Leading International Marathi News Daily                                 शनिवार, २४ जानेवारी २००९
लोकमानस

साहित्याच्या कौतिकाची दांभिकता

 

‘सॅनहोजेच्या कौतिकाची’ (१९ जानेवारी) बातमी वाचून काही महिने जाणीवपूर्वक दाबून ठेवलेल्या भावनांचा उद्रेक झाला. मराठी भाषा व साहित्याच्या अपार प्रेमापोटी ‘बे एरिया’च्या मराठी भाषिकांनी सॅनहोजेमध्ये साहित्य संमेलन भरविण्याचे आमंत्रण दिले असा प्रचार खूप झाला. तेव्हा सॅनहोजेच्या मराठी प्रेमाची एक सुरस कथा सांगितल्याशिवाय राहवत नाही.
२००४ मध्ये तेथील एका तरुण युगुलाने एक ‘उद्योग’ केला त्याची ही कहाणी. सॅनहोजेमध्ये साधारण १५०० मराठी कुटुंबे राहतात. त्यांना चांगले व नवीन मराठी वाङ्मय वाचनासाठी उपलब्ध नाही. ते व्हावे व बुडीत न जाता एक वाचनालय चालविण्याच्या उद्देशाने या जोडप्याने मराठीतील उत्तमोत्तम ३५०-४०० पुस्तके जमवली (याची यादी मराठी लायब्ररीडॉटकॉम या संकेतस्थळावर अजूनही उपलब्ध आहे.) त्यात विविध पुरस्कारप्राप्त, ललित शिफारस इत्यादींनी नावाजलेली मुख्यत्वे कथासंग्रह तसेच कादंबऱ्या व काही ललित लेखनाची पुस्तके, धार्मिक ग्रंथ, उत्कृष्ट मराठी नाटक व सिनेमाच्या सी.डी. यांचा समावेश होता. १५०० कुटुंबांपैकी किमान १०० वाचक जरी मिळाले तरी बुडीत न जाता परंतु थोडी पदरमोड करून आठवडय़ास चार पुस्तके व एका पुस्तक वाचनाची ‘फी’ दोन डॉलर (अमेरिकेत कोठेही दोन डॉलर किमतीत फक्त कोका-कोला मिळू शकतो) इतकी अत्यल्प ठेवली व ही पुस्तके सॅनहोजेमध्ये विनामूल्य घरपोच देण्याची व्यवस्थाही निश्चित केली. त्याप्रमाणे या वाचनालयाची जाहिरात वाटली गेली. साधारण तीन महिन्यांच्या खटाटोपानंतर वाचनालयाला केवळ एक वाचक सभासद मिळाला! हे सभासद कुटुंब सोडता एक तेथील आपल्या मुलांना भेटायला आलेले वृद्ध दांपत्य येऊन गेले; परंतु ‘सहा महिनेच तर राहायचं, कशाला एका पुस्तकाचे दोन डॉलर द्या’ असे उघड स्वरात बोलून निघून गेले.
सॅनहोजेमध्ये संमेलन होईल. कदाचित हजारोंच्या संख्येने उपस्थितीही असेल. बरीच मराठी पुस्तकेही विकली जातील (नंतर आपल्या मराठी प्रेमाची प्रतीक म्हणून पानेही न फाडता काचेच्या कपाटात जाहिरात म्हणून मिरवली जातील). या मराठी साहित्यप्रेमाची दांभिकता भारतीयांना कळावी म्हणून ही ‘सत्य कथा’ सांगावीशी वाटली. त्यातून ज्याने त्याने आपले सार काढावे.
प्रकाश आपटे, अंधेरी, मुंबई

या कथाचौर्याचे कौतुक करावे की.?
मी विदर्भातील एक मान्यवर लेखिका असून आजपर्यंत माझी अनेक पुस्तके आणि कथा प्रकाशित झाल्या आहेत. ४ जानेवारी रोजी झी मराठी वाहिनीवर संध्याकाळी ७.३० वाजता प्रकाशित करण्यात आलेल्या ‘इश्श’ या चित्रपटाच्या नामावलीत कथा लेखिकेचे नाव ‘उषा राऊत’ असे असून निर्मात्याचे नाव ‘अशोक राऊत’ असे आहे. दिग्दर्शकाचे नाव ‘प्रशांत गिरकर’ असे आहे.
उपरोक्त चित्रपट माझ्या ‘भदे इज डिलिव्हर्ड नाऊ’ या कथेची भ्रष्ट नक्कल आहे. व. पु. काळे यांच्या ‘भदे इज प्रेग्नंट’ या कथेवरून स्फुरलेली ही कथा व. पुं.च्या नावाच्या उल्लेखासह मी लिहिली. नागपूर येथून प्रकाशित होणाऱ्या ‘तरुण भारत’च्या १९८१ सालच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या या कथेने फार धमाल उडवली होती. व. पुं.ना मी या कथेची एक प्रत नागपूर मुक्कामी भेट दिली होती.
अगदी हलक्या दर्जाचा मसाला वापरून, मूळ कथेमध्ये जुजबी फेरफार करून सादर केलेला हा चित्रपट पूर्णपणे माझ्या कथेवर बेतलेला आहे. लेखक आणि निर्मात्याच्या चलाखीला काय म्हणावे? या वाङ्मय चौर्याचे कौतुक करावे की ‘चलता है’ म्हणून गप्प बसावे? पण मग ‘राऊत’ मंडळी निर्ढावतील त्याचे काय? आज एका सुप्रिया अय्यरची कथा चोरता आली, उद्या आणखीन कुणाची मिळेल. उषा व अशोक राऊत पत्राची दखल घेतील काय?
सुप्रिया अय्यर, नागपूर

कर्तव्याची जाणीव संपली
‘त्रिकालवेध’ सदरातील विस्मृतिचित्रे (१० जानेवारी) हा हेन्री मोलायसन या व्यक्तीवरचा मृत्युलेख खूप आवडला. तसेच ‘द इकॉनॉमिस्ट’ साप्ताहिकाच्या या सदराची माहितीही समजली.
तसेच मुंबई शहराबद्दल रवींद्र पांचाळांनी लिहिलेल्या लेखाच्या शेवटी ‘हे माझे शहर आहे आणि ते मी स्वच्छ ठेवीन’ ही जाणीव मुंबईकरांना केव्हा येणार असे ते विचारतात. त्यांनी उल्लेखलेल्या गोष्टींव्यतिरिक्त कितीतरी ओंगळ गोष्टी आपल्याभोवती घडत असतात, पण आपण नाइलाजाने गप्प बसतो. शहाण्याला शब्दाचा मार वगैरे सौम्य म्हणी आता इतिहासजमा झाल्यात. यावर एक उपाय म्हणजे प्रत्येक विघातक कृत्य दंडनीय करणे. अगदी ट्रेनमध्ये समोरच्या बाकावर पाय पसरून बसणेसुद्धा. कारण तीही हल्ली सर्रास बाब झाली आहे. रेल्वेने जसे प्रायव्हेट टी. सी. नेमलेत तसे म्युनिसिपालिटीने रिसीट बुके देऊन सार्वजनिक ठिकाणी माणसे पेरावीत. बेरोजगारी कमी होईल आणि म्युनिसिपालिटीचे उत्पन्नही वाढेल. लोकशाहीच्या साठ वर्षांत फक्त हक्काची भावना बळावल्याचा हा एक परिणाम आहे असे म्हणावेसे वाटते.
साधना ताम्हणे, मुंबई

स्टार प्रवाह डी.टी.एच.वर का नाही?
स्टार प्रवाह ही नवीन मनोरंजन मराठी वाहिनी सुरू होऊन दीड महिना झाला तरी पण ही वाहिनी कुठलीही डी.टी.एच. कंपनी अजूनपर्यंत दाखवीत नाही. मी बिग टीव्हीचा ग्राहक आहे. डी.टी.एच. सेवेबद्दल कुठलीही तक्रार नाही, मी बिग टीव्हीच्या कस्टमर केअरशी संपर्क साधल्यावर अजूनपर्यंत उपलब्ध नाही. उपलब्ध झाल्यावर आपल्याला कळविण्यात येईल, असं उत्तर मिळते.
गोविंद परब, दहिसर, मुंबई