Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, २३ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

बंकट वाचनालयाचे ज्ञानकुंड

 

चाळीसगाव येथील शेठ नारायण बंकट वाचनालयातर्फे आयोजित सरस्वती व्याख्यानमालेने यंदा ७२ वर्षे पूर्ण केली. १९३४ मध्ये सुरू झालेल्या या व्याख्यानमालेचे खरे तर हे ७४ वे वर्ष राहिले असते. परंतु १९७५-७७ मधील आणीबाणीमुळे दोन वर्षांचा खंड पडला. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील दिग्गजांनी या व्याख्यानमालेतून प्रबोधनाच्या सार्वजनिक कार्यातून आपली सेवा दिलेली आहे. या व्याख्यानमालेच्या यंदाच्या सत्रातील व्याख्यानांचा थोडक्यात आढावा.
चाळीसगावच्या सरस्वती व्याख्यानमालेत यंदा विविध विषयांवरील व्याख्याने झाली. ‘पालकत्व’ विषयावर औरंगाबादचे रामेश्वर दुसाने यांनी पहिले पुष्प गुंफले. मुलांना जन्म देणे, वाढविणे, याबरोबरच मुलांना घडविणे हे अधिक महत्वाचे असते. कर्तव्यदक्ष आई-वडिलांची मुले कर्तबगार निघाल्याचे आपल्या लक्षात येईल, असे त्यांनी सांगितले. आहार, निद्रा, भय, मैथून या चार गोष्टी सर्वच प्राण्यांसाठी असतात. परंतु बुद्धी हे मानवाचे वैशिष्टय़े होय. या बुद्धीच्या जोरावरच समुद्रतळ, जमीन व अवकाश अशी अस्मानी प्रगती मानवाने केली आहे व करीत आहे. या बुद्धीचा विकास गर्भाशयापासून सुरू होतो. तो वयाच्या सहाव्या वर्षांपर्यंत वृद्धींगत होत असतो. या बुद्धीचा पाल्यातील विकास घडवून आणणे हेच खरे पालकत्व होय. निरीक्षण व अनुकरण यातूनच मुले मुख्यत्वे शिकत असतात. बुद्धीला विवेकाची जोड असावी. यासाठी सुसंस्कार आवश्यक असतात. त्यामुळे मुलांना वाढविण्याइतकेच नव्हे तर घडविणे अधिक महत्वाचे व मोलाचे असते, असे ते म्हणाले.
दुसरे पुष्प औरंगाबादचे प्रकाश कुलकर्णी यांनी ‘घर आणि घरटे’ या विषयावर गुंफले. इंजिनिअरिंगचा अभ्यास आणि अनुभव यांची सांगड असणाऱ्या कुलकर्णी यांनी आपली गरज ही महत्वाची मानली पाहिजे असे सांगितले. घर म्हणजे केवळ आर्थिक गुंतवणूक नव्हे तर कुटुंबियांच्या समन्वयाची, मनाची गुंतवणूक होय. तसे पाहिले तर पक्षी घरटे बांधतांना, तयार करताना स्थळ आणि काळाचा, निसर्ग आणि साधनांचा अधिक विचार करतात. तसाच विचार माणसाने केला पाहिजे. सुखद निवास आणि आवश्यक सुरक्षितता या दोन गोष्टी महत्वाच्या असतात, असा विचार त्यांनी मांडला. औरंगाबादच्या रवींद्र खरात यांनी तिसरे पुष्प गुंफले. वनस्पती पर्यावरणाचे प्रथम संरक्षक असतात. त्याबरोबर अनेक वनस्पती अनेक प्रकारे उपयुक्त असतात. नानाप्रकारची औषधे या वनस्पतीतून तयार होतात. हे सचित्र व्याख्यानमालेतून त्यांनी दाखविले. वनस्पतीचा लता-वेलींचा औषधी खजानाच प्रेक्षकांसमोर खुला करून दाखविला.
पुण्याचे विश्वास देशमुख यांनी चवथे पुष्प गुंफताना एखादी गोष्ट विश्वासपूर्वक करायची ठरविले तर ती करता येते. ज्या गोष्टींचा बाऊ केला जातो, त्या गोष्टीदेखील बुद्धी आणि विचारपूर्वक, कृती यातून साध्य करता येतात, असे सांगितले. प्रचंड लोकसंख्या, उपलब्ध नैसर्गिक साधन-सामग्री यांचा कौशल्याने व नियोजनयुक्त वापर केला तर भारत नक्कीच महासत्ता बनू शकतो, असा विश्वास त्यांनी श्रोत्यांना दिला. उद्योग हेच तरुणांपुढे मुख्य आव्हान आहे, असे समारोपात त्यांनी सांगितले.
बँक व्यवस्थापक, साहित्यिक, कलाकार, परीक्षक असे बहुरूपी व्यक्तीमत्व असलेल्या रामदास कामत यांनी ‘जनजागृती आणि प्रसार माध्यमांची भूमिका’ यावर प्रकाश टाकताना सर्वच प्रसार माध्यमांनी जीवन, नीतीमूल्ये जोपासली पाहिजेत असे सांगितले. जनजागृती, जनप्रबोधन व लोकशिक्षण हेच प्रसार माध्यमांचे आद्य कर्तव्य असते. देशभक्ती, प्रेम सहिष्णूता आणि उद्योगशीलता यांना प्रेरणा देणारे प्रसारण हवे. भोगवादी, स्वैराचारी, व्याभिचारी वृत्तींना प्रेरणा देणारे प्रसारण प्रसार माध्यमांचे नसावे. विकृत आणि विपर्यस्त दृश्यांमुळे नवीन पिढी धोक्यात येते. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर प्रसार माध्यमांच्या भूमिकांवर बोलताना ध्येयवादाकडून, तत्वनिष्ठेकडून प्रसार माध्यमे, भांडवलदार व राजकारणी यांची बटिक झालेली आहे. हा प्रवास, ही घसरण थांबली पाहिजे, असे ते म्हणाले.
भडगावचे प्रा. सुनील पाटील यांनी ‘मोगरा फुलला’ या विषयावर बोलताना जमिनीत गाडले जाणारे बी परिस्थितीचा, पर्यावरणाचा सामना करीत संकटांचा आघात सोसतच जीवनाचा प्रवास करीत असते आणि त्यातून पुढे फळा-फुलांनी बहरलेला वृक्ष उभा राहतो, असे सांगितले. प्रतिकूल आव्हान पेलत पुढे जातात तेच समर्थ होतात. सोन्याला कसे अग्नीतून जावे लागते. ज्ञानियांचा राजा ज्ञानेश्वर हे काळाच्या आणि परिस्थितीच्या अग्निदिव्यातून सुवर्णमयी तेजाने झळकले. सहिष्णुता, सोशिकता प्रेम यातून साकारणारे मातृसम म्हणजे सर्वाची माऊली ज्ञानेश्वर महाराज होते. गीता हा तर सर्व धर्माचा सार आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणजे मानवातील प्रतिपरमेश्वर होय, असा विचार त्यांनी मांडला. नाशिकच्या प्रा. डॉ. सुरेश मेणे यांनी ‘पसायदान’ विषयी विचार मांडतांना ज्ञानियांच्या राजाने सर्वाच्या माऊलीने सर्व प्राणीमात्रांसाठी भगवंताकडे मागितलेला विशेष कृपा प्रसाद म्हणजे पसायदान होय, असे सांगितले. ज्येष्ठ बंधू तथा स्वगुरू निवृत्तीनाथांच्या आज्ञेप्रमाणे ज्ञानेश्वरीचे उद्बोधन पुर्णत्वाला गेल्यानंतर भगवंताकडे सर्व प्राणिमात्रांसाठी, विश्वासाठी भगवंताकडे मागितलेला अमृतमयी प्रसार म्हणजे पसायदान होय. पसायदानाची सर अन्य कोणत्याही प्रसादाला नाही. अनेक भाषांतून विश्वव्यापी भाषांतर व्हावे एवढी खोली, एवढी प्रचंड उंची पसायदानात आहे, असा गौरव त्यांनी केला.
जळगावचे प्रा. पी. डी. जगताप यांनी आठव्या पुष्पात अजिंठा लेण्यांची माहिती दिली. अचूक स्थापत्यशास्त्र, अत्युत्तम शिल्प कलाकृती व अजोड चित्रकलेचा नमुना की ज्याची जागतिक ठेव्यात नोंद घेतली गेली आहे, अशा या लेण्या असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय पुरातत्वाचे ते अद्वितीय लेणेच होय, असे ते म्हणाले. नांदेडच्या श्रीनिवास औंधकर यांनी नवव्या पुष्पात अवकाशाचा अगाध अभ्यासाचा ओनामा मांडला. आकाशातील ग्रह, तारे-तारकांचे स्लाईड शो च्या माध्यमातून जमिनीवर सादरीकरण म्हणजे हे व्याख्यान होते. राहुरीचे डॉ. शिवरत्न शेटे यांनी दहाव्या पुष्पात शिवचरित्र आणि आजचा दहशतवाद यांची घातलेली सांगड श्रोत्यांना भावली. दगा, फटका, धोका, याबाबत अखंड सावधानता आणि ऐनवेळची समयसूचकता यात छत्रपतींच्या यशाचे गमक होते तर आजचा दहशतवाद हा राज्यकर्त्यांच्या भेकड आणि बेसावधपणामुळे वाढत गेला आहे. पाकिस्तानसारख्या लबाड आणि बेरक्या राष्ट्राशी जशास तसे न वागल्याने प्रत्यक्ष समोरासमोरच्या लढाईत मार खाल्लेले हे राष्ट्र छुप्या युद्धाव्दारे दहशतवाद आणि घुसखोरीव्दारे भारताला सतावत आहे. जग शिवरायांची राजनीती आणि युद्धनीती जाणून घेत आहे, अभ्यासत आहे, पण आमच्या आजच्या नेत्यांना ते शहाणपण आणि धारिष्टय़ समजत नाही. त्यांना फक्त सत्ता आणि संपत्ती एवढेच समजते.
विषय प्रस्तुत करताना शेटे यांनी श्रोत्यांनाही देशाप्रती आपले काहीच योगदान नसल्याची जाणीव करून दिली. प्रत्यक्ष हत्यार घेऊन लढले पाहिजे असे नव्हे तर न चुकता सर्वानी मतदान करून योग्य प्रतिनिधी निवडून दिले पाहिजे. आपापल्या स्तरावर सावध राहून संशय आणि संशयित याबाबत पोलीस यंत्रणेला मदत केली पाहिजे. देशभक्त आणि शहिदांच्या बलिदानाची जाणीव ठेवून त्यांच्याबाबत, कुटुंबियांबाबत आदर आणि प्रत्यक्ष सक्रिय सहकार्य केले पाहिजे. देशासाठी लढणाऱ्यांची जबाबदारी जेव्हा समाज घेतो तेव्हाच राष्ट्र शाबूत राहते, दैदिप्यमान होते. शेवटी सर्व श्रोत्यांना कर्तव्याची जाणीव करून देणारी शपथ त्यांनी घ्यायला लावली.
वसंत चंद्रात्रे,
अध्यक्ष शेठ ना. बं. वाचनालय, चाळीसगाव.