Leading International Marathi News Daily                                  शनिवार, २४ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

जात, अधिवास, राष्ट्रीयत्वाचे दाखले शाळेतच देण्याची मोहीम
सांगली, २३ जानेवारी / प्रतिनिधी

 

सांगली जिल्ह्य़ातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांना जात, अधिवास व राष्ट्रीयत्वाचे दाखले शाळेतच देण्याची मोहीम जिल्ह्य़ात प्रभावीपणे हाती घेण्यात आली असून येत्या प्रजासत्ताकदिनापर्यंत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शाळेतच दाखले उपलब्ध करून दिले जातील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राजेंद्र चव्हाण यांनी शुक्रवारी केले.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे दाखले शाळेत देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असून या उपक्रमांतर्गत मिरज विद्या समितीच्या मिरज येथील विद्या मंदिर प्रशालेतील विद्यार्थ्यांना जात, अधिवास व राष्ट्रीयत्वाचे दाखले जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांच्या हस्ते आज देण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष अनिल कुलकर्णी, प्रांताधिकारी बाळासाहेब कोळेकर, तहसीलदार डॉ. विकास खरात, गटशिक्षणाधिकारी नामदेव माळी, डॉ. विश्वजित चव्हाण व नंदकुमार सुतार आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना शाळेतच दाखले देण्याच्या उपक्रमामुळे विद्यार्थी व पालकांच्या वेळ व श्रमाची तसेच पैशाची निश्चितपणे बचत होणार असल्याचे स्पष्ट करून जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले की, या उपक्रमामुळे पालक व विद्यार्थ्यांची मोठी सोय होत असून जिल्ह्य़ात या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. भविष्यात या प्रकल्पास ‘सांगली पॅटर्न’ म्हणून लौकिक प्राप्त होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. या उपक्रमास शिक्षण संस्था, शिक्षक, पालक व शाळा यांच्यासह संबंधित शासकीय विभागाचे महत्त्वपूर्ण योगदान मिळत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी जिद्द व परिश्रमातून विशेष यश संपादन करावे, असा सल्ला देऊन ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शिक्षण व संस्कारातून नवसमाज निर्मितीसाठी प्रयत्नशील राहावे. सामाजिक व नैतिक मूल्यांची जोपासना करण्याबरोबरच निर्णयशील व नम्र या भूमिकाही जोपासणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. सांगली जिल्ह्य़ाच्या दुष्काळी भागाला साहाय्यभूत ठरणारा नद्या जोड प्रकल्प जिल्हा प्रशासनाने हाती घेतला असून या प्रकल्पासाठी जिल्हा वार्षिक आराखडय़ात एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सध्या या प्रकल्पांतर्गत दुष्काळी भागातील पाणी अडविण्यासाठी ३४ कामे सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहेत. शासनस्तरावर ९६ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविला असून या प्रस्तावास लवकरच मान्यता मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तसेच जिल्ह्य़ातील युवकांना उद्योग व्यवसायासाठी प्रशिक्षण मिळावे, याकरिता जिल्हा वार्षिक आराखडय़ात ५० लाख रुपयांची तरतूद करून सुमारे ५२ ट्रेडचे प्रशिक्षण दिले आहे. तसेच सुमारे १५० युवकांची उद्योग व्यवसायासाठीची प्रत्येकी २५ लाख रुपयांची प्रकरणे मंजुरीची शिफारस करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले. याप्रसंगी अनिल कुलकर्णी यांचेही भाषण झाले. प्रारंभी मुख्याध्यापक एस. एस. देशपांडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पर्यवेक्षक बी. एम. पलकानावार यांनी या उपक्रमाची माहिती दिली. मिलिंद कुलकर्णी यांनी आभार मानले.