Leading International Marathi News Daily                                 शनिवार, २४ जानेवारी २००९

वादग्रस्त नामकरण करणाऱ्यांचा निषेध करत शहीद कामटेंचे अन्य रस्त्यास नाव
सातारा, २३ जानेवारी/प्रतिनिधी
संजय साठेंची सभापतिपदी निवड
रुग्णालय सेवा दरात वाढ
शिक्षण कर १० टक्के
शाहू कला मंदिर १० फेब्रुवारीला उद्घाटन
कॉम्रेड व्ही. एन. पाटील यांचे नाव जिल्हा परिषद चौक ते मोना स्कूल ते भीमाबाई आंबेडकर स्मारक (जरंडेश्वर नाका) या रस्त्यास देण्यावरून भाजपचे नरेंद्र पाटील यांनी हरकत घेऊन कालच त्या ठिकाणी शहीद अशोक कामटे मार्ग असा फलक लावला हा प्रकार म्हणजे दोन तीन मंडळांनी शहिदांची ढाल करून राजकारण करण्याचा प्रकार आहे. त्याचा आपण निषेध करतो अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष निशांत पाटील यांनी दिली व संबंधितावर कारवाई करण्यात येईल. अशोक कामटे यांच्याबाबत आदर असून, त्यांचे नाव पोवईनाका कालीदास पंप ते पोलीस परेड ग्राऊंड रस्त्यास देण्यात येईल असे सांगितले.

इचलकरंजी अर्बन बँकेच्या वसुलीवरून तणाव; प्रकाश ऑफसेटवर जप्तीची प्रक्रिया
इचलकरंजी, २३ जानेवारी/वार्ताहर

राजकीय आणि सहकार क्षेत्रात आघाडीवर असलेल्या खंजिरे कुटुंबीयांच्या प्रकाश ऑफसेटमधील इचलकरंजी अर्बन सहकारी बँकेच्या १ कोटी ६० लाख रुपयांच्या कर्जवसुलीवरून येथील खंजिरे कुटुंबीय, संचालक, पोलीस यांच्यात आज तणाव होता. सायंकाळी या फर्मवर जप्तीची प्रक्रिया करण्यात आल्यानंतरच हा तणाव संपुष्टात आला. खंजिरे कुटुंबीयांनी बँकेकडून सव्वापाच कोटी रुपयांचे कर्ज घेतले असून, एकूण कर्जापैकी १ कोटी ६० लाख रुपयांचे कर्ज थकले होते. थकीत कर्जवसुलीसाठी बँकेच्या व्यवस्थापनाने जप्तीची कारवाई पोलिसांच्या मदतीने आज सकाळी ११ वाजता सुरू केली. तेव्हा ही कारवाई बेकायदेशीर आहे.

जात, अधिवास, राष्ट्रीयत्वाचे दाखले शाळेतच देण्याची मोहीम
सांगली, २३ जानेवारी / प्रतिनिधी

सांगली जिल्ह्य़ातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांना जात, अधिवास व राष्ट्रीयत्वाचे दाखले शाळेतच देण्याची मोहीम जिल्ह्य़ात प्रभावीपणे हाती घेण्यात आली असून येत्या प्रजासत्ताकदिनापर्यंत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शाळेतच दाखले उपलब्ध करून दिले जातील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राजेंद्र चव्हाण यांनी शुक्रवारी केले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे दाखले शाळेत देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असून या उपक्रमांतर्गत मिरज विद्या समितीच्या मिरज येथील विद्या मंदिर प्रशालेतील विद्यार्थ्यांना जात, अधिवास व राष्ट्रीयत्वाचे दाखले जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांच्या हस्ते आज देण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

शिष्यवृत्तीसाठी निधी मंजूर होऊनही मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर कॉलेजकडून सक्ती
सोलापूर, २३ जानेवारी/प्रतिनिधी

शासनाने हिवाळी अधिवेशनात मागासवर्गीयांसाठी २२१ कोटींची शिष्यवृत्ती मंजूर केली असून, सोलापूर शहर आणि जिल्ह्य़ातील विविध महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची परीक्षा व शैक्षणिक शुल्कासाठी चाललेली अडवणूक थांबविण्यात यावी, अशी मागणी विशेष मागास प्रवर्ग संघर्ष समितीचे सरचिटणीस अशोक इंदापुरे यांनी केली आहे.

सुधारित योजनेमुळे आता मलकापूरला मुबलक पाणीपुरवठा
शाहूवाडी, २३ जानेवारी / वार्ताहर

सुधारित व विस्तारित नळपाणीपुरवठा योजनेमुळे या पुढील काळात मलकापूर शहरास मुबलक पाणीपुरवठा होईल, असे प्रतिपादन मलकापूर (ता. शाहूवाडी)च्या नगराध्यक्ष स्वाती बंके यांनी केले.
शहरासाठी शासनाच्या वर्धितवेग योजनेतून १ कोटी ६३ लाख रुपये खर्चाची नवीन सुधारित नळपाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेल बांधकामाचे भूमिपूजन करतेवेळी त्या बोलत होत्या.

राजारामबापू पाटील स्मृतिदिनी कला उत्सवाचे आयोजन
सांगली, २३ जानेवारी / प्रतिनिधी

लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या २५व्या स्मृतिदिनानिमित्त येथील कलापुष्प संस्थेच्या वतीने शनिवार दि. २४ व २५ जानेवारी रोजी १६व्या कला उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब पाटील यांनी दिली. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील मराठा समाज संस्थेच्या सभागृहात हा कला उत्सव आयोजित केला आहे.

मंडलिक-मुश्रीफ गटातील मारामारीतील जखमीचे निधन
कागल, २३ जानेवारी / वार्ताहर

तालुक्यातील मळगे बुद्रूक येथे मंडलिक-मुश्रीफ गटात झालेल्या मारामारीतील दिगंबर विश्वास पाटील (वय २४) याचे कोल्हापूर येथील डॉ.प्रभू यांच्या दवाखान्यात शुक्रवारी निधन झाले. त्यामुळे मळगे गावातील वातावरण तंग झाले असून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रविवारी या गावातील मंडलिक गटाचे कार्यकर्ते शरद पाटील व मुश्रीफ गटाचे कार्यकर्ते संजय पाटील यांच्यात बिद्री येथे वाद झाला होता व एकमेकास मारहाण झाली होती. गावातील काही मंडळींनी हा वाद मिटविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला असतानाच अचानक दगडफेक सुरू झाली व झालेल्या मारामारीत दिगंबर विश्वास पाटील (वय २५), अक्षय आनंदा पाटील (वय १३) व आप्पासो तुकाराम पाटील हे मंडलिक गटाचे तर भैरवनाथ भाऊसो पाटील, मुलगा दिगंबर भैरवनाथ पाटील (वय १९) हे मुश्रीफ गटाचे दोघे जखमी झाले. यातील दिगंबर विश्वास पाटील यास डोकीस मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला कोल्हापूर येथील डॉ.प्रभू यांच्या रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारास प्रतिसाद मिळत नव्हता. शुक्रवारी दुपारी तो मयत झाला. सदरच्या घटनेने मळगे गावातील वातावरण एकदम तंग झाले आहे. गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

देशी दारू दुकान हलविण्याची पट्टणकोडोलीत मागणी
इचलकरंजी, २३ जानेवारी / वार्ताहर

पट्टणकोडोली (ता.हातक णंगले) येथील मध्यवस्तीत असणाऱ्या देशी दारू दुकानाचा त्रास विद्यार्थीनी, महिलांना होत असल्याने ते इतरत्र हलवावे या मागणीसाठी प्रजासत्ताकदिनापासून ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे. गावातील शंभरावर महिलांनी निवेदनाद्वारे हा इशारा दिला आहे. गजानन नाझरे व पाटील यांचे दारूचे दुकान मुलींच्या प्राथमिक शाळेपासून ४० फुटावर आहे. मुख्य बसस्थानक व ग्रामदैवत विठ्ठल बिरदेव मंदिराच्या जवळच हे दुकान आहे. बस स्थानक व मंदिर याठिकाणी विद्यार्थीनी महिला, भाविकांची सतत वर्दळ असते. दारू दुकानातील मद्यपींचा त्यांना नेहमी त्रास होतो. त्यांच्या त्रासाला कंटाळलेल्या महिलांनी २६ जानेवारीपासून उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. निवेदनाद्वारे शालन माळी, शांताबाई अपराध, उज्वला माळी, अर्चना अपराध, मेघा पोतदार आदींच्या सह्य़ा आहेत.

सोनम काळेला राजर्षी शाहू पुरस्कार
मिरज, २३ जानेवारी / वार्ताहर

येथील कन्या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या सोनम नाथा काळे या विद्यार्थिनीला राजर्षी शाहूमहाराज पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सोनम काळे ही कन्या महाविद्यालयाच्या वरिष्ठ विभागातील कला शाखेत शिक्षण घेत आहे. उच्च माध्यमिक परीक्षेत सोनम काळे हिने उत्तुंग यश संपादन केल्याबद्दल राज्य शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राजर्षी शाहूमहाराज पुरस्कारासाठी तिची निवड झाली. या पुरस्काराप्रीत्यर्थ रोख पाच हजार रुपये तिला मिळाले असून, तिच्या या यशाबद्दल प्राचार्य राजू झाडबुके यांनी कन्या महाविद्यालयाच्या वतीने तिचे अभिनंदन केले आहे.

तोष्णीवाल ट्रस्टच्यावतीने डॉ. प्रजापती यांचे प्रवचन
सोलापूर, २३ जानेवारी/प्रतिनिधी

येथील स्व. शेठ गुलाबचंद लादुराम तोष्णीवाल ट्रस्टच्यावतीने दिल्लीचे डॉ. भिकमचंदजी प्रजापती यांची येत्या २७ जानेवारी ते १ फेब्रुवारीपर्यंत सात दिवस अनुपम प्रवचनमाला आयोजिली आहे. ‘परिवारामध्ये प्रसन्न राहण्याची कला’ या विषयावर डॉ. प्रजापती हे २७ जानेवारी ते १ फेब्रुवारीपर्यंत दररोज सायंकाळी ६ ते ८ यावेळेत हुतात्मा स्मृतिमंदिर येथे प्रवचन देणार आहेत. या प्रवचनामुळे माणसाच्या मनावर सकारात्मक बदल घडून येतो, असा दावा संयोजक डॉ. नवनीत तोष्णीवाल यांनी पत्रकारांना दिली.