o
Leading International Marathi News Daily                                 शनिवार, २४ जानेवारी २००९

‘स्लमडॉग मिलिऑनेर
या चित्रपटाविषयी एव्हाना बरंच काही लिहून आलंय. त्याला चार गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाल्यावर चर्चेला आणखी वेग, आणखी उधाण येणंही स्वाभाविक आहे. शिवाय गोल्डन ग्लोब जिंकल्यामुळे ऑस्करकडे जाणारी वाट सुकर झाल्याचेही संकेत मिळू लागले. मुळात या चित्रपटाचं कथासूत्र हाच आजच्या भारतीय प्रेक्षकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. टीव्हीवरचे रिअ‍ॅलिटी शोज आणि त्यातही विजेत्याला करोडपती बनवणारा ‘कौन बनेगा करोडपती’ रिअ‍ॅलिटी शो. विकास स्वरूपची ‘क्यू अ‍ॅण्ड ए’ ही या रिअ‍ॅलिटी शोचंच स्पष्ट सूचक शीर्षकातून करणारी कादंबरी, तिच्यावर डॅनी बॉयल या विदेशी दिग्दर्शकानं चित्रपट बनवणं, त्यासाठी अर्थातच पटकथेत गरजेनुसार बदल करणं, मुंबईच्या धारावीत त्यानं केलेलं चित्रीकरण आणि त्या प्रक्रियेत त्याला केवळ दिग्दर्शक म्हणून नव्हे, तर सामाजिक भान असलेला एक माणूस म्हणून आलेलं नवं भान, रहमानचं संगीत आणि यातल्या वास्तवाशी नातं असणारे बालकलावंत, अशी विविध अंगांनी चर्चा होत आली आहे. चित्रपटाला गोल्डन ग्लोब मिळताच अमिताभनं, चित्रपटात भारताच्या दारिद्रय़ाचं दर्शन घडवलं म्हणून टीका करीत आपल्या ‘देशप्रेमा’चा प्रत्यय आणून दिला आणि चित्रपट ऑस्करच्या उंबरठय़ावर येता येता झुग्गी झोपडी संयुक्त संघर्ष समितीचे महासचिव तपेश्वर विश्वकर्मा यांना साक्षात्कार झाला की, चित्रपटात झोपडपट्टीतल्या मुलांना ‘डॉग’ म्हणून संबोधलंय. (अमिताभ आणि तपेश्वर यांना हे भान गेले कित्येक दिवस चाललेल्या चर्चेनंतरही नेमकं चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मुहूर्तावर आलंय!) तर सांगायचा मुद्दा, एव्हाना या चित्रपटाची कथादेखील बहुतेकांच्या परिचयाची झाली आहे. हे कथासूत्र चमकदार आहे, यात शंकाच नाही. ते वेगळं आहे आणि तरीही प्रेक्षकांच्या आजच्या जगण्याशी जोडलेलं असं आहे.

इंडियन आयडॉल स्पर्धकांच्या मनात धाकधुक
प्रतिनिधी

इंडियन आयडॉलच्या सेटवर आता उरलेत फक्त सात स्पर्धक. परिक्षकांच्या अपेक्षांपेक्षा वेगळे वातावरण सध्या इंडियन आयडॉलवर अनुभवण्यास येत आहे. ज्या स्पर्धकांकडून परिक्षकांना खूप अपेक्षा होत्या, ज्यांचे वारंवार कौतुक होत होते तेच स्पर्धक आता, परिक्षकांचा भ्रमनिरास करत आहेत. याऊलट ज्या स्पर्धकांचे कौतुक होत होते, त्यांनी आता आपल्या मेहेनतीने आपल्यातील क्षमता दाखवून देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही आठवडय़ातील आपल्या आवाजाने त्याने या सर्व परिक्षकांना जणु खोटे ठरवले आणि केवळ प्रादेशिक मतांच्या आधारावर आपण या स्पर्धेत टिकलो नसून आपणही चांगले गाऊ शकतो हेच त्याने दाखवून दिले आहे. ‘आर्मी मॅन’ कपील थापा याने सुद्धा आपल्या आवाजाने व अदाकारीने परिक्षकांना आश्चर्यचकीत केले. सौरभी आणि प्रसनजीतने मात्र आपल्या गाण्यात कायम एकप्रकारचे सातत्य राखले आहे. तोर्षांला सुद्धा गेल्या आठवडय़ात टीक सहन करावी लागली होती. पण आता तिने आपल्या आवाजाची जादू दाखवून दिली आहे. पण राजदीपने मात्र परिक्षकांची निराशा केली. तो अजूनही परिक्षकांच्या अपेक्षांना खरा उतरत नसल्याचे परिक्षक सांगतात. या सगळ्या गोष्टीमुळे इंडियन आयडॉल मधील स्पर्धा दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर प्रचंड अनिश्चितता सेटवर जाणवत आहे. काय होणार या शनिवारी? हा उत्कंठावर्धक भाग शनिवारी रात्री ९.०० वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हीजनवर बघायला मिळेल.

‘ऑस्कर’मधली खरी चुरस कुणात?
ऑस्करची नामांकने जाहीर होतात तेव्हा चर्चेत नसलेल्या काही नावांचा समावेश झालेला पाहायला मिळतो. गोल्डन ग्लोबमध्ये किंवा आधी काहीच कामगिरी न केलेल्या चित्रपटांचा, कलाकारांना या नामांकनामुळे ओळख मिळते. यंदा फ्रोझन रिव्हरसाठी मेलिसा लिओसाठी मिळालेलं सवरेत्कृष्ट अभिनेत्रीसाठीच्या गटातील आणि द व्हिजिटरसाठी रिचर्ड जेन्किन्स यांना मिळालेलं सवरेत्कृष्ट अभिनेत्यासाठीचं नामांकन ही त्याची उदाहरणे. परभाषिक चित्रपटासाठी आपला तारे जमीं पर आधीच बाद झाला त्या गटात इस्राइलच्या गोल्डन ग्लोब विजेत्या वॉल्ट्झ विथ वशीर या चित्रपटाला नामांकन मिळाले. मात्र अ‍ॅनिमेशनच्या गटातून त्याला हद्दपार करण्यात आल्याने वॉल-ईचं जाहिररीत्या प्रमोशन करीत असल्याची टीका अ‍ॅकॅडमीवर केली जात आहे.

सेलिब्रिटींच्या उपस्थितीत उद्या गोरेगावात रंगणार
‘बदव रे बदव’ पतंगोत्सव

२६/११च्या कटू आठवणी पुसून काढण्यासाठी मुंबई आता सरसावली असून वेगवेगळे फेस्टिव्हल्स, मालवणी जत्रोत्सव, कोल्हापूर महोत्सव, कॉलेज फेस्टिव्हल्स या सांस्कृतिक महोत्सवांद्वारे मुंबईकरांना यात गुंतवू पाहात आहे. याच फेस्टिव्हल्सच्या धूममध्ये आता आणखी एका उत्सवाची भर पडली आहे आणि तो म्हणजे ‘बदव रे बदव’ पतंगोत्सव. अगदी अलीकडच्या काळापर्यंत मुंबईत किमान महिनाभर तरी लोक पतंग उडवायचे. परंतु आता संक्रांतीच्याच दिवशी पतंग उडवून झाली की मुंबईकरांचा हा शौक पूर्ण होतो. मुंबईकरांचा हा शौक आणखी पूर्ण करण्यासाठी ‘माध्यम’ या सेवाभावी संस्थेने येत्या रविवारी दुपारी ३.०० वाजल्यापासून गोरेगाव (पश्चिम) येथील आझाद मैदानात ‘बदव रे बदव’ हा पतंगोत्सव आयोजित केला आहे. डीजेच्या तालावर आणि सेलिब्रिटींच्या उपस्थितीत होणारा हा पतंगोत्सव विशेषत: एचआयव्ही/एड्स विरोधी जनजागृतीसाठी आयोजित करण्यात येणार असून मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेच्या अधिपत्याखाली होणाऱ्या या पतंगोत्सवात एचआयव्ही/एड्स विरोधी जनजागृतीपर घोषवाक्ये असलेले हजारो रंगीबेरंगी पतंग आकाशात उडविण्यात येणार आहेत. शिवसेना शाखा क्र. ४९ चे शाखाप्रमुख सुशील चव्हाण आणि महिला शाखा संघटक लोचना चव्हाण हे या महोत्सवाचे निमंत्रक आहेत. तर सेन्ट अ‍ॅन्जेलो कॉम्प्युटर्सचे या कार्यक्रमाला सहप्रायोजकत्व लाभले आहे. या पतंगोत्सवाचे उद्घाटन शिवसेना आमदार सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे.
एचआयव्ही/एड्सविरोधी जनजागृती अभियानांतर्गत आयोजिलेल्या या पतंगोत्सवादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केला असून त्यात झी सारेगमपचा महागायक अभिजीत कोसंबी, मंगेश बोरगावकर, विजय गटलेवार, नेहा राजपाल, लिटिल चॅम्प सागर फडके, राधिका नांदे हे कसलेले गायक या पतंगोत्सवात आपली कला सादर करणार आहेत. मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगना दिपाली सय्यद या पतंगोत्सवात ‘पतंग उडवित होते’ ही लावणी सादर करणार असून ‘एकापेक्षा एक’फेम सुकन्या काळण आणि याच कार्यक्रमाचे विेजेते नृत्यदिग्दर्शक नितिन आपले नृत्यकौशल्य सादर करणार आहेत. हा सगळा पतंगोत्सव भारताचा आघाडीचा डीस्क जॉकी डीजे विपिन याच्या तालावर थिरकणार आहे. या पतंगोत्सवाच्या आयोजनामागची संकल्पना सांगताना मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक डॉ. एस. एस. कुडाळकर यांनी सांगितले की, आकाशात पतंग उंच उडवून इतरांचे पतंग कापण्याचा प्रयत्न करतो त्याप्रमाणे तारुण्याचा जोशही उन्मादाच्या वेगात चुकीचे पाऊल उचलत असतो. त्याला आळा घालणे हे आपले कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य निभावण्यासाठी सध्या मानवजातीला एचआयव्ही/ एड्सचा जो शाप भोगावा लागतोय त्यापासून मुक्ती मिळण्यासाठी एचआयव्ही/ एड्स काय आहे हे समजून घेतले पाहिजे आणि त्यासाठी एचआयव्ही/एड्सविरोधी जनजागृती अभियानात आपण सगळ्यांनी सहभागी होणे गरजेचे आहे.
प्रतिनिधी