Leading International Marathi News Daily                                  शनिवार, २४ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

मौलाना आझादांचा बहुसांस्कृतिक राष्ट्रवाद देशाला उपयुक्त - येळेगावकर
सोलापूर, २३ जानेवारी/प्रतिनिधी

 

धर्माच्या आधारावर बॅरिस्टर जीना यांनी मांडलेल्या राष्ट्रवादाला आणि अल्लामा इक्बाल यांच्या सर्व जग इस्लाममय करण्याच्या संकल्पनेला मौलाना अबुल कलाम आझाद यांनी प्रखर विरोध करून त्यांचा बहुसांस्कृतिक राष्ट्रवाद देश अखंड व एकात्म ठेवण्यास उपयुक्त ठरणारा असल्याचे मत प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी व्यक्त केले.
येथील सोशल महाविद्यालयाच्या उर्दू बज्मे अदबने मौलाना अबुल कलाम आझादांच्या जीवनकार्यातील विविध पैलूंवरील विद्यार्थ्यांच्या शोधनिबंधाच्या वाचन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. येळेगावकर बोलत होते. प्रा. सईदा शेख यांनी प्रास्ताविकात उर्दू बज्मे अदबच्या उपक्रमाची माहिती दिली. प्राचार्य के. एम. जमादार यांनी सर्वाचे स्वागत केले. मौलाना अबुल कलाम आझादांनी स्वातंत्र्यपूर्व काळात मांडलेल्या बहुसांस्कृतिक राष्ट्रवादाची आणि धार्मिक सहिष्णुतेची संकल्पना धार्मिक, जातीय, वांशिक आणि भाषिक विविधता असलेल्या भारत देशाला उपयुक्त ठरणारी आहे. ती देशाला एकसंध, अखंड आणि एकात्म ठेवू शकेल. त्यांनी स्वातंत्र्यापेक्षा हिंदू-मुस्लिम ऐक्याला महत्त्व दिले होते, असे सांगून डॉ. येळेगावकर म्हणाले, की मौलाना आझादांचे विचार हे केवळ भाषणांचे आणि लेखांचे विषय न राहता ते आचरणाचे विषय झाले पाहिजे.
बशीर परवाझ यांनी मुस्लिम लीगने पाकिस्तान निर्माण झाल्यास इस्लामी राजवट स्थापन होईल, असा भूलभुलैया दाखविला होता. त्याला बळी पडू नये, असे आवाहन मौलाना आझाद यांनी करून फाळणीला विरोध केला होता. त्यांचे व्यक्तिमत्त्व अनेक पैलूंनी समृद्ध होते, ते मानवतावादी होते, असे सांगितले.
या वेळी शगुफ्ता आरेवाले (आझादांची लेखनशैली), गजाला सगरी (आझादांचे व्यक्तिमत्त्व), मोहसीन शेख (आझादांचे शिक्षणमंत्री म्हणून कार्य), शमा मनियार (आझादांबद्दल समकालीनांची मते), सुमय्या बागवान (संपादक मौलाना आझाद) या विद्यार्थ्यांनी शोधनिबंध वाचले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गौस शेख यांनी, तर आभार प्रदर्शन समरीन खान यांनी केले.