Leading International Marathi News Daily                                  शनिवार, २४ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

राजारामबापू पाटील स्मृतिदिनी कला उत्सवाचे आयोजन
सांगली, २३ जानेवारी / प्रतिनिधी

 

लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या २५व्या स्मृतिदिनानिमित्त येथील कलापुष्प संस्थेच्या वतीने शनिवार दि. २४ व २५ जानेवारी रोजी १६व्या कला उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब पाटील यांनी दिली.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील मराठा समाज संस्थेच्या सभागृहात हा कला उत्सव आयोजित केला आहे. शनिवार, दि. २४ जानेवारी रोजी खुल्या राज्यस्तरीय प्रत्यक्ष निसर्गचित्रण व व्यक्तिचित्रण स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत राज्यातील ४०० हून अधिक स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. सायंकाळी सहा वाजता पहिल्या भारतीय अ‍ॅनिमेशन फिल्मचे जनक ज्येष्ठ अ‍ॅनिमेटर व्ही. जी. सामंत यांचे एलसीडी शोद्वारे व्याख्यान होणार आहे. तसेच ख्यातनाम चित्रकार रवि मंडलिक यांच्या कलाकृतींचाही स्लाईड शो होणार आहे.
रविवार, दि. २५ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता प्रसिद्ध व्यक्तिचित्रकार वासुदेव कामत यांचे व्यक्तिचित्रणाचे प्रात्यक्षिक होणार आहे. त्यानंतर या कला उत्सवाचे उद्घाटन गृहमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. याच वेळी ‘अन्वयार्थ’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन, स्मृती पुरस्कार, राज्यस्तरीय निसर्ग व व्यक्तिचित्रण आदी स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे. यंदाचा कलातपस्वी गणपतराव वडणगेकर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत, तर चित्रकार विश्वनाथ नागेशकर स्मृती पुरस्कार ख्यातनाम चित्रकार रवि मंडलिक यांना देण्यात येणार आहे.
या उद्घाटन कार्यक्रमानंतर शिल्पकार शरद कापूसकर यांचे व्यक्तिशिल्पाचे प्रात्यक्षिक, दुपारी दोन वाजता चित्रकार रवि मंडलिक यांचे ‘माध्यम व तंत्र’ या विषयावर प्रात्यक्षिक होणार आहे.
सायंकाळी पाच वाजता चित्रकार वासुदेव कामत, रवि मंडलिक व शिल्पकार शरद कापूसकर यांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ कला समीक्षक श्रीराम खाडिलकर हे घेणार आहेत. तरी या कला उत्सवातील सर्व कार्यक्रमांस रसिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही प्रा. पाटील यांनी केले आहे.