Leading International Marathi News Daily
शनिवार, २४ जानेवारी २००९
  एक धागा सुखाचा, अनेक धागे दु:खाचे
  ‘सबला’ यल्लमा
  एकदा तरी..
  सहज कसरत!
  विज्ञानमयी
  घरकामगारांना पाठबळ
  अशी ही दिवाळी.. आणि नवीन वर्षांची पहाट!
  कन्याप्राप्ती भाग्याची!
  वेगळं, स्पेशल..
  विशेष शिकवण
  मानाचा मुजरा
  कंटाळा आला आहे..
  प्रतिसाद
  शिक्षणविचारांचे मंथन
  मुलींसाठी उपयुक्त पुस्तिका
  मुनिया खाली टिल टिल आणि बस्तरचा राजकुमार
  अभिनव सौंदर्य स्पर्धा
  नेटका इव्हेंट

 

थंडीचा मोसम सुरू होताच शहरांमध्ये हातमाग आणि हस्तकलेच्या वस्तूंची प्रदर्शने भरू लागतात. कलात्मक एक्सक्लुजिव्ह वस्तूंची आवड असणारी मंडळी ही प्रदर्शने चुकवत नाहीत. या अमूल्य वस्तू मोठे मोल देऊन कौतुकाने विकत घेणाऱ्या शौकीन ग्राहकांपर्यंत त्या कलात्मक चीजा साकारणाऱ्या कलाकारांची कैफियत अनेकदा पोहोचत नाही. अलीकडे दस्तकारी हाट समितीच्या अध्यक्ष जया जेटली यांनी जानकीदेवी बजाज पुरस्कार वितरण समारंभात भाषण करताना या कारागिरांची बाजू मांडली. या कारागिरांची अव्यक्त खंत जया जेटली यांच्या या भाषणातून व्यक्त झाली-
स्त्रीही मुळातच सृजनशील असते. ती सतत काहीतरी कामात असते. तिच्या रिकाम्या वेळातही ती कशिदा, शिवणकाम यासारखी कला जोपासत असते. तिच्या या छंदातून तिला मिळणारा आनंद तिचं दैनंदिन आयुष्य अधिक सुंदर बनवत असतो. एकूणच स्त्री
 

घरात जे काम करीत असते, ते जाणीवपूर्वक दुर्लक्षित राहते. तिच्या कष्टांना तशी मान्यता मिळत नाहीच आणि मोबदला तर मुळीच नाही. स्वयंपाक बनवण्यापासून कशिदाकामापर्यंतच्या तिच्या कामांचं महत्त्व लक्षात घेऊन तिच्या कष्टांना योग्य ते आर्थिक मूल्य मिळणं आवश्यक आहे. आज छंदाच्या रुपात असणाऱ्या हस्तकलांमधून जर तिला योग्य मोबदला मिळाला, तर तिची आर्थिक उन्नती होण्यास वेळ लागणार नाही.
आजच्या यांत्रिकीकरणाच्या जगात एकसारख्या वस्तूंचे उत्पादन मोठय़ा संख्येने होणे ही फारशी अवघड गोष्ट राहिलेली नाही. अशा वेळेस आपल्या गावात बसून आपल्या हस्तकौशल्याने छोटीशी सुंदर वस्तू बनविणाऱ्या हस्तकारागिरांचे मोल कसे ठरवणार?
सध्या जगभरात सुरू असलेल्या आर्थिक मंदीच्या कालावधीत मात्र ही छोटीशी बाजारपेठ वेगाने विकास पावत आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हस्तकला क्षेत्राच्या विकासाकडे सरकार पातळीवर जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे, असे दस्तकारी हाट समितीच्या संस्थापक व अध्यक्ष जया जेटली यांनी सांगितले.
आज युरोपात ‘वर्किंग फ्रॉम होम’ची संकल्पना लोकमान्य होत आहे. ग्रामीण पातळीवरील कारागिरांकडे पाहिले तर आपल्याकडे ही प्रथा सुरुवातीपासूनच प्रचलित आहे. हे लक्षात घेत व्यवस्थेचे चक्र या कारागिरांना अनुकूल ठरतील, अशी फिरवायला काय हरकत आहे ? त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ, योग्य किंमत, कच्च्या मालाची उपलब्धता, मार्केटिंग या गोष्टीकडे लक्ष पुरवले तरी त्यांचे आजच्या घडीला जी फरफट होते, जी आर्थिक पिळवणूक होते, ती थांबू शकेल.
आज जगाच्या पाठीवर सर्वत्र भारताच्या कानाकोपऱ्यात बनवल्या जाणाऱ्या वैविध्यपूर्ण वस्तूंना मोठी मागणी आहे. या वस्तूंची संभाव्य मोठी बाजारपेठ ध्यानात घेत तिथपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारी पातळीवर ठोस योजना आखणे आणि ती राबवणे आवश्यक आहे. या क्षेत्राचा विकास होताना हस्तकलेच्या वस्तू बनवणाऱ्या मूळ कारागिरांपर्यंत त्याचे लाभ पोहोचणे अत्यावश्यक आहे. अन्यथा गेली अनेक वर्षे या कारागिरांच्या वस्तू विकत घेऊन शहरी ग्राहकांपर्यंत पोहोचवणाऱ्या दलाल व्यक्ती आपली लेबले लावून विकणाऱ्या मोठमोठय़ा ब्रँड्सचे उखळ पांढरे होत आहे.
मोठी संभाव्य बाजारपेठ असलेल्या या व्यवसायाकडे मात्र आजही सॉफ्ट स्किल म्हणून पाहिले जाते. पापड, लोणची करून विकण्यासारखाच हाही एक छोटा व्यवसाय आहे, अशी वागणूक या कारागिरांना मिळते. मात्र सहकार तत्त्वावर या पापड, लोणच्यातूनच लिज्जतसारखा अवाढव्य पसारा उभा राहिला आहे, याकडे दुर्लक्ष केले जाते. हे कारागीर गावोगावी विखुरलेले आहेत. त्यांना एकत्र आणणारी ना संघटना आहे, ना त्यांच्या समस्या मांडणारा कुणी नेता. त्यामुळे विस्ताराची संधी असूनही वर्षांनुवर्षे, पिढय़ान्पिढय़ा त्यांची कुतरओढ मात्र सुरूच आहे.
देशातील जातीव्यवस्थेमुळे पिढय़ान्पिढय़ा तोच व्यवसाय करणाऱ्या कारागिरांची संख्या काही कमी नाही. विणकर हा गेल्या अनेक पिढय़ा तोच व्यवसाय करतोय. त्याची नवी पिढी त्याच्या या व्यवसायात नवी भर घालण्याचा प्रयत्नही करते. आजच्या काळातील मार्केटिंगचे महत्त्वही जाणते. अशा या पिढय़ान्पिढय़ा कलेचा वारसा जपणाऱ्या कारागिरांना सरकारने लवचिक सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. जया जेटली यांनी सांगितले की, त्यांच्या हितासाठी सरकारच्या पूर्वी सुमारे २२ योजना होत्या. पण आज सरकारी योजना कॉर्पोरेट पद्धतीने राबविल्या जात असून आजच्या घडीला हस्तकलेसाठी केवळ सहा योजना आणि हँडलूम क्षेत्रासाठी सात योजना शिल्लक आहे. त्यांचा लाभ मिळण्यासाठी ज्या अटींची पूर्तता करावी लागते, त्यासाठी सतराशेसाठ अडचणींच्या मांडवाखालून जावे लागते. म्हणूनच या योजनांचा लाभ तळागाळातील कारागिरांनी कधीच मिळू शकत नाही. अस्सल कारागीर या योजनांपासून वंचित राहतात आणि सत्ता असलेल्या व्यक्ती बोगस स्वयंसेवी संस्था निर्माण करून त्यातील अटींची पूर्तता केल्याचे भासवितात. त्या फसव्या अनुभवामुळे सरकारही अशा व्यक्तींना निधी पुरवठा करण्यासाठी नियम अधिक कठीण बनवते आणि त्यात साध्या इमानदार कारागिरालाही निधी उपलब्ध होणे अवघड होऊन बसते. एखादे कला प्रदर्शन जर आखायचे असेल, तर वर्षभर आधी त्या प्रदर्शनात कुठले कारागीर सहभागी होणार आहेत, त्याची यादी सरकारकडे पाठवावी लागते. त्यातील काही कारागीर अथवा संघटना त्या प्रदर्शनात सहभागी होऊ शकल्या नाहीत, तर त्या कारणावरून त्या प्रदर्शनासाठी जो निधी सरकार उपलब्ध करून देतो, त्यापासून आयोजकाला वंचित राहावे लागते.
कारागिरांचे प्रश्न कोणते आहेत, त्यांना कोणत्या समस्यांशी झगडावे लागते, याबाबत सरकारी नेते, अधिकारी आणि कारागीर संघटना यांच्यात समोरासमोर बैठका होणे अत्यावशक आहे. मात्र याबाबत पदरी निराशाच येते, असा कारागीर संघटनांचा अनुभव आहे.
दिल्लीत वर्षांचे ३६५ दिवस ‘दिल्ली हाट’ येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कारागिरांच्या कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन व विक्री सुरू असते. प्रत्येक कारागिराला अथवा कारागिरांच्या वेगवेगळ्या संघटनेला वर्षांतून केवळ दोन आठवडेच आपल्या वस्तू प्रदर्शनात मांडता येतात. त्यामुळे कारागीर बदलतात, मात्र कलाप्रदर्शन सुरूच राहते. त्या वस्तूंसोबतच वेगवेगळ्या लोकसंस्कृतीचे दर्शनही तिथे होते. लोकनृत्ये, वेगवेगळ्या पद्धतीचे खाणे या दिल्ली हाट मध्ये उपलब्ध असते. ग्राहकांचे लक्ष आकर्षित करणारा माहोल उभा करीत रास्त भावात वेगवेगळ्या कलावस्तू उपलब्ध करून देणारा दिल्ली हाट गेली १४ वर्षे सुरू आहे.
आर्थिक मंदीच्या या कालावधीत बडे बडे मॉल्स ओस पडत असताना डिसेंबर महिन्यात दस्तकारी हाट संघटनेचे कलाप्रदर्शन दिल्ली हाटमध्ये सुरू होते. त्या दोन आठवडय़ात तीन कोटींची विक्री झाल्याचे जया जेटली यांनी सांगितले. या प्रदर्शनातून छोटय़ा कारागिरांच्या कलावस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होते. जया जेटली म्हणाल्या की, काही वर्षांपूर्वी खाण्यापिण्याची भ्रांत असलेल्या ओरिसा येथील एका दुर्गम गावातील कारागिरांनी बास्केट विकायला एक छोटा स्टॉल घेतला. आज त्या गावातील ८०० घरांचा हा एक व्यवसाय बनला असून त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय या उद्योगामुळे होत आहे. तीन र्वषपूर्वी पहिल्यांदा या प्रदर्शनात भाग घेतलेला उत्तर प्रदेशातील एक गरीब कारागीर आज दहा लाख बास्केट्सची विक्री केली.
काश्मीर म्हणजे केवळ शाली नि एम्ब्रॉयडरी हा सामान्यांचा समज असतो, हे सांगून जया जेटली म्हणाल्या की, काश्मीरमध्ये दल लेक परिसरात वगू नावाचे गवत आढळते. त्यापासून चटया विणल्या जातात. या चटया त्यांच्या शिकाऱ्यात अंथरल्या जातात. यंदा अशा चटया बनविणाऱ्या कारागिराला आम्ही छोटय़ा छोटय़ा ‘योग चटया’ बनवण्यास सांगितल्या. पहिल्यांदाच तो प्रदर्शनामध्ये सहभागी झाला होता आणि त्याच्या चटयांना ग्राहकांना भरभरून प्रतिसाद लाभला. अशा देशाच्या कानाकोपऱ्यातील अस्सल कारागिरांपर्यंत पोहोचण्याचे आणि त्यांना लोकांसमोर आणण्याचे काम सरकारी पातळीवरून व्हायला हवे.
एकीकडे आर्थिक मंदीची लाट आली असताना हस्तकला व्यवसायाला मात्र सुगीचे दिवस आले आहेत. आणि जगभरातील मोठमोठय़ा बँकाचे दिवाळे वाजत असताना पतपुरवठा करणाऱ्या ग्रामीण पातळीवरील सहकारी संस्थांच्या कामांचा विस्तार होत आहे, ही गोष्ट नजरेआड करता कामा नये.
एकूणच देशभरात विखुरलेल्या या असंघटित क्षेत्राला एका छत्राखाली आणून त्यांच्या उन्नतीचे जाणीवपूर्वक प्रयत्न झाल्यास त्यांचे जीवनमान सुधारण्यासोबत अर्थव्यवस्थेलाही हातभार लागू शकेल, हेच जया जेटली यांच्या वक्तव्याच्या निमित्ताने अधोरेखित झाले.
सुचिता देशपांडे
suchitaadeshpande@gmail.com