Leading International Marathi News Daily                                  शनिवार, २४ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

सुधारित योजनेमुळे आता मलकापूरला मुबलक पाणीपुरवठा
शाहूवाडी, २३ जानेवारी / वार्ताहर

 

सुधारित व विस्तारित नळपाणीपुरवठा योजनेमुळे या पुढील काळात मलकापूर शहरास मुबलक पाणीपुरवठा होईल, असे प्रतिपादन मलकापूर (ता. शाहूवाडी)च्या नगराध्यक्ष स्वाती बंके यांनी केले.
शहरासाठी शासनाच्या वर्धितवेग योजनेतून १ कोटी ६३ लाख रुपये खर्चाची नवीन सुधारित नळपाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेल बांधकामाचे भूमिपूजन करतेवेळी त्या बोलत होत्या. सध्या या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील एक कोटी रुपये खर्चाची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. यामध्ये वितरणनलिका, पाणी टाकी यासह अन्यही काही कामांचा अंतर्भाव आहे. दुसऱ्या टप्प्यातील सुमारे ६३ लाख रुपये खर्चाच्या जॅकवेल व तद्नुषंगिक कामाचे भूमिपूजन झाले. अल्पावधित ही योजना पूर्ण होऊन शहरास मुबलक व स्वच्छ पाणीपुरवठा होऊन नगरवासीयांची पाण्याची समस्या मार्गी लागेल, असा विश्वास नगराध्यक्ष स्वाती बंके यांनी व्यक्त केला.
या वेळी उपनगराध्यक्ष रमेश चांदणे, नगरसेवक प्रवीण प्रभावळकर, विनायक कुंभार, बाबासाहेब पाटील, राजेंद्र देशमाने, श्यामराव लोखंडे, सत्यशील देसाई, मीलन बर्डे, शालन सोनावळे, ज्योती शिरगावकर, विकास तांदळे, बबन सनगर, सुधाकर पाटील, मुख्याधिकारी प्रभाकर पत्की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी प्रकाश वर्णे आदी उपस्थित होते.