Leading International Marathi News Daily                                 शुक्रवार, २३ जानेवारी २००९
विविध

कंदहारप्रकरणी टीका सोपी, कारवाई कठीण
गृहमंत्री पी. चिदम्बरम यांची जसवंतसिंगांना सहानुभूती
नवी दिल्ली, २२ जानेवारी/ए.वृ.से.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या कार्यकाळात, १९९९ मध्ये काठमांडूहून येणाऱ्या इंडियन एअर लाइन्सच्या विमानाचे अपहरण करून ते कंदहारला नेण्यात आले आणि नंतर तीन खतरनाक अतिरेक्यांच्या बदल्यात ते सोडवून घेण्यात आले. तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंतसिंग हे स्वत: त्या अतिरेक्यांना घेऊन कंदहारला गेले होते. या सगळ्या प्रकरणात जसवंतसिंग आणि एकूणच रालोआ सरकारवर प्रचंड टीका झाली होती.

ओबामा ब्लॅकबेरीचा वापर सुरूच ठेवणार
वॉशिंग्टन, २२ जानेवारी/पी.टी.आय.
ब्लॅकबेरी मोबाईल फोनवरून पाठविण्यात येणाऱ्या इ-मेलवर पाळत ठेवता येऊ शकते असा इशारा सुरक्षा यंत्रणांनी दिला असतानाही अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे आपला प्रिय ब्लॅकबेरी मोबाईलचा वापर सुरूच ठेवणार आहेत.अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ओबामा ब्लॅकबेरी मोबाईल वापरू शकतील का, याविषयी काही कायदेशीर व सुरक्षाविषयक प्रश्न निर्माण झाले होते. त्यामुळे या विषयावर ओबामा यांचे निकटवर्तीय तसेच सरकारी अधिकाऱ्यांनी गेले काही दिवस मौन बाळगले होते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी आग्रही असलेले ओबामा हे लवकरच ब्लॅकबेरी फोनचा वापर पुन्हा सुरू करतील. मात्र त्याआधी ओबामा यांच्या ब्लॅकबेरी फोनमध्ये विशेष सुरक्षा तंत्रज्ञानाची जोड देण्यात येणार आहे, असे ब्रिटनमधील एका दैनिकाने यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे.
अमेरिकी सरकारमधील उच्चपदस्थांनी कामकाजाकरिता विशिष्ट प्रकारचेच मोबाईल वापरावे असा नियम आहे. व्हर्जिनिया येथील जनरल डायनॅमिक्सने बनविलेला सिक्रेटा एज हा मोबाइल या यादीत आहे. या मोबाईलचे राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून काटेकोर परिक्षण करण्यात आले आहे. उच्च तंत्रज्ञानाने युक्त उपकरणांचा वापर अमेरिकी अध्यक्षांनी शक्यतो कमी प्रमाणात करावा अशी तेथील प्रथा आहे. इतर देशांकडून अमेरिकी अध्यक्षांचे संभाषण तसेच व्यवहारांवर पाळत ठेवली जाण्याची शक्यता त्यामुळे कमी होते. मात्र पारदर्शक राज्यकारभार व कायद्याचे राज्य अंमलात आणू अशी घोषणा देऊन सत्ता काबीज केलेले बराक ओबामा हे आपले वैयक्तिक ई-मेल पाठविण्यासाठी ब्लॅकबेरी फोनचा वापर करण्याची शक्यता आहे.

घातपाताच्या धमकीनंतर पंजाबात सुरक्षा वाढविली
चंदीगड, २२ जानेवारी / पी.टी.आय.

गणराज्यदिनाच्या दिवशी पंजाबात दहशतवादी हल्ले घडवून आणण्याची धमकी देणारी पत्रे मिळाल्याने राज्यातील सुरक्षा आणखी कडक करण्यात आली आहे.
पंजाबात २६ जानेवारीला मोठे दहशतवादी हल्ले घडविण्याची धमकी देणारी उर्दू भाषेतील ही दोन पत्रे काश्मिरातून पाठवण्यात आली आहेत. हा खोडसाळपणाही असेल परंतु, कोणताही धोका पत्करण्याची पोलिसांची तयारी नाही, असे पंजाबचे पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) शशीकांत यांनी सांगितले. रेल्वे स्थानके, विमानतळ, शॉपिंग मॉल्स, सिनेमागृहे, बस स्थानके आणि गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. राज्याच्या सीमेवरील चौक्यांना प्रत्येक वाहनाच्या तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा वाढविली गेली आहे. गणराज्यदिन सोहळे ज्या ठिकाणी साजरे होणार आहेत तेथे पुरेशी काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लुधियानात राज्यपाल एस.एफ. रॉड्रिग्ज यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असून मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल अमृतसरमध्ये तर उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल भटिंडात ध्वजारोहण करतील. या कार्यक्रमांवर धमक्यांचा कोणताही परिणाम होणार नाही, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.

‘सत्यम घोटाळा मुंबईवरील हल्ल्याइतकाच भीषण’
नवी दिल्ली, २२ जानेवारी/पी.टी.आय.

सत्यम कॉम्प्युटरमधील आर्थिक घोटाळा ही मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याइतकाच भीषण आहे, असे माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाचे अध्यक्ष टी. एस. विजयन यांनी म्हटले आहे. सत्यम कॉम्प्युटर ताब्यात घेण्यासाठी एल अँड टी कंपनी प्रयत्नशील असून या दोन्ही कंपन्यांत ‘एलआयसी’ची गुंतवणूक आहे. सत्यम ही एक उत्तम कंपनी असून योग्य नेतृत्व लाभल्यास ती आर्थिक घोटाळ्यातून नक्कीच सावरेल, असेही ते म्हणाले.विजयन म्हणाले की, मुंबईवरील हल्ल्यात शेकडो लोक ठार झाले. संपूर्ण सज्जतेशिवाय असा हल्ला थोपविता येणे शक्यच नसते. अशा अकल्पित घटनांमध्ये सत्यम घोटाळ्याचा समावेश करता येईल. संचालक मंडळात कितीही मोठे तज्ज्ञ असतील तरी त्यांना अशा अकल्पित घटना रोखता येणे शक्य नसते. कारण असे घोटाळे नियोजनबद्धरितीने केले जातात. सत्यमचे चार टक्के समभाग एलआयसीच्या ताब्यात आहेत. सत्यमच्या समभागांना भविष्यात उत्तम किंमत प्राप्त झाली तर या कंपनीचे एलआयसीकडे असलेले चार टक्के समभाग विकण्याचाही निर्णय घेतला जाऊ शकतो, असेही विजयन म्हणाले.

ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी मौलवीला खडसावले
मेलबोर्न, २२ जानेवारी/पी.टी.आय.

एखादी स्त्री ‘आज्ञाधारक’ नसेल तर तिच्यावर जबरदस्ती करण्याचा वा मारहाण करण्याचा अधिकार पुरुषाला आहे, असे विधान करणाऱ्या एका मुस्लिम धर्मगुरुने माफी मागावी, असा आदेश ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान केविन रुडी यांनी आज दिला.मेलबोर्न येथील समीर अबु हमझा या स्वयंघोषित धर्मगुरुने आपल्या पुरुष अनुयायांना दिलेल्या संदेशात हे तारे तोडले होते. त्याचे हे खासगी ‘प्रवचन’ इंटरनेटद्वारे जगभर पोहोचले आणि वाचले गेले आहे. आज्ञा न पाळणाऱ्या स्त्रियांना अखेरचा उपाय म्हणून मारहाण करण्यास इस्लामी कायद्याने पुरुषांना परवानगी दिली आहे, असे या धर्मगुरुने थेट कुराणाचा हवाला देत म्हटले आहे.

नाटो सरचिटणीसांची पाकिस्तानला भेट
इस्लामाबाद, २२ जानेवारी/पी.टी.आय.

दहशतवादविरोधी लढा आणि विभागीय सुरक्षास्थितीचा आढावा घेण्यासाठी नाटो संघटनेचे सरचिटणीस जाप डे हूप शेफर आज पाकिस्तानच्या दौऱ्यावर आले.
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महम्मद कुरेशी यांच्याशी त्यांनी चर्चा केली. अध्यक्ष असिफ अली झरदारी आणि पंतप्रधान युसूफ रझा गिलानी तसेच संरक्षणमंत्री चौधरी अहमद मुख्तार यांच्याशीही ते चर्चा करणार आहेत. अमेरिका व नाटो अधिकाऱ्यांच्या मते अफगाणिस्तान हद्दीलगतचा पाकिस्तानी भूप्रदेशात तालिबानी व अल कायदाच्या अतिरेक्यांचा मुक्त वावर आहे. त्यामुळे या भागांत दहशतवादविरोधी लढा अधिक तीव्र करण्याचा अमेरिकेचा निर्धार आहे.

‘संजय दत्तचे विधान भारतीय परंपरेनुसारच’
नवी दिल्ली, २२ जानेवारी / पी.टी.आय.

विवाहानंतर महिलांनी माहेरचे आडनाव लावू नये, हे संजय दत्तचे विधान भारतीय पंरपरेला अनुसरून असल्याची पावती समाजवादी पक्षाचे महासचिव अमरसिंह यांनी आज दिली. संजय दत्तचा इशारा त्याची बहीण प्रिया दत्त हिच्याकडे अप्रत्यक्षपणे होता. मात्र, याबाबत कोणतेही भाष्य अमरसिंह यांनी केले नाही. ते म्हणाले, संजयचे विधान वादग्रस्त नव्हते. भारतीय परंपरेनुसार स्त्री पतीचे आडनाव लावते. ही जुनी परंपरा आहे. त्यात वादाचे कारण नाही.संजय दत्त याने सपात सामील होण्याचा निर्णय घेतल्यापासून त्याची बहीण प्रिया दत्त त्याच्यावर नाराज आहे. तिच्या पाठोपाठ केंद्रीय महिला व बाल कल्याणमंत्री रेणुका चौधरी यांनीही संजय दत्तच्या विधानावर टीका केली आहे.

राणे यांच्या पुनर्वसनासाठी गिडवाणींचे अँटनींना साकडे
नवी दिल्ली, २२ जानेवारी/खास प्रतिनिधी

काँग्रेसने निलंबित केलेले माजी महसूल मंत्री नारायण राणे यांचे निलंबन रद्द करून त्यांना लवकरात लवकर पक्षात परत घेण्यासाठी आज माजी आमदार व अ. भा. काँग्रेसचे सदस्य कन्हैयालाल गिडवाणी यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी, संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांना साकडे घातले. आज सकाळी अँटनी यांच्या ९ कृष्णन मेनन मार्ग या निवासस्थानी भेट घेऊन गिडवाणी यांनी राणे यांच्या पुनर्वसनासाठी पक्षाने तातडीने पावले उचलावीत, अशी विनंती केली. लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्या असताना राणे यांच्यासारख्या आक्रमक व धडाडीच्या नेत्या निलंबित ठेवणे अन्यायकारक असल्याची सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांंची भावना त्यांनी अँटनी यांच्या कानावर घातली. राणे यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरु झाली आहे, असे सांगून त्यांचे पुनर्वसन करण्याविषयी पावले उचलली जातील, असे आश्वासन अँटनी यांनी दिले.

शांततेसाठी चीनला मध्यस्थी करण्याची पाकची विनंती
इस्लामाबाद, २२ जानेवारी / पी. टी. आय.

मुंबईत २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या भारत-पाक दरम्यानच्या तणावाच्या वातावरणाविषयी भारताशी पाकिस्तानच्या वतीने वाटाघाटी करण्यासाठी पाकिस्तानने चीनला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. या संदर्भात पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी म्हणाले, पाकिस्तानने चीनला ‘ब्लॅक चेक’ दिला आहे. येथील चिनी दूतावासातील स्वागत समारंभात चीनचे विशेष दूत ही याफी यांना कुरेशी म्हणाले, तुम्ही भारतात जा आणि आमच्या वतीने वाटाघाटी करा, तुम्ही काढाल तो तोडगा आम्हाला मान्य असेल. गेल्या २९ डिसेंबरलाही याफी यांनी पाकिस्तानचा दौरा केला होता, त्या वेळी झालेल्या पाकिस्तानी नेत्यांच्या भेटीत उपखंडातील शांततेसाठी चीन पाकिस्तानला सहाय्य करील, असे आश्वासन याफी यांनी दिले होते. या आश्वासनानंतर पाकिस्तानने दोन प्रस्ताव मांडले. सीमेवरील एक हवाई तळांवरील सज्जता शिथिल करावी आणि दुसरा सैन्य पुन्हा शांतताकालीन स्थितीत न्यावे. पाच जानेवारीला याफी भारत दौऱ्यावर आले आणि पाकिस्तानशी वाटाघाटी सुरू करण्याची विनंती त्यांनी भारतीय नेत्यांना केली.

महालक्ष्मी मंदिरावरील पुस्तक राष्ट्रपतींना अर्पण करणार’
नवी दिल्ली, २२ जानेवारी/खास प्रतिनिधी

प्रसिद्ध हवाई छायाचित्रकार गोपाळ बोधे यांच्या ‘गॉडेस महालक्ष्मी टेंपल अ‍ॅट कोल्हापूर : शक्तीपीठ’ हे सचित्र पुस्तक महामहीम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना उद्या २३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता राष्ट्रपती भवनात अर्पण करण्यात येईल. महाराष्ट्र शासनाच्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. आज एका पत्रकार परिषदेत बोधे यांनी ही माहिती दिली.
प्राचीन व ऐतिहासिक महत्त्व असलेले कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक प्रमुख पीठ आहे. आकर्षक बांधकाम आणि कलाकुसर असलेल्या या मंदिरात होणारा किरणोत्सव जागतिक आकर्षण आहे. या मंदिरातील प्राचीन चालीरिती, दागदागिने, त्यांचे ऐतिहासिक महात्म्य आणि दृश्य परिणाम बोधे यांनी कल्पकतेने टिपला असून छायाचित्रांसोबतच मंदिराचा इतिहास व वैभवाची माहितीही पुस्तकात देण्यात आली आहे. पुस्तकाच्या निर्मितीमागची भूमिका, छायाचित्रे आणि मंदिराच्या पूर्वेतिहासाची माहिती यावेळी बोधे यांनी दिली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे हेही यावेळी उपस्थित होते. त्यांनी मंदिराच्या व्यवस्थापनाविषयी माहिती दिली.

‘देशद्रोही’ वरील बंदी बाबत महाराष्ट्र सरकारचे म्हणणे आज सुप्रिम कोर्टात
नवी दिल्ली, २२ जानेवारी / पी.टी.आय.

‘देशद्रोही’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याच्या याचिकेवरील महाराष्ट्र सरकारचे म्हणणे उद्या सुप्रिम कोर्टात मांडण्यात येणार आहे. उत्तर भारतीयांना झालेल्या मारहाणीच्या पाश्र्वभूमीवर आधारित हा चित्रपट असल्याने त्यावर बंदी घालण्याची याचिका महाराष्ट्र सरकारतर्फे करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखविल्याने त्याविरोधात सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हा चित्रपट महाराष्ट्रात शुक्रवारी प्रदर्शित होत असल्याने त्यावर म्हणणे मांडण्याची मागणी महाराष्ट्र सरकारचे सॉलिसीटर जनरल गुलाम वहानव्हटी यांनी केली. न्या. बी. एन. अगरवाल यांच्या खंडपीठाने त्याची त्वरित दखल घेत उद्या सरकारला आपले म्हणणे मांडण्यास परवानगी दिली आहे. सद्यस्थितीत हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो हा गुप्तचर खात्याचा अहवाल असल्याचे स्पष्ट करून वहानव्हटी म्हणाले की, अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यामधून मुंबई सावरत असताना या चित्रपटाच्या प्रदर्शनाने पुन्हा अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे. हे म्हणणे उच्च न्यायालयाने ग्राह्य धरले नाही व चित्रपटाच्या प्रदर्शनाला मान्यता दिली. शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होत असून त्यावर त्वरित बंदी घालावी. वहानव्हटी यांचे म्हणणे न्या. अगरवाल यांनी मान्य करतानाच उद्या या प्रकरणी सुनावणी घेण्याची तयारी दर्शविली.