Leading International Marathi News Daily                                 शुक्रवार, २३ जानेवारी २००९
विशेष लेख

गाझापट्टी अजून रक्ताळलेलीच!

इस्रायलची विमाने गाझापट्टय़ात आग ओकू लागली तेव्हा गाझाची भूमी रक्ताने न्हाऊन निघाली. हजारो पॅलेस्टिनी नागरिकांची आज अक्षरश: दैना उडाली आहे. पाच-सहाशे बळी आणि कोटय़वधीच्या साधनसंपत्तीची राखरांगोळी, हा आतापर्यंतचा हिशेब आहे. जगले-वाचलेले बॉम्बहल्ल्यातून जीव वाचविण्यासाठी सीमेलगतच्या शेजारी राष्ट्रांकडे पळ काढीत आहेत. अशा परिस्थितीत इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी फोडलेली डरकाळी अधिकच भयावह

 

आहे. ‘हमास ही दहशतवादी मुस्लिम संघटना असून तिच्या प्रमुख २० ठाण्यांचा नायनाट केल्याशिवाय आमची लष्करी कारवाई थांबविली जाणार नाही.’ या शब्दांत त्यांनी आपला हेतू स्पष्ट केला होता. त्याला हमासनेदेखील सडेतोड उत्तर दिले होते- ‘आमच्या मातृभूमीचे लचके तोडणाऱ्या इस्रायलला धडा शिकवून स्वदेश आणि देशवासीयांच्या हिताचे रक्षण करण्यास हमास कटिबद्ध आहे!’ ..
वायुदलाच्या जोडीने गाझावासीयांना नेस्तनाबूत करण्यासाठी इस्रायलचे सैन्य पुढे सरसावले आणि हमासचे चारपाच बिनीचे शिलेदार ठार झाले, तरी त्या हल्ल्यांना ‘हमास’ने चिवटपणे प्रत्युत्तर दिले. इथे कोण किती बलवान हे महत्त्वाचे नसून कोणाचा पक्ष न्याय्य आहे हे पाहणे गरजेचे आहे.
मानवी संस्कृतीइतकीच परकीय आक्रमणाविरुद्धच्या लढाईची कहाणी प्राचीन आहे. ‘आपल्या मायभूमीचे संरक्षण तसेच तिच्या मुक्तीसाठीचा लढा’ हा मनुष्याचा एक अत्यंत मौल्यवान व मूलभूत अधिकारच आहे. तरीही इस्रायलने गिळंकृत केलेली पॅलेस्टिनी भूमी मुक्त करण्यासाठी चाललेल्या संघर्षांस इस्लामी दहशतवादाचा रंग फासण्याची अहमहमिकाच जगात लागली आहे.
इ. स. २००६मध्ये पॅलेस्टाइनमध्ये झालेल्या निवडणुकांत पश्चिम किनारपट्टीवर ‘अल फतेह’ची सरशी झाली तरी गाझापट्टीत ‘हमास’ प्रचंड मताधिक्याने निवडून आली. ‘हमास’ला लोकशाही प्रक्रियेविषयी आस्था आहे. आपली संघटना हा एक संसदीय पक्ष असल्याचे तिने दाखवून दिले आहे. तरीदेखील लेबनॉनमधील हिजबुल्ला व नेपाळमधील माओवादी पक्षास अमेरिका ‘दहशतवादी’ ठरविते तसेच इस्रायल ‘हमास’ची दहशतवादी संघटना म्हणून संभावना करत आली. इस्रायलच्या प्रचाराची आजपर्यंत अमेरिकादेखील री ओढत आली. अपप्रचारातून पॅलेस्टिनींच्या स्वातंत्र्यसंग्रामाची धार जगाच्या नजरेत बोथट करायची व गिळंकृत केलेल्या त्यांच्या भूभागावरील आपल्या वर्चस्वाची वैधता सिद्ध करायची हाच इस्रायलचा डाव आहे. एकीकडे बुश यांच्या नेतृत्वाखालील अमेरिका, पाकिस्तानबाबत भारताला ज्या ‘दहशतवादा’च्या मुद्दय़ावरून सबुरीने घ्यायला सांगत होती त्याच दहशतवादाचे चलनी नाणे खेळवीत तिने इस्रायलला मोकळे रान दिले होते.
१९४७ पूर्वी जगाच्या नकाशावर नसलेले इस्रायल आज पश्चिम आशियातील एक बलदंड राष्ट्र बनले असून पॅलेस्टाइनमधील जनतेला मात्र परांगदा व्हावे लागत आहे ही घटना जितकी विचित्र तितकीच बोलकी आहे. जगभर विखुरलेल्या यहुदींना ‘स्वतंत्र राष्ट्र’ असावे, तिथे त्यांना सन्मानपूर्वक वसता यावे; यासाठी संयुक्त राष्ट्रप्रणीत ‘विभाग योजना १९४७’ नुसार त्यांचेच तीर्थक्षेत्र असलेल्या जेरुसलेमजवळ ‘इस्रायल’च्या निर्मितीवर शिक्कामोर्तब झाले. जेरुसलेम हे ‘ज्यूं’प्रमाणेच मुस्लिम व ख्रिश्चन धर्मीयांचेदेखील तीर्थस्थान असल्यामुळे त्यास आंतरराष्ट्रीय प्रशासनाच्या अधीन ठेवण्यात आले होते. इस्रायलला त्याच्या निर्मितीपासून सर्वार्थाने खतपाणी घालण्यात इंग्लंड-अमेरिकेने यत्किंचितही कसर ठेवली नाही. कारण पश्चिम आशियातील खनिज तेल आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवरील आपली पकड घट्ट करण्याच्या दृष्टीने इस्रायलसारखे दुसरे विश्वसनीय राष्ट्र नाही, हे एक आणि जगभरातल्या रणनीतीत आपले वर्चस्व अबाधित ठेवता यावे हे दुसरे कारण. इस्रायलच्या विस्तारवादी कारवायांना इंग्लंड-अमेरिकेचा सातत्याने पाठिंबा लाभण्यामागील हे खुले गुपित आहे. अस्तित्वात आल्यानंतर लगेचच वर्षभरात १९४८ साली इस्रायलने संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावातील अन्य तरतुदींना हरताळ फाशीत जेरुसलेमवर आक्रमण करून तेथील ८४% भूभाग बळकाविल्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही. लेबनॉन, जॉर्डन, सीरिया, अरबस्तान आदी आखाती राष्ट्रांवर हल्ले करून त्यांच्या फार मोठय़ा भूभागावर आक्रमण केले. १९६७ मध्ये पुन्हा एकदा जेरुसलेम, सीरिया, गोलन टेकडय़ा, इजिप्तवर अतिक्रमण करून आपला ‘सीमाविस्तार- कार्यक्रम’ चालू ठेवला. पॅलेस्टाइनचा ७०% भूभाग कब्जात घेऊन तेथील भूमिपुत्रांना निर्वासित छावण्यांमध्ये कोंडून टाकले; परंतु एवढय़ावर संतुष्ट होईल तर ते इस्रायल कसले? २००२ साली त्याने पश्चिम किनारपट्टीवर चक्क ६४० कि. मी. लांबीची भिंतच उभी केली व अशा रीतीने त्या परिसरातील भूमिपुत्रांचा स्वत:च्याच घरा-अंगणात वावरण्याचा जन्मसिद्ध अधिकारदेखील हिसकावून घेतला. आज पॅलेस्टिनींचे हाल कुत्रादेखील खात नाही.
जमिनीतील पाण्यापासून ते हवाई सीमांपर्यंत सर्वत्र र्निबध लादणाऱ्या इस्रायलच्या दयेच्या भिकेपुढे इथली माणसं आपल्या दैनंदिन गरजांकरितादेखील लाचार झाली आहेत. पॅलेस्टाइनमधील ८९% जलस्रोत आज इस्रायलच्या ताब्यात असून केवळ ११% जलस्रोतांवर ही जनता आपली पाण्याची गरज भागवीत आहे. मातृभूमी ज्या शत्रूने घशात घातली तो तिच्या उदरातील पाण्याचा यथेच्छ उपभोग घेत आहे. इस्रायलींना दररोज दरडोई २८० लिटर पाणी उपलब्ध होत असताना त्याचे मूळ मालक मात्र दररोज दरडोई ४० लिटर पाण्यावर तडजोड करीत आहेत. पॅलेस्टाइनमधील वीजनिर्मिती प्रकल्पांवरदेखील इस्रायलने मनमानी र्निबध लादले आहेत. पाणी आणि विद्युत पुरवठय़ाअभावी शेतमालाच्या उत्पन्नात कमालीची घसरण झाली आहे. नवव्या दशकात पॅलेस्टाइनमधील सकल कौटुंबिक उत्पन्नात (ॅ.ऊ.ढ.) कृषिक्षेत्राचा ३०% वाटा होता तो घटून आता १०% वर आला आहे.
इस्रायली अत्याचारांची कहाणी सांगावी तेवढी थोडीच! गाझापट्टीभोवती ४० कि. मी. लांब आणि १० कि. मी. रुंदीचे तारांचे कुंपण घालून तिचा अक्षरश: तुरुंग बनविला आहे. जिथे स्थानिकांच्या दैनंदिन गरजा भागविण्याखातर दररोज ९०० ट्रक ये-जा करीत तिथे संपूर्ण मालवाहतूकच थांबविण्यात आली आहे. माणसांची अन्नान्नदशा झाली आहे. इस्रायलच्या या छळवादी वृत्तीबाबत संयुक्त राष्ट्र संघाने वेळोवेळी निषेध नोंदवूनही इस्रायलने त्यास भीक घातली नाही. अतिरेकी व बेमुर्वत इस्रायलने बांधलेली ६४० कि. मी. लांबीची भिंत पाडण्याबाबत संयुक्त राष्ट्र संघाने प्रस्ताव संमत करून आदेशही काढला. त्यालादेखील इस्रायलने वाटाण्याच्या अक्षताच लावल्या. त्याला कारणही तसेच आहे. अमेरिकेने या ठिकाणी आपला व्हेटोचा अधिकार वापरून इस्रायलची पाठराखण केली. इस्रायलबरोबर पॅलेस्टाइनचे महान नेते यासर अराफत यांनी १९९३ च्या ओस्लो शिखर संमेलनापासून कॅम्प डेव्हिड परिषदेपर्यंत अनेक करार केले. संयुक्त राष्ट्र संघाने आपल्या १९४ क्रमांकाच्या प्रस्तावान्वये ‘‘४ जून १९६७ नंतर इस्रायलने बळकावलेली पॅलेस्टाइनची भूमी त्यांस विनाअट परत करून ‘पॅलेस्टाइन’चे ‘स्वतंत्र राष्ट्र’ म्हणून असलेले अस्तित्व मान्य करावे, तसेच पूर्व जेरुसलेमला पॅलेस्टाइनच्या राजधानीचा मान द्यावा,’’ असे आवाहन करूनही प्रतिसाद शून्य!
असे डझनावारी प्रस्ताव अक्षरबंद होऊन पडलेले आहेत. गाझापट्टीतील १५ लाखांवर लोक स्थलांतरित झालेले आहेत आणि तरीही ‘हमास’सारख्या दहशतवादी संघटनांचे उच्चाटन करण्यासाठी इस्रायलने चालविलेली मोहीम योग्यच आहे, अशी भलामण अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी केली होती. पॅलेस्टाइनच्या मुक्तिसेनेकडे ‘आपली आपण करा सोडवण’ एवढा एकच पर्याय शिल्लक राहिल्यामुळेच ‘मारा किंवा मरा’ या ईष्र्येने ते आपली खिंड लढवीत आहेत.
प्रा. रामसागर पांडे
(अनुवाद : प्रा. हिरा भुजबळ)