Leading International Marathi News Daily                                 शनिवार, २४ जानेवारी २००९
व्यापार - उद्योग

डेटाविण्डचे ‘पॉकेट सर्फर २’
मोबाईल नेटसर्फिगचा अधिक प्रभावी व सोयीस्कर अनुभव

व्यापार प्रतिनिधी: डेटाविण्ड लिमिटेड या वायरलेस वेब अॅक्सेस उत्पादने व सेवा क्षेत्रातील कंपनीने ‘डेटाविण्ड पॉकेट सर्फर २’ हे जगातील सर्वात जलद हॅण्डहेल्ड इंटरनेट उपकरण भारतात सादर केले आहे. ‘डेटाविण्ड पॉकेट सर्फर २’बरोबर मोफत मोबाईल इंटरनेट अॅक्सेसही ग्राहकांना मिळेल. मोबाईलवरील थ्रीजी सेवेपेक्षा खूपच स्वस्त आणि ब्रॉडबॅण्ड कनेक्टिव्हिटीने समर्थ लॅपटॉपपेक्षा वापरास सोयीचे असे हे उपकरण आहे. पॉकेट सर्फर २ हा अतिशय पातळ, सुबक असा मोबाईल डिव्हाईस असून, डेस्कटॉप वेबची संपूर्ण शक्ती व ओरिजिनल ग्राफिक इंटेन्सिटीने त्वरित व बिनतारी पद्धतीने आपल्या तळहातावर देणारे हे क्रांतिकारी उपकरण आहे. हे उपकरण सहजपणे आपल्या पाकिटात किंवा बॅगेत मावतो व केवळ १७४ ग्रॅम वजनाचे हे उपकरण घरात किंवा कार्यालयात अव्याहत व जलद वेबचा अनुभव ग्राहकांस देतो.

मुंबईत ‘वेल्ड इंडिया एक्स्पो’
व्यापार प्रतिनिधी: इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ वेल्डिंग या संस्थेच्या वतीने ‘वेल्ड इंडिया एक्सपो २००९’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अमेरिका, युरोपियन युनियन यासारख्या देशातील मोठय़ा कंपन्याबरोबरच भारतातील लार्सन अॅण्ड टुबरेसारखी अग्रेसर कंपनी अशा जगभरातील ८० पेक्षा जास्त कंपन्या सहभागी होत असून वेल्डिंग, कटिंग, ऑटोमेशन आणि संबंधित उत्पादने या प्रदर्शनात मांडतील. मुंबईतल्या गोरेगाव पूर्व येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे २५,००० चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळावर हे प्रदर्शन भरविण्यात येणारे हे प्रदर्शन ५ ते ७ फेब्रुवारी २००९ असे तीन दिवस चालेल, अशी माहिती कार्यक्रमाचे समन्वयक ए. ए. देशपांडे यांनी दिली. आज देशभरात जवळजवळ ९ लाख वेल्डर कार्यरत आहेत. परंतु त्यापैकी दोन तृतीयांश वेल्डरांकडे प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यामुळे अनेक पायाभूत प्रकल्पांना धोका निर्माण होऊ शकतो अशी भिती इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ वेल्डिंगचे उपाध्यक्ष श्री. आर. श्रीनिवासन यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. पोलादला सुरक्षित आणि मजबूत जोड देण्याच्या कामात कार्यरत असलेले ६५०,००० पेक्षा जास्त वेल्डर अकुशल आणि अप्रमाणित आहेत. पोलादाची जोडणी सुरक्षित आणि मजबूत अशा प्रकारे खात्रीपूर्वक केले जाते की, जेणेकरून पूल पडणार नाही आणि ते वापरणाऱ्या व्यक्तींच्या जीवनाला धोका निर्माण होणार नाही. पूल, इमारती, बॉयलर्स आणि अशा अन्य अनेक कामात ज्या-ज्या ठिकाणी पोलादाचा वापर केला जातो. त्या-त्या ठिकाणी वेल्डिंगचे काम हे करावेच लागते. अमेरिका, जपान, कॅनडा आणि युरोपियन युनियन आदी राष्ट्रांमध्ये केवळ प्रमाणित वेल्डर्सनाच वेल्डिंग करण्याची परवानगी दिली जाते. आपल्या देशातील बहुसंख्य वेल्डर्सना आधुनिक वेल्डिंग प्रक्रिया आणि त्याचे चालणारे काम अत्याधुनिक उच्च परिशुद्ध वेल्डिंग उपकरणे यांची माहिती करून देणे आवश्यक आहे. जेणेकरून भक्कम आणि सुरक्षित वेल्डिंगची खात्री पटून अपघातात्मक दुर्घटना टाळल्या जातील.

‘कॅनपेक्स समूहा’चा चीनमध्ये उत्पादन प्रकल्प
व्यापार प्रतिनिधी:
कॅनपेक्स उद्योग समूहाने मोबाईल फोन हॅण्डसेट निर्मितीच्या व्यवसायातील आपले पदार्पण जाहीर केले असून, बियॉन्ड ही हॅण्डसेट मालिका बाजारात आणली आहे. कॅनपेक्स समूहाचे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या नव्या व्यवसायासाठी कॅनपेक्स समूहाने बियॉन्ड टेक ही स्वतंत्र कंपनी स्थापन केली असून, चीनमधील शेन्झेन प्रांतात मोबाईल फोन उत्पादनाचा कारखाना सुरू केला आहे. कंपनीने जीएसएम तंत्रज्ञानाच्या हॅण्डसेट्ससाठी तैवान येथील मीडिया टेक या समूहाशी, तर सीडीएमए तंत्रज्ञानाच्या हॅण्डसेट्ससाठी अमेरिकेतील क्वालकॉमशी तांत्रिक सहकार्याचे करार केले आहेत. बियॉन्ड टेकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष बोरा म्हणाले, की बियॉन्ड या नव्या मालिकेच्या माध्यमातून आम्ही ‘डय़ुएल सिम’ प्रकारात दोन जीएसएम सिमकार्ड किंवा जीएसएम आणि सीडीएमए अशा दोन कार्डाचा वापर करता येईल, असा पर्याय भारतात प्रथमच उपलब्ध करून देत आहोत. उत्तम तंत्रज्ञान आणि स्पर्धात्मक किंमत ही बियॉन्ड मालिकेतील उत्पादनांची खास वैशिष्टय़े आहेत. आधुनिक डिझाईनने बनलेले आणि वापरायला सोपे असे हे हॅण्डसेट ग्राहकांना निश्चित आकर्षित करून घेतील. बियॉन्ड मालिकेतील हॅण्डसेट त्यांच्या आकर्षक डिझाईन, उत्कृष्ट टचस्क्रीन डिस्प्ले आणि आक्रमक रंगसंगतीमुळे ग्राहकांच्या मनोवृत्तीचे निदर्शकच-स्टाईल स्टेटमेंट ठरतील. या हॅण्डसेट्सच्या थक्क करणाऱ्या प्रकाशमान डिस्प्ले स्क्रीनला स्पर्श करून आपल्याला हव्या त्या व्यक्तीशी संपर्क करणे हा एक आगळावेगळा अनुभव असणार आहे.
कॅमेरा, एफएम रेडिओ, एमपी थ्री प्लेयर, ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिग, ब्ल्यू टूथ, मेमरी कार्ड, उच्च दर्जाचा स्टीरिओ इयरफोन आणि यूएसबी केबल तसेच चार्जर अशी सर्व वैशिष्टय़े अंतर्भूत असलेल्या बियॉन्ड मालिकेत सुरुवातीला आठ मॉडेल्स असतील आणि त्यांच्या किमती रु. २५०० ते ६५०० या दरम्यान असतील. यापैकी सात मॉडेल डय़ुअल सिम प्रकारची असतील. यातीलच एक मॉडेल जीएसएम अधिक जीएसएम किंवा सीडीएमए अशा पयार्याचे असेल.

केपीआयटी कमिन्सच्या महसुलात वाढ
व्यापार प्रतिनिधी
: केपीआयटी कमिन्स चालू आर्थिक वर्षांच्या ३१ डिसेंबर २००८ अखेर संपलेल्या तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. कंपनीचा महसूल आधीच्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत २२.०६ टक्क्यांनी वाढून १८४.५२ कोटी रुपयांवर पोचला आहे. निव्वळ नफाही १९.३६ टक्क्यांनी वाढून १६.८६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत नफ्यातील वाढ ०.९९ टक्के झाली आहे. कंपनीने तिसऱ्या तिमाहीत तीन नवे ग्राहक जोडले असून, त्यामुळे एकूण ग्राहकांची संख्या १२६पर्यंत पोहोचली आहे. त्याचप्रमाणे १०६ नव्या कर्मचाऱ्यांची भरती केल्याने एकूण कर्मचारी संख्या आता ४८६७ झाली आहे. मल्टी-कोअर प्रोसेसर तंत्रज्ञान क्षेत्रात कंपनीने दोन नव्या पेटंटसाठी अर्ज सादर केले आहेत. चालू आर्थिक वर्षांत कंपनीने अर्ज सादर केलेल्या पेटंटची संख्या एकूण आठ झाली आहे. कंपनीचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक गिरीश वर्दाडकर म्हणाले, की ग्राहकांना सुधारित उत्पादकता व कार्यक्षमतेचे फायदे मिळवून देण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी केलेल्या गुंतवणुकीला फळ येऊ लागले आहे. गेल्या तीन तिमाहीत आम्ही परदेशी कर्मचारी खर्च व्यवस्थापन व भरती धोरणाची जुळणी यांसारख्या अनेक उपाययोजना महसुलातील २.५ टक्के खर्च वाचला. आगामी काळातही अशीच प्रगती सुरू राहण्याची खात्री आहे. ल्ल
हीरो होंडाला ३०० कोटींचा नफा व्यापार प्रतिनिधी: दुचाकी उत्पादनातील आघाडीची कंपनी हीरो होंडा लिमिटेडच्या तिसऱ्या तिमाहीतील निव्वळ नफ्यात ९.२४ टक्के वाढ झाली असून, कंपनीला ३००.४२ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षांत याच तिमाही कंपनीला २७५.०१ कोटी रुपयांचा नफा झाला होता. एकूण उत्पन्न सुमारे पाच टक्क्यांनी वाढून २८८१.२७ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीला २७५०.२० कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले होते. कच्च्या मालाच्या किमतीत घट झाल्याने तसेच प्रीमियम श्रेणीतील उत्पादनांवर भर दिल्याने आणि ग्रामीण भागातील बाजारपेठ वाढत असल्याने कंपनीची कामगिरी सुधारण्यास मदत झाली आहे, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पवन मुंजाल यांनी सांगितले.

डिश टीव्हीची ग्राहकसंख्या अडीच कोटींवर
व्यापार प्रतिनिधी:
झी समूहाचा भाग असलेल्या डिश टीव्ही या डीटीएच सेवेने आपल्या सध्याच्या व नव्या ग्राहकांसाठी रिचार्ज फ्री ऑफर जाहीर केली आहे. कंपनी लवकरच ५० लाख ग्राहकसंख्या अर्थात अडीच कोटी ग्राहकसंख्येचा टप्पा ओलांडण्याच्या तयारीत आहे. त्यानिमित्त ही खास योजना राबविण्यात येत आहे. ‘रिचार्ज फ्री ऑफर’ मार्चअखेपर्यंत लागू राहील. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना त्यांच्या रिचार्ज कार्डच्या मूल्याइतकाच लाभ मोफत मिळणार आहे. उदाहरणार्थ, ग्राहकाने २०० वा ५०० रुपये किमतीचे रिचार्ज फ्री सिल्व्हर पॅक घेतल्यास त्याला त्यावर तेवढय़ाच किमतीचे लाभ (२० टक्के मूल्याचे ‘अ ला कार्ते पॅक’ व ८० टक्के मूल्याचे ‘मूव्ही ऑन डिमांड’) मोफत मिळतील. ५०० रुपये किमतीचे रिचार्ज फ्री गोल्ड पॅक, ७०० रुपये किमतीचे रिचार्ज फ्री डायमंड पॅक,७०० किंवा १८०० रुपये किमतीचे रिचार्ज फ्री प्लॅटिनम पॅक घेतल्यास त्यावरही अशाच पद्धतीने मोफत लाभ मिळतील.

तिमाही निकाल
प्राज इंडस्ट्रीज: उत्पन्नात १६ टक्के वाढ

व्यापार प्रतिनिधी: प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडचे तिसऱ्या तिमाहीत उत्पन्न १६ टक्क्यांनी वाढून आधीच्या वर्षीच्या याच काळातील १८०.२३ कोटींवरून २१०.०५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. करपूर्व नफा २२ टक्क्यांनी वाढून ४६.८६ कोटी झाला आहे. आधीच्या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत ते ४०.७८ कोटी रुपये होते. चालू आर्थिक वर्षांच्या संपलेल्या नऊमाहीत उत्पन्न १५ टक्क्यांनी वाढून ४८९.९३ कोटींवरून ५६५.०९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

एअरटेलकडून ‘डिजिटल टीव्ही सेवे’चे अनावरण
व्यापार प्रतिनिधी:
मोबाईल सेवा देणाऱ्या एअरटेल कंपनीने लँडलाईन दूरध्वनी, ब्रॉडबँड इंटरनेट आणि केबल टीव्ही या तीन सेवा एकाच लाइनमधून देणारी यंत्रणा नुकतीच सुरू केली. दिल्ली, गुरगाव व नोएडा या तीन ठिकाणी ही नवीन सेवा सुरुवातीस आणण्यात आली असून लवकरच देशाच्या इतर भागात ती नेण्यात येईल. भारती एअरटेलच्या टेलीमिडिया विभागाचे अध्यक्ष अतुल बिंदाल यांनी या सेवेबद्दल माहिती देताना सांगितले. ‘दूरध्वनी ब्रॉडबँड व केबल टीव्हीच्या या नव्या सेवेसाठी आम्ही ‘आयपीटीव्ही हेडेन्ड’ हे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले आहे. यामुळे ग्राहकांना अधिकाधिक स्पष्ट चित्र आणि जलद इंटरनेट मिळू शकणार आहे. केबल टीव्हीमध्ये ‘व्हिडिओ ऑन डिमांड’ ही सुविधाही उपलब्ध आहे. टीव्हीवरील थेट प्रक्षेपण मध्येच थांबवून रेकॉर्डिग करण्याची सोयही यात आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी ५९८ आणि ९९९ रुपये दरमहा शुल्काच्या दोन योजना याकरिता आखण्यात आल्या आहेत.