Leading International Marathi News Daily                                 शुक्रवार, २३ जानेवारी २००९
व्यक्तिवेध

१९७१ ते ८० च्या दशकात मराठी साहित्यात नव्यानं लिहिते झालेल्यांमध्ये बुलढाणा जिल्ह्य़ातल्या हिवरखेड या गावात नेमकं सांगायचं तर, ५४ वर्षे आणि ३६३ दिवसांपूर्वी जन्मलेल्या भगवान ठगचा समावेश होता. त्यांचा वाढदिवस उद्या, २४ जानेवीराला धूमधडाक्यात साजरा करायचा, असं नियोजन मित्रांनी केलेलं होतं. परंतु ते दुर्दैवाने प्रत्यक्षात आलंच नाही. त्या भगवान ठगनी ‘मूल्यापेक्षा निर्मिती महत्त्वाची,’ हेच सूत्र ३०-३२ वर्षे जपलं. कवी, अनुवादक, ‘तुका म्हणे’ या पुरस्कारांचा निर्माता, ‘तुका म्हणे’ प्रकाशन संस्थेचा सर्वेसर्वा असणाऱ्या भगवान ठगचं एकूणच आयुष्य आजच्या तरुणांच्या भाषेत सांगायचं तर ‘हटके’ होतं. प्रस्थापित साहित्यिक, साहित्य

 

संस्था आणि प्रकाशकांनी त्याला टाळण्याचा प्रयत्न केला तेव्हा जराही नाउमेद न होता त्यानं कविता निर्मिती थांबवली नाही. काव्यनिर्मिती तर केलीच पण, स्वत:च प्रकाशन संस्था धाडसानं सुरू करून आणि त्यापेक्षा दुप्पट धाडसानं यशस्वीरीत्या चालवून दाखवली. प्रकाशन संस्था केवळ स्वत:पुरती मर्यादित राहू न देता नवोदितांचं व्यासपीठ म्हणून त्यानं ‘तुका म्हणे’ प्रकाशन संस्थेला लौकिक आणि बळ प्राप्त करून दिलं. ज्याचं कवितेवर निस्सीम प्रेम असेल त्याच्यासाठी भगवान ठगच्या ‘तुका म्हणे’ प्रकाशनचे दरवाजे दिवसाचे २४ तास खुले होते. म्हणूनच नवोदित कवी त्याला ‘मसीहा’ मानू लागले होते. नवोदित कवींविषयी ऋजू असणारा भगवान ठग साहित्यातल्या ठेकेदारांविरुद्ध खमकेपणानं उभा राहणारा होता आणि अशा ठेकेदारांविरुद्ध लढताना त्याला हत्तीचं बळ प्राप्त होत असे. ‘वक्तृत्व म्हणजे साहित्य नव्हे’ अशी आव्हानात्मक भूमिका घेऊन विदर्भाच्या साहित्य क्षेत्रातल्या भल्या-भल्यांच्या तोंडाला फेस आणणारा किरकोळ शरीरयष्टीचा भगवान ठग सर्वाच्या जसा परिचयाचा आहे तसाच इतकी काव्यनिर्मिती केल्यावर एकही पुरस्कार का मिळाला नाही? या प्रश्नाला ‘ज्ञानेश्वराला कुठे पुरस्कार मिळाला होता?’ असा प्रतिप्रश्न लगेच उपस्थित करणारा अस्सल वऱ्हाडी इरसालपणा दाखवणारा भगवान ठगही अनेकांच्या परिचयाचा होता. पुरस्कार वाटपातलं राजकारण पाहून-अनुभवूनच त्यानं ‘तुका म्हणे’ पुरस्कार सुरू केले आणि दात्याची भूमिका नम्रपणे स्वीकारत या पुरस्कारांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. मात्र, भगवान ठगचा खरा जीव कवितेवर होता. कवितेवरच्या त्यांच्या प्रेमाचा प्रवाह खळाळता होता, निर्मळ होता आणि महत्त्वाचं म्हणजे टीकाकारांनी कितीही हेटाळणी करो, नवोदितांसाठी प्रेरणादायी होता. भगवान ठगने १०० पेक्षा जास्त कवींचे काव्यसंग्रह प्रकाशित केले, या संग्रहांना प्रस्तावना लिहिल्या, हे संग्रह पदरमोड करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. नोकरीतून इमाने इतबारे (आडनाव ठग असले तरी भगवानच्या रक्तात कणभरही ठगगिरी नव्हती.) मिळालेला पैसा त्यानं कवितेवर असा उधळला त्यामुळेच तो अनेकांच्या प्रशंसेला पात्र ठरला. प्रारंभीच्या काळातली हौशी असणारी त्याची कविता अलीकडच्या काळात बरीच समंजस, परिपक्व आणि प्रौढ होत असल्याचे जाणवत होते. मृत्यूविषयक त्याचे प्रकटीकरण मनाच्या गाभाऱ्याला हात घालणारे होते. कोणाच्याही-कोणत्याही कवितांचे अनुवाद करतो, ही टीका सहन करून रशियन, जर्मन भाषेतील ५० वर कवी त्यानं मराठीत आणले आणि आधुनिक मराठी कविता, दलित कविता इंग्रजीत अनुवादित केल्या. ‘मॉडर्न मराठी पोएट्री’ या प्रकल्पाचे सात खंड त्यानं प्रकाशित केले आणि मराठी कविता वैश्विक करण्याचा प्रयत्न केला. मराठी सारस्वतानं हेटाळणी केली तरी ‘इंटरनॅशनल हुज हू’ ने ‘पोएट्री अ‍ॅन्ड पोएट एन्साक्लोपिडिया’त केवळ एकाच वैदर्भीय कवीची नोंद घेताना भगवानच्या कवितेवरील प्रेमालाच मुजरा केला आहे. एकाचवेळी आत्मकेंद्रित आणि दिलखुलास, अशी परस्परविरोधी वृत्ती असणाऱ्या भगवान ठगचा आकस्मिक मृत्यू म्हणूनच चटका लावणारा आहे.