Leading International Marathi News Daily                                  शनिवार, २४ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

दिलीप शिंदे, मोरे यांना समाजभूषण पुरस्कार
सांगली, २३ जानेवारी / प्रतिनिधी

 

सांगली जिल्हा गोंधळी, वासुदेव, जोशी व बागडी समाज सेवा संघाच्यावतीने देण्यात येणारा समाजभूषण पुरस्कार मुंबई महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक दिलीप शिंदे, तर समाज गौरव पुरस्कार ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नारायण सटवाजी मोरे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण शनिवार दि. २४ व २५ जानेवारी रोजी सांगली येथे आयोजित राज्यव्यापी अधिवेशनात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रकाश काळे यांनी दिली.
सांगली- कोल्हापूर रस्त्यावरील एसटी कामगार भवननजीकच्या वसंतदादा क्रीडा मंडळाच्या क्रीडांगणावर गोंधळी, वासुदेव, जोशी व बागडी समाज सेवा संघाचे राज्यव्यापी अधिवेशन होत आहे. या समाजाच्यावतीने प्रथमच राज्यव्यापी अधिवेशन भरविण्यात येत आहे. या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष पी. डी. सुगते यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रासह कर्नाटक व गोवा राज्यातील सुमारे २० हजारहून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. समाज सेवा संघाच्यावतीने देण्यात येणारा समाजभूषण पुरस्कार मुंबई महापालिकेत तीनवेळा नगरसेवकपद भूषविलेले दिलीप शिंदे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नारायण मोरे यांना समाज गौरव, तर पुणे येथील अशोक शिंदे यांना युवा भूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
शनिवार दि. २४ जानेवारी रोजी या अधिवेशनाच्या उद्घाटन कार्यक्रमास महसूलमंत्री डॉ. पतंगराव कदम, पणनमंत्री मदन पाटील, काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष जयवंतराव आवळे, खासदार प्रतीक पाटील, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रकाश शेंडगे, हाफिज धत्तुरे, प्रकाश आवाडे, परभणीचे जिल्हाधिकारी मोहनराव ठोंबरे, व्यंकटराव अवधूत व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोकुळ मवारे आदी उपस्थित राहणार आहेत. याचदिवशी रेणके आयोगावर विशेष परिसंवादाचे आयोजन केले असून त्यात शिवाजी विद्यापीठाचे मराठी विषयाचे विभागप्रमुख डॉ. विश्वनाथ शिंदे, राजेंद्र नवारसे, व्यंकटराव अवधूत, डॉ. दिगंबर दयाळ व बबनराव हतळगे आदी सहभागी होणार आहेत. त्यानंतर राज्यस्तरिय गोंधळी लोककला व वासुदेव गीतगायन स्पर्धेचे आयोजन केले आहे.
रविवार दि. २५ जानेवारी रोजी ‘महाराष्ट्रातील गोंधळ व गोंधळी समाजाची ऐतिहासिक कामगिरी’ या विषयावर प्रा. अभिजित ननावरे यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी बारा वाजता राज्यस्तरिय वधू- वर व पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे. त्यानंतर सायंकाळी चार वाजता या अधिवेशनाची सांगता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी सांगली संस्थानचे राजे विजयसिंह पटवर्धन, परमपूज्य तुकाराम महाराज, आमदार परशुराम उपरकर, संजय पाटील, सुरेश खाडे, अजित घोरपडे, महापौर मैनुद्दीन बागवान, सभागृह नेते सुरेश आवटी व भालचंद्र फडके आदी उपस्थित राहणार आहेत.