Leading International Marathi News Daily                                  शनिवार, २४ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

वादग्रस्त नामकरण करणाऱ्यांचा निषेध करत शहीद कामटेंचे अन्य रस्त्यास नाव
सातारा, २३ जानेवारी/प्रतिनिधी

संजय साठेंची सभापतिपदी निवड
रुग्णालय सेवा दरात वाढ
शिक्षण कर १० टक्के
शाहू कला मंदिर १० फेब्रुवारीला उद्घाटन

 

कॉम्रेड व्ही. एन. पाटील यांचे नाव जिल्हा परिषद चौक ते मोना स्कूल ते भीमाबाई आंबेडकर स्मारक (जरंडेश्वर नाका) या रस्त्यास देण्यावरून भाजपचे नरेंद्र पाटील यांनी हरकत घेऊन कालच त्या ठिकाणी शहीद अशोक कामटे मार्ग असा फलक लावला हा प्रकार म्हणजे दोन तीन मंडळांनी शहिदांची ढाल करून राजकारण करण्याचा प्रकार आहे. त्याचा आपण निषेध करतो अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष निशांत पाटील यांनी दिली व संबंधितावर कारवाई करण्यात येईल. अशोक कामटे यांच्याबाबत आदर असून, त्यांचे नाव पोवईनाका कालीदास पंप ते पोलीस परेड ग्राऊंड रस्त्यास देण्यात येईल असे सांगितले.
नगराध्यक्ष निशांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी सभागृहात नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली. त्यामध्ये कॉम्रेड व्ही. एन. पाटील मार्ग, जिल्हा मध्यवर्ती बँक चौकास माजी मंत्री अभयसिंहराजे भोसले, सदर बझार पारसी अग्यारी समोरील बागेस हेमलताई पाटील, गेंजमाळ ते अर्कशाळा चौकास डॉ. मो. ना. आगाशे, कोटेश्वर मंदिर ते अर्कशाळेसमोरील रस्त्यास बन्याबापू गोडबोले शिवाय कै. शंकरराव गिरीगोसावी (कोटेश्वर मंदिर ते राधिका चौक रस्ता) व शंकरराव भोसले मार्ग (कोटेश्वर मंदिर ते बदामी विहीर रस्ता) आदी मान्यवरांची नावे देण्याचे ठरावासहित एकूण २९ विषय कोणतीही चर्चा न करता आवाजी मतदानाने संमत करण्यात आले.
समाज कल्याण सभापतिपदी नगरसेवक संजय साठे यांची निवड करण्यात आली. पालिकेच्या कस्तुरबा प्रसूतीगृह व गोडोली येथील दवाखान्याच्या वैद्यकीय सेवा दरामध्ये जिल्हा रुग्णालयातील दराप्रमाणे वाढ करण्यात आली. कंसामध्ये सध्याचे दर बाह्य़रुग्ण व गरोदर माता केसपेपर १५(२), इंजेक्शन १५(१०), मातासंगोपन कारड १०(५), प्रसूती १ ते २ पर्यंत ५००(२५०), प्रसूती ३ री ७०० (५००), प्रसूती ४ व त्यापुढील ८००(६००), टाके १००(९०), सलाईन लावणे ५०(०), सलाईन १२५(७५), कॉट भाडे १५(१०), प्रवेश फी + तपासणी ७५(३५). शिक्षण करामध्ये एकत्रित मालमत्तेच्या (घरपट्टी) ५ टक्के वाढ करूनही ती १० टक्के करण्यात आली आहे. पालिका शिक्षण मंडळाचा एकूण खर्च ७५ लाख होत असतो. तर २५ लाख रुपये शिक्षण कराद्वारे सध्या मिळत आहेत.
पोवईनाका ते जरंडेश्वरनाका सिव्हिल हॉस्पिटलमार्गे रस्ता १८ मीटर रुंदीच्या १ कोटी ४७ लाख ७५ हजार २०० रुपये खर्चाच्या कामास मंजुरी देण्यात आली.
शाहूकला मंदिराच्या ८०० नवीन खुच्र्याकरिता १२ लाखांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. नूतनीकरणाचे काम पूर्ण होत आले असून, येत्या १० फेब्रुवारी रोजी उद्घाटन करण्याचे नियोजन सुरू झाले असून, हसन मुश्रीफ, रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या तसेच बाळ कोल्हटकर, मोहन आगाशे, सयाजी शिंदे यांना निमंत्रित करून त्यांचा सत्कार व सांस्कृतिक महोत्सव स्थानिक रंगकर्मीच्या सहकार्याने भरविण्यात येणार आहे. १७ डिसेंबर रोजी विषय समिती सभापतींच्या निवडी प्रांताधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या. त्यावेळी त्यांनी सभेचे हजेरी पुस्तक नेले आहे. ते अद्याप परत केलेले नाही. नगराध्यक्षांच्या सहीने १० दिवसांपूर्वी पत्र पाठवूनही प्रांताधिकाऱ्यांनी हजेरी पुस्तक परत पाठविण्याऱ्याचे नाव आजअखेर काढले नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.