Leading International Marathi News Daily                                  शनिवार, २४ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

इचलकरंजी अर्बन बँकेच्या वसुलीवरून तणाव; प्रकाश ऑफसेटवर जप्तीची प्रक्रिया
इचलकरंजी, २३ जानेवारी/वार्ताहर

 

राजकीय आणि सहकार क्षेत्रात आघाडीवर असलेल्या खंजिरे कुटुंबीयांच्या प्रकाश ऑफसेटमधील इचलकरंजी अर्बन सहकारी बँकेच्या १ कोटी ६० लाख रुपयांच्या कर्जवसुलीवरून येथील खंजिरे कुटुंबीय, संचालक, पोलीस यांच्यात आज तणाव होता. सायंकाळी या फर्मवर जप्तीची प्रक्रिया करण्यात आल्यानंतरच हा तणाव संपुष्टात आला.
खंजिरे कुटुंबीयांनी बँकेकडून सव्वापाच कोटी रुपयांचे कर्ज घेतले असून, एकूण कर्जापैकी १ कोटी ६० लाख रुपयांचे कर्ज थकले होते. थकीत कर्जवसुलीसाठी बँकेच्या व्यवस्थापनाने जप्तीची कारवाई पोलिसांच्या मदतीने आज सकाळी ११ वाजता सुरू केली. तेव्हा ही कारवाई बेकायदेशीर आहे, असा आक्षेप घेत कारवाईला विरोध करणाऱ्या प्रकाश खंजिरे यांना पोलिसांनी बाजूला सारून प्रकाश ऑफसेट या फर्ममध्ये जप्ती पथकाला प्रवेश सुकर करून दिला. या वेळी पोलिसांनी प्रकाश खंजिरे, अरुण खंजिरे, प्रवीण खंजिरे, किशोर खंजिरे यांना बळाचा वापर करीत पोलीस गाडीत बसवले. जप्तीची कारवाई पूर्ण झाल्यानंतर वातावरण निवळले. जप्तीच्या कारवाईसाठी बँकेचे अध्यक्ष वसंतराव दत्तवाडे, उपाध्यक्ष सुनील तोडकर, तसेच तीन विशेष वसुली अधिकारी, ५० कर्मचारी यांचे पथक या जप्ती कारवाईत गुंतले होते. जप्तीची कारवाई सुरू करण्यापूर्वी या पथकाने पैसे भरण्यासाठी अर्धा तासाचा अवधी खंजिरे कुटुंबीयांना दिला होता, पण त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर जप्ती कारवाई सुरू झाली तेव्हा खंजिरे कुटुंबीयांनी विरोध सुरू केला. या वेळी पोलिसांनी लाठीमार केला. त्यामध्ये प्रवीण खंजिरे गंभीर जखमी झाले. कुटुंबीयातील इतर लोकांनाही लाठय़ांचा फटका बसला.