रश्न मार्गी लागावेत, अशी अपेक्षा आहे. प्रवासात भेडसावणाऱ्या समस्या, अधिकाधिक सुविधा मिळण्यासाठी करता येण्याजोग्या उपाययोजना आदी बाबींवर प्रामुख्याने चर्चा होणार असून हे व्यासपीठ सर्वासाठी खुले ठेवण्यात आले आहे. सध्याच्या रेल्वे सेवेत सुधारणा व्हाव्यात हाही हेतू त्यामागे आहे. प्रवासात आपल्याला येणाऱ्या अडचणी, समस्या मांडण्याबरोबरच या संदर्भात काही नव्या संकल्पना, उपयुक्त सूचना असतील तर त्या संबंधितांनी येथे येऊन जरूर मांडाव्यात असे कळविण्यात आले आहे.
रेल्वे प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना देखील कार्यक्रमासाठी पाचारण करण्यात आले आहे. या प्रसंगी मांडण्यात येणाऱ्या समस्या, सूचना, उपाययोजना रेल परिषदेमार्फत रेल्वे प्रशासनाला निवेदनाव्दारे कळविण्यात येतील तसेच त्याचा पाठपुरावाही सातत्याने केला जाणार आहे. त्यामुळे कार्यक्रमास मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पंचवटी एक्स्प्रेसमधील रेल परिषदेच्या आदर्श बोगीतील ‘सिव्हिक डायरेक्टर’ प्रिया तुळजापूरकर, परिषदेचे सरचिटणीस देवीदास पंडित, जयेश संघवी, अ‍ॅड. जयदीप पवार, अशुतोष राठोड, गुरूमितसिंग रावल, मंगेश गुप्ता, गोविंद भट्टड आदींनी केले आहे.