Leading International Marathi News Daily                                 शनिवार, २४ जानेवारी २००९
अग्रलेख

ये तो केवल झांकी है!

 

आभाळात ढग जमा झाल्याबरोबर मोर जसा पिसारा फुलवून नाचू लागतो आणि लांडोरीला आकर्षित करण्यासाठी नृत्य करू लागतो तसे आपल्या राजकीय पक्षांचे आहे. कोणत्याही निवडणुकीची चाहूल लागली की अहंकारांचे, लाचारीचे, तडजोडीचे आणि ‘जोड-तोडी’चे पिसारे फुलविण्यासाठी स्पर्धाच सुरू होते. लोकसभा निवडणुकीचा सूर्य उगविण्यापूर्वी क्षितीजावर सध्या लाली पसरलेली आहे आणि सूर्य उगवल्यावर त्याच्या सप्तअश्वांकित रथावर स्वार होण्यासाठी अनेकांची लगबग सुरू झाली आहे. दर खेपेप्रमाणे याहीवेळी शरद पवारांनी आपला घोडा रिंगणात फेकला आहे. ‘अभी नही तो कभी नही’ अशा मनोवस्थेत पंतप्रधानपदाकडे नजर लावून बसलेल्या अडवाणी यांना मोदींच्या महत्त्वाकांक्षेने काळजीत पाडले आहे. स्वच्छ प्रतिमा ही मनमोहनसिंगांची जमेची बाजू ठरते की काय ह्य़ा धास्तीने अनेक ज्येष्ठ काँग्रेसनेते पछाडलेले आहेत. शिवाय मायावतींपासून तर लालूप्रसाद यादव यांच्यापर्यंत प्रत्येकाच्या चुलीवर स्वतंत्र ‘रेसिपी’ चुपचापशिजविली जात आहेच. पुढील काही महिन्यात राजकीय आघाडय़ांची आणि ‘बिघाडां’ची नवी नवी रुपे दिसणार आहेत, त्याची पहिली मोठी झलक कल्याणसिंग आणि मुलायमसिंग यांच्या हातमिळवणीने उत्तर प्रदेशात मिळाली आहे. एकेकाळी भाजपाच्या भगव्या महत्त्वाकांक्षेचा उत्तर प्रदेशातील आधारस्तंभ म्हणून कल्याणसिंगांकडे पाहिले जात होते. अवघ्या दीड दशकात कल्याणसिंग यांची झालेली राजकीय घसरण ही एकूणच भारतीय राजकारण्यांच्या सत्तालोलूप, संधीसाधू मनोवृत्तीचे प्रातिनिधीक दर्शन घडविणारी आहे. १९९१ साली कल्याणसिंग पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले तेव्हा अडवाणींच्या रथयात्रेने उडविलेल्या भगव्या धुरळ्यात सगळ्यांची मती गुंग झाली होती. धार्मिक श्रेष्ठत्वाच्या अहंकाराचे फुगे सर्वत्र टम्म फुगलेले होते. अशा वातावरणात बाबरी मशीद उद्ध्वस्त झाली होती. तेव्हा मुलायमसिंग यादव हे सर्वधर्मसमभावाचे प्रतिक म्हणून उभे ठाकले होते. त्यानंतरच्या १७ वर्षांत दैवगतीची चक्रे अशी फिरली आहेत की, कल्याणसिंग हे उत्तर प्रदेशातील सर्वोच्च प्रतिष्ठेचे नेते असल्याचा साक्षात्कार मुलायमसिंग यांना झाला आहे. आणि मुलायमसिंग हे उत्तर प्रदेशचे तारणहार असल्याची खात्री कल्याणसिंग यांना पटली आहे. कल्याणसिंग यांना अशी खात्री पटावी म्हणून मुलायमसिंग यांना फार कष्टही करावे लागले नाहीत. कल्याणसिंग यांचे पुत्र राजवीरसिंग यांना समाजवादी पक्षात प्रवेश देऊन त्यांची पक्षाचे महासचिव म्हणून प्रतिष्ठापना फक्त करावी लागली. पक्षात आपली अवहेलना आणि मानहानी केली जात असल्याचा आरोप करून कल्याणसिंग यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. यापूर्वी, म्हणजे १९९९ साली त्यांनी हीच कारणे देऊन पक्ष सोडला होता. पाच वर्षे त्यांनी स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व दाखविण्याची धडपड केली आणि अखेर २००४ साली ते परत भाजपात गेले. मानहानीची आणखी एक ‘पंचवार्षिक योजना’ पूर्ण करून आता ते पुन्हा पक्षाच्या मांडवातून बाहेर पडले आहेत. आपण समाजवादी पक्षात जाणार नाही आणि स्वत:चा पक्ष काढण्याची चूकही पुन्हा करणार नाही, असे ते आता सांगत आहेत. यावेळी भाजपला आपण ‘फायनल’ टाटा केला आहे, असेही ते म्हणत आहेत. परंतु लवकरच त्यांनी एखाद्या जाहीर समारंभात समाजवादी पक्षात प्रवेश केला आणि अमरसिंगांसह ‘व्ही फॉर व्हिक्टरी’ची बोटे उंचावत कॅमेऱ्यांना ‘पोज’ दिली तर आश्चर्य वाटू नये. कल्याणसिंग हे मुख्यमंत्री असताना त्यांनी राजनाथसिंग यांना प्रथमच मंत्री होण्याची संधी दिली होती. त्याच राजनाथसिंग यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करण्याची वेळ कल्याणसिंग यांच्यावर आली आहे. उत्तर प्रदेशात सध्या भाजपची स्थिती काही फार बरी नाही आणि काँग्रेसची तर त्याहूनही वाईट स्थिती आहे. मायावतीच्या वाढत्या वर्चस्वाला आव्हान देण्याची थोडीफार ताकद मुलायमसिंग यांच्याकडेच आहे. कल्याणसिंग हे लोध समाजाचे नेते आहेत. लोध आणि यादव हे दोन मोठे ‘गट’ एकत्र आले आणि काँग्रेसच्या समर्थनासह मुस्लिम मतदारांचाही पाठिंबा मिळाला तर उत्तर प्रदेशात एक नवी राजकीय शक्ती जन्माला येऊ शकते असा बहुधा मुलायम यांचा विचार दिसतो. भाजपला मात्र कल्याणसिंग यांच्या जाण्यामुळे काही विशेष फरक पडेलसे वाटत नाही. उत्तर प्रदेशात मुळातच फार जनाधार उरलेला नसताना कल्याणसिंग यांच्यासारखा प्रभाव हरवून बसलेला नेता पक्ष सोडून गेला, त्याला फार महत्त्व देण्याची गरज भाजपला वाटत नसेल तर ते साहजिक आहे. अर्थात म्हणून भाजपत सगळे आलबेल आहे असे नव्हे. मोदींनी सांगावे, मी पंतप्रधानपदाचा दावेदार नाही आणि अडवाणींनी म्हणावे, मोदी हे पंतप्रधान होण्यास सक्षम आहेत, असा ‘गनिमी कावा’ सुरू आहे. कल्याणसिंगांपाठोपाठ शत्रुघ्न सिन्हाही बंडाच्या पवित्र्यात उभे आहेत. सिन्हा यांना बिहारचा मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन पक्षाने म्हणे दिले होते. बिहारमध्ये भाजपला सत्ता स्थापण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्या आश्वासनाची पूर्ती पक्षाला करता आली नाही. पाटण्यातून लोकसभेची निवडणूक लढविण्याची संधी दिली जाईल, असे सिन्हा यांना सांगण्यात आले होते त्यालाही पक्ष जागला नाही. राज्यसभेची चार वर्षे शिल्लक असूनही भाजपने पाटण्यातून माजी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांचे नाव निश्चित केल्यामुळे शत्रुघ्न सिन्हा पक्ष सोडण्याच्या मन:स्थितीत आहेत. नाराज नेते आणि चित्रपट कलावंत यांना समाजवादी पक्षात आणून त्यांना तिकिटे देण्याचे कंत्राट अमरसिंह यांनी घेतलेले असल्यामुळे कदाचित शत्रुघ्न सिन्हा यांनाही उद्या मुलायमसिंगांच्या महानतेचा साक्षात्कार झाला तर मनाची तयारी ठेवली पाहिजे. अंमली पदार्थाचे सेवन, विना परवाना शस्त्र बाळगल्याचा आरोप, अंडरवर्ल्डमधील लोकांशी संबंध असल्याची चर्चा अशी ‘आवश्यक ती सर्व योग्यता’ प्राप्त असलेल्या अभिनेता संजय दत्तला अमरसिंह यांनी खासदारकीच्या घोडय़ावर बसविण्याचे प्रयत्न चालविले आहेतच. मान्यता या अभिनेत्रीशी झालेला किंवा न झालेला संजय दत्तचा विवाह, त्याविषयीची जाहीर चर्चा आणि आता संजय दत्तने धरलेली समाजवादी पक्षाची वाट हे सर्व पाहताना सुनील दत्त यांना मोठा मानसिक त्रास झाला असता. संजय दत्तची मिरवणूक काढली जाणे आणि त्या मिरवणुकीत जया बच्चनसारख्या अभिनेत्रीने सहभागी होणे हे उबग आणणारे आहे. राजकीय नेत्याचे भाषण, वागणूक आणि समज कशी असावी, समारंभ कसा नेटका असा याचा आदर्श ओबामा तिकडे अमेरिकेत सादर करत होते आणि त्याच वेळी भारतात ‘उद्याचे संभाव्य लोकप्रतिनिधी’ लोकांच्या मनावर उदासीनतेची छाया पसरवत होते. राज ठाकरे यांच्या पक्षाला किती जागा मिळतील यापेक्षा त्यांच्या पक्षाचा किती जणांना फटका बसू शकतो आणि अशी ‘नकारात्मक शक्ती’ मोजण्याची वेळ यावी हे केवढे मोठे दुर्दैव आहे? देशाच्या प्रगतीची स्वप्ने पाहणारा, देशाच्या विकासाची स्वत:ची अशी एक योजना किंवा विचार असणारा नेता म्हणून आज एकाही नेत्याची प्रतिमा नाही. व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेने पछाडलेले आणि त्या महत्त्वाकांक्षेपायी कोणाशीही आघाडी करण्याचा मार्ग खुला ठेवणारे नेतेच सर्वत्र दिसत आहेत. केंद्रात कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता आता मंदावलेलीच आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पक्षांच्या संभाव्य आघाडय़ा, पक्षांतर्गत दबावगट तयार करून आपले नेतृत्व पुढे रेटण्याचे प्रयत्न यासाठीचे विविध प्रयोग आता सुरू झाले आहेत. ‘कल्याणसिंग-मुलायमसिंग’ युती हा केवळ ‘ट्रेलर’ आहे. परंतु ‘ट्रेलर’ पाहून पुढचा चित्रपट कसा असेल याची कल्पना आपण करू शकतो. भाजपच्याच शब्दात सांगायचे तर, ‘ये तो केवल झांकी है, अभी बहोत कुछ बाकी है.’